अमरावतीचा वैदर्भीय जन्म , शिक्षण सगळं नागपूरला पण पुण्याचं अप्रूप वाटायचं –‘पुणे तेथे काय उणे’
★★ ‘पुणे तेथे काय उणे’ ★★
आज मी पुण्याबद्दल बोलणार आहे.कधीकाळी मला अपरिचित असलेलं हे शहर आता माझं वाटतं.ह्या शहराची ओढ वाटते.
मी वैदर्भीय.जन्म अमरावतीचा पण नंतर वास्तव्य, शिक्षण सगळं नागपूरला.त्यावेळी पुण्याची काहीही माहिती नव्हती.मुंबईसारखंच पुण्याचं पण अप्रूप वाटायचं.माझ्या आईची मैत्रीण पुण्याची.ती आणि तिचे मिस्टर कधीतरी आमच्याकडे यायचे तेव्हा मला खूप भारी वाटायचं.त्या दोघांचेही बोलणे अगदी खालच्या पट्टीत, आदबशीर.आमचंही बोलणं मग आपोआपच खालच्या पट्टीत जायचं.
योगच म्हणा,त्या मावशीमुळेच माझं लग्न जमलं आणि पुणेकर झाले.आणि भाषेच्या गमतीजमती सुरू झाल्या. माझे सासरे पंधरा वर्षे नोकरीनिमित्त नागपूरला होते त्यामुळे त्यांना नागपुरी भाषा नवीन नव्हती.पण सासरी कोणाचीही भाषा बदलली नाही.ती पुण्याचीच राहिली.
मला सर्वप्रथम ‘करून राहिली’,’येऊन राहिली’ ‘आली’, ‘गेली’ हे बदलावं लागलं.मग हळूहळू शिकत गेले.
माझी जाऊ पुण्याची.एकदा स्वयंपाक करताना मी त्यांना म्हटलं, “वहिनी,सराटा कुठेय?” त्या माझ्याकडे गोंधळलेल्या, प्रश्नार्थक चेहऱ्याने बघायला लागल्या.आता पुण्यात त्याला काय म्हणतात, हे मला ठाऊक नव्हतं. मी इकडेतिकडे बघितलं आणि सराटा दिसल्यावर म्हटलं,”हा.” तसं त्या म्हणाल्या,हे उलथनं आहे. वरण, कढी वाढतो त्याला नागपूरला डाव म्हणतात.आमच्या घरी ओघराळं.चिमटा म्हणजे पापड भाजायला किंवा फुलके करायला लागतो तो,पण इथे चिमटा म्हणजे सांडशी.माझ्या सासूबाईंची भाषा तर त्याहून वेगळी.त्या विळीला वेळी म्हणतात.एक दिवस सफरचंद कापायचे होते म्हणून मी म्हटलं,” चाकू कुठे ठेवलाय?” तर आमचे अहो म्हणाले,”कोणाचा खून करायचा आहे?” आणि हसायला लागले.मला कळेचना काय झालं, तर म्हणाले,
” सूरी म्हण,सूरी.”🤣
नागपूरला आम्ही मैत्रिणी नेहमी “किती पागल,किती बावळट’ (म्हणजे नाव ठेवताना हो) असं म्हणायचो पण पुण्यात आल्यावर ते ‘पागल’चं ‘खुळचट’ कधी झालं कळलंच नाही.
पदार्थांच्या नावाचं तर काही विचारूच नका.साबुदाण्याची उसळ म्हणजे खिचडी,फोडणीचं वरण म्हणजे आमटी(आमची नागपूरची म्हणजे फक्त कटाची आमटी),मिरचीचे लोणचे म्हणजे खारातली मिरची. माझे सासरे ‘उपमा’ ला ‘उप्पीट’ म्हणायचे.
एक तर धमाल किस्सा आहे.लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी किराणाच्या दुकानात गेले होते.मी म्हटलं, “ओला नारळ द्या.”
ते दुकानदार म्हणाले,”पुण्याच्या दिसत नाही तुम्ही ताई.”
मला वाटलं, ह्यांना कसं कळलं? माझ्या चेहऱ्यावर तर कुठे लिहिलं नाहीय.मी म्हटलं,”तुम्हाला कसं कळलं?”
