दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

गवसले माझे मला – अस्मिता ते सारा ते अस्मि ची स्थित्यंतरे – ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★गवसले माझे मला★★

मोबाईलची रिंग वाजली म्हणून मी बघितलं, सुहासचा फोन होता. “हॅलो.”

“अस्मिता, आज कंपनी सुटल्यावर घरी जायची घाई करू नकोस. कंपनीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून सेलिब्रेशन आहे. त्यासाठी मी एकांकिका बसवतोय. त्यात तुला महत्वाचा रोल दिला आहे. सगळे कलाकार मी फायनल केले आहेत. आज सगळे भेटून डिस्कस करू.” सुहासने फोन बंद केला.

माझं एक वाक्य सुद्धा न ऐकता सुहासने मोबाईल बंद केला. कायम कुठलीही गोष्ट हा मला फक्त सांगतो. माझं मत,माझे विचार जाणून घ्यायची ह्याला कधीही गरज वाटली नाही. पण त्याचं हे असं माझ्यावर हक्क दाखवणं तर आवडायला लागलं होतं आणि मी त्याच्या प्रेमात पडले.

सुहास आणि मी एकाच दिवशी ह्या कंपनीत जॉईन झालो होतो. सुहास आय टी इंजिनिअर होता आणि मी एमसीएस केलं होतं. सुहास अत्यंत बुद्धिमान आहे. त्याच्या वागण्यात, बोलण्यात इतका प्रचंड आत्मविश्वास आहे की समोरची व्यक्ती नकळत त्याच्यापुढे कमीपणा घेते. कंपनी जॉईन केल्यापासून तो सीनिअर्सचा आवडता एमप्लॉयी झाला आहे. माझं आणि सुहासचा सुरवातीला एक मुद्द्यावर बराच वाद झाला. पण मी कुठेही कमी पडले नाही. त्याच्या बरोबरीने मी माझं म्हणणं प्रूव्ह केलं. त्या दिवसापासून मी सुहासकडे ओढल्या जात होते. त्याचं देखणं रूप, बुद्धिमत्तेची चमक मला त्याच्याकडे आकर्षित करायला लागली. सुहासही मला साथ देतोय असं जाणवलं आणि आम्ही काहीही शब्दाने व्यक्त न करता एकमेकांचे झालो असं मला वाटायला लागलं होतं.

सुहासला अभिनयाची आणि दिग्दर्शनाची जबरदस्त आवड होती. हा छंद तो एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत पूर्ण करत होता. आमच्या कंपनीला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कल्चरल ऍक्टिव्हिटीज होत्या त्यात सुहासने एकांकिका करायचं ठरवलं होतं. कम्पनी सुटल्यावर कॅन्टीनमध्ये आम्ही भाग घेणारे सगळे जमलो होतो. मी गेले तर मिटिंग सुरू झाली होती. सुहासच्या हातात स्क्रिप्ट होतं. एकांकिकेत पाच पात्र होती. भूषण, सचिन,अर्जुन,काव्या आणि मी! मी खुर्चीत बसणार इतक्यात सुहास बोलला, “अस्मिता,ह्यापुढे वेळेचं बंधन पाळ. कुठल्याही मिशनसाठी शिस्त हवी.”
सुहासचा जरा रागच आला. ह्या सगळ्यांसमोर माझा पाणउतारा करायची ह्याला काय गरज होती? हा कधीही मला, आमच्या दोघांच्या नात्याचं स्पेशल फीलिंग देतच नाही. कायम गृहीत धरतो. जरा रागातच खुर्चीत बसले.
“ये नीलकंठ, तुझीच वाट बघत होतो. गाईज,प्लिज वेलकम नील. आपल्या एकांकिकेचं नेपथ्य नील करणार आहे.”
माय गॉड, आता हा नीलकंठ पण आहे का इथे? ह्याच्याइतका मवाळ,हो ला हो करणारा कलीग आमच्या कंपनीत कोणीही नसेल. बीसीएस करून कंपनीत जॉईन झाला होता. कम्पनीचा ड्रेस कोड होता म्हणून,नाहीतर बाहेर मी ह्याला अगदी टिपिकल ड्रेस मध्ये बघितलं होतं. गळ्यात शबनम बॅग,जीन्सवर नेहरूशर्ट! स्वतःला काय खूप ग्रेट कवी,लेखक समजतो का काय माहिती नाही! नाव पण काय तर नीलकंठ!

