कॉलेजगर्ल ©️स्नेहल अखिला अन्वित
: मुलगी आता कॉलेजगर्ल झाली आहे तर रोज महाविद्यालयातून येताना एक एक महाविलक्षण शब्द गोळा करून घरी घेऊन येते. अन् बरेचदा त्याची फेकाफेकी माझ्यावर चालू असते.
तेव्हा आम्ही लुडो खेळत होतो. तिच्या सोंगट्या पटापटा पुढे जात होत्या. मी आपली त्यांचं कौतुक करत होते तर त्याबद्दल आभार बिभार काही न मानता व्हसकन् म्हणाली, ए मम्मी, तू उगाच जिंक्स लावू नको हं……
तिला म्हटलं, ज्या शब्दाचा मला अर्थही माहीत नाही मी ते कशी काय लावू शकते बरे?
नजर लावू नको नजर, कळलं? आमच्यात नजर लावण्याला ‘जिंक्स लावणे’ म्हणतात!
मी त्याचा उच्चार तिला हवा तसा प्रॉपर करत नव्हते म्हणून खेळून झाल्यावर मला पकडून तिने तो शब्द स्पेलिंग सकट माझ्याकडून पाठ करून घेतला. #हल्लागुल्ला
एकदा अशीच कॉलेजमधून आली अन् वैतागवैतागुन म्हणाली, ती चंद्रिका आहे ना, ती बघावं तेव्हा इतकी फ्लेक्स मारत असते ना की बस रे बस!
मी तिला विचारलं, तुला कुठे लागलं बिगलं तर नाही ना तिने फ्लेक्स मारल्यावर? गुंडाळी करून मारला की कसा मारला? हलका होता की जड होता? अन् नक्की कुठून काढला तिने तो फ्लेक्स? कुणी काही बोललं नाही तिला?
अचंबित नजरेने बघत मुलगी म्हणाली, मम्मी, तू बरी आहेस ना? काय वाटलं तुला फ्लेक्स म्हणजे?
मी म्हटलं, ते जागोजागी नाही का फ्लेक्स बोर्ड लावले असतात तेच मारले ना?
पोरीने सोss बावळट असा काहीसा लूक देऊन कपाळावर हात मारला अन् म्हणाली, मम्माss आमच्यात ‘फ्लेक्स मारणे’ म्हणजे तुमच्या भाषेत शायनिंग मारणे, उगीच ओव्हर करणे असतं ग!
कोण आणत असेल ह्यांच्यात हे असले कन्फ्युजिंग वर्ड्स? त्या थोर आत्म्याला बडव बडव बडवावं वाटलं मला त्या क्षणी!
आता मला सांगा वाचकहो, इंग्रजी मधलं घोस्ट म्हणजे मराठीमधलं भूत की नाही हो?
परