©️®️ मेधा नेने- आयुष्यभर वेगवेगळे प्रसंग आणि निरनिराळ्या व्यक्ती नकळत आपल्याला काही ना काही शिकवून जातात. त्यांच्याच या कथा…..
चला मनापासून शिका….
काहीतरी नवीन शिकवणारे शिक्षक फक्तं शाळा कॉलेजमध्येच असतात असं थोडीच आहे? तसं बघितलं तर आयुष्यभर वेगवेगळे प्रसंग आणि निरनिराळ्या व्यक्ती नकळत आपल्याला काही ना काही शिकवून जातात.
त्यांच्याच या कथा…..
१) संध्याकाळी ऑफिस मधून घरी जाताना नेहमीप्रमाणे तो वाटेत असलेल्या एका देवळात गेला.एका कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या मोबदल्यात, त्याच्याकडून मिळालेलं नोटांचे बंडल त्याच्या खिशातच होतं.
त्याच्या भाषेत सुविधा शुल्क आणि सामान्य लोकांच्या भाषेत लाच.
चपला बाहेर काढून तो देवळात शिरणार तितक्यात तिथल्या फुलं विक्रेत्याने त्याला हाक मारली.
“साहेब,तुमचे पैसे खाली पडले.”
मगाशी बहुतेक घाम पुसायला रुमाल बाहेर काढला,तेंव्हा हे पैशांचं बंडल खाली पडलं असावं. मनात आलं असतं तर हे पैसे तो विक्रेता सहज स्वतःकडे ठेवू शकला असता. त्याने आश्चर्याने फुल विक्रेत्याकडे बघितलं आणि त्याचे आभार मानले.
“आभार कसले साहेब ! चुकीच्या मार्गाने मिळालेले पैसे माझ्याकडेच ठेवले असते तर देवाला कुठल्या तोंडाने सामोरा गेलो असतो ?”
यावेळेस देवळात प्रवेश करताना त्याचे पाय कधी नव्हे ते अडखळले.
२) हातातला वडापाव खात, बसची वाट बघत तो बस स्टॅंड वर बसला होता.वडापाव खाऊन संपला.शेजारच्या प्लॅटफॉर्मजवळ डस्टबिन दिसत होती. तरीही त्याने वडापाव गुंडाळलेला वर्तमान पत्राचा कागद हळूच बाकड्याखाली ठेवून दिला. तेवढ्यात शेजारीच बसलेल्या अंध माणसाने त्याला विचारलं,
“दादा इथे डस्टबिन कुठे आहे ?मला वेफर्सचं रॅपर टाकायचं आहे.”
आणि तो खजील झाला.
३) लग्नकार्यातली हल्लीची बुफे पद्धत त्याला अजिबात आवडत नसे.”त्या लाईनीत आणि गर्दीत सारखं सारखं जायचा वीट येतो अगदी”, असं वाटून त्याने आपली डिश वेगवेगळ्या पदार्थांनी भरून घेतली.समारंभ संपल्यावर यजमानांचा निरोप घेऊन तो बाहेर आला,तेव्हा त्याला फुटपाथवर एक लहानसा मुलगा अर्धवट कपड्यात पावाचा एक कोरडा तुकडा कुरतडत खाताना दिसला. त्याच्याही नकळत त्याच्या नजरेसमोर त्याची खरकटी डिश तरळून गेली.ती डिश जेव्हा खरकट्या भांड्यांच्या ड्रममध्ये ठेवली,तेव्हा ती निम्मी तशीच भरलेली होती.
“ही गोष्ट पुन्हा होऊ द्यायची नाही”….त्याने त्याच्या मनाशी ठरवलं…
४) आज सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीत तो त्याच्या मुलाला,अमितला उगाचच रागवला होता.अमितही मग,”मी बोलणारच नाही तुमच्याशी” असं म्हणून रूसून निघून गेला होता.संध्याकाळी घरी आल्यावर मात्र अमित आधी सारखाच प्रेमाने त्याला चिकटला आणि “बाबा तुम्हाला एक गंमत दाखवू का ?”, असं म्हणून उत्साहाने काहीतरी दाखवायला लागला.
“किती सहज विसरला सकाळची गोष्ट अमित ! खरं तर त्याची काही चूकही नव्हती आणि मी मात्र एका छोट्याशा वादामुळे दोन दिवस बाबांना फोनही केलेला नाही.अहंकार सोडला पाहिजे हेच खरं!”. त्याच्या मनात विचार आला.
त्याने फोन उचलला आणि वडीलांचा नंबर डायल केला.
५) तीने पन्नाशी ओलांडली होती. संस्कृत तिला मनापासून आवडायचं,पण शिकायची संधी आली तेंव्हा मात्र ‘या वयात जमेल का’? ही शंका मनात डोकावयाला लागली.तिने जरा चाचरतच संस्कृत वर्गात प्रवेश केला.
तिथे शिकणाऱ्यांमध्ये सत्तरीच्या आसपास वय असलेल्या दोन तीन स्त्रियांना बघून तिला खूप कौतुक वाटलं.त्यांच्याकडे हसून पहात वाढलेल्या आत्मविश्वासाने ती तिच्या जागेवर जाऊन बसली.
©️®️ मेधा नेने यांची परवानगी आहे असे गृहीत धरून .. त्यांना मनापासून धन्यवाद