वैशिष्ट्यपूर्ण / फिचरदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)

जीवनमान उंचावणारी गुंतवणूक , संजय हेजीब यांच्या लेखणीतुन संपन्न जीवनमान

भविष्यातले जीवनमान अधिक संपन्न होऊ शकेल... असा विचार करताना मला खालील मुद्दे सुचले. तुम्ही पण हा लेख पूर्ण वाचून झाल्यावर या मुद्द्यांवर परत लक्ष देऊन विचार करा

जीवनमान उंचावणारी गुंतवणूक

आजकाल आपण बघतो की सगळे जण म्हणत असतात, मला गुंतवणूक करायची आहे… माझ्या भविष्यातील गरजांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, स्वतःचे असे छोटेसे का होईना पण छानसे घर बांधण्यासाठी, तसेच जमल्यास आरामदायी रिटायर्डमेंट साठी!

मग सुरू होते त्यासाठीची त्यांची होणारी तगमग, चांगला प्लॅन शोधण्यासाठीची धावपळ, अनेक साधनांमधून (जसे की MF, गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेले विविध plans, फ्लॅट, प्लॉट, सोने वगैरे वगैरे) एक दोन निवडण्याची कसरत… मग त्यानंतर सुरू होते वेळप्रसंगी पोटाला किंवा हौसेला चिमटा काढून करायला लागणारी काटकसर…

थोड्या फार फरकाने आपण सगळे यातून जात असतो.,

एकदा सहज विचार करत होतो की आपण आणखी काय काय करू शकतो जेणेकरून आपले आत्ताचे

आणि भविष्यातले जीवनमान अधिक संपन्न होऊ शकेल… असा विचार करताना मला खालील मुद्दे सुचले. तुम्ही पण हा लेख पूर्ण वाचून झाल्यावर या मुद्द्यांवर परत लक्ष देऊन विचार करा.

आरोग्य

  1. आरोग्य विमा, नियमित health checkup या गोष्टी आपले भविष्यातले आजार आणि हॉस्पिटल्स वरचे मोठे खर्च टाळू शकतात.
  2. पौष्टिक खाद्य जसे की सुकामेवा, फळे, ऑरगॅनिक धान्ये, चांगल्या प्रतीचे दूध-तूप हे सुद्धा आपल्याला निरोगी, सशक्त व्हायला आणि आपली उत्पादकता वाढवायला मदत करतात.
  3. योगाभ्यास, व्यायाम तसेच मैदानी खेळ यांचे महत्व सांगायची तर गरजच नाही.
  4. शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावर सुद्धा खूप लक्ष देणे आवश्यक आहे.

शिक्षण

  1. बाजारातली आजची आणि उद्याची गरज तसेच आपली आवड यांना समोर ठेऊन त्याला साजेसे शिक्षण हे कायम आपली साथ देत असते. ते आपल्याला कायम पुढे पुढेच नेते.
  2. सध्या online वर उपलब्ध असलेले हजारो अभ्यासक्रम अगदी स्वस्तात उपलब्ध आहेत. आपल्या क्षेत्राला पुरक असे course एक एक करत राहिले तर हळूहळू बऱ्याच गोष्टी आपल्या पुण्याईमध्ये (cv मध्ये) जमा होतात आणि आपल्या कामात सुद्धा त्यांचा फायदा होतो.

३. तसेच वेळप्रसंगी कर्ज काढून घेतलेले शिक्षण पुढे फार फायदेशीर होऊ शकते.

छंद

बऱ्याच जणांना काही ना काही संग्रह करण्याचा छंद असतो, तर बऱ्याच जणांना एखादी कला जोपासायला आवडते, तसेच भटकंती, खेळ, खाद्य पदार्थ असे बरेच

छंद आपल्याला आता परवडू लागले आहेत. याचा मुख्य फायदा म्हणजे मनावरचा ताण कमी होतो. आणि अशी बरीच उदाहरणे आहेत की हे छंदच नंतर पुढे पैसे कमवायला सुद्धा  उपयोगी पडतात. विशेषतः लवकर निवृत्ती घेताना या गोष्टी बऱ्याच वेळा side income म्हणून उपयोगी पडतात.

मित्रमंडळी, शेजारी

जीवाला जीव देणारी मित्रमंडळी मिळणे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात दुर्लभ झालीय. एक चांगला मित्र किंवा मैत्रीण मिळवायला कधींकधी दशकं वाट पाहावी लागते. तसेच समजूतदार आणि विश्वासू शेजारी मिळणे सुद्धा एक भाग्यच आहे. अशी ही मंडळी आपले जीवन किती संपन्न करतात.

