चॉकलेट फॅक्टरी..
मला अंधुक आठवतंय. मी खूप लहान होतो तेव्हाची गोष्ट आहे. आमच्या मागे असलेल्या बिल्डिंग मध्ये पडदा लावून तेव्हा मुद्दाम कृष्णधवल सिनेमे दाखवत. कारण कोणीतरी सांगितलं त्यानुसार ते रंगीत सिनेमांपेक्षा स्वस्त मिळायचे. त्यामुळे त्या इमारतीच्या कमी बजेट मध्ये ते अतिशय जुने कृष्णधवल सिनेमे दाखवत! तर त्या दिवशी कसलीतरी पूजा होती त्या इमारतीत आणि त्या निमित्ताने रात्री पडदा लावून सिनेमा. आम्ही आमच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीतून सिनेमा बघत होतो. आम्ही म्हणजे माझी आत्या आणि तिच्या मांडीवर बसलेला लहानगा मी. सिनेमा होता फंटूश. ते मजेशीर नाव तेव्हा जे लक्षात राहील ते आजवर. सिनेमा डोक्यावरून गेला पण त्यातलं “ए मेरी टोपी पलट के आ..” ह्या गाण्याच्या फक्त त्या वेळी ऐकलेल्या गाण्याच्या पहिल्या चार ओळी आजही लक्षात आहेत. आणि डोळ्यासमोर आहे ती त्या गाण्यात हवेत उडणारी टोपी आणि तिच्यामागे गाणं गात उड्या मारत फिरणारा हसऱ्या चेहऱ्याचा नट. त्याचं नाव देव आनंद होत हे बरंच नंतर कळलं. पण त्या वयानुसार मजेशीर वाटणारी उडणारी टोपी आणि त्यामागे धावणारा नट डोक्यात कायम फिक्स झाले.
नंतर थोडं मोठं झाल्यावर रविवारी टीव्हीवर लागणाऱ्या अनेक सिनेमात त्याच देव आनंदला केसांचा कोंबडा काढून, ढगळ कपड्यात अनेक गाण्यात तसाच डोळे मिचकावत धावताना पाहिला आणि बालपणीची फंटूश मधील टोपीच्या मागे धावणाऱ्या हसऱ्या देव आनंदची ओळख पटली!
आम्ही लहान असतानाचा काळ अमिताभ, विनोद, ऋषी, शशी, शत्रू, सेकंड हाफ मधला धर्मेंद्र, संजीव कुमार, जितू ह्यांचा होता. त्यांना बघत आम्ही तारुण्यात आलो आणि तेव्हा मग सनी, जॅकी, अनिल आणि पुढे खान मंडळी बघत सिनेमा अनुभवत गेलो. पण तेव्हाही देव आनंदचे सिनेमे येतच होते. पण ते आम्हालाही आवडले नाहीत तर ज्यांनी द देव आनंदचा सुवर्णकाळ पाहिलेल्या त्याच्या भक्तांना आवडणं शक्यच नव्हतं. पण देवाला फरक पडला नाही. कारण त्याचे असंख्य चाहते त्याच्या जितके प्रेमात होते त्याच्या कित्येक पट जास्त तो स्वतःच्या आणि सिनेमाच्या प्रेमात होता. म्हणूनच हिट किंवा फ्लॉपची पर्वा न करता तो सिनेमाच्या प्रेमासाठी सिनेमा काढत राहिला आणि स्वतःवरच्या प्रेमासाठी स्वतःलाच त्यात नायकाची भूमिका देत राहिला. अनेकांनी चेष्टा केली, सिनेमे पडत राहिले तरी तो काढत राहिला! पण हा आहे आम्ही पाहिलेला त्याचा उतार वयातील पडता काळ!
