दुर्गाशक्तीClassifiedदेश विदेशवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

आपली राजापूर, रत्नागिरीची कन्या Samata Gokhale-Dandekar सध्या इस्राईल मध्ये आहे तिथून तिने दिलेले लाईव्ह updates

आपली राजापूर, रत्नागिरीची कन्या Samata Gokhale-Dandekar सध्या इस्राईल मध्ये आहे तिथून तिने दिलेले लाईव्ह updates

इस्राईलमधून शलोम,
२०२१ नंतर परत एकदा इथल्या युद्धजन्य परिस्थितीवर लेख लिहिण्याची दुर्दैवाने माझ्यावर वेळ आली आहे. कारण भारतात दाखवल्या जाणाऱ्या बातम्या, नातेवाईक, मित्र परिवार यांचे काळजीयुक्त येणारे मेसेज आणि कॉल्स यासाठी इथल्या परिस्थितीवर खरंखुरं तटस्थ भाष्य करण्याची मला नितांत गरज वाटते.

सुरुवात कशी झाली?

इस्राईलच्या दक्षिण-पश्चिम भागात गाझा-पट्टी हा एक संघर्षमय प्रदेश आहे. पॅलेस्टाईनच्या दोन विभक्त भागांपैकी हा एक तुलनेने बराच लहान भाग आहे. हा प्रदेश हमास या इस्लामिक दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. ७ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ६ च्या दरम्यान गाझा पट्टीमधील हमासचे शेकडो दहशतवादी गाझा पट्टीला लागून असलेल्या इस्राईलमधील काही गावांत इस्रायली सीमाकवच तोडून घुसले. काही दहशतवादी सीमेवरील भक्कम कुंपण बुलडोझर ने तोडून तर काही paraglider ने हवेतून इस्रायली हद्दीत घुसले तर काही समुद्रमार्गे इस्राईलच्या हद्दीत घुसले. त्याचवेळी हमासने गाझामधून सीमावर्ती भागासह रेहोवोत, तेल अवीव, जेरुसलेम या मध्य इस्राईल मधील शहरांवर रॉकेट्स सोडायला सुरु केली. अशाप्रकारे सीमावर्ती भागांत हमासच्या दहशतवाद्यांची इस्राईलमध्ये घुसखोरी आणि बाकी इस्रायली शहरांवर गाझामधून रॉकेट्स अशा दोन आघाड्यांवर हमासने इस्राईलवर हल्ला सुरु केला.

सीमावर्ती भागांतील घुसखोरी

गाझामधून शेकडो दहशतवादी वेगवेगळ्या मार्गानी इस्राईलच्या सीमेवरील सुमारे २२ गावांत घुसले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. या घुसलेल्या हमासच्या अतिरेक्यांनी रस्त्यांवर सकाळी व्यायामासाठी, बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या इस्रायली आबालवृद्धांना, इस्रायली चेकपोस्ट मधील सैनिकांना, इस्रायली पोलीस स्थानकातील पोलिसांना गोळ्या घालून अमानुष हत्या केली. इस्रायली सैनिकांच्या मृतदेहांसोबत विजयी आविर्भावाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून जल्लोष सुरु केला. इस्रायली सैनिकांचे मृतदेह परत गाझामध्ये नेले. काही इस्रायली गावांमध्ये या दहशतवाद्यांनी इमारती स्वतःच्या ताब्यात घेतल्या आणि बेछूट गोळीबार सुरु केला. घरांघरांत जाऊन बेल वाजवून अजाणत्या लोकांनी दरवाजा उघडला की त्या घरांमध्ये आग लावली, वस्तूंची नासधूस करून इस्रायलींना मारून आणि त्यांचे अपहरण करून गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलं आहे.

