मनोरंजनमंथन (विचार)वैद्यकीय

विनोदी पद्धतीने कोकणातल्या डॉक्टरांची परिस्थिती मांडली आहे! जॅक ऑफ ऑल! डॉ. मिलिंद कुलकर्णी

विनोदी पद्धतीने कोकणातल्या डॉक्टरांची
परिस्थिती मांडली आहे!

जॅक ऑफ ऑल!

डॉ. मिलिंद कुलकर्णी

===============

आमच्याकडे कोकणात डॉक्टर दातही काढतो, (म्हणजे दुसऱ्याचे), कानात, नाकात पोरांनी घातलेला पेन्सिलचा तुकडाही काढतो, टाकेही टाकतो, प्लास्टरही घालतो, टीबीवरही औषधे देतो आणि बीपीवरही देतो. इथला प्रत्येक डॉक्टर हा असा बहुविध प्रकारचा असतो. स्पेशालिस्ट ही चैन हल्लीहल्ली येते आहे, पण डॉक्टर म्हटल्यावर त्येका, ‘ह्य़ा मी करूचय नाय’ असा असता नये. निखळलेला खांदाही बसवता यायला हवा आणि रुपलेला काटाही काढता यायला हवा. आमच्याकडे परिस्थितीच डॉक्टरला अशी मस्त ट्रेन करते. निखळलेल्या जबडय़ापासून ते बिघडलेल्या आतडय़ांपर्यंत आमचा डॉक्टर मुरारबाजीसारखा लढत असतो. तो डेंटिस्ट कम ऑर्थो कम गायनॅक कम पेडिअेट्रिक कम सर्जन एकाच वेळी असतो. नाकात घातलेला पेन्सिलचा तुकडा मी जर नाय काढला तर त्या पेशंटला कमीत कमी ३० किमी अंतरावर तालुक्याच्या ठिकाणी जायला लागणार, याची जाणीव असते.

आमच्याकडे पावसाळ्याच्या आसपास बोंबुल नावाचा एक कीटक असतो. टणक, गुळगुळीत कवचाचा आणि काटेरी पाय असणारा हा बोंबुल कोकणातल्या डॉक्टरची आणि पेशंटची रात्रीची झोप उडवायसाठीच पेशंटच्या कानात जातो. डॉक्टरची आणि पेशंटची झोप बोंबलते म्हणून हा बोंबुल. हा कानात गेला की तो कानाच्या पडद्याकडे धडक मारतो. गुळगुळीत पाठीमुळे चिमटय़ात धड पकडताही येत नाही. पेशंट बोंबुलाच्या प्रत्येक हालचालीबरोबर अक्षरश: बोंबलत असतो. आता हा काढला पाहिजे हे खरंच, पण मेंदू कुरतडल्यासारख्या वेदना होत असताना पेशंटला मी शांत, स्थिर राहायला सांगतो तेव्हा हमखास तो वैतागून म्हणतो, ‘हय माजो जीव चल्लो आणि तुमी ह्य़ा काय सांगतास भाऊनो, लौकर काय त्या करा नायतर मी मरतंय आता.’ सुरुवाती-सुरुवातीला मी फार टेन्स व्हायचो, पण आता यावर एक नवीनच उपाय शोधलाय. सरळ झायलोकेन जेलीने कान पूर्ण भरतो. लुब्रिकेटिंग जेली असल्याने कीटक पकड घेऊ शकत नाही आणि अॅयनेस्थेटिक असल्याने वेदनाही कमी होतात. बोंबुलाला आधी पूर्ण जेलीसमाधी देतो आणि मगच त्याला काढायच्या मार्गाला लागतो. आता हे असं करावं असं कुठल्या पुस्तकात आहे? पण ढूंढना पडता है! विंचू लागलेला पेशंट तर अक्षरश: उडत असतो. प्रचंड वेदना असतात. मला स्वत:ला विंचवाचा एकदाच अनुभव आला, पण तेव्हापासून विंचू चावलेला पेशंट आलाय म्हटलं की मी त्या वेळच्या वेदना आठवून दुप्पट वेगानं धावतो. तिथलं चित्र मात्र फार मजेशीर असतं. दक्षिण कोकणातला विंचू घातक नाही, त्यामुळे नातेवाईक मजेत हसत असतात आणि पेशंटला हसूही येतं आणि वेदना असह्य़ही असतात.