“हॅलो एव्हरीवन! मी कॉलेजमध्ये असताना नाटकासाठी खूपदा नेपथ्य केलं आहे. मला खूप आवड आहे त्याची. हॅप्पी टु जॉईन ऑल ऑफ यु.” नीलकंठ माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसत म्हणाला. नीलकंठ माझ्याशी नेहमी बोलायचा प्रयत्न करायचा पण का कुणास ठाऊक,मला त्याच्याशी बोलायची कधी इच्छाच होत नव्हती. सतत पडतं घेणं, स्वतःकडे कमीपणा घेणं, हे त्याचं वैशिष्ट्य मला अजिबात आवडत नव्हतं. सुहासच्या अगदी विरुद्ध! मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं.

“आज आपण स्क्रिप्ट वाचतोय. प्रत्येकाची भूमिका समजून घ्या. अस्मिता,स्पेशली तू! एकांकिकेत तुझी मध्यवर्ती भूमिका आहे. तुझ्याभोवतीच कथा फिरते. सो,पुट युअर एफर्टस्.”

नाटकाची तालीमही सुरू व्हायची होती आणि सुहासने त्याच्या नेहमीच्या स्टाईलने मला सांगितले. मला जरा दडपणच आलं. सुहासने स्क्रिप्ट वाचलं. नाटक दमदार होतं. एका महिला धावपटूच्या आयुष्यात घडलेली कथा! सतत गोल्ड मेडल मिळवणारी सारा,एका स्पर्धेत हरते आणि मानसिक धक्क्याने अचानक तिच्या पायातली शक्ती जाते आणि तिला व्हीलचेअर जवळ करावी लागते. ती खचून जाते,उमेद हरते पण तिचा जवळचा मित्र अतिशय सकारात्मक पद्धतीने तिला त्यातून बाहेर काढतो,पायावर उभी करतो आणि तिचं आंतरराष्ट्रीय धावपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करतो,हे कथानक! माझा रोल खूपच चॅलेंजिंग होता. मेहनत घेणं आवश्यक होतं. अर्जुन माझ्या मित्राची भूमिका निभावणार होता. अर्जुनने बऱ्याच एकांकिका स्पर्धेत बक्षिसं पटकावली होती. तो छानच काम करणार होता.
“अस्मिता, फोकस ऑन युअर रोल. सिरियसली घे. यु कॅन डू इट.”
सुहासला माझ्याबद्दल वाटणारा विश्वास बघून मन सुखावलं. त्याचं देखणं रूप मी परत परत बघत राहिले.
सुहासने प्रत्येकाला स्क्रिप्टची एक झेरॉक्स कॉपी दिली. त्याने वाचन सुरू केलं तसं साराची भूमिका माझ्या लक्षात यायला लागली. एकांकिका असली, दीड तासाची असली तरी साराच्या भूमिकेला खुप कंगोरे होते. एका जिद्दी धावपटूची कथा मला साकारायची होती. मी स्वभावाने जिद्दी होतेच पण साराचं आणि माझं ध्येय पूर्णपणे वेगळं होतं. शरीराने तंदुरुस्त असणारी खेळाडू अचानक एका आजाराला बळी पडते,त्यावेळेचं तिचं मानसिक आंदोलनं मला उभं करायचं होतं. एका क्षणी वाटलं, सुहासला सांगावं की सुहास मला हा रोल जमणार नाही.
“हाय अस्मिता.” मी चमकून वर बघितलं. नीलकंठ माझ्या समोर उभा होता. “यु आर द राईट चॉइस फॉर धिस रोल.” नीलकंठ म्हणाला.
“हं, बघूया.” मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले. ह्याच्या सल्ल्याची मला गरज नव्हती. मी खुर्चीतून उठले आणि सुहासकडे जायला वळले.
“अस्मिता,काही मदत लागली तर सांग. मी आहे.” नीलकंठ म्हणाला आणि मला रागच आला. हा का उगाच माझ्याशी बोलायचा सारखा प्रयत्न करतोय!
“नो थँक्स! तुला नेपथ्य दिलं आहे त्याकडे लक्ष दे. माझ्या रोलची काळजी मी आणि सुहास घेऊ. दिग्दर्शक सुहास आहे.” मी जरा चिडूनच बोलले.
“ओके ओके, मी सहज बोललो. ऑल द बेस्ट! छान प्रॅक्टिस कर आणि तुझ्या अभिनयाने पार कम्पनीच्या मॅनेजिंग डिरेक्टर पासून सगळ्यांची मनं जिंकून घे. बाय. अधून मधून मी प्रॅक्टिसला येईनच.”

