मंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

रिटायर्ड – सुनील काळे

रिटायर्ड

आज सकाळी व्हॉट्सॲपवर मेसेजेस पाहत असताना इंद्रनील बर्वे या मित्राचा गुड मॉर्निंगचा मेसेज आला . त्यामध्ये एका तुटलेल्या , टाकून दिलेल्या , गंजलेल्या बोटीचा फोटो होता . आणि त्याखाली लिहले होते ” रिटायर्ड ” . तो फोटो पाहून मी एका जुन्या आठवणीत रममाण झालो .
२oo४ साली आमचा एक ग्रूप शो मुंबईला नेहरू सेंटरच्या मोठया हॉलमध्ये झाला . प्रदर्शन सुरु झाले संध्याकाळी मला गॅलरीच्या ऑफीसमधून निरोप आला की महाबळेश्वर वरुन तुमच्यासाठी फोन आला आहे .गॅलरीच्या कोपऱ्यातच कॉर्नरला ऑफीस आहे .मी टेलीफोन घेतला …. कोणीतरी वयोवृध्द आवाजात पारशी टोन मध्ये बाई बोलत होत्या.
” मिस्टर सुनील काले मी पेरीन बोलते , पेरीन भरूचा असा माझा नाव हाय,मी पण रिटायर हाय ,पण आता महाबलेश्वरमंदी आला हाय , तुझा क्लबमंदी पाठवलेला एक्झीबिशनचा ब्रोशर मी पाहीला हाय , त्यामंदी एक बोटींचा पेंटींग हाय , ” रिटायर्ड ” टायटल लिवला हाय त्यो मला लई आवडला. ह्यो पेंटींग मला हंड्रेड परसेन्ट पाहिजे हाय . त्याला ब्राऊनकलरमंदी फ्रेम कर . मी बॉम्बेला आला की तवा तुझा पैसा दिल .पक्का प्रॉमिस कर . माझा नंबर लिव . मी प्रॉमिस करून नंबर लिहून घेतला . आणि समोरुन फोन बंद झाला .
प्रदर्शनाची धामधूम संपल्यानंतर निघण्यापूर्वी मी त्या पारशी पेरीन बाईंना फोन केला . त्यांनी सांगितल्या प्रमाणे मंत्रालया शेजारी ‘ समता ‘ नावाची पॉश इमारत होती . त्या ठिकाणी पेंटींग व्यवस्थित पॅक करून टॅक्सीने गेलो . नरिमन पॉईंट ,मंत्रालय परिसरात ती इमारत प्रसिद्ध असल्याने शोधायला जास्त त्रास झाला नाही . इमारत पॉश होती .लिफ्टने पोहचलो आणि घराची बेल वाजविली.
75 वयाच्या पेरीनबाई टिपीकल स्लीवलेस पारशी फ्रॉक घालून समोरच दरवाजा उघडून उभ्या होत्या .आत गेल्यावर प्रशस्त हॉलमध्ये पारशी सागवानी फर्निचर व सर्व ठिकाणी जाडजूड पुस्तकांची कपाटे . विश्वकोष किंवा वकीलाच्या ऑफिस मध्ये जशी जाडजूड काळ्या रंगाची पुस्तके असतात तशीच सगळीकडे पुस्तकेच पुस्तके . त्या पुस्तकांच्या भोवती बरोबर मध्यभागी अतिशय व्यवस्थित टाय सुट बुट घातलेले ८० वर्षांचे एक पारशी गृहस्थ बसलेले. अतिशय धारदार नाक , गोरा वर्ण ,उंच , सडपातळ ब्रिटीशां प्रमाणे दिसणारा व शांतपणे शुन्यात नजर लावून बसलेला. मी त्यानां गुडमॉर्निंग केले , पण काहीच प्रतिक्रिया नाही , हास्य नाही, ओळख नाही, शब्द नाहीत .पेरीनने मला सरळ आत मध्ये येण्यास सांगितले .आतमध्ये सुध्दा सगळीकडेच कपाटांनी भरलेली पुस्तके व या कपाटांच्या मधोमध एक छोटी जागा मोकळी सोडलेली .व त्याला खिळा सुध्दा मारुन ठेवला होता . ते ” रिटायर्ड ” बोटींचे चित्र तिने तेथे लावायला सांगितले .मी पॅकींग केलेले चित्र काढले व त्या ठिकाणी लावले . ते इतके परफेक्ट बसले की जणू कित्येक वर्ष ती जागा माझ्या पेंटींगची वाटच पहात होते .