पायाखाली होणं म्हणजे साप चावणं किंवा विषाराची केस म्हणजेही साप चावलेला पेशंट! आमच्याकडे बहुतेक वेळा पेशंट (टूर्नीके बांधलेला), मारलेला साप (प्लास्टिक पिशवीत) आणि सरकारी दवाखान्यातून मागून आणलेली अरश् ची बाटली हे सगळं प्रेझेंट एकत्रितच येतं. फुरसं हा प्रकार ठीक आहे, पण आग्या-घोणस लचकाच तोडतो. अतिघाणेरडा साप. सर्पमित्रांची माफी मागतो, पण रेनल फेल्युअर, रक्तस्राव यामुळे या घोणसाची मला प्रचंड चीड आहे. मण्यार हा प्रकार मज्जासंस्थेवर परिणाम करणारा असतो. फुरसं छोटं, घोणस मोठा आणि मण्यार लांबड, नाजूक.

भात कापणीच्या वेळी, उकाडय़ाच्या संध्याकाळी हे सगळे छोटे, मोठे, लांबडे शेतात, रस्त्यावर विहरत असतात. भातझोडणीच्या वेळी जो गोटा (टरफलासकटचा तांदळाचा दाणा) उडतो तो कुठे कुठे घुसून बसेल ते सांगता येत नाही. त्यामुळे भातझोडणीच्या वेळी हे कानात, नाकात गोटा घुसून (त्याला टोक असल्याने ते चांगलेच रुतून बसते) हैराण झालेले पेशंट येतात. थोडक्यात काय, प्रत्येकाचे दिवस ठरलेले आहेत. बोंबुल, विषार, विंचू, गोटा काटा, हर एक का अपना-अपना अंदाज है़ एकदा का ही चीजवस्तू यशस्वीपणे बाहेर काढली की सर्वप्रथम झोपलेल्या अवस्थेतच पेशंट आपला तळवा पसरतो, त्यावर ती ठेवायची, मग तो ती नीट न्याहाळतो आणि कागद मागून घेऊन त्यात व्यवस्थित बांधून घेऊन घरी, वाडीत दाखवायला घेऊन जातो. मग वाडीत त्यावर परिसंवाद, बोंबुल पैले आणि आत्ताचे किंवा वाडीत यापूर्वी कोणाकोणाच्या कानात असे अतिक्रमण झाले वगैरे विषयांवर रंगतात.

त्यामुळे कोकणातली ओपीडी म्हणजे विविध वैद्यक शाखांचे स्नेहसंमेलनच असतं. रोज भरणारं स्नेहसंमेलन.

स्नेहसंमेलन, जे वेटिंगरूममध्ये चालू असतं त्यावर मात्र बारीक लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे सांधेदुखीसाठी वरचेवर येणारी आजी फूल व्हाल्यूममध्ये भरल्या ओपीडीत संवाद सुरू करते. वर्षभर यांच्याकडे नुस्ती चलतंय. काय एक गुण नाय. उठलंय तर बसता येत नाय आणि बसलंय तर उठता येत नायं. ढीगभर गोळ्या खातंय, पण फरक म्हणानं नाय. गाडीभाडय़ाकच पाच-धा हजार घातले असतील. दरवेळी औषधां मात्र लिवान देतंत. काडीचो गुण नाय. जास्त तेवढां होता. आताशी गोळ्या गरम होतंत आणि इंजेक्शना घेऊक वाव रवलो नाय हा.

माझ्या इज्जतीचा फालुदा चालू असतो. आता ही हाडांची झीज झालेली आजी खयही गेली तर ह्य़ाच होतला हे माका माहिती असता आणि तिकाही. म्हणान तर ती परत परत येता. तेवढय़ात दुसरी एखादी आजी दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला माझ्याच वेटिंग रूममध्ये बसून मला ऐकू येईल या आवाजात देते. तू म्हांजनांकडे (आडनाव महाजन) एकडाव जाऊन बघ. माझ्या सुनेच्या काकाच्या मावशीक त्येंचो गुण इलो. वातारं बरे हा म्हणतत, नायतर गोवळच्या गावठी वैद्याक दाखवून बघ. तो बरो हा.

आता हा फालुदा थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या आजीला नंबरपूर्वीच बोलावून उपचार करून पाठवणे. आजी आतमध्ये आली की मी कळवळून म्हणतो. ‘गे आवशे काय चार लोकांत माझी लाज काढतंस? गुण नाय म्हणान सांगतंस.’ आजी म्हणते- ‘रे झीला, रे माज्या वासरा, माजा दुखणाच तसला, तेका तू तरी काय करशील? माका उठूक होत नाय, बसाक होत नाय. कंटाळलंय बाबा. एखादा कायमचा तरी विंजेक्शन दे. वर जाऊसाठनं गोळ्या दे. पूर्वी मी या ओपीडीच्या वेटिंगरूममधल्या परिसंवादाला घाबरून असायचो. आता मात्र निर्धास्त असतो. शेवटी कोकणी पेशंट आपल्या अनुभवाशी ठाम असतो. कोणी काही चर्चा करतंय म्हणून किंवा सांगतंय म्हणून तो सहजासहजी आपला डॉक्टर बदलत नाही. कोकणात पेशंट डॉक्टरचे खाजगी आयुष्य आणि त्याची निदान-उपचार क्षमता यांत गल्लत करीत नाहीत. एखादा डॉक्टर थोडीशी घेणारा जरी असला तरी त्याचे पेशंट म्हणतात. ‘डॉक्टराच्या हाताक गुण हा, फक्त संध्याकाळी ८ नंतर थय जाता नये.’