मी सुहासजवळ गेले तर अर्जुन आणि काव्या त्याला काही प्रश्न विचारत होते. सुहासचं माझ्याकडे लक्ष गेलं तसं त्याने मला हाक मारली.
“अस्मिता,तुम्ही पाच जण सतत एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये रहा. एकांकिकेत त्या ठराविक वेळात अभिनयाचा कस लागतो. सहकलाकाराशी उत्तम जमलं तर अविस्मरणीय प्रयोग होऊ शकतो. प्रोग्रामला अजून दोन महिने आहेत. आपली ड्युटी करून संध्याकाळी तालीम करत जाऊ. प्लिज कोऑपरेट विथ मी.”
“हो सर, आम्ही नक्कीच मेहनत घेऊ.” अर्जुन म्हणाला.

सुहास मला घरी सोडतो म्हणाला आणि मला अतिशय आनंद झाला. त्याच्या कारमध्ये कितीतरी दिवसांनी आम्ही असं एकत्र जाणार होतो. मी गाडीत बसले. सुहासने लताची गाणी लावली. माझं आवडतं गाणं लागलं होतं.’लग जा गले के फिर ये हँसी रात हो ना हो.’ मी आनंदाने सुहासच्या खांद्यावर मान टेकली.
“अस्मिता, तू ठीक आहेस ना?” सुहासने असं विचारल्यावर मी चमकले.”म्हणजे? असं का विचारतो आहेस?” मी त्याच्याकडे रोखून बघत विचारलं.
“इतकी इमोशनल होऊ नकोस. तुला माहितीय मला खूप इमोशनल झालेलं आवडत नाही. आणि सारा तुझ्यासारखी इमोशनल नाहीय.”
“साराच्या आयुष्यात तो प्रसंग घडल्यावर ती पण इमोशनल होतेच ना! आणि इथे साराचा काय संबंध? या क्षणी मी अस्मिता आहे. तुझी अस्मिता! आहे ना?”

सुहास काहीच न बोलता माझ्याकडे बघून फक्त हसला. घर आलं तशी मी कारमधून उतरायला लागले.
“टेक केअर.” सुहास म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली.

बस इतकंच? सुहासने मला प्रतिसाद द्यावा असं खूप वाटलं होतं. लताच्या गाण्यातली ही अशी रात्र खरंच परत येणार नव्हती का? विचाराने मी अस्वस्थ झाले. फ्लॅटचं दार उघडलं. जेवायची इच्छाच होईना. कसलीतरी हुरहूर दाटून आली. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं. मी तशीच कॉटवर डोळ्यावर हात ठेवून आडवी झाले पण डोळ्यातले गरम अश्रू गालावर ओघळायला लागले. हा काय माझा वेडेपणा? इतकं काय घडलं होतं? सुहासने फक्त प्रतिसाद दिला नाही त्याने मी इतकं अस्वस्थ व्हावं?………

आज शनिवार होता म्हणून बरं झालं. सकाळी जागच आली नाही. डोकं जड झालं होतं. मोबाईल बघितला. आईचे चार मिसड् कॉल दिसले. दर शनिवारी आणि रविवार मला सुट्टी म्हणून तिचा सकाळी फोन असतोच. एरवी आठवडाभर माझी गडबड! बोलायची इच्छा असूनही वेळ मिळत नाही. तिची आणि बाबांची नाराजी सहन करावी लागते. मी पुण्यात नोकरीसाठी आले आणि आईबाबा नागपूरला! आईबाबा दोघांचीही नोकरी असल्यामुळे ते पुण्यात येऊ शकत नव्हते. सुरवातीला एकटं राहायचा कंटाळा आला होता पण हळूहळू सवय झाली आणि सुहासशी ओळख झाल्यापासून रोज कंपनीत जाण्याची ओढ लागली. मी आईला फोन केला. “सॉरी आई,आज उशीरा उठले. फोन सायलेंट होता.”
“का ग? तब्येत बरी आहे ना? सुट्टी असली तरी इतका वेळ तू कधी झोपत नाहीस.”
“मी अगदी ठणठणीत आहे. काळजी करू नको. आई,मी कंपनीच्या गॅदरिंगसाठी नाटकात काम करतेय. घरी यायला थोडा उशीर होईल. रोजचा माझा मिसड् कॉल तुला जरा उशीरा येईल. लगेच काळजी करू नको.”
“वा छानच की! आम्ही येऊ जमलं तर. कधी ते कळव. आणि खाण्यापिण्याची काळजी घे. उद्या सकाळी फोन करते.”
आईशी बोलले आणि छान वाटलं. आई कायम माझ्या खूप जवळची राहिली. मी तिला सगळं सांगायचे. एखाद्या जवळच्या मैत्रिणीला सांगतो तसंच!