निसर्ग

  1. घराच्या आजूबाजूला झाडे लावणे, कुंड्यांमध्ये का होईना फुलझाडे, फळे, भाज्या लावणे
  2. गावातल्या एखाद्या ठिकाणी जसे की टेकडीवर, नदीकाठी, मैदानालगत वृक्षारोपण करत राहणे आणि त्यांच्या जोपासनेत सहभागी होणे
  3. Rain water harvesting किंवा सेंद्रिय खत प्रकल्प घर किंवा सोसायटीत सुरू करणे. त्यासाठी लागणारी वर्गणी देणे

– या अश्या बऱ्याच गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने करू शकतो ज्या आपल्याला समाधान, व्यायाम तर देतातच पण भविष्यातसुद्धा आपल्यालाच नाही तर पुढच्या पिढ्यांना सुद्धा उपयोगी पडतात.

पायाभूत सुविधा

  1. सुटसुटीत काम करता येईल, आराम करता येईल, तसेच घरातल्या सगळ्यांना स्वतंत्र पणे काम करता येईल असे फर्निचर हे आपली उत्पादकता वाढवायला आणि शारीरिक आणि मानसिक कष्ट कमी करायला मदत करतात.
  2. भरपूर वारा उजेड येण्यासाठी आवश्यक ते बदल केले तर दिवे, पंखे तसेच AC चे बिल कमी येते.
  3. शक्य असेल तर गच्ची किंवा बाल्कनीत झाडांच्या सानिध्यात छानशी बैठक व्यवस्था आपल्याला सकाळ संध्याकाळी निवांतपणा देते.
  4. वस्तू जागच्या जागी रहातील याची सोय जसे की पुस्तके, कपडे, खेळाचे साहित्य, organized storage अश्या गोष्टींमुळे घरात मोकळी जागा उपलब्ध होते.
  5. पाण्याची टाकी, UPS अश्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा बऱ्याचवेळा व्यवस्था नाही केली तर खूप मनस्ताप देतात.
  6. मोठा टीव्ही, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर अश्या या घरगुती वस्तू त्यांच्या जीवनकाळात आपले खूप पैसे आणि वेळ वाचवतात. मॉल मध्ये movie बघायला 1000-2000 रुपये सहज जातात. पण तेच चित्रपट काही दिवसांनी आपण घरीच मोठ्या टीव्ही वर अगदी स्वस्तात बघू शकतो. आटा चक्कीचे महत्व तर ती घेतल्यावरच समजते.
  7. कामासाठी लागणारे Tools जसे की लॅपटॉप, मॉनिटर, ऑफिस चेअर, चांगले टेबल, फोन, टॅबलेट, प्रिंटर या गोष्टी आपल्याला आपली उत्पादकता वाढवण्यासाठी हातभार लावतात. गाडी सुद्धा यात येते. या गोष्टींकडे आणखी सखोल आणि दूरदृष्टीने बघण्याची गरज आहे. साधे गाडीचेच बघितले तर फक्त fuel economy न बघता त्याबरोबर safety rating आणि ride comfort हे सुद्धा तितकेच महत्वाचे निकष आहेत.

अनुभव

आपले अनुभव म्हणजे एक मौल्यवान खजिनाच असतो. वेगवेगळे प्रसंग आपण स्वतः अनुभवणे, नवीन वाटा अनुभवणे, नवीन काम, सामाजिक कार्य, पद किंवा हुद्दा अनुभवणे या गोष्टी आपल्याला नकळत खूप संपन्न करून जातात. आपल्या अनुभवाचा इतरांना फायदा करून देता आला तर सोन्याहून पिवळे! कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी असो किंवा सामाजिक कार्यासाठी आपण दिलेले योगदान असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात. तो

दिलेला वेळ किंवा इतर माध्यमातून केलेलं योगदान कधीच वाया जात नाही. त्यातून मिळणारे समाधान, तसेच समोरच्या व्यक्तींना मिळणारे समाधान, ज्याला काही जण पुण्य म्हणतात त्याची किंमत कशी करणार…

पुढची पिढी

आपल्या पुढच्या पिढीच्या मानसिक जडणघडणीवर लक्ष देणे, त्यांना आपला वेळ देणे, त्यांना खेळ, संस्कारवर्ग, ट्रेक्स, विविध विषयांवरची पुस्तके, organizing skills, communication skills आणि इतरही बरेच soft skills उपलब्ध करून देणे, तसेच त्यांना पुण्य म्हणजे काय असते, चांगले काम म्हणजे काय असते हे उदाहरणातून दाखवून देणे हे सोपे काम नाहीये.

