ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता !! अविनाश धर्माधिकारी , मुंबई पोलिसांचे अधिकारी यांचे विचार
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता!!
संपूर्ण जगामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला खूप खूप प्राधान्य दिले जाते. भारत देशदेखील त्याला अपवाद नाही. सुरक्षिततेसंबंधी सरकारतर्फे आणि पोलीस खात्यातर्फे विशेष उपाययोजना केल्या जातात आणि त्या अनुषंगाने विशेष उपक्रमदेखील राबविले जातात. परंतु या सर्व उपाययोजनांना अपेक्षित प्रसिद्धी दिली जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काही सामाजिक संस्थादेखील या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे काम करीत आहेत.
विलेपार्ले परिसरात तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांचे मुले परदेशामध्ये शिक्षण नोकरी निमित्त गेले असल्यामुळे या ठिकाणी वयस्कर आई-वडील किंवा एकट्या आई किंवा एकटे वडील असे राहावयास आहेत. पोलिसांकडून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची यादी बनवली जाते आणि त्यांच्या घरी बीट अधिकारी अथवा पोलीस अंमलदार नियमितपणे भेट देतात. ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती मदत करतात एवढेच काय अगदी औषध पाणी करणे, वयस्कर नागरिकांचा वाढदिवस साजरा करणे त्यांच्याशी गप्पा मारणे असे उपक्रम देखील राबवले जातात. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांची माहिती नियमितपणे अद्यावत केली जाते. पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये समन्वयक साधण्याची भूमिका लोकमान्य सेवा संघ मार्फत केली जाते. त्या दृष्टीने त्यांचा खूप उपयोग पोलिसांना होतो. अशा प्रकारचे काम इतर शहरांमध्ये देखील अनेक संस्था करत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता संदर्भात महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्याच्या दृष्टीने. काही वस्तुस्थितीसदृश्य घटना (दंतकथा नाहीत) या ठिकाणी उद्युक्त करू इच्छितो जेणेकरून ही माहिती अधिक सुरस् आणि सहज समजणारी तसेच सर्वसाधारण लोकांनादेखील वाचनीय होईल. कोणतीही माहिती कथेच्या स्वरूपात सादर, केल्यास अधिक अवगत होते, हे नैसर्गिक तत्त्व आहे.
एक वयोवृद्ध स्त्री. साकीनाका विभागातील एका शाळेजवळून दुपारच्या वेळी जात असताना दोन गृहस्थ तिला भेटले व त्या स्त्रीला त्यांनी सांगितले, की त्यांच्या शेठला मुलगा झाला आहे. त्यामुळे गल्लीच्या टोकाला ते महिलांसाठी फुकट साडीवाटप करीत आहेत. त्याकरित दाग दागिने काढून पर्समध्ये ठेवा आणि पुढे जा. त्या महिलेला काही सुचले नाही, ते सांगतील त्याप्रमाणे त्या करत गेल्या त्यांनी स्वतःहून अंगावरील दागिने काढून त्यांच्या समक्ष रुमालात ठेवले. त्यांनी तो रूमाल तिच्या पर्समध्ये ठेवला परंतु रुमालातील दागिने कधी काढून घेतले हे त्या महिलेला कळलेदेखील नाही. पुढे काही अंतर चालत आल्यानंतर झाला प्रकार तिच्या लक्षात आला व तिने जमिनीवर बसकण मारली.
आजकाल मोबाईल फोनवरून बरेच आर्थिक व्यवहार केले जातात बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांची मुले अथवा मुली परदेशात असल्याने त्यांचा देखील आग्रह असतो की त्यांच्या आई-वडिलांनी नेट बँकिंग करावे परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये फसगत झाल्याचे आढळून आलेले आहे. बँकेचा प्रतिनिधी म्हणून त्यांना फोन करून त्यांची फसवणूक करून आवश्यक ती गोपनीय माहिती प्राप्त करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सन २०१० मध्ये एक वृद्ध दांपत्यांची निर्गुण हत्या त्यांच्या राहत्या घरामध्ये डोक्यात लोखंडी रोड मारून केल्याचे आढळून आले. त्यांचे रक्त गॅलरीतील पाणी वाहून जाण्याच्या पाईप मधून खाली पडल्याने लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले पुढील तपासामध्ये असे आढळून आले आढळून आले की ही आत्या त्यांच्या मुलानेच केली होती.