कालचा प्रसंग आठवला. मी तरी काय,काहीतरी खुळ्यासारखा विचार करत होते. फ्रेश झाले आणि चहा टाकणार इतक्यात सुहासचा फोन! माझा सगळा नूरच अचानक बदलला. अधीरतेने,उत्सुकतेने मी मोबाईल घेतला. “अस्मिता,स्क्रिप्ट अनेकदा वाच म्हणजे तुला ती भूमिका खोलात जाऊन करता येईल. आजपासून तू सारा आहे,असंच समज.”
“दुसरं काहीतरी बोल ना सुहास! अजून दोन महिने आहेत नाटकाला.”
“दोन महिने आहेत हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. आपण निदान ९५% तरी द्यायला हवं.” सुहासची नेहमीची जरब!
“मी १००% देईन,बस? पण आता दुसरं काहीतरी बोल. आज भेटायचं कॅफेमध्ये?”
“हो,मला तुझ्याशी त्या भूमिकेबद्दल अजून बोलायचं आहे.”
सुहासचं ते बोलणं ऐकलं आणि माझा सगळा मूडच गेला. इतका झपाटल्यासारखा हा का वागतोय? एक साधं कंपनीचं गॅदरिंग, त्यात ती दीड तासाची एकांकिका आणि हा का इतका त्याचा विचार करतोय! सुहासचं एखाद्या मिशनसाठी झोकून देणं मला चांगलंच माहिती होतं,पण ते कंपनीच्या कामासाठी! इथे हा अगदी एखादा व्यावसायिक दिग्दर्शक असल्यासारखा वागत होता. मला परत ते साराच्या भूमिकेचं काहीही ऐकायचं नव्हतं. “सुहास,मी तुला मेसेज टाकते. जमलं तर भेटू.” मी मोबाईल बंद केला. आज चक्क मी सुहासला टाळत होते? मला त्याचं ते माझ्यावर वर्चस्व दाखवणं,कधी नव्हे ते तापदायक वाटलं.

दुपारी जेवण करून काही सामान आणायला मी बाहेर पडले. सुहासला कळवलच नाही. मला आज एकटीलाच निवांत फिरावसं वाटत होतं. मॉलमध्ये फिरत काही खरेदी केली आणि ग्रोसरीच्या भागात आले. महिन्याचं सगळं सामान घ्यायचं होतं. नाटकाची तालीम सुरू झाली की वेळ मिळणार नव्हता. मी घरून मोठी बॅग देखील आणली नव्हती. दोन कॅरी बॅग घेतल्या पण त्या चांगल्याच जड झाल्या होत्या. बिल देऊन मी बाहेर आले. सामानाचे ओझे न झेपल्यामुळे एक कॅरी बॅग तुटली. सामान खाली पडणार इतक्यात बॅगच्या खालून कुणीतरी हात धरला. मी बघितलं,तर नीलकंठ!
“मे आय?” त्याने हसत विचारलं.
मी देखील कधी नव्हे ते त्याच्याकडे बघून हसले आणि हो म्हणले. त्याने ती बॅग दोन्ही हाताने खालून धरली आणि म्हणाला,”कशी आली आहेस? टु व्हिलर का रिक्षा?”
“रिक्षेनेच आले आज! ड्रायव्हिंगचा कंटाळा आला होता.”
“ओके,तुझी हरकत नसेल तर एक कप कॉफी?”
“हो चालेल, गरज आहे त्याची! पण तू इथे कसा काय?” मी हसत म्हणाले.
“तुझ्याच सारखं महिन्याचं सामान घ्यायला. तू बाहेर पडायला आणि मी आत जायला एकच गाठ पडली. मी पण एकटा जीव सदाशिव ना! मॅनेज करावं लागतं.”

मलाच आश्चर्य वाटलं की नीलकंठला मी हो कसं काय म्हणाले? का माझा स्वार्थीपणा आड आला? तो माझ्या मदतीसाठी धावून आला म्हणून? मी त्याच्याकडे बघितलं. त्याचा नेहमीचा टिपिकल पेहेराव होता पण चष्म्याच्या आड असलेली त्याच्या डोळ्यातली निरागसता आज पहिल्यांदा मला जाणवली. खूप कोणावर तरी जीव ओवाळून टाकावा असं त्या डोळ्यांमध्ये काहीतरी दिसलं. नीलकंठला समजून घेण्यात मी चुकत होते का?..

