दुर्गाशक्तीमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

मधुर कुलकर्णी ची आणखी एक कथा .. दुर्गाशक्ती , मातृशक्ती काय असते ते पहा या कथेमध्ये , पार्वतीचं ते रौद्ररूप ,त्रिभुवनी भुवनी पाहता,तुज ऐसी नाही

★★दुर्गा★★

पार्वतीने ब्रेडचा छोटा पुडा विकत घेतला आणि घरी निघाली. त्या ब्रेडच्या सहा तुकडयात तिघांचे पोट कसे भरणार होते? शेवटी तिलाच उपाशी रहावं लागणार होतं. दारुडा नवरा आणि चार वर्षाचा सत्या डोळ्यापुढे आले.

दिवसभर बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करून पार्वतीला जेमतेम दोनशे रुपये दिवसाला मिळत होते पण त्यातही गुजराण होत होती. निदान दिवसाचे दोन वेळचे जेवण तरी मिळत होते. उपासमार होत नव्हती.पण गेले दोन दिवस मजूर कट्ट्यावर दिवसभर उभं राहून फारसं काम मिळालं नव्हतं.

पार्वतीने झोपडीत पाऊल ठेवलं. तिचा नवरा,जग्या तारवटून झोपला होता. त्याला कशाची शुद्ध नव्हती. गावातले टवाळ मित्र रोज त्याला अड्ड्यावर घेऊन जायचे आणि दारू पाजायचे. काहीही काम करत नव्हता. त्याच्या श्वासाची दुर्गंधी सगळ्या झोपडीत पसरली होती. तिने नाकावर पदर धरला.
सत्या घरात दिसत नव्हता. खर तर तिच्या पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता पण पोटचं लेकरू उपाशी राहायला नको म्हणून ती भूक मारायला तांब्याभर पाणी प्यायली. इतक्यात सत्या झोपडीत आला.

“आये, आज काय आणलं व्ह खायला?” सत्याने पिशवी उपडी करत विचारलं.

“पाव हाय. त्यातले चार तू खा. दोन बाबूसाठी ठेव.”

“चारच पाव? अन कशाशी खाऊ म्या? बटर कुठाय?”

“तुझा बाप हाफिसरच तर हाय, बटर मागतोय. गिळ मुकाट्याने. मीठाबरोबर खा.”

“मी नाही खाणार.” सत्याने ब्रेड भिरकावला.

“सत्या” पार्वतीने संतापाने त्याच्यावर हात उगारला.

कशी कोण जाणे,पण सत्यावर हात उगारताना जग्याला बरोबर जाग आली.
“ए, ह्यापुढे त्याच्यावर हात उगारशील,तर माझ्यासारखा वाईट कुनी न्हाय,सांगून ठेवतो. त्यो सत्या हाय माझा. त्या शीनेमातल्या सत्यावाणी राजा होणार हाय. त्याची दहशत सगळ्या गावात पसरणार हाय.” नवरा झोकांडे खात सत्याला कुरवाळत होता.

ते बघून पार्वतीला किळस आली. तिने तो ब्रेडचा पुडा नवऱ्याच्या हातात ठेवला आणि म्हणाली, “दोघे मिळून संपवा. आज इतकंच हाय.”

“एवढंच खायला? तू करते काय मग दिवसभर? मजा मारते का?”

नवऱ्याचं ते वाक्य ऐकलं आणि अपमानाने,संतापाने पार्वती लाल झाली. “लाज हाय का रं तुला? मर्दासारखा मर्द,दिवसभर लोळत पडतोय. बायको कामावर जाऊन चार पैसे कमावून आणते. जगायला नालायक हायेस तू.” पार्वतीला अश्रू अनावर झाले आणि ती झोपडीबाहेर पडली. समोर वडाच्या झाडाखाली बसून हुंदके देऊ लागली. शेजारच्या झोपडीतल्या सखुला तिच्या हुंदक्यांचा आवाज आला. सखू पार्वतीजवळ आली.
“पार्वती,काय ग बाय? रोजचंच का?”

पार्वती तिला बिलगून अजूनच रडायला लागली.
“पार्वती, माझ्या ओळखीने तुला एक काम मिळू शकेल पण तुझी तयारी पायजे व्ह. काम जरा वंगाळ हाय.”

“सखे,अग माझ्यासाठी काम महत्वाचं. कुठलंही काम वंगाळ नसतं. कष्टाचा पैसा हाय त्यो. कुठलं काम हाय?”

“दिवसाचे पाचशे रुपये मिळतील. एका बड्या हापिसात सतत संडास स्वच्छ ठेवायचं काम हाय. तू करशील का? त्या कामाची घाण वाटते न व्ह.”

“पोटाच्या खळगीपुढे कुठलं काम घाण ग? मी तयार हाय. मला घेऊन चल. माझं पोर उपाशी मी बघू शकत न्हाय. त्याचं शिक्षण मला करायचं हाय. पैशाशिवाय कशी जगू ग?” पार्वतीचे डोळे परत भरून आले.

“उगी,उद्या सकाळच्याला तयार रहा. मी घेऊन जाईन तुला. असेल नशिबात तर मिळेल तुला काम.”

दुसऱ्या दिवशी पार्वतीला घेऊन सखू,आय टी ऑफिसमध्ये गेली. ते ऑफिस बघून पार्वतीचे डोळे दिपले. सखूने तिथल्या मॅनेजरशी पार्वतीची भेट घडवून आणली. मॅनेजरला पार्वतीच्या डोळ्यात खरेपणा दिसला. त्यानं तिला दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला सांगितलं.

कामाचा पहिलाच दिवस पण पार्वतीने चोख काम केलं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर हातात पाचशेची नोट बघून तिला गहिवरून आलं. तिने ते कपाळाला लावले. घरी जाताना सत्याच्या आवडीची भेंडी,काकडी घेतली, चार गुलाबजाम घेतले.

आज सगळा स्वयंपाक बघून सत्या हावरटासारखं जेवला. नवऱ्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळायला लागला. त्याने नशेतच विचारलं, “कुठे उधळली होतीस ग? आज सगळं जेवण? एवढा पैका आला कुठून तुझ्याजवळ? माझ्या घरात फालतू गोष्टी खपवून घेणार नाही, सांगून ठेवतो.”

“तुझं घर? काय करतोस रं तू ह्या घरासाठी? आरं,स्वतःची बायको आणि पोर सांभाळायची तुझ्यात हिम्मत नाय.”

“लई बोललीस. पैका कुठून आला ते सांग.”

“नवीन काम मिळालं हाय. एका हापिसात संडास सतत साफ करायचं.”

जग्याने ते ताट ढकललं आणि म्हणाला,”त्या घाणीतून येऊन इथे स्वयंपाक करून खाऊ घालतेस होय. चालणार न्हाय.”

पार्वतीने ते ताट उचललं. आणि एका निर्धाराने म्हणाली. “माझ्या पोराला नीट खायला प्यायला मिळावं,त्याचं शिक्षण व्हावं,तो एक चांगला माणूस व्हावा,ह्यासाठी मी वाटेल ते काम करेन. मला कशात कमीपणा किंवा घाण वाटत न्हाय. तुला रस्ता मोकळा हाय. चालू लाग.”

पार्वतीचं ते रौद्ररूप बघून जग्या खजील झाला. त्याच्या नसलेल्या आधाराची तिला आता गरज नव्हती. दूर दुर्गादेवीच्या देवळात आरतीचे सूर ऐकू आले….

‘त्रिभुवनी भुवनी पाहता,तुज ऐसी नाही’……

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}