विलेपार्लेमध्ये देखील ज्येष्ठ नागरिकांच्या निर्घुण हत्यांच्या घटना घडलेल्या आहेत.
कोविड च्या प्रादुर्भावाच्या काळात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे खूप हाल झाले होते त्यांना मुंबई पोलिसांनी वेळोवेळी खूप मदत केली. काही ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक ते वरती देखील याचा विपरीत परिणाम झाला होता आणि त्याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे कोविडच्या काळामध्ये प्रार्थना समाज रोड विलेपार्ले पूर्व येथे राहणाऱ्या वृद्ध डॉक्टर व्यक्तीने विषाचे इंजेक्शन देऊन मुलीचा खून केला पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः आत्महत्या केली. पत्नीला दिलेल्या इंजेक्शनचा अपेक्षित परिणाम झाला नाही त्यामुळे पत्नी वाचली. मानसिक वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये झालेले हे कृत्य होते. त्याचप्रमाणे कोविडच्या काळामध्ये कोणतेही काम धंदा नव्हता उपजीविकेचे कोणतेही साधन नव्हते त्यामुळे एका वयोवृद्ध स्त्रीचा संभाळ विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सुमारे दीड महिना केला होता त्यानंतर त्यांना लोणावळा जवळील सहारा वृद्धाश्रम या ठिकाणी दाखल केले होते आणि सुमारे एक वर्ष त्या वृद्धाश्रमामध्ये आनंदाने राहत होत्या. त्यानंतर त्यांना काही नातेवाईकांनी मदतीचा हात दिला आणि त्या स्वतःच्या पायावर पुन्हा उभा राहिल्या.
वरील सर्व घटनांमध्ये आपल्या लक्षात आले असेल की बळी पडलेली व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक होती.
मुंबईमध्ये अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसाधारण जनतेमध्ये रोष निर्माण होऊन पोलिसांच्या क्षमतेबाबत शंका निर्माण होते. पोलिसांचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे गुन्ह्यास प्रतिबंध करणे म्हणजेच पुन्हा घडूच नये याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणे. त्याचप्रमाणे शासनाची देखील जबाबदारी आहे की जेष्ठ नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील या दृष्टीने उपाययोजना करणे.
याच दृष्टिकोनातून केंद्र शासनाने सन २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने एक विशेष कायदा अंमलात आणला आहे त्याचे नाव
“Maintenance and Welfare of Parents and Senior Citizens Act 2007” असे आहे. तसेच सन २०१८ मध्ये या कायद्यामध्ये काही सुधारणा देखील करण्यात आलेली आहेत. या कायद्याची व त्यातील तरतुदींची माहिती सर्वसाधारण जनतेला अद्याप अवगत झालेली नाही. या कायद्यातील तरतुदीनुसार सरकारवर जबाबदारी आहे की, त्यांनी जेष्ठ नागरिकांना शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक ते सर्व औषधोपचार उपलब्ध करून दिले पाहिजेत. त्यांच्यासाठी जेष्ठ नागरिक निवारा केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधले पाहिजे त्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.
एखाद्या ज्येष्ठ नागरिकांचा मुलगा अथवा मुलगी त्यांची देखभाल करत नसल्यास ते त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार अर्ज करू शकतात. सदर तक्रार अर्ज ते स्वतः करू शकतात किंवा त्यांच्यातर्फे इतर व्यक्ती अथवा स्वयंसेवी संस्था देखील करू शकतात तसेच रुपये दहा हजार पर्यंत महिना देखभाल खर्च ते प्राप्त करू शकतात.