नीलकंठ आणि मी मॉलमधल्या कॉफीशॉपमध्ये गेलो. त्याने कॉफी ऑर्डर केली आणि मला त्याची शबनम बॅग देत म्हणाला,”ह्यात मावेल तितकं सामान ठेव. कॅरी बॅग आता काही कामाची नाही.”
“पण तुला लागेल ना! तुलाही खरेदी करायची आहे ना!” मी त्याला बॅग परत देत म्हणाले.
“असू दे ग! मी उद्या परत येईन.”
“तुझी स्टाईल म्हणून नेहमीची बॅग आज कामात आली ” मी त्याच्याकडे बघून हसत म्हणाले.
“हो! मी लहानपणी कधीतरी टी व्ही वर ‘सिंहासन’ सिनेमा बघितला होता. त्यावेळी निळू फुलेंची ती शबनम बॅग, तो नेहरुशर्ट,तो चष्मा,मला खूप आवडलं होतं. काहीतरी फॅन्टसी!” नीलकंठ खळखळून हसत म्हणाला.
“म्हणजे? चष्मा उगाच लावतोस की काय?”
“नाही ग! नंबर आहे मला. बाकी बोल. नाटकाचं स्क्रिप्ट वाचलं का परत? छान रोल आहे ग! तू मस्तच परफॉर्म करशील,मला खात्री आहे. फार लोड घेऊ नकोस. सगळं मस्त होणार बघ. यु विल रॉक!”

नकळत मी सुहास आणि नीलकंठमध्ये तुलना करायला लागले. एखाद्याला गृहीत धरणं आणि एखाद्याला समजून घेणं,ह्यातला फरक मला आज कळला होता…..

आज नाटकाच्या प्रॅक्टिसचा पहिलाच दिवस होता. कंपनीच्या ऑडीटोरिअममध्ये आम्ही सगळे जमलो होतो. आज खुर्चीवर बसून फक्त प्रत्येकाने आपापले डायलॉग म्हणून दाखवायचे होते. नाटकाची सुरवात माझ्याच संवादापासून होती.
मी संवादाला सुरवात केली आणि सुहास एकदम ओरडला,”व्हॉट नॉनसेन्स अस्मिता! एका धावपटूचा रोल तू करते आहेस. शी इज अ स्ट्रॉंग गर्ल. तिच्या शारीरिक हालचाली बायकी नसणारच पण तिचं बोलणं सुद्धा टफ असणार. तुला मी सांगितलंय,साराच्या आयुष्यात जे घडलं त्यावेळची सारा आणि आधीची सारा ह्यात फरक दिसायला हवा. तुझ्या डायलॉग डिलिव्हरीत जरा बदल कर. एक अतिशय महत्वाकांक्षी मुलगी बोलतेय असं वाटायला हवं.”
सुहासचं ते बोलणं ऐकून माझा चेहरा पडला. गळ्यात दाटून आलं.

“कमॉन सुहास! आज पहिलाच दिवस आहे. आणि अस्मिता नेहमी नाटकात काम करत नाही. तिला जरा वेळ लागेल. नीट समजावून सांगितलं तर ती लवकर तयार होईल.” नीलकंठ माझी बाजू घेत म्हणाला.
“अस्मिता रिलॅक्स! तू उत्तम वाचते आहेस पण थोडे संवादात चढउतार येऊ दे.” सुहास नरमाईने म्हणाला.
माझं पुढचं वाचन छान झालं. सलग तीन दिवस सुहासने फक्त वाचन करून घेतलं. जेव्हा प्रत्यक्ष प्रॅक्टिसची वेळ आली तेव्हा मात्र भीती वाटायला लागली. सुहासच्या अपेक्षेचं ओझं वाटायला लागलं.

साराचा जिंकण्याचा प्रवास पूर्वार्धात होता. सतत यश मिळत गेलेली थोडी अहंकारी सारा मला रंगवायची होती. सुहास सांगायचा त्याप्रमाणे मी सगळं करत होते. अर्जुन साराचा मित्र म्हणून मला उत्तम साथ देत होता. आमच्या दोघांचे ट्युनिंग छानच जमले. प्रॉपर्टी आणि नेपथ्यची जबाबदारी नीलकंठने घेतली होती.

