दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या चौथे दुर्गा रूप – माझे गुरुजन — सौ आरती अलबूर – सिन्नरकर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या

चौथे दुर्गा रूप – माझे गुरुजन

” शिदोरी ज्ञानाची”

गुरुसारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी

आई ,वडील, घर ह्या विश्वातून एक नव्या विश्वात प्रवेश करताना आपल्याला पहिल्यांदा भेटतात ते गुरुजन. शाळेचा पहिला दिवस आठवला की गम्मत वाटते , आई बाबांनी आपला हात सोडू नये , आपल्याला एकट सोडून जाऊ नये म्हणून केलेली रडारड…अशक्य असते. पण एकदा का त्या नव्या जगात प्रवेश केला की तिथे मिळणार प्रेम , विश्वास , तिथल ज्ञान ह्याला तोड नसते.

मला आजही आठवत मला बालवाडीत शिकवणाऱ्या माझ्या पिटके बाई, खूप प्रेमळ,लाड करणाऱ्या होत्या. मोठे होत जाताना कदम बाईन सारख्या भरपूर अभ्यास करून घेणाऱ्या ते ही अगदी मागे लागून, समजेपर्यंत शिकवणाऱ्या बाई…असे शिक्षक
लाभण भाग्यच.

बाबांच्या फिरती मुळे वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या शाळेत मी शिकले. पण प्रत्येक ठिकाणी गुरुजनानी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. शाळेमध्ये ४५ मि ची तासिका पण त्यामध्ये सुध्धा उत्तम अभ्यास करून विषयाचा पाया पक्का करून घेणारे शिक्षक होते.

मराठी सारखा विषय,त्यातल्या कविता ते समजावून सांगणारे शिक्षक ,आणि चालीत शिकवलेल्या कविता ह्यामुळे कळतनकळत पणं माझ्यामध्ये संगीत विषयाची आवड निर्माण झाली.

मुळातच घरात आई गाणारी त्यामुळे लहानपणापासून मला संगीत खूप आवडीचा विषय. आणि म्हणूनच शाळेमध्ये संगीत विषय असल्याने माझ्यासारखे अभ्यासात जेमतेम असणारे विद्यार्थी पण स्वतःची ओळख निर्माण करू शकत होते.

शिंदगी सर, ज्यांनी मला वेगवेगळ्या भाषांमधली गाणी शिकवली. खुप सहज सुरेख चाल, ताल ह्यामुळे आजही ही गाणी मला तोंडपाठ आहेत. त्यांच्यामुळे आयुष्यात प्रथमच आकाशवाणी केंद्र पाहण्याची आणि तिथे गाण्याची संधी मिळाली.

माझ्या आईच्या गुरू सौ रजनी
पाच्छापुरकर ह्यांच्याकडे माझा संगीत विषयाचा प्राथमिक अभ्यास सुरू झाला. पण एका जागी बसून शास्त्रीय संगीत अभ्यास कठीण वाटायचा, अश्यावेळी मला तबला शिकण्यासाठी शांताराम दयाळ ह्यांच्या सारखे गुरू लाभले. गुरू असेल तरी दादा म्हणत असल्याने एक प्रेमळ नात निर्माण झालं. दादा ने पण खूप प्रेमाने वादन कला माझ्यामध्ये रुजवली.
आत्ता गाणं म्हणताना तालात चुकत नाही ह्याच श्रेय नक्कीच शांताराम दादा ला.

अनेक नवीन जागा आणि नवी माणस भेटत होती.पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते प्रत्येक ठिकाणी मला खूप प्रेमळ गुरुजन लाभले.

अहमदनगर ला आल्यानंतर सगळच परत नव्याने सुरू झालं.पण शाळेमध्ये संजीवनी कुलकर्णी ,रसाळ बाई ह्यांच्या मुळे मराठी हा विषय आवडायला लागला. त्यातल्या कवितांवर मी प्रेम करायला शिकले. कविता वाचताना ती हाताने नाद करत म्हणत शिकल्याने त्याची गंमत अनुभवत अभ्यास होत गेला. संस्कृत सारखा कठीण विषय….देवा देवो…आता हे पाठांतर भयांकर वाटायचं. पण मुळे बाई, कुलकर्णी बाई ह्यांच्यमुळे हा विषय ही आवडायला लागला.
आपल्याला शिक्षक कसे भेटतात ह्यावर , विषय आवडीचा की नावडीचा हे ठरत अस मला मनापासून वाटत.

इंग्रजी ही परकी भाषा त्यात मी अती सामान्य बुद्धीची विद्यार्थिनी पण खेर सर हे असे शिक्षक ज्यांच्यामुळे आज व्यावसायिक जगात ही मी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलू ,लिहू शकते. बाहेरच्या जगात व्यवहारात ही भाषा वावरताना भीती वाटत नाही.

मुळातच मी आणि अभ्यास फार कधी जमल नाही. पण म्हणून माझ्या कोणत्याच शिक्षकांनी मला कमी लेखल नाही. माझ्याकडे काय चांगल आहे ज्याला मार्गदर्शन केलं तर मी उत्तम घडेन हे त्या सगळ्याच शिक्षकांनी पाहिलं. म्हणूनच शाळेत खेळा साठी गोडळकर सर, मुथा बाई, अडेप सर यांच्यासारखे गुरू लाभले आणि महाराष्ट्रासाठी खेळण्याची संधी मिळाली.

