#पैशापलीकडची_नाती – ©️ स्नेहल अखिला अन्वित
#पैशापलीकडची_नाती
आई, अगं हे काय लागलं तुझ्या साडीला? हा कुठला कलर दिसतोय वेगळाच? मावशीला दिली होतीस ना तू नेसायला? वाट लावली सगळी!!, आपल्या आईच्या नव्या साडीचा उडालेला रंग बघून ऋतू एकदम ओरडलीच.
हं, धुवायला गेली असेल आणि फिस्कटला असेल रंग, जाऊ दे, दिपा अगदी सहज म्हणाली.
अरे, इतकं कसं हलकं घेऊ शकतेस तू? तुझी आवडती साडी होती ना ती? माझी आवडती वस्तू जर अशी कोणी खराब केली असती ना कच्चं खाल्लं असतं मी त्याला, ऋतू अगदी दात ओठ चावत म्हणाली.
मी असते तरी, कच्चं खाल्लं असतं तू मला? किंवा तुझी बेस्ट फ्रेंड रिंकी, ती असती तरी? करून बघ बरं इमॅजिन?, दिपा फट्कन म्हणाली.
“असं नाही होत इमॅजिन. आणि का कराल तुम्ही असं?”
“कोणी मुद्दाम नाही करत ग!! होतं चुकून कधी….”
“पण तू काहीतरी बोलायला पाहिजे होतंस मावशीला. मला नाही आवडलं कोणाची गोष्ट खराब करून असं गपगार बसणं. वस्तूची काही किंमत आहे की नाही?,” ऋतूने तरीदेखील आपलं म्हणणं पुढे केलंच.
“आहे ना? पण माणसाची त्याहून जास्त आहे. आणि समोर माणूस कोण आहे त्यावरही बरंच अवलंबून आहे. दुसरं कोणी खराब केली असती साडी, तर मी बोललेलंही असते कदाचित थोडंफार.
पण तुझ्या मावशीला नाही. माझ्या प्रत्येक सुखदुःखात बरोबर असते ती. माझी एकन् एक गोष्ट न थकता ऐकून घेते ती. वेळोवेळी माझ्या अडचणीच्या वेळी पहिले धावून येणारी असते ती.
तुझ्या बाळंतपणात आईला झेपत नव्हतं, म्हणून स्वतःचा संसार सोडून माझं करायला राहिली होती घरी. मला किती कायकाय खायला करून घालायची ती!!,” दिपाला किती बोलू अन् किती नको असं झालं होतं.
“म्हणून काय सोडून द्यायचं का असंच,” ऋतू मध्ये म्हणालीच.
“बोलायला काय ग फट्कन बोलूनही गेले असते मी!! पण बोलून काय ती साडी पूर्ववत होणार होती का? माझं फ्रस्टेशन निघालही असतं. पण तिला जी बोच लागली असती, ती परत कशानेही भरून आली नसती.
तुला काय वाटतं, अशा चार साड्या आणून टाकेल ती माझ्यापुढं, झपकन. तिची काय परिस्थिती नाही?
पण प्रेमाने नेसावी वाटली तिला माझी साडी. त्यातही आपलेपणा आहे ग. लहानपणापासून एकमेकींचे कपडे घालायचो आम्ही. मज्जा यायची त्यात. एकदा तर दोघी़ंना दोन नवे ड्रेस आणलेले आईने. पण मला आवडला तिचा, आणि तिलाही तोच जास्त आवडून सुद्धा एका मागणीत तिने तो मला देऊन टाकला होता.
अन् बघ ना अगदी अजूनही आम्हाला एकमेकींचं हवं हवसं वाटतं, हक्काने मागतो आम्ही, एक वेगळीच माया वाटते त्यात.
एक साडी खराब झाली तिच्याकडून तर तिला बोलून, आतापर्यंतच्या सुखावर पाणी फेरु का मी? जळो ती साडी……”
मायलेकी हे बोलत असतानाच बेल वाजली म्हणून ऋतू बघायला गेली तर तिला तिची मावशीच समोर दिसली.