उत्तरार्धाची प्रॅक्टिस आज सुरू होणार होती. मी प्रॅक्टिसला आले तर मला व्हीलचेअर दिसली. बापरे! आता माझी खरी परीक्षा होती. व्हीलचेअरवर बसून ती चाकं चालवण्याची प्रॅक्टिस करायची होती.
रेस हरल्यावर सारा घरी येते आणि तिच्या पायातली शक्ती जाऊन ती दारातच कोसळते. इथेच पूर्वार्ध संपणार होता, जो आमचा छान बसला होता. दिग्दर्शक म्हणून सुहास समाधानी होता.
“सारा,तू व्हीलचेअरवर बसून ते चालवायची प्रॅक्टिस कर.” सुहास असं बोलल्यावर मी हसून म्हणाले,
“सुहास, तू चुकून मला सारा हाक मारलीस.”
“चुकून नाही अस्मिता! जाणूनबुजून मी तशी हाक मारली आहे. तू आजपासून प्रयोग संपेपर्यंत सारा आहेस.”
सुहासच्या ह्या पॅशनचं मला खूप दडपण यायला लागलं. मी माझा आत्मविश्वास गमावते का काय असं वाटायला लागलं. दारात कोसळलेल्या साराला तिचा मित्र उचलून घरात आणतो. अर्जुनने मला उचललं आणि गमतीत म्हणाला, “अस्मिता, ह्या सीनची मला जास्त प्रॅक्टिस नको देऊ हं! तुला उचलून माझे हात दुखायला लागतील. अर्जुनने जरा ताण कमी करायचा प्रयत्न केला. प्रॅक्टिसला जरा उशीरच झाला. सुहासने मला घरी सोडलं. गाडीत तो फक्त नाटकाबद्दल बोलत होता पण माझं लक्षच नव्हतं. तो माझ्या कामाची तारीफ करेल,माझ्या मेहनतीची दाद देईल असं वाटलं होतं पण तो स्वतः किती उत्कृष्ट दिग्दर्शन करतो ह्याचीच प्रौढी मिरवत होता. मी सीटवर डोळे मिटून पडले. एकतर त्या चेअरची चाकं सतत हलवून माझे हात दुखायला लागले होते. आईची तीव्रतेने आठवण झाली आणि रडूच आलं.
“अस्मिता,आर यु ओके? हवंतर उद्या प्रॅक्टिसला येऊ नकोस.”
सुहासच्या अशा बोलण्याने मी सुखावले. घर आलं आणि मी सुहासला बाय केलं.

सुहास मला साराच्या भूमिकेत शिरायला सांगत होता. मी पण ठरवलं,मी माझं १००% देईन. जिद्दी तर मी देखील आहेच. घरी आरशासमोर उभं राहून मी साराचे संवाद म्हणायला सुरवात केली. माझ्या आवाजाचे चढउतार, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव मी निरखून बघू लागले. आता स्वतःला झोकून द्यायचं असंच ठरवलं. व्हीलचेअर फिरवून फिरवून माझ्या तळहाताची सालं निघायला लागली होती. एक दिवस प्रॅक्टिसच्या आधी मी व्हीलचेअरवर बसले आणि नीलकंठने मला हॅन्डग्लोवज् दिले,”अस्मिता,प्रॅक्टिसच्या वेळेस हे घालत जा. म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी तुला हे घालता येणार नाही. मला संकोचल्यासारखं झालं. माझ्या सुद्धा हे लक्षात आलं नव्हतं. मी त्याच्याकडे बघितलं. त्याचं तेच निरागस हास्य! सुहासचं लक्षच नव्हतं. तो बाकीच्यांना सूचना देण्यातच व्यस्त होता.

प्रॅक्टिस सुरू होऊन जवळपास महिना होत आला होता. साराच्या पायातली शक्ती गेल्यावरचं तिचं उध्वस्त होणं,माझ्या अभिनयातून म्हणावं तसं येत नव्हतं. प्रॅक्टिसला मी जरा ब्रेक घेऊन बसले असता नीलकंठ माझ्याजवळ आला. माझ्या हातात कोल्ड ड्रिंक देत म्हणाला,”आज तुझा परफॉर्मन्स भन्नाट होणार आहे. नोट माय वर्ड्स.”
सतत मला प्रोत्साहन देऊन नीलकंठ माझी उमेद वाढवत होता आणि सुहास? त्याने आजपर्यंत माझ्या एकाही सीनची,माझ्या अभिनयाची तारीफ केली नव्हती.