या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर या पिढीला पुढे कमी संघर्ष करायला लागतो आणि मूलभूत गोष्टींमध्ये त्यांना वेळ घालवायला लागत नाही. त्यांची प्रगती आपल्यापेक्षा खूप सहज आणि चक्रवाढ व्याजाप्रमाणे exponential पद्धतीने होते. गडगंज कमावून बसलोय पण मुलं जर क्रूझवर पकडली जाणार असतील तर त्याचा काय फायदा…

प्लॅन B (B for Backup)

  1. टर्म इन्शुरन्स ही अशी गोष्ट आहे की कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास बाकीचे कुटुंब वाऱ्यावर येत नाही आणि त्याला पण त्याच्या हयातीत निर्धास्तपणे कामावर लक्ष द्यायला मदत करते.
  2. नोकरी गेल्यास पैसे कमावता येईल असे एखादे कौशल्य असेल तर ताण सुद्धा कमी जाणवतो. आणि त्यावेळी हवालदिल व्हावे लागते नाही.
  3. घरातल्या सगळ्यांनी गाडी शिकली, गाडी चालवत राहिली तर अडीअडचणीला दुसऱ्यांवर अवलंबून रहावे लागत नाही. तसेच रिक्षा, टॅक्सीवर खर्चसुद्धा कमी होतो. आणि तसेच उत्पन्नाची अनेक साधने उपलब्ध होऊ शकतात.

Assets आणि Liabilities

रॉबर्ट कियोसाकी या लेखकाने आपल्या Rich Dad Poor Dad या पुस्तकामध्ये एक किस्सा सांगितलाय. त्याने एका अपार्टमेंटमध्ये काही जणांकडे मोठमोठे टीव्ही असलेले  बघितले. तो म्हणतो की मला हे टीव्ही विकत घ्यायला परवडणार नाही पण संपूर्ण बिल्डिंग विकत घेणे परवडेल कारण टीव्हीतुन मला काही उत्पन्न मिळणार नाही पण बिल्डिंग विकत घ्यायची झाली तर त्या सगळ्या भाडेकरूंकडून नियमित मिळणारे भाडे मला मदत करेल.  आता या ठिकाणी त्याने Asset आणि Liability ची Accounting मधली व्याख्या वापरलीये. आपल्याला या व्याख्येच्या थोडं पलीकडे जाऊन विचार करायचाय. माझी व्याख्या थोडीशी वेगळी आहे.

जी गोष्ट आपल्याला परतावा देते किंवा देणार आहे, जी आर्थिक असो, मानसिक असो, भौतिक असो किंवा पारमार्थिक असो, ती म्हणजे Asset. आणि जी मनस्ताप देते, पैसे गेल्याचे दुःख देते, किंवा देणार आहे ती म्हणजे Liability!

घर कर्ज काढून घ्यायचे का रिटायर्ड झाल्यावर घ्यायचे यावर काही दशकांपूर्वी खूप विवाद व्हायचे. आता लोकांचे स्पष्ट मत झालेय की नंतरचे कुणी पाहिलंय, तरुण धडधाकट असताना घराचा उपभोग घेणे कधीही चांगले, मग भले कर्ज घ्यायला का लागेना! त्यामुळे विचार करण्याची गोष्ट आहे, की राहत्या घराला आपण liability म्हणू शकतो का?

कहना क्या चाहते हो

सरकारने highways, tunnels, hospitals, IIT-IIM-NID यासारख्या आणि इतर शैक्षणिक संस्था, तसेच मनरेगा, जलयुक्त शिवार अश्या अनेक योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही आपला GDP तसेच Happiness Index वाढवण्यासाठी तसेच बऱ्याच जणांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी मदत करत असते. सरकार ही गुंतवणूक नागरिकांसाठी करत असते.

त्याचप्रकारे व्यक्तिगत पातळीवर जश्या MF, PF, SIP, Insurances, या सारख्या आणि इतरही आर्थिक गुंतवणूका महत्वाच्या आहेत त्याच प्रकारे वर सांगितलेली प्रत्येक गोष्ट एक गुंतवणुकीचाच भाग आहे आणि ती आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची असेल. आपल्या पुढच्या दिवसांचे तसेच आपल्या पुढच्या पिढीचे जीवनमान यावर अवलंबून असेल. आपला कौटुंबिक GDP, Happiness Index वरती न्यायला या गोष्टी उपयोगी ठरतील.

त्यामुळे आशा करतो की यापुढे आपणाला आता सगळीकडेच गुंतवणुकीच्या संधी दिसू लागतील!  तुम्ही विचाराल की माझी सगळ्यात जास्त परतावा (ROI) देणारी गुंतवणूक कोणती? तर माझे उत्तर असेल, काही वर्षांपूर्वी 500 रुपयाला घेतलेली योगा मॅट! ☺️

– संजय हेजीब , 9960632888

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}