व्यवसायदेश विदेश

२०१७ साली बेडेकर कंपनीने शंभरी पूर्ण केली. एका मराठी उद्योजकाचं हे यश वाखाणण्याजोगं आहे

बेडेकरांच्या फ्रोजन उकडीच्या मोदकांची जाहिरात पाहिली.त्यात म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या कंपनीने गेल्या वर्षी एकट्या अमेरिकेत सव्वा लाख मोदक अमेरिकेला निर्यात केले. ऐकून बरं वाटलं. गिरगावातल्या सदाशिव गल्लीत उघडलेल्या एका साध्या दुकानाची ही परदेशातील झेप पाहून आनंद वाटला.एके काळी किराणा मालाची विक्री करणारे बेडेकर काळाची पावले ओळखून मसाला,लोणचे क्षेत्रात शिरले आणि आपल्या दर्जेदार उत्पादनांनी लोकांच्या जीभेचे चोचले पुरवत एका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले हे अभिमानास्पद आहे. आपल्या या यशोगाथेची कथा खुद्द वासुदेव विश्वनाथ बेडेकर यांनी ‘ बेडेकर जीवन वृत्तांत ‘ या पुस्तकात 📖सांगितली आहे. २६ जानेवारी १९६१ साली प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची किंमत होती ४ रुपये.

त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे स्वातंत्र्य पूर्व काळात बेडेकर कुटुंब कोकणातून मुंबईमध्ये चरितार्थासाठी आले. गिरगावातल्या सदाशिव गल्लीत विश्वनाथ बेडेकरांनी  दुकान उघडलं. त्यावेळी त्यांची  गिऱ्हाईक म्हणजे नवी वाडीपासून खेतवाडीपर्यंत स्वतःच्या घरात राहणारी सधन व खानदानी अशा पाठारे प्रभु, खत्री,सारस्वत,, पाचकळशी वगैरे ज्ञातीतील होती. त्यावेळची दुकानदारीची पद्धत म्हणजे दररोज सकाळच्या वेळी विश्वनाथराव   गिऱ्हाईकांच्या घरोघरी जाऊन त्यांना हव्या असलेल्या मालाची यादी आणायचे व तो माल त्यांना नंतर घरी पोहचवायचे.म्हणजे होम डिलिव्हरीची पद्धत तेव्हापासून आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पुढे ते दुकान बंद करून  त्यांनी शांतारामाच्या चाळीत नवीन दुकान उघडलं.

काही दिवसांनी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव वासुदेवराव दुकानात बसू लागले.ते महत्त्वाकांक्षी होते. त्यांनी पाहिलं की नुसतं किराणा माल विकून आपल्या धंद्याची प्रगती होणार नाही, त्यासाठी निराळं काही तरी करावं लागेल. त्यांनी मसाला बनवून तो विकायचं ठरवलं. त्यांचा हा  मसाले कुटून विकण्याचा धंदा त्यांच्या वडिलांना-दादांना– रुचत नव्हता. कारण  त्याकाळात वस्तू तयार करून विकणे, हे एक प्रकारचे कमीपणाचे समजले जाई. हाँटेल, खानावळी हे जसे वस्तू तयार करून विकतात तसेच हे दादांना वाटे. त्यांना हे पसंत नाही, म्हणून सुरुवातीला दादा बाहेर गेले असतील अशावेळीच ते गोडा मसाला शेर दीड शेर कुटून ठेवीत असत. त्यांच्या या मसाल्याचा सुगंध आसमंतात दरवळला. मग लोकांची पाऊलं आपोआप त्यांच्या दुकानाकडे वळू लागली. खास मसाला विकत घेण्यासाठी दुकानात येऊ लागले. परंतु दादांचा या धंद्याला विरोध असल्यामुळे ते दुकानात नसतानाच मसाल्याची विक्री होई. ते असताना गिऱ्हाईक आल्यास त्यांची पंचाईत होई आणि विनोदी परिस्थिती निर्माण होई. दादा असले, की वासुदेवराव मसाला आम्ही विकत नाही म्हणून सांगायचे. पण गिऱ्हाईक म्हणत, “नाही कसा, मी परवा तर नेला होता.” तेव्हा ‘ पूर्वी करत होतो आता आम्ही मसाला करीत नाही’ ‘ असं सांगून ते वेळ मारून न्यायचे. पण पुढे मसाल्याच्या खपाचं प्रमाण वाढू लागल्यावर तसे म्हणणेही जमेना. काळाची पावले ओळखून त्यांनी आपल्या मालाची जाहिरात करण्याचं ठरवलं. त्याकाळच्या’  लोकमान्य ‘ दैनिकात दररोज ‘बेडेकर मसाल्या’ची  जाहिरात प्रसिद्ध होऊ लागली. परंतु ती जाहिरात दादांच्या वाचनात आल्यानंतर , त्यांनी हा निष्फळ प्रयत्न असल्याचं सांगितलं.आता दादा दुकानात असतानाही ते मसाला विकू लागले. त्यामुळे पितापुत्रात खटके उडू लागले. शेवटी १९२१ साली दादा रागाने  गावी गेले. त्यामुळे वासुदेवरावांना वाईट वाटलं. पण आपला  निर्णय धंद्याच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत योग्य आहे, याबाबत त्यांना खात्री वाटत होती.आणि खरोखरच त्यांना मसाल्याच्या धंद्याने हात दिला.’ मसालेदार ‘ यश दिलं !