ज्यू लोकांच्या सणांनिमित्त इथे सध्या सुट्ट्या सुरु आहेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री सुमारे हजारभर तरुण मुलं-मुली दक्षिण इस्राईलमधीलच एका ठिकाणी उघड्या माळरानावर पूर्ण रात्रभर पार्टीसाठी जमले होते. पार्टीनंतर शनिवारी पहाटे जागच आली ती आकाशात दिसणाऱ्या रॉकेटच्या धुराने. आणि उठून बघतायत तोवर समजलं की आपल्या पूर्ण ग्रुपला पण हमासच्या अतिरेक्यांनी वेढा घातला आहे. त्या हजारभर मुलामुलींनी वाट दिसेल तिकडे धावायला सुरुवात केली खरी पण बेछूट गोळीबार करणारे दहशतवादी त्यांच्या मागावर होतेच. काहींनी खूप अंतर धावून इमारतींमध्ये आश्रय घेतला पण दुर्दैवाने त्या इमारतीसुद्धा दहशतवाद्यांनी आधीच ताब्यात घेतल्या होत्या. काही मुलामुलींची मात्र निव्वळ दैवयोगाने सुटका झाली तर काहींना ओलीस म्हणून गाझा मध्ये नेण्यात आलं आहे.

बाकी इस्रायली शहरांवर रॉकेट हल्ले

हमासने सकाळी ७ वाजल्यापासूनच दक्षिण सीमावर्ती भागांतील सेडेरोत, अशकेलॉन, रेहोवोत अशी इस्रायली शहरं आणि जेरुसलेम, तेल अवीव सारख्या बाकी प्रमुख शहरांवर रॉकेट्स सोडायला सुरुवात केली. एकूण सुमारे ५००० रॉकेट्स सोडली असं बातम्या सांगतात. परंतु जगात एकट्या इस्राईलकडे “आयर्न डोम” या प्रणालीने या ५००० रॉकेट्सपैकी ९0% रॉकेट्स हवतेच थांबवून नष्ट केली गेली. जसं रामायण किंवा महाभारतात दाखवलं जायचं की रावणाने किंवा कौरवांनी सोडलेल्या बाणाचा रामाने किंवा पांडवांनी मारलेल्या बाणाने हवेतच अचूक वेध घेतला, अगदी तसंच ही “आयर्न डोम” यंत्रप्रणाली काम करते. पूर्ण देशभर ही यंत्रप्रणाली कार्यरत असते.

ही यंत्रप्रणाली तंत्रज्ञानाने एवढी समृद्ध आहे की उजाड माळरानावर लोकसंख्या नसलेल्या भागात रॉकेट्स पडत असतील तर तेथील रॉकेटचा वेध घेतला जात नाही. गाझाकडून येणाऱ्या रॉकेट्सची अवघ्या काही सेकंदात दिशा बघून त्या दिशेने आयर्न डोम मधून प्रतिक्षेपणास्त्र सोडलं जातं आणि हे प्रतिक्षेपणास्त्र त्या रॉकेटला हवेतच निष्प्रभ करतं. याचसोबत ज्या भागाकडे रॉकेट जात आहे बरोबर त्या भागांत siren वाजतात, जेणेकरून त्या भागांतील लोक जवळच्या शेल्टर मध्ये सुरक्षितपणे आसरा घेऊ शकतात. शेल्टर म्हणजे रॉकेटपासून बचाव करणारी जागा. आयर्न डोमच्या कार्यप्रणालीमध्ये चुकून काही बिघाड झाल्यास लोकांना रॉकेटपासून ईजा होणार नाही, अशी ही दुहेरी भक्कम व्यवस्था इथे अस्तित्वात आहे. जुन्या इमारतींमध्ये शेल्टर हे तळघरात असतात तर १९९० नंतर बांधलेल्या सर्व इमारतींत शेल्टर प्रत्येक मजल्यावर असतात.