मी सीनला सुरवात केली. अगदी पूर्णपणे सारा होऊन त्यात शिरले. बेभान होऊन संवाद सुरू केले. सीन संपला आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मी चेअरवर मागे मान टाकून डोळे मिटले.
“अमेझिंग अस्मिता! आज तुला खऱ्या अर्थाने सारा सापडली.” सुहास टाळ्या वाजवत म्हणाला. मी त्याच्याकडे बघून हसले. नीलकंठने लांबूनच मला दोन्ही हाताने “सुंदर” अशी खूण केली. त्याचं खरं ठरलं होतं. आज माझा परफॉर्मन्स खरोखर सुंदर झाला होता. मी समाधानाने व्हीलचेअरवरून उठायला लागले पण मला उठताच येईना. माझ्या पायातली पूर्ण शक्ती गेली होती. मी घाबरून रडायला लागले.
“अस्मिता, काय झालं? सीन संपला आहे. उठ की!” सुहास म्हणाला.
“सुहास,मला उठताच येत नाहीय.” मी हुंदके देत होते.
सगळे माझ्याजवळ येऊन मला उठवायचा प्रयत्न करत होते. पण माझे पाय लुळे पडले होते. दहा मिनिटांनी नीलकंठ माझ्याजवळ आला,त्याने मला खुर्चीतून उचललं आणि काव्याला म्हणाला, “काव्या, अस्मिताची पर्स घेऊन ये. मी टॅक्सी बोलावली आहे. तिला घरी सोडून येतो. तिची स्कुटर आज राहू दे कंपनीत, नंतर नेता येईल. आणि तू माझ्याबरोबर चल. तुला फ्लॅटचं लॉक उघडावे लागेल. मला अस्मिताला आत उचलून कॉटवर ठेवावं लागेल.”
नीलकंठने हळुवारपणे मला टॅक्सीत बसवलं. घरी आल्यावर मला अलगद कॉटवर ठेवलं. माझ्या मोबाईलमधून आईचा नंबर काढायला सांगून आईला फोन केला.
“काकू,मी नीलकंठ बोलतोय. अस्मिताचा कलीग! अस्मिताला थोडं टेम्परेचर आहे. तुम्ही येऊ शकाल का काही दिवस? घाबरण्याचे काहीच कारण नाही. अशा वेळेला ती एकटी नको म्हणून कळवलं.”
“काय झालं स्मिताला?”
“काकू रिलॅक्स! फार काहीही झालं नाही. दिवसभर आम्ही सगळे तिच्याकडे लक्ष ठेवून आहोतच आणि शेजारी पण सांगून ठेवतो पण रात्री तिला एकटं वाटेल म्हणून तुम्ही आलात तर बरं होईल.”
“मी उद्याच निघते. तिला बघितल्याशिवाय मला तरी कसं राहवेल?”
नीलकंठने फोन बंद केला आणि काव्याला म्हणाला,”आजची रात्र तू अस्मिताजवळ थांबू शकतेस का काव्या?”
“हो नक्कीच! मी घरी कळवते.”
“गुड! मी बाहेरून डिनर मागवतो आपल्या तिघांचे!”

तासाभरात नीलकंठने कुणालाही न सांगता, इतके पटकन सगळे निर्णय घेतले. मला काय बोलावे सुचेना. डोळेच भरून आले.

दुसऱ्या दिवशी आई आली. मला बघून आधी ती रडायलाच लागली. काय झालं हे कळल्यावर माझ्या पायावरून हात फिरवत म्हणाली,”स्मिता,तू ते नाटक अजिबात करणार नाहीस. मी त्या सुहासला कळवते.”
“आई प्लिज! मी त्यावर खूप मेहनत घेतली आहे. आता मला माघार घ्यायची नाही.”
“अग, पण तुझ्या तब्येतीची किंमत देऊन? हा शुद्ध वेडेपणा आहे. अजून महिना बाकी आहे. त्या रोलसाठी अजून कोणी मिळेल.”
“आई प्लिज!”
“मोठी झालीस तरी तुझी जिद्द आणि हट्टीपणा तसाच आहे.”

तीन दिवस झाले तरी पायात शक्ती येत नव्हती. औषधांचा मारा सुरू होता. आई रोज तेल लावून मालिश करत होती पण काहीच फरक पडत नव्हता. फिजिओथेरपी पण सुरू केली होती.

डोळे मिटून नाटकाचाच विचार करत होते,इतक्यात नीलकंठचा फोन आला,”अस्मिता,मी एका सायकॉलॉजिस्टची अँपॉईंटमेंट घेतली आहे. त्या खरं तर होम व्हिजिट करत नाही पण तुझी कंडिशन कळल्यावर त्या तयार झाल्या. डॉ सई, अतिशय प्रसिद्ध आणि हुशार डॉ आहेत.”
“अरे पण सायकॉलॉजिस्ट कशासाठी?” मी आश्चर्याने विचारलं.
“कळेल तुला, फार विचार करू नकोस. मला तुला ह्यातून बाहेर काढायचं आहे. साराची भूमिका तूच करणार आहेस.” नीलकंठने फोन बंद केला.
का हा इतकं करतोय माझ्यासाठी? हा माझ्या प्रेमात तर….? आणि मी ज्या सुहासच्या प्रेमात होते,त्याने हे सगळं घडल्यावर दुसऱ्याच दिवशी मला फोन करून विचारलं होतं, “अस्मिता, तू करू शकशील ना नाटकात काम? नाहीतर मी दुसरं कोणीतरी बघतो.”
सुहासबद्दल वाटणारं आकर्षण एका क्षणात कमी झालं.