बेडेकरांचा लोणच्याच्या धंद्यातील प्रवेश हा अनपेक्षितरित्या झाला.
एकदा वासुदेवराव तापाने आजारी होते. तापात होतं तसं त्यांच्या तोंडाची चव अजिबात गेली होती. त्यामुळे काहीतरी आंबट असं लोणचं  खाण्याची इच्छा झाली. परंतु मागणार कोणाकडे ? एके दिवशी त्यांचे मित्र दाबके यांनी अगदी थोडं जुनं व मुरलेलं लिंबाचं लोणचं आणून दिलं‌. ते अधूनमधून खात त्यांनी  महिनाभर पुरवलं. यावेळी त्यांच्या डोक्यात  कल्पना आली की ,कोणाला जर असं लोणचं  खाण्याची इच्छा झाली तर त्याला मिळायची सोय काय ? बाजारात लोणची मिळत पण ती काही खास नसत. झालं !  वासुदेवरावांनी मसाल्याबरोबर  लोणचीही बनवायचं हे मनोमनी ठरवलं. सुरुवात करावी, म्हणून दोनशे लिंबे आणून लोणचं बनवलं. ते हातोहात खपलं.बेडेकरांचं लिंबाचं लोणचं लोकांच्या पसंतीस पडलं. तसचं यश पुढे त्यांना आंब्याच्या लोणच्याच्या धंद्यातही मिळालं. याही क्षेत्रात असाच अनपेक्षितपणे त्यांचा प्रवेश झाला.
एक दिवस दुकानात असताना त्यांच्याकडे विनायकराव फडके नावाचे गृहस्थ आले. त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी भेट देण्यासाठी म्हणून गावावरून १५-२० हिरवे कच्चे  आंबे आणले होते.पण ज्यांना ते द्यायचे होते ते गृहस्थ न भेटल्यामुळे परत  गावी जातेवेळी  त्यांनी ‘ते आंबे तुम्हालाच ठेवा ‘असं म्हणून ते वासुदेवरावांकडे दिले. या कल्पक माणसाने  त्या आंब्याचे  लोणचं घातलं व ते विकायला ठेवलं. या नवीन उत्पादनानेही मुंबईकरांची मने जिंकली. त्या १९२२ च्या चैत्रात त्यांनी सुमारे दोन मण लोणचं घातलं आणि  ते लोणचेही लोकांना आवडून त्याचाही खप झाला. मसाला, लोणचं यामार्गे बेडेकरांनी गृहिणींच्या घरात व मनात प्रवेश केला. मग काय आजतागायत हे बेडेकरांचं लिंबाचं आणि आंब्याचं लोणचं लोकांच्या सेवेसी तत्पर आहे.

या धंद्यात तशी मेहनतही होती. सुरुवातीला दोन चार वर्षे ते  चर्नीरोड अगर नळबाजार येथेच आंबे विकत घेत. पुढे काही वर्षानंतर भायखळ्याहून आंबे आणून त्याचे लोणचे बनवण्यास सुरुवात केली. तेथे जायला पहाटे पावणेपाचला उठून ट्रँमने सहा वाजता तेथे पोहचत असत.पाहिजे तेवढ्या कैऱ्या घेतल्यानंतर व्हिक्टोरियात म्हणजे घोडागाडीत टाकून ती दुकानात घेऊन यायचे. स्नान करून दोन तीन माणसांसह आंबे कापायला बसायचे.फक्त जेवणापुरते घरी जाऊन लगेच पुन्हा कैरी कापायला सुरुवात करून ८-९ वाजेपर्यंत फोडी कापून, फोडीत मसाला मिसळून पिंपात ते लोणचे भरून ठेवायचे. अशी त्यांच्या कामाची पद्धत असे.चैत्र व वैशाखात आंब्याचे व ज्येष्ठ,आषाढ महिन्यात लिंबूचे लोणचे घालीत असत. जुलै १९५९ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय आंबा प्रदर्शनात बेडेकरांच्या आंब्याच्या लोणच्याला पहिलं बक्षीस मिळालं.आता महाराष्ट्राबाहेर इतर राज्यांतही त्यांची उत्पादने पोहचू लागली.