सर्वसाधारणपणे आई-वडिलांची स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त होईपर्यंत मुले त्यांची देखभाल करतात परंतु एकदा का मुलांच्या नावावर मालमत्ता नोंदणी झाली की ती मुले आई-वडिलांची देखभाल करत नाही हे लक्षात घेऊन या कायद्यातील महत्त्वाची तरतूद कलम २३ मध्ये करण्यात आलेली आहे त्यानुसार एखादा मुलगा अथवा मुलगी हा कायदा अमलात आल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची देखभाल करीत नसेल आणि त्यापूर्वी त्यांची मालमत्ता मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर नोंदणी झाली असेल तर ती नोंदणी रद्द होऊ शकते.
त्याचप्रमाणे या कायद्यातील कलम २५ अन्वये जर मुलगा अथवा मुलगी ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांची देखभाल करत नसेल किंवा त्यांना शारीरिक मानसिक त्रास देत असेल तर तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा व किंवा रुपये ५०००/- दंडाची शिक्षा त्यांना ठोठावली जाऊ शकते. या कायद्याअंतर्गतचे गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे असल्याने ज्येष्ठ नागरिक अथवा त्यांचे प्रतिनिधी याबाबत होणारा त्रासाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करू शकतात. जुलै २०१८ मध्ये अशा स्वरूपाचा गुन्हा शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई येथे दाखल झालेला आहे. तसेच माननीय उच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणांमध्ये पाल्य आपल्या ज्येष्ठ पालकांची देखभाल करत नसतील तर अशा पाल्यांना घराबाहेर काढण्याचे अधिकार देखील जेष्ठ नागरिकांना असल्याचा न्यायनिवाडा केलेला आहे.
सध्या भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या सात ते आठ टक्के लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे आणि सन २०२६ पर्यंत ती लोकसंख्या १० ते १२% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या दृष्टिकोनातून राज्य शासनातर्फे देखील जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत आणि प्रस्तावित देखील आहेत. त्यापैकी लक्षणीय योजना म्हणजे पाल्य आपल्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांची देखभाल करत असल्यास त्यांना आयकर मध्ये सूट देण्याचा प्रस्ताव देखील विचाराधी आहे.
नुकताच राज्य शासनाने ८५ वर्ष वयोमानाच्यावरील ज्येष्ठ नागरिकांना बसने मोफत प्रवास करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केलेले आहेत त्याचे क्रमांक १०९०, १०३, १०० इत्यादी आहेत . मुंबई पोलिसांचे अधिकारी अंमलदार ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेटीस आले असता ज्येष्ठ नागरिकांनी देखील त्यांचे योग्य ते स्वागत करणे आणि आवश्यक त्याच सेवेची अपेक्षा करणे गरजेचे आहे. काही ज्येष्ठ नागरिक वैयक्तिक कामे देखील पोलिसांना सांगत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.असे होणे योग्य वाटत नाही त्यामुळे उपलब्ध करून दिलेल्या सोयीचा गैरफायदा घेतला जातो आणि आवश्यक ते परिणाम साध्य होत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या घरी येणाऱ्या पोलिसांची त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि त्यांच्या अनुभवाचे कथन जरूर करावे जेणेकरून पोलिसांच्या ज्ञानात देखील भर पडेल. ज्येष्ठ नागरिकांकडे ज्ञानाचे व अनुभवाचे भांडार असते ते त्यांनी पोलिसांबरोबर शेअर केल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याचा विचार आणि आचरणामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडेल आणि एक सुदृढ समाज संस्था प्रस्थापित होण्यास ज्येष्ठ नागरिकांचा अशा प्रकारे हातभार लागेल असे मला वाटते. या ठिकाणी मी Todd Henry यांच्या Die Empty या पुस्तकातील अर्थपूर्ण वाक्याने या लेखाची सांगता करीत आहे.
“The cost of inaction is vast, Don’t go to your grave with best work inside you, choose to die empty”
अविनाश धर्माधिकारी , 9930685831
copavinash@gmail.com