बरं, रॉकेट या नावाने आणि त्यांच्या आकड्यांनी घाबरून जाणं स्वाभाविक असलं तरीही ह्या रॉकेट्सचे तंत्रज्ञान हे तुलनेने जुनाट आणि कमकुवत आहे, हे जाणणे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे एखादे रॉकेट समजा इमारतीला आदळले तरी पूर्ण इमारत पडण्याची क्षमता या रॉकेट्समध्ये नाही. फारतर एखादी भिंत पडू शकते, खिडकी असेल तर आग लागू शकते आणि खोलीत माणूस असेल तर त्याला इजा होऊ शकते. असेच एक रॉकेट इमारतीच्या भिंतीला आदळून तिथे आग लागल्याचा एक फोटो viral झाला आहे. पण त्याची बातमी भारतीय वृत्तवाहिन्यांवर पूर्ण इमारत पडली अशी बनवली जातेय. असो.

यावर इस्राईल सरकारने केलेल्या उपाय योजना

शनिवारी भल्या सकाळी सीमेवर हा प्रकार सुरु झाल्यावर सुरुवातीला काहीशा गाफील इस्रायली लष्कराला परिस्थितीचा संपूर्ण अंदाज यायलाच वेळ लागला. त्यात सुट्ट्यांमुळे सुमारे बरेच सैनिक रजेवर होते, दक्षिणेत तर नगण्य कुमक होती. स्वतःच्याच घरात लोक अडकून पडले होते तर काहींच्या घरात दहशतवादी घुसले होते. घराबाहेर दहशतवादी मुक्तपणे फिरतायत, गोळीबार करतायत, असे २२ गावांतून पीडित लोकांचे सैन्याला फोनकॉल्स सतत येतच होते. पण परिस्थिती समजून घेऊन, बचाव योजना आखून देशाच्या दुसऱ्या भागांतून दक्षिणेत कुमक नेईपर्यंत इस्रायली सरकार आणि लष्कराला किमान ७ तास लागले. एवढ्या वेळात दक्षिण इस्राईलमध्ये प्रचंड नुकसान होऊन गेलं होतं.

त्यानंतर मग योजना ठरवून बचाव मोहीमा सुरु झाल्या. एक मोहीम म्हणजे घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून अडकलेल्या नागरिकांना सोडवणे आणि दुसरी मोहीम म्हणजे गाझामधील हमासच्या केंद्रांवर हवाई प्रतिहल्ले सुरु करणे. इथे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिलं जात असल्याने हजारो लोकांना या कारवाईसाठी बोलावण्यात आलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी सरकारने मिळून परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी एक एकत्रित “आपत्कालीन सरकार” बनवलं आहे.

इस्राईल गाझाला अन्न, पाणी, आणि वीज पुरवतो. तो पुरवठा पूर्णपणे तूर्तास तरी बंद केला आहे. इस्राईल करत असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे गाझा मधल्या सामान्य नागरिकांना इस्रायली पंतप्रधानांनी गाझा सोडून दुसऱ्या देशांत जायला सांगितलं आहे.

युद्धाच्या दुसऱ्या दिवशी इस्राईलच्या मुख्यतः पीडित सीमेवरील भागात काय परिस्थिती आहे?

२२ पैकी बऱ्याच गावांत घुसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यात इस्रायली लष्कराला यश आलेलं आहे. अजूनही १-२ इस्रायली गावांत हमासच्या अतिरेक्यांसोबत इस्रायली सैनिकांची धुमश्चक्री सुरु आहे. मृतदेहांची ओळख पटवली जात आहे, साधारण किती जणांना ओलीस म्हणून गाझा मध्ये नेलं आहे याचा तपास सुरु आहे. त्यांना सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. हॉस्पिटल्समध्ये हजारो जखमी लोकांवर उपचार सुरु आहेत, रक्तदानासाठी पूर्ण देशात ठिकठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. आणि सोबतच प्रत्युत्तर म्हणून हमासच्या अतिरेकी केंद्रांवर इस्रायली हवाई प्रतिहल्ले प्रचंड तीव्रतेने सुरु आहेत.