बेडेकरांनी आपल्या कल्पकतेने, मेहनतीने धंदा बरकतीला आणला. हाती पैसा खेळू लागला. पूर्वी दुकानदार बेडेकरांची त्यांच्या काही नातेवाईक, परिचित मंडळीना लाज वाटे. त्यांच्या दुकानावरून जाताना ते  त्यांच्या दुकानाच्या विरूद्ध बाजूने जात, पण त्यांच्या  दुकानाच्या बाजूने कधी जात नसत. तसेच काही दुकानदारही कधी भेट झाल्यास  कुत्सित भाषेत बोलत. लग्न समारंभात अगदी नजिकच्या व चांगल्या स्नेह्यांकडूनही त्यांना आमंत्रण नसे. त्या लग्नाला माल मात्र बेडेकरांकडून गेलेला असे. पण आता बेडेकरांच्या दारी  लक्ष्मी आल्यावर लोकांची दृष्टी बदलली. आता बेडेकरांशी आपला संबंध आहे, हे दाखवणं त्यांना मोठेपणाचं वाटू लागलं. बेडेकरांनी नवी दुकाने उघडली. गिरगावातील काही चाळी विकत घेतल्या. १९४९ साली ‘ कोकण नेव्हीगेशन कंपनी ‘ ही स्टीमर कंपनी स्थापन झाली. त्या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव ते त्या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर गेले. त्या कंपनीने ‘ सदाफुली ‘ व ‘ गुलछडी ‘ या नावाच्या दोन लाँचेस रेवस धरमतरला चालवण्यासाठी म्हणून विकत घेतल्या.( या ‘ सदाफुली ‘ बोटीने मी भाऊचा धक्का ते मोरा बंदर (उरण ) प्रवास केला आहे.)काही दिवसानंतर कंपनीचे मूळ चालक श्री. मुणगेकर निघून गेले. यानंतर काही काळ कंपनी चालली.नंतर बेडेकर बोर्डावरून निवृत्त झाले.या अगोदरच सुप्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांचे वडीलही बोटीच्या व्यवसायात उतरले होते. १९४७ साली बुडालेली ‘रामदास ‘ ही बोट ज्या कंपनीत ते डायरेक्टर होते, त्याच कंपनीची.

घरी श्रीमंती आल्यानंतरही वासुदेवराव उतले नाहीत की मातले नाहीत. १९४८ साली गांधी हत्येनंतर ब्राह्मण म्हणून मुंबईतील त्यांच्याही दुकांनावर हल्ले झाले. त्यांचे परळचे दुकान फोडून सर्वस्वी लुटले गेले. दादरच्या दुकानाचीही नासधूस झाली. त्यांच्या मुगभाटच्या दुकानावरही दगडफेक झाली‌. त्याचप्रमाणे ठाकूरद्वारचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी झाला नाही. फक्त फोर्टमधील  दुकानाला मात्र काही  झालं नाही. गांधींच्या हत्येनंतर पुणे,सातारा, सांगली,वाई वगैरे भागातून खेडोपाडी अनेक  ब्राह्मणांची घरे जाळली गेली व पुष्कळसा ब्राह्मणवर्ग निर्वासित झाला. तेव्हा आपल्या दुकानांवरील हल्ल्याचं दु:ख गोंजारत न बसता ते त्या अभागी लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी आपल्या पुराणिक, वैद्य, देवबुवा या मित्रांसोबत एक ‘ हिंदु धर्मसंवर्धक मंडळ ‘नावाची संस्था स्थापन केली. दंगलग्रस्तांच्या याद्या मिळवून  प्रत्येकाच्या नावाने पंचवीस रुपये याप्रमाणे मनीआँर्डरीने रकमा पाठवल्या. त्या त्यांना गणपतीच्या पूर्वी मिळाल्या.यावेळी त्यांच्यापैकी काहींकडून जी पत्रे आली त्यावरून असं दिसून आलं, की  यांच्याकडची मदत प्रथम मिळालेली मदत असून त्यांना तोपर्यंत इतर कुठूनही मदत मिळालेली नव्हती. ही मदत करत असतानाही त्यांनी आपपरभाव ठेवला नाही, तर ब्राह्मणांच्या घराजवळ असल्यामुळे काही इतर ज्ञातींची घरेही या जळितात जळली होती. त्यांनाही  सर्वांप्रमाणे मदत पाठवली गेली. त्यानंतर पुन्हा दिवाळीपूर्वी प्रत्येकी वीस रुपये याप्रमाणे आर्थिक मदत पाठवली. त्यावेळी हायस्कूल शिकणाऱ्यांना मँट्रीकपर्यंत व काँलेजमध्ये शिकणाऱ्यांना त्यांचा अभ्यासक्रम संपेपर्यंत मदत केली.

२०१७ साली बेडेकर कंपनीने शंभरी पूर्ण केली. एका मराठी उद्योजकाचं हे यश वाखाणण्याजोगं आहे.त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे बेडेकरांच्या पुढच्या पिढीनेही या उद्योगात रस घेऊन आपल्या कंपनीची यशोपताका समुद्रापार नेली आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे !

प्रदीप राऊत

🖋🖋🖋

अनघा वैद्य  88068 09043 , यांनी व्हाट्स ऍप ने शेअर केलेली वाचनीय पोस्ट .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}