डॉ सईना घेऊन नीलकंठ आला. डॉ सईंच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची चमक होती. त्यांनी इतकं गोड स्माईल दिलं की मला एकदम उभारी आली. नीलकंठने त्यांना सगळं सविस्तर सांगितलंच होतं. त्यांनी माझं बी पी चेक केलं.
“अस्मिता,आमच्या सायकॉलॉजीकल सायन्समध्ये ह्याला असोसिएशन (Association) किंवा होलनेस (Wholeness) म्हणतात. अनेक कलाकारांच्या बाबतीत हे घडतं. कामाची पॅशन, भूमिकेत शिरणे इतकं पराकोटीला जातं की पेशंट स्वतःला तीच व्यक्ती समजायला लागतो. फर्स्ट ऑफ ऑल, ह्यातून बाहेर पडायला तुम्हीच तुम्हाला मदत करायची आहे. औषध सुरू करूच! पण लवकर बरं होण्यासाठी तुमची पॉझिटिव्हीटी खूप महत्वाची आहे.
“जस्ट फरगेट अबाऊट सारा फॉर अ फ्यु डेज.” औषधं,व्यायाम आणि सकारात्मक विचार ह्यातून तुम्हाला बाहेर काढतील. तो रोल मीच करणार हा निर्धार करा आणि करून दाखवा.”
डॉ च्या बोलण्याने मला अगदी आजच मी पायावर उभी राहीन असं वाटायला लागलं. मी त्यांना लवकर बरी होण्याचं प्रॉमिस केलं.

नीलकंठ रोज येत होता. मला जबरस्तीने पायावर उभं करत होता. मरणप्राय वेदना होत होत्या पण तो आधार देऊन माझ्याकडून रोज चार पावलं चालणं करवून घेत होता. नाटकाचे संवाद माझ्याकडून पाठ करवून घेत होता. त्याने सुहासला स्पष्ट सांगितलं होतं की साराचा रोल अस्मिताच करेल. औषध,व्यायाम, आणि मी स्वीकारलेलं साराच्या भूमिकेचं चॅलेंज ह्या सगळी गोष्टींमुळे मी ह्यातून बाहेर पडले. बाबा एकदा येऊन भेटून गेले होते. आईची रजा खूप झाल्यामुळे ती नागपुरला परतली.
नाटकाला फक्त आठ दिवसांचा अवधी होता. मी थेट रंगीत तालीम होती त्यादिवशी नीलकंठ बरोबर कंपनीत गेले. माझी जिद्द, माझी तडफ,माझं पॅशन सगळं पणाला लावत मी सारा अशी उभी केली की काही वेळ सगळे स्तब्ध होते.

प्रयोगाचा दिवस उजाडला. मला काय वाटलं कुणास ठाऊक मी नीलकंठला फोन केला.
“बोल अस्मिता! तू किती वाजता पोहोचतेय?”
“तू येतो आहेस मला घ्यायला. मी घरून निघण्यापासून परत घरी येईपर्यंत तू माझ्याबरोबर असणार आहेस. मला काहीच विचारू नकोस. वाट बघतेय,लवकर ये.” मी फोन बंद केला आणि डोळ्यात अश्रू आले. पंधरा मिनिटात नीलकंठ टॅक्सी घेऊन आला.

प्रयोग सुरू झाला. हातपाय गार पडले होते. पण आईबाबा, नीलकंठ आणि डॉ सई डोळ्यासमोर आले. मी परत पूर्णपणे सारा झाले. अक्षरशः जीव ओतून अभिनय केला. शेवटच्या सीनमध्ये सारा आंतरराष्ट्रीय धावपटूचे गोल्डमेडल घेऊन तिच्या मित्राला सुयशला मिठी मारते. तो सीन करताना मी अर्जुनला मिठी मारली आणि माझ्याच नकळत “नील,नील” असं म्हणत रडायला लागले. टाळ्यांचा कडकडाटात पडदा पडला. बॅकस्टेजला येऊन सगळ्यांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. स्वतः मॅनेजिंग डिरेक्टर येऊन माझं कौतुक करून गेले,पण माझे डोळे नीलला शोधत होते. लांब कोपऱ्यात मला तो दिसला. मी त्याच्या जवळ गेले तर त्याने चष्मा काढून डोळे पुसले. मी पण भरल्या डोळ्यांनी त्याचा हात हातात घेत म्हटलं,”नील..”
तो माझ्या ओठावर बोट ठेवत म्हणाला,”काही बोलू नकोस. आपण करून दाखवलं अस्मि.”
अस्मि…किती गोड वाटत होतं ऐकायला!

मला घरी सोडण्यासाठी नीलने टॅक्सी बोलावली. टॅक्सीत काही न बोलता मी त्याच्या खांद्यावर मान टेकून डोळे मिटून घेतले. नीलने माझा हात घट्ट धरला. ड्रायव्हरने लताची गाणी लावली…

‘हर एक मुश्किल सरल लग रही है…..तेरा साथ है तो मुझे क्या कमी है….”

माझी आयुष्यभराची साथ मला गवसली होती….

★समाप्त★

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}