जाणते-अजाणतेपणी पसरवले जात असलेले काही गैरसमज

५००० रॉकेट्समुळे आयर्न डोम यंत्रणा मोडकळीला आली असं बातम्यांमध्ये सांगितलं जात आहे. परंतु ५००० रॉकेट्स एकाच वेळी सोडण्यात आली नाहीत. ती सकाळी ७ ते ११ या वेळेत टप्पाटप्प्याने सोडली गेली. त्यामुळे ९0% रॉकेट्सना आयर्न डोम ने निष्प्रभ केलेच आहे. उरलेली १0% रॉकेट्स काही ठिकाणी इमारतीला, गाडयांना आपटली. पण आधी सांगितल्याप्रमाणे आयर्न डोमसोबतच sirens आणि शेल्टर ही दुहेरी व्यवस्था पण इथे अस्तित्वात आहे.

काही पोस्ट्स मध्ये तरुण मुलींवर लैगिक अत्याचार करून मग गाझामध्ये ओलीस म्हणून नेलं गेलं असं जे लिहिलेलं आहे, ते पूर्ण खोटं आहे. अर्थात त्यांना गाझामध्ये नेल्यानंतर काय परिस्थिती आहे, हे अजून समजलेलं नाही. शिवाय वर लिहिलं तसं हजारो मुलं उजाड माळरानावर पार्टी साठी गेली होती. इथे सद्धया उन्हाळा सुरु असल्याने मुली शॉर्ट कपडे घालतात, अगदी पार्टीमध्येसुद्धा. त्याच कपड्यांमध्ये त्या बिचाऱ्या मुलींना उचलून ओलीस म्हणून नेलं गेलं. त्याचे फोटो viral झाले. याचा त्या मुलींना अर्धनग्न करून नेलं म्हणून कोणी अर्थ काढला?

यात इस्रायली यंत्रणेचे काय अपयश?

इस्रायली लष्कराने वेळोवेळी अश्या धोक्याची जाणीव करून देऊनही इस्रायली सरकारने एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीत गाफील राहणं, मोसादसारख्या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेलाही या दहशतवादी हल्ल्याची सुतराम कल्पना नसणं, सीमेवर असलेले सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टिम निष्क्रिय होणं, गाझासारख्या घातकी सीमेवर लष्करी रणगाडे असून पण त्यावर पुरेसे सैनिक तैनात नसणं, घरांमध्ये दहशतवादी घुसल्यावर लोकांनी मदतीसाठी फोनद्वारे याचना करूनही तब्बल ७ तासानंतर मग सैनिक तिथे पोहोचणं आणि मग एवढ्या उशिरा बचावकार्याला सुरुवात होणं, या नक्कीच इस्राईलसारख्या देशासाठी लाजिरवाण्या गोष्टी आहेत. त्यावर यथावकाश इथले सरकार, लष्कर, आणि जनता कार्यवाही करेल, यात शंकाच नाही. आत्ता या क्षणाला मात्र कोणीही कोणावर आरोप-प्रत्यारोप करत न बसता सगळी जनता, सत्ताधारी आणि विरोधी सरकार एकत्र येऊन पुढील कार्यवाही करण्यावरच लक्ष केंद्रित करत आहेत, ही आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे, असं मला वाटतं.

७ ऑक्टोबर हा दिवसच हल्ल्यासाठी का निवडला गेला?

बरोबर ५० वर्षांपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबर १९७३ ला इजिप्त आणि सीरिया या दोन्ही देशांनी समन्वयाने इस्राईल गाफील असताना इस्राईलवर असाच हल्ला केला होता. त्यावेळी इस्राईल एकाच वेळी सीरियाशी उत्तर सीमेवर तर इजिप्तशी दक्षिण सीमेवर युद्धात लढत होते. ते युद्ध साधारण अडीच आठवडे चालले आणि त्यावेळी गोल्डा मेयर या इस्राईलच्या पंतप्रधान होत्या. त्यावेळचा हल्ला सुद्धा गाफील असताना झाला त्यामुळे इस्राईलसाठी आश्चर्यकारक आणि सुरुवातीला नुकसानकारक ठरूनसुद्धा जखमी इस्राईलनेच युद्धात अखेरीस विजय मिळवला, असा इतिहास आहे. हे युद्ध “योम किप्पूर युद्ध” म्हणून इस्राईलमध्ये ओळखलं जातं. त्याच दिवसाचं निमित्त आणि इस्राईल गाफील असण्याची तशीच संधी साधत ७ ऑक्टोबरच्या दिवशीच असा हल्ला केला गेला असावा, असं तज्ज्ञ म्हणतात.

