ये कान्हा,मधुसूदना, एकदा तरी ये। या कलियुगात, सुदर्शन तुझे घेऊन ये।।
कृष्ण.….
देवकीचा सुपुत्र..
यशोदेचा कान्हा..
राधेचा कृष्ण..
गवळणींचा गोपी..
सांदीपनी ऋषींचा आवडता शिष्य..
सुदामाचा परममित्र..
द्रोपदीचा सखा..
अर्जुनाचा बंधू..
रुख्मिणीचा नाथ..
मीराचा गिरीधर..
आणि राजा द्वारकाधीश.
कितीतरी रूपे तुझी.प्रत्येक रुपात फक्त कर्तव्य करत राहिलास.तुझं अफाट चरित्र वाचताना अचंबित व्हायला होतं.अगदी लहान वयात सुद्धा तुझ्या गोष्टी ऐकताना भारावल्यासारखं व्हायचं.वसुदेव तुला टोपलीत घालून नदीतून नेताना,तुझ्या इवल्याश्या पावलांच्या स्पर्शाने नदीचे पाणी कमी करणारा,गोवर्धन पर्वत उचलणारा, कालिया मर्दन करणारा,सुकुमार वयात कंसाचा वध करणारा, चोरून लोणी खाणारा,तुझ्या बासरी वादनाने गोकुळातल्या गायींना मोहविणारा,सुदाम्याचे पोहे खाणारा,एवढाच काय तो कृष्ण माहित होता.
पण जसं वय वाढलं तसं तुझं कर्तृत्व, तुझं आरपार भेदणं, प्रत्येक कृतीमागची तुझी तळमळ..कितीतरी गोष्टींचा उलगडा झाला. दौपदीला भर सभेत वस्त्र पुरवून तिची लाज राखणारा, कर्णासाठी विव्हल झालेल्या कुंतीला समजावून सांगणारा की पाच पांडव जिवंत राहतील, कर्ण अथवा अर्जुन. नरकासुराने बंदिस्त केलेल्या सोळा हजार स्त्रियांना अभय देणारा आणि त्यांचे स्वजन त्यांना स्वीकारणार नाही म्हणून त्या सगळ्या उपवर राजकन्यांशी विवाह करून त्यांना सौभाग्य देणारा तूच तर होता. सगळ्यांचा कळस म्हणजे रणभूमीवर अर्जुनाने शस्त्रत्याग केल्यावर त्याला धर्म आणि अधर्म काय हे गीतेतून सांगणारा. ‘गीता’, हे तर आयुष्य जगण्याचं सार. पुढील कित्येक युगांसाठी तुझी ही शिकवण.
सगळ्यात असून नसल्यासारखा होतास, अगदी अलिप्त. यशोदेला सोडून गेलास ते परत मागे वळून न बघण्यासाठी. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच होतं का मधुसूदना? अगदी यादवी माजली तेव्हा सुद्धा? तेव्हा नक्कीच नसेल. तेव्हा आयुष्यात सगळी कर्तव्य निभावून थकलेला एक साधा माणूस असशील.आयुष्यभर सगळ्यांच्या हाकेला धावून जाणारा तू पण तुझ्या अंतिम समयी कोणाच्या तरी खांद्यावर विसावा घ्यावा असं कुणीच तुझ्याजवळ नव्हतं.सगळ्यात मनाला टोचणारा आहे तो तुझा अंत. एका पारध्याच्या हातून शापामुळे तुला मरण येणं. तू प्रत्यक्ष विष्णूंचा पूर्णावतार. तुला सगळंच माहिती होतं. पण तुझा एकाकी शेवट वाचताना डोळे भरून येतात.गांधारीच्या शापाने यदुवंशाचा नाश होताना तुला बघवले नाही,म्हणून जंगलात जाऊन वास्तव्य केलेस. तिथे एका शिकाऱ्याच्या बाण लागून तुला मृत्यू यावा? नव्हे,ते केवळ निमित्त होतं. तुला तुझा अवतार संपवायचा होता. ह्यातूनही तुला काहीतरी सुचवायचंच असेल, जे आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या आकलनाच्या पलिकडे आहे. तुझी सगळीच रूपं हृदयात जपावी अशी. ह्या कलियुगात कल्की नव्हे,तुझी गरज आहे. उत्तम राजकारणी, जशास तसे वागणारा.
कर्तव्यदक्षता तुझी, कधीतरी आम्हा उमजावी।
आयुष्याचे मर्म जिथे,ती गीता नसानसात भिनावी।।
ये कान्हा,मधुसूदना, एकदा तरी ये।
या कलियुगात, सुदर्शन तुझे घेऊन ये।।
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे.