देश विदेश

बाप्पा- जगण्यासाठी पुरेसा# ©️  सतीश बर्वे खूप भावलेली कथा लेखकाची परवानगी गृहीत धरून पोस्ट करत आहे

#बाप्पा- जगण्यासाठी पुरेसा#

आज कृत्रिम विसर्जन तलावावर रिमझिम पावसात एक आजी आजोबा दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत आणखी कोणी नव्हते. तिथला एक कार्यकर्ता ते बघून चटकन पुढे झाला आजोबांच्या हातात असलेल्या पाटावरच्या गणपतीला बाजूला ठेवलेल्या टेबलावर ठेवण्यासाठी.

आजींनी त्या मुलाला थांबवले. अरे त्यांना एकट्याला करून दे. सगळं हौसेने करायला आवडत त्यांना.

आजोबांनी हातातल्या बाप्पाला अलगदपणे टेबलावर ठेवले आणि ते आजींना म्हणाले,” आरतीचे ताम्हन तयार कर आणि झांजा काढ.

आजींनी पिशवीतून ताम्हन आणि थोडंसं तूप घालून आणलेलं निरांजन आणि उदबत्ती असं सगळं बाहेर काढलं. निरांजन लावून ताम्हन आजोबांच्या हातात दिलं. आजोबांनी आरती म्हणायला सुरुवात केली आणि आजींनी झांज वाजवायला. एव्हाना तिथे आलेले काही भाविक कौतुकाने पुढे येऊन आरती मध्ये सहभागी झाले. दोन चार आरत्या म्हणून आजोबा थांबले. बाप्पाच्या पाटावर डोकं टेकवताना आजोबांचे डोळे पाणावले. आजींनी तबक आणि बाकी साहित्य परत पिशवीत ठेवलं.

तो तेवढा मोबाईल काढ बर पिशवीतून आणि ह्यांना दे बाप्पा सोबत आपला फोटो काढायला. आजोबा आजीला म्हणाले. आजींनी तो मोबाईल माझ्या हातात दिला. मी फोटो काढून आजोबांना दाखवला. आजोबा खुष झाले.
तुम्हाला शक्य असेल तर विसर्जन करतानाचा छोटासा व्हिडिओ काढाल का? आजोबांनी मला विचारले.

का नाही आजोबा. काढतो मी व्हिडिओ. मी म्हणालो. आजोबांच्या चेहरा उजळला. त्यांनी टेबलावरचा बाप्पाचा पाट उचलला आणि हळूहळू पावलं टाकत ते विसर्जन तलावाच्या दिशेने निघाले. आजी आणि मी त्यांच्या मागोमाग. तलावाजवळ कार्यकर्त्यांच्या हातात तो पाट ठेवत त्याला म्हणाले,” सांभाळून कर बाबा सगळं”. असं म्हणून आम्ही उभे होतो त्या बाजूला आजोबा आले. मी विसर्जनाचा व्हिडिओ काढला आणि मोबाईल त्यांच्या हातात दिला. मोबाईल घेताना आजोबांचा हात थरथरत होता.

मी आजोबांचा हात धरून म्हणालो,” थोडा चिखल झाला आहे इथे पावसामुळे. मी तुम्हाला मुख्य दरवाज्यापाशी सोडतो.”

आता मात्र आजोबांनी विरोध केला नाही आणि त्यांनी शांतपणे माझ्या सोबत पावलं टाकायला सुरुवात केली. आमच्या मागून आजी येत होत्या. प्रवेशद्वाराजवळच्या टेबलापाशी आलो आणि आजोबा आजींना म्हणाले,” ह्यांना प्रसाद दे बरं तु आणलेला ” आजींनी पिशवीतून आणलेला प्रसाद माझ्या हातावर ठेवला.

आजोबा एक विचारू का? मी धीर एकवटून म्हणालो.
” मला माहीत आहे तु काय विचारणार ते. ऐक बाळा. आम्ही इथे जवळच रहातो एकमेकांच्या सोबतीने. आमची दोन्ही मुलं परदेशात असतात. घरोघरी असते तीच कहाणी आमच्या घरी देखील आहे. आमचा हा परंपरागत गणपती आहे आणि मी आहे तोवर ती परंपरा चालू रहाणार. मघाशी झांजेचा आवाज ऐकून आजूबाजूचे चार पाच जणं चटकन पुढे होऊन आरतीत सामील झाले पण मी मात्र ह्या परंपरेत माझ्या मुलांना सामील करून घेण्यात अपयशी ठरलो. बाप्पा सगळं जाणतो आणि म्हणूनच आमच्या दोघांच्या हातून आम्हाला जमतेय ती आणि जमतेय तेवढी सेवा तो गोड मानून घेतो. त्याची कसलीच अपेक्षा नसते आणि तक्रार देखील नाही. ह्याचंच कौतुक वाटतं आम्हा दोघांना. आज मी ८५ वर्षांचा आहे आणि ही ८० वर्षांची. आम्ही देखील आमच्या मुलांकडून कसलीच अपेक्षा ठेवली नाहीये. जोपर्यंत मनांत जिद्द, हातात ताकद आणि शरीरात श्वास आहे तोपर्यंत बाप्पाची सेवा मनांपासून करत रहायचं असं आम्ही दोघांनीही ठरवलं आहे.

आमच्या पोटचे आम्हाला केंव्हाच परके झाले आहेत. पण आमच्या सोबत बाप्पा आहे हा विचारच जगण्यासाठी पुरेसा आहे आम्हाला.”

बोलता बोलता आम्ही मुख्य दरवाज्यापाशी आलो. भारावलेल्या अवस्थेत मी आजी आजोबांच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेतला. दोघेही एकदम म्हणाले ” आरोग्यदायी शतायुषी भव:”

सावकाश पावलं टाकत ते दोघेही घरी जायला निघाले. मी ते दृष्टीआड होईस्तोवर त्यांच्याकडे एकटक नजर लावून बघत होतो.

मला आजोबांचे शब्द आठवले,” बाप्पाला आमच्या कडून कसली अपेक्षा नाही तशीच अपेक्षा आमच्या मुलांकडून आम्हाला नाही.पण आमच्या सोबत बाप्पा आहे हा विचारच जगण्यासाठी पुरेसा आहे आम्हाला.”

©️  सतीश बर्वे खूप भावलेली कथा लेखकाची परवानगी गृहीत धरून पोस्ट करत आहे

२०.०९.२३.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}