आम्हाला काही त्रास झाला का?

७ ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी सुट्टी असल्याने उशिरा म्हणजे सकाळी ८:३० वाजता आम्ही सायरनच्या आवाजानेच उठलो आणि आमच्याच मजल्यावरील शेल्टरमध्ये गेलो. पण आधी सांगितलं तसं आयर्न डोम आणि सायरन यंत्रणेमुळे काहीही धोका नसतो हे आम्ही जाणून होतो. हे वगळता आम्हाला प्रत्यक्ष काही त्रास झाला नाही. त्यानंतर बातम्या बघून आम्हाला पण दक्षिण सीमेवर चाललेल्या भीतीदायक प्रकाराची कल्पना आली. परंतु आमच्या भागांत सुदैवाने सगळं शांतच होतं आणि अजूनपर्यंत तरी आहे. आम्ही युनिव्हर्सिटी परिसरात राहत असल्याने आम्हाला gated armed security सुद्धा आहे. पण तरीही पीडित लोकांच्या वेदना पाहून पूर्ण दिवसभर मन नक्कीच झाकोळलं गेलं होतं. केवळ इस्राईलमधीलच नाही तर भारताच्या आणि इतर देशांच्या सीमावर्ती भागांत राहणाऱ्या लोकांचं जीवन, त्यांच्या अडचणी असे विचार पूर्ण दिवसभर डोक्यात घोंगावत होते. मग रात्री कधीतरी खूप उशिरा मानसिकरीत्या थकून आम्हाला झोप लागली.

इस्राईलमधील बाकी जनजीवन कसे सुरु आहे?

७ ऑक्टोबरला सुट्टी होती त्यामुळे इथल्या पद्धतीनुसार बाहेर सर्व गोष्टी म्हणजे शाळा, ऑफिस, दुकानं, बस, ट्रेन, इत्यादी बंद असल्याने आधीच शांत वातावरण होतं. परंतु reserved forces मधल्या हजारो लोकांना आर्मी बेस वर बोलावल्यामुळे, रक्तदानासाठी जनतेला आवाहन केल्यामुळे आणि दक्षिणेत आपल्या अडकलेल्या आईबाबांना, मुलांना शोधण्यासाठी लोक स्वतःच्या गाड्या घेऊन बाहेर पडत होते. आज दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ ऑक्टोबरला सीमावर्ती भाग सोडून बाकी पूर्ण देशभर दुकानं, बस, ट्रेन, आवश्यक ऑफिसं वगैरे सुरु झालं आहे. मात्र शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी बंद आहेत.

आत्तातरी गाझामध्ये नेलेले इस्रायली ओलीस, अजूनही समर्थपणे खिंड धरून ठेवणारे इस्रायली सैनिक, आरोग्यसेवक, स्वयंसेवक, सरकार, प्रशासन आणि जनता यांना लढण्यासाठी खूप ताकद मिळो, ही प्रार्थना आणि मृत्युमुखी पडलेल्या इस्रायली सैनिक आणि नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Live updates आणि इस्रायली तज्ज्ञांचे विश्लेषण इंग्रजीमधून वाचण्यासाठी काही खात्रीशीर स्रोत

https://www.timesofisrael.com/
https://www.jpost.com/

समता गोखले-दांडेकर
इस्राईल, ८/१०/२०२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}