बऱ्याच वेळा पेशंट मागची कागदपत्रे, दाखवायला औषधे न घेता येतो त्या वेळी मी भडक-भडक भडकतो. विचारतो- ‘औषधा, रिपोर्ट कित्या नाय आणलास!’ पेशंट हमखास सांगतो, ‘भाऊनो, गडबडीत इसारलंय. गाडीची घाई झाली आणि पिशवी थयच रवली.’ मी विचारतो- ‘पायात चप्पल घातलास?’ पेशंट हो म्हणाला की मी तडकून विचारतो- ‘म्हणजे चप्पल लक्षात रवता आणि माजो कागद इसारतास, म्हणजे किंमत जास्त कशाची झाली? आता ती चप्पल आणा इकडे आत आणि घाला माझ्या डोक्यार.’

पेशंट समजूत काढतो- ‘भाऊनो रागावतास कशाक? उद्या कागद पाठवून देतंय झीलाबरोबर. तो उद्या तरळ्यात येऊचो हा.’ मी थोडा शांत होतो. पुन्हा पुढच्या वेळी हाच सीन, हाच डायलॉग रिपीट. इतकं भडकून, चिडूनही पेशंट रागावत नाहीत. मी कधीतरी पेशंटना विचारतोसुद्धा. ते सांगतात- ‘भाऊनो, ह्य़ा तुमी आमच्याच भल्यासाठी भडाकतास. त्येचा काय एक राग नाय. काही बोल्लास तरी आमचो विश्वास तुमच्यावर. तुमका टाकणार नाय आणि दुसरीकडे जाणार नाय.’

प्रत्येकाचा आपापला डॉक्टर ठरलेला असतो. एखादे दिवशी आपला नसलेला पेशंट येतो तेव्हा शांतपणे सांगतो, ‘आज आमचे डॉक्टर नाय हत म्हणून नाइलाजानं तुमच्याकडे इलाव.’ पहिल्यांदा या वाक्याचा मला खूप राग यायचा. आता मात्र या स्पष्टवक्तेपणाची मलाही सवय झालीय. मी नसताना माझा पेशंटही दुसऱ्या डॉक्टरला हेच ऐकवत असणार. ‘ते नाय हत. आतापुरता काय ते देवा. उद्या ते इले की त्यांच्याकडेच दाखवतंय.’ शाब्बास रे पठ्ठय़ा. उगाच तोंडदेखलं बोलणं नाही की खोटेपणा नाही.

एकदा मुंबईच्या चाकरमान्यानं मला एक सेन्सर बसवलेल्या पोपटाचं खेळणं भेट दिलं. त्याच्याजवळ टाळी वाजवली की तो चिर्र-चिर्र असं ओरडायचा. त्या पोपटाला मी ओपीडीतल्या एका खुंटीवर टांगून ठेवलं होतं. एक आजी सारखी बरं नाही, गुण नाही म्हणून सतत माझ्याकडे येते. मी तिला कंटाळत नाही आणि ती मला. तिने विचारलं- ‘भाऊनो या पाखरू कसला?’ मी गमतीनं सांगितलं, ‘जादूचा पोपट हा. बरा होणार काय विचारल्यावर ओरडला तर आजारपण नक्की बरा होता आणि नाय वराडला तर नाय.’ आजी म्हणाली, ‘त्येका माजा विचार तरी.’ मी टाळी वाजवली, पोपट ओरडला. म्हातारी खूश झाली. खरंतर तिलाही माहिती- ही सगळी गंमत आहे. पण कंटाळलेलं माणूस कशातही आधार शोधतं. असं तीन-चार वेळा आजीनं टाळी वाजवायला लावून ‘बरा होणारं’चा कौल घेतला. दरम्यान, तो पोपट एका पोरानं ओढून त्याचा सत्यानाश केला. आजी पुन्हा आली तेव्हा पोपट नव्हता. आजीनं विचारलं, ‘जादूचा पोपट खय हा?’ मी सांगितल, ‘तो पळून गेला.’ म्हातारीनं सुस्कारा टाकला आणि म्हणाली, ‘त्ये एक बरा झाला. तीन वेळा मेला खोटाच बोलला. काय एक बरा नाय हा. काडीचो गुण नाय हा!’

@@@

डॉ. मिलिंद कुलकर्णी ,तळेरे,सिंधुदूर्ग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}