पैशाचे पाकीट तयारच ठेवले होते . तिने ते माझ्या हातात दिले, डोक्यावर प्रेमाने हात ठेवला . गॉड ब्लेस यू असे म्हटले व शांतपणे बाहेरचा रस्ता दाखवला . बाहेर पडताना मी तिच्याकडे पाहीले तर म्हणाली ………
” माजा हाजबंड हाय , ते असाच बसते . ”
मी त्या इमारतीतून बाहेर प्रचंड गर्दीत आलो . रस्त्याच्या फूटपाथवरून मी जरी चालत होतो तरी माझ्या मनात असंख्य विचार येत होते . घरात पारशी बाबा टाय बूट घालून का बसत असेल ? असा निर्विकार शांत मनाने तो कसला विचार करत असेल ? त्याला कोणी दुःख दिले असेल का ? काय तरी त्याचे बिनसले असेल किंवा हरविले असेल का ? त्याला कंटाळा येत नसेल का त्या रोजच्या बसण्याचा ? असे दिवसभर एका जागेवर बसून राहायचे म्हणजे अवघड काम …… माझ्या मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते .
पुढे मी त्यानां विसरून गेलो . चार पाच वर्षानंतर मी पाचगणीत असताना मला अचानक फोन आला . तोच पारशी टोन,
” मी पेरीन भरूचा बोलते . मी आता महाबळेश्वर क्लब मंदी हाय तू भेटायला ये, मला तुला काय तरी दयायचं हाय तू ये .पक्का प्रॉमिस कर . मीही पक्का प्रॉमिस केला व ठरलेल्या दिवशी मी महाबळेश्वरला गेलो . संध्याकाळी मी तेथे पोहचलो क्लबच्या ऑफीस मध्ये चौकशी केली . उजव्या बाजूलाच थोडया पायऱ्या असलेली छोटी एकसंघ कॉटेजेस आहेत . त्यातील १ नंबरच्या कॉटेज मध्येच पेरीन उभ्या होत्या. बाहेर व्हरांड्यामध्येच आराम खुर्ची होती व त्यामध्ये पारशी बाबा बसलेले . तीच नजर , तेच निर्विकार आंतरळात पहाणे . मी केलेल्या नमस्काराला प्रत्युतर नाही . बोलणे नाही . मी पेरीन कडे पाहीले . तिने न बोलता एक इंग्रजी पुस्तक माझ्या हातावर ठेवले . महाबळेश्वर क्लब व परिसराची माहीती असलेले . महाबळेश्वर क्लब साठी तिने ते स्वतः लिहले होते .
वुई एंजॉईंग युवर पेटींग मिस्टर काले , वुई बोथ लाईक दॅट पेंटींग ,
तुझा ” रिटायर्ड ” टायटल लई म्हंजी लईच आवडला .
मी आरामखुर्चीकडे पाहीले तर म्हणाली
” माजा हजबंड हाय , ते असाच बसते . ”
टाय, सुट ,बुट कडक पारशीबाबा .निर्विकार ,शांत शुन्यात नजर लावून बसलेला . काहीही बोलणे नाही , समोरच्याशी बोलणे नाही , कसलाच प्रतिसाद नाही . एकदम शुन्यात नजर . निर्विकार . कसलेच एक्सप्रेशन नाही . त्याला पाहिल्यानंतर मी परत प्रश्नांच्या खाईत … मनात प्रश्नावर प्रश्न निर्माण होत होते . काय शोधत असेल हा माणूस ? का शांतपणे न बोलता शुन्यात हरवलेल्या नजरेने बसत असावा ?
मला आठवले ते पेंटींग मी तापोळ्याला गेलो होतो त्यावेळी काढले होते . माझा एक शिक्षक मित्र दीपक चिकणे तेथे रुम घेऊन रहात होता .दिवसभर मी तापोळ्याच्या शिवसागर बोटींग क्लब व बामणोली परिसरात फिरत होतो संध्याकाळी परतताना थोडया अंतरावर ह्या वापरलेल्या ,टाकून दिलेल्या, निरोपयोगी झालेल्या बोटी पडल्या होत्या . मला त्या चकाचक नव्या बोटींपेक्षा या गंजलेल्या , दुर्लक्षित फेकून दिलेल्या बोटींचेच चित्र काढावेसे वाटले . त्याची झिजलेली लाकडे ,उडालेला रंग पूर्ण गंजलेले लोखंड यांचा इफेक्ट मिळविण्यात मी बराच यशस्वी झालो होतो व त्याला ” रिटायर्ड “नाव देऊन मी ते चित्र ब्रोशरमध्ये छापले होते .