शाळेमध्ये असणाऱ्या band पथकामध्ये आढाव सरांनी संधी दिल्यामुळे नवीन ताल वाद्यांशी मैत्री झाली.

केसकर सर, कुलकर्णी बाई यांच्यामुळे शाळेत होणाऱ्या सगळ्या संगीत स्पर्धा, कार्यक्रम ह्यात भाग घेऊन बक्षीस मिळवता आली. कदाचित ह्यालाच भाग्य म्हणतात.

विषयांचे अभ्यास त्यातले मार्क ह्याला पर्याय नक्कीच नसतो पण म्हणून माझ्या कोणत्याच गुरूंनी मला कमी न लेखता माझ्यातल उत्तम ला कायम खुलवल, फुलवल,आणि म्हणूनच आज मला संगीत असो वा निवेदन ..माझ्या गुरूंनी मला दिलेल्या ज्ञानाचा उत्तम उपयोग होतो.

वयाच्या ठराविक टप्प्यात हाताच बोट धरून शिकवणारे शिक्षक आपल्याबरोबर असतात, थोडस पुढे गेलं की आपल्याबरोबर आपले मित्र बनून विश्वास ठेवणारे आणि ज्ञान देणारे शिक्षक आपल्याला लाभतात. मोरे सर,झेंडे सर, हुद्देदार सर,नगरकर सर, बजेकल सर हे सगळे शिक्षक माझ्यासाठी खूप मोठे मार्गदर्शक . कारण कॉलेज हे विश्व अस जिथे सगळ काही शेजारी बसवून शिकवणारे शिक्षक नसतात…पण ह्या सगळ्याच शिक्षकांनी मला कायम मोलाचं मार्गदर्शन केलं.

बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, jr कॉलेज, मास्टर …माझ्या नशिबाने मला सगळीकडे उत्तम मार्गदर्शन करणारे गुरुजन मला लाभण आणि त्या ज्ञांनाची शिदोरी मला भरभरुन मिळण ह्यासारखे भाग्य ते काय.

शाळा , कॉलेज हे टप्पे आयुष्यातले अतिशय महत्वाचे आणि नाजूक टप्पे , आणि ह्या टप्प्यांवर मला शिक्षकांनी कायम भरभरून दिलं. त्यांच्या ह्या ऋणातून मुक्त होता येणं शक्यच नाही.

लग्नानंतर पुन्हा शिक्षणाकडे वळताना अभ्यास हे लक्ष्य साधणं म्हणजे तारेवरची कसरत. पण ह्या सगळ्यात कठीण काळात मला MBA करायची इच्छा होती. अश्यावेळी मला घरात अचानक आलेल्या अडचणींमुळे परीक्षा देता येईल की नाही पूर्ण होईल की नाही अशी परिस्थिती असताना राजमाता कॉलेज च्या शिक्षकांनी माझं मनोबल वाढवत मला परीक्षा दे सांगितल आणि अभ्यासासाठी खूप मदत ही केली. तो कठीण काळ विसरण आणि ती मदत विसरण अशक्य.

व्यावसायिक शिक्षण घेत असताना नोकरी ,बढती हे ही सुरूच होत. पण संगीत आणि निवेदन ह्याच वेड काही कमी होत नव्हत अश्यावेळी इतर व्याप सांभाळत संगीत सुरू ठेवण्याची माझी धडपड माझे गुरू जहागीरदार सर, आणि सुषमा थिटे मॅडम ह्यांनी ओळखली आणि म्हणूनच आज मी माझं संगीत शिक्षण सुरू ठेवू शकले.

मला वाटत गुरू आणि शिष्य हे जगातलं एकमेव निर्मळ नात असावं !

कोणत्याही व्यक्तीच्या यशासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरु असणे आवश्यक आहे, कोणीतरी अगदी बरोबरच म्हटले आहे, गुरु बिन घोर अंधेरा म्हणजे आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात जगाला ओळख करून देणारा तो एकमेव व्यक्ती म्हणजे गुरु.

मुलांची पहिली शिक्षिका ही त्यांची आई असते, जिने जन्मापासून मुलांच्या आचरण, खाण्याच्या सवयी आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिले असतात किंवा शिकवल्या असतात.
नंतर गुरू शिष्याला ज्ञानी करून, त्यांना सुसंस्कृत बनवतात ज्याने त्यांच्यात लपलेले व्यक्तिमत्व उलगडते. गुरू आपल्या शिष्याला जीवनात पुढे जाण्यासाठी, अडचणींना तोंड देण्यासाठी आणि निर्धारित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करतात.
जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर शिक्षक मिळू शकतो. कधीही भेटू शकते. गुरु म्हणजे ज्याच्याकडून काहीतरी चांगलं करायला शिकायला मिळतं हा स्वानुभव आहे.

आज काळ बदलतो आहे , गुरू शिष्य हे नात शिक्षक आणि विद्यार्थी अस बदलल आहे. नात्यामधल प्रेम ,विश्वास थोडासा व्यावहारिक झाला आहे.

पण मी आज ही विश्वासाने सांगू शकते माझे गुरुजन आजही त्याच प्रेमाने मला शिकवतात, त्याच विश्वासाने मी माझ्या शंका त्यांच्याकडे घेऊन जाते. हीच तर ती पुंजी…तो ज्ञांनाचा ठेवा जो मला मिळाला आणि तो पुढे मी देत जाईन.

“गुरू ने दिला ज्ञान रुपी वसा
मी चालवेन हा पुढे वारसा”

सौ आरती अलबूर – सिन्नरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}