ऋतूच्या हातात तिच्यासाठी आणलेला खाऊ देत, दिपाला आतल्या खोलीत ओढत नेत म्हणाली, “तू चल जरा आत.”
“अगं काय एवढं, बस की जरा आरामात. घाई कसली,” म्हणत दिपा तिच्यामागे आतल्या खोलीत आली.
पटकन तिच्या बहिणीने पिशवीतून साडी काढली आणि तिच्यासमोर बेडवर टाकली आणि म्हणाली, “रंग तेवढा वेगळा मिळाला बघ दिपू. किती दुकान पालथी घातली, कुठे नाहीच त्या रंगाची…..”
“अगं पण तुला नको ते उद्योग करायला सांगितले होते कुणी, मी बोलले तरी का तुला काही?, दिपाला त्रागाच झाला एकदम.”
“तू बोलली असतीस तर एकवेळ चाललं असतं ग.
नवी कोरी होती साडी तुझी. मला बघितल्यावर आवडली, मनात आलं, समारंभाला जायचंय तर हिच नेसून जावं. तू ही आनंदाने म्हटलीस, मोड घडी तूच याची!!
पण तिथे ती बासुंदी थोडी सांडली; डागाची तशीच परत द्यायला, मन होईना, म्हणून नुसती पाण्यातून काढली, तर रंगच उतरला ग. खूप लागलं माझ्या मनाला, अंगालाही लावली नव्हतीस तू ती.
तुला परत केली खरी, पण मला चैनच पडेना.
तश्शी शोधून काढली तेव्हा कुठे बरं वाटलं मला,” एका दमात तिच्या बहिणीने सगळं बोलून संपवलं.
“हेच ओळखलं का तू मला? नव्हती लावली अंगाला म्हणून काय झालं? तुझ्यापुढे तिची काय किंमत मला? पण तू हे करून माझं मन दुखावलंस बघ. एवढं सगळं शेअर करणाऱ्या बहिणी आपण, झाली एखादी गोष्ट खराब तर त्यात मनाला लावून घेण्यासारखं काय एवढं?
लहानपणी काय असं एकमेकींचं काही तोडलं मोडलं तर बाजारात जाऊन लगेच आणून द्यायचो का ग परत?
आता पैसे आले हातात म्हणून नाती बदलली का लगेच? मला मुळीच नाही आवडलं हे,” एवढं बोलून दिपाने तिच्याकडे पाठ फिरवून पटकन डोळे पुसून घेतले.
पण तिच्या बहिणीच्या नजरेत आलंच ते, तिने तिला जवळ घेतलं, आणि माझं खरोखर चुकलं असं म्हणत साडी पिशवीत भरून टाकली.
दिपा म्हणाली, “आता ही साडी तुलाच ठेव. शिक्षा म्हणून!! जेव्हा जेव्हा नेसशील, तेव्हा तेव्हा आपलं पैशापलीकडलं घट्ट नातं आहे कोणाशीतरी, या भावनेने नक्कीच सुखावशील. अन् पुन्हा असा मूर्खपणा करायला धजावणार नाहीस कधी.”
दिपाच्या बहिणीने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “कित्ती लकी आहे मी!!”
ऋतू गुपचूप सगळं ऐकत होतीच, तीही येऊन त्यांच्या मध्ये मिठीत शिरली, आणि म्हणाली, “मी सुद्धा बरं का!!”
खूप काही शिकवून गेलं तुमचं नातं मला, मी सुद्धा कोणाला काही बोलताना यापुढे दहा वेळा विचार करीन…….
जितकं सोप्पं तोडून बोलणं तितकंच अवघड वर्षानुवर्षे एखादं नातं जपणं. कळलं मला आई!!
दिपाने फक्त गालात हसून तिघींची प्रेमाची मिठी जरा आणखी, आणखी जास्त घट्ट केली……
©️ स्नेहल अखिला अन्वित
यांची परवानगी आहे असे गृहीत धरून .. त्यांना मनापासून धन्यवाद