पण आमच्या जन्माच्याही कित्येक आधी देव आनंद हा हिंदी सिनेमावर राज्य करणाऱ्या देव राज दिलीप ह्या साम्राटांपैकी एक होता. म्हणजे “ही शान कोणाची?” ला “आपल्या देव आनंद ची!” अशी आरोळी आली असती अशी त्याची शान होती त्यावेळी. मी वडीलधाऱ्या लोकांकडून त्याबद्दल फक्त ऐकून आहे. त्या तिघांपैकी मला राज कपूर नेहमी लबाड आणि स्वार्थी वाटला. दिलीप कुमार रड्या आणि नाटकी. पण देव आनंद हसरा, दिलदार आणि सदाबहार वाटला नेहमीच. अर्थात अभिनयात दिलीप कुमार लेजंड होता. राज आणि देव कदाचित त्या बाबतीत थोड्याफार फरकाने सारखे म्हणता येतील. पण अभिनयातील उणिवा दोघांनी आपापल्या चार्म ने भरून काढल्या. त्यातही देव आनंद म्हणजे जिवंत चैतन्य, स्टाईल आणि चार्म ओव्हर लोडेड! माझ्या मते देव आनंद हा हिंदी सिनेमातील पहिला चॉकलेट हिरो होता. मी त्याला चॉकलेट फॅक्टरी हिरो म्हणतो इतका गुलछबु देखणा होता तो त्याच्या तरुणपणी! खोया खोया चांद, तू कहां ये बता, अच्छा जी मै हारी, अभी न जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता अश्या गाण्यांमध्ये त्याला बघा. चॉकलेट फॅक्टरी फक्त! त्याचं ते मिस्कील, अवखळ आणि भुरळ पडणारं स्माईल, कधी मोठे होणारे तर कधी मिचकावणारे बोलके डोळे, सरळ नाक, केसांचा तो कोंबडा आणि तुकतुकीत शुचिर्भूत चेहरा! खल्लास हँडसम होता देव त्याच्या उमेदीच्या काळात! पुढे ज्वेलथिफ, जॉनी मेरा नाम अश्या रंगीत सिनेमात येईपर्यंत त्याचा तो कृष्णधवल सिनेमातील डार्क चॉकलेट चार्म थोडा कमी झाला होता असं मला वाटतं. पण दिसला चिकणाच. इतका चिकणा बस कंडक्टर असेल तर बायका स्टार्ट टू एन्ड अँड रिटर्न असा प्रवास दिवसभर करत राहतात हे अनुभवल्यामुळे कदाचित त्याने ती नोकरी सोडली असेल! असो तर देव चे सिनेमे! गाईड मध्ये त्याने “देव ला अभिनय फार जमत नाही. तो लुक वर सिनेमा खेचतो” असं म्हणणाऱ्या लोकांना गप्प केलं! त्याचा गाईड कितीही वेळा पाहिला तरी आवडतो!
पण गोल्डी लवकर गेला आणि मग देव पुढे स्वतः सबकुछ टाईप सिनेमे बनवू लागला. वय वाढत होतं. कथांचा दर्जा खालावत गेला आणि काही वेळा देव चेष्टेचा विषय ठरला! पण ते टीकाकारांपुरतं मर्यादित होतं. सिनेमाच्या आणि स्वतःच्या प्रेमात असलेल्या देव ला त्याने काहीच फरक पडत नव्हता. त्या प्रेमाखातर तो सिनेमे बनवत राहिला. त्याच्या समकालीन दिलीप, राज ह्यांनी उतार वयाच्या चरित्र भूमिका करायला सुरुवात केली, वहिदा पासून नूतन पर्यंत त्याच्या सगळ्या नट्या केव्हाच पडद्यावर आई झाल्या होत्या पण देव शेवटपर्यंत फक्त हिरो राहिला. मेंटेड राहिला. त्याचा स्कार्फ, कोट आणि चार्म ह्यांनी स्वतःच वय लपवायचा प्रयत्न करत राहिला! कारण वय, म्हातारपण त्याला मान्यच नव्हतं. ऐंशी वर्षांचा झाल्यावरही त्याचा उत्साह दांडगा होता. त्याचे उतार वयातील काही इंटरव्ह्यू पाहिल्यावर त्याचं सिनेमा विषयी पॅशन लक्षात येतं!
देव आनंद हे हिंदी सिनेमाच्या इतिहासातील एक महत्वाच प्रकरण आहे. कधी इतिहास लिहिला गेला तर देव बद्दल एक मोठा खंड त्यात नक्कीच असेल. खरं तर तो माझ्या आजोबांच्या वयाचा. पण नट आणि क्रिकेटर वर आमचा फॅन्स म्हणून इतका हक्क असतो की त्यांना अहो जाओ केल्यावर उगाच परकं वाटतं. म्हणून त्यांचा एकेरी उल्लेख केला जातो. त्यात त्यांचा अपमान करायचा उद्देश अजिबात नसतो. आणि देव कधी भेटला असता आणि मी त्याला आजोबा म्हणालो असतो तर चिडून तो “मला बडी म्हण यार” अस म्हणत माझ्या खांद्यावर हात टाकून तरातरा चालत मला ओढत घेऊन गेला असता ह्याची खात्री आहे!
गेला त्याहून फक्त बारा वर्षे जास्त जगला असता तर आज देव शंभर वर्षांचा झाला असता! आणि आपल्या शंभरीच्या मुहूर्तावर त्याने आज नव्या सिनेमाची घोषणा केली असती. सिनेमाचा लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संकलक आणि हिरो देव स्वतः आणि हिरॉईन मध्ये आलिया, कियारा किंवा सुहाना खानची वर्णी लागली असती आणि त्यांनीही ती भूमिका आनंदाने स्वीकारली असती! कारण देव कधी म्हातारा होत नसतो! भारताच्या पहिल्या चॉकलेट फॅक्टरीला शंभराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
©मंदार जोग यांच्या फबी पोस्ट वरून साभार