तर ते लगेच म्हणाले,”अहो ताई,नारळ ओलाच असतो.खोबरं सुकं असतं.(कोरडं नाही हं,इथेही शब्द बदलला)फक्त नारळ द्या असं म्हणा.”नागपूरला त्यावेळी नारळ सहजासहजी मिळत नसे.देवाला वाहताना सुद्धा तिकडे पूर्वी कोरडा नारळच अर्पण करायचे.म्हणून ओला नारळ,कोरडा नारळ असं म्हणायची पद्धत होती.
ऑटोरिक्षाची अजून एक गम्मत.नागपूरला सायकल रिक्षा असल्यामुळे ऑटो म्हणतात.पुण्यात फक्त रिक्षा.मी सुरवातीला ऑटोच म्हणायची.मग मला कळलं की ऑटो म्हटलं की त्यांना लगेच कळत,ही व्यक्ती पुण्याची नाही.
पुण्याबद्दल लोकांमध्ये एक अकारण गैरसमज आहे.पुण्याचे लोकं फारसं जवळ करत नाहीत.स्वतःच्या कुटुंबापलीकडे कोणाचा विचार करत नाहीत.पण खरं सांगू का,मला आजपर्यंत असा एकही पुणेकर भेटला नाही.जो भेटला त्याच्याशी चांगलेच ऋणानुबंध जुळले.
आम्ही शुक्रवार पेठेत राहायचो तेव्हा शेजारची नेहा माझी खास मैत्रीण झाली. तिच्याशी तर माझी गट्टीच जमली होती.माझ्या मुलाच्या बारशाला ती पुण्याहून नागपूरला आली होती.वास्तविक देशपांडे सगळे पुणेरी,पण वागण्याबोलण्यात कुठेही पुणेरी झाक नव्हती. अजूनही आमची तितकीच गाढ मैत्री आहे. अशा बऱ्याच पुण्याच्या मैत्रिणींनी मला खूप प्रेम दिलं.आणि ‘ब्राम्हण युनिटी’ जॉईन केल्यापासून तर खूप छान, मनमिळावू मित्र,मैत्रिणी मिळाले आहेत. तुटकपणा,तुसडेपणा हा माणसात असतो. त्यात गावाचा काहीही संबंध नाही. पुण्याची माणसं थोडी अंतर ठेवून असतील पण कर्तव्याला चुकत नाहीत.
आता या पिढीतल्या कितीतरी मुलांची पुणे ही कर्मभूमी झालीय.त्यांना जे ऐश्वर्य मिळतंय ते पुण्यात राहूनच.म्हणजे इथे राहायचं आणि गोडवे आपल्या गावाचे गायचे हे काही मला पटत नाही.
माझ्या वडिलांना पुणे फारच आवडायचं.पुण्याची लोकं शिस्तबद्ध आणि कष्टाळू आहेत असं ते नेहमी म्हणायचे. प्रत्येक गावाचं आपलं एक खास वैशिष्ट्य असतं. तिथे राहायला लागलो की तिथले गुण येतातच.आता कधी कधी मलाही ऐकून घ्यावं लागतं,”पुणेरी झालीस.” मी हो म्हणते.इतकी वर्षे पुण्यात राहतेय,बदल तर होणारच. पण तरीही माझ्या तोंडात खास पुणेरी ‘की’ काही येत नाही. माझं आपलं ‘करते न’ असंच असतं, ‘करते की’ नाही.
जसजसे वय वाढते तसे स्त्रीला माहेरपेक्षा सासरची जास्त ओढ वाटते असं म्हणतात.माझंही तसंच झालंय. माझं नागपूरवर जिवापाड प्रेम आहे पण नागपुरात चार दिवस झाले की मला पुण्याची आठवण येते.
‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण आहेच. गुण,अवगुण प्रत्येकच शहराचे असतात पण आपण जिथे राहतो तिथले चांगले गुण घ्यावे आणि त्या गावाशी कृतज्ञ राहावं असं माझं मत आहे. एखाद्या वेळेस चेष्टा,गम्मत जरूर करा पण इतर शहरातून पोटापाण्यासाठी पुण्यात येऊन राहणाऱ्यांनी, पुण्यावर प्रेम पण करा.
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे , 98604 38232