पुढे एकदा आमच्या मुंबईच्याच पारशी मित्राला मी ही कथा सांगितली . त्यांच्याविषयी विचारले तर म्हणाले ,
“तो पारशी तर मिस्टर सॅम भरुचा . ”
एके काळी तो दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश होता, रिटायर्ड जज्ज . तो खूप मोठा माणूस , ऑप्टीमॅस्टीक ॲॅन्ड व्हेरी व्हेरी टॅलेंटेड मॅन , अलसो ही वॉज व्हेरी पॉवरफूल मॅन , व्हेरी स्ट्रीक्ट जज्ज . यु आर लकी दॅट युवर ओन्ली पेंटींग इन हीज हाऊस .
आणि अचानक मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली . माझे रिटायर्ड नावाचे पेंटीग त्यांनी का घेतले असावे त्याचे कोडेही अचानकपणे सुटले . मनात खूप दिवस असलेल्या दिवसांचे शंकेचे उत्तर मिळाले
त्या दुर्लक्षित, गंजलेल्या, लाकुड सडलेल्या निरोपयोगी बोटी पूर्वी किती छान दिसत असतील ? किती पर्यटकांनीं या बोटीवर व शिवसागर क्लबमध्ये असताना मस्ती , मजा अनुभवली असेल . रुबाब असेल या बोटींचा त्यावेळी मालक त्यांची मन लावून काळजी घेत असणार . आणि आता गरज संपल्यावर त्या एका कोपऱ्यात टाकून दिलेल्या असाव्यात .दुर लोटलेल्या दुर्लक्षित केलल्या ,अडवळणी कोनाड्यात लांब ,विषन्नपणे तुटलेल्या अवस्थेत त्या आता पडलेल्या आहेत , कदाचित आता अखेरचा श्वास मोजत पडलेल्या या त्याच बोटी त्यांच्याकडे आता कोणीच लक्ष देत नाहीत ……….
अचानक मला सुपरस्टार राजेश खन्नाचे अखेरच्या दिवसात केलेले एक भाषण आठवले . त्यावेळी त्याने साहीरचा एक शेर म्हटला होता तो शेर असा होता , ” इज्जते , शोहरते , उल्फते , चाहते सब कुछ इस दुनिया में रहता नही . आज मै हू जहाँ कल कोई और था , ये भी एक दौर है …… वो भी एक दौर था ” .
पुढे गुगलवर सहज जस्टीज सॅम भरुचा नावाचा शोध घेतला त्यावेळी कळाले ते भारताचे तीसावे सरन्यायाधीश होते . कर्नाटक राज्याचे मुख्य न्यायधीश म्हणूनही कार्यरत होते . त्यांच्या काळात त्यांनी जयललीता यानां मुख्यमंत्री पदावरून पायउतार केले होते . अनेक महत्वाचे निर्णय जस्टीज सॅम भरुचा यांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतले होते . कदाचित त्यांचा पूर्वीचा रुबाबदार , उच्चत्तम पदावरचा व्यतित केलेला काळ आठवत असेच खूप गुढपणे शांत बसत असावेत . दूर अंतराळात , निर्विकार चेहऱ्याने , आठवणी काढत, आठवणींचे गाठोडे सोडत बसलेले असावेत, आपला पूर्वीचा रुबाब आठवत बसलेले असावेत .
त्या ” रिटायर्ड ” बोटीप्रमाणे स्वतःच्याच एका भूतकाळातील अनोळखी भावविश्वात……….

सुनील काळे
9423966486

Related Articles

One Comment

  1. Waa किती छान एक्सप्लेन केले आहे. खूप interesting आणी gripping article. Especially reading about the Parsi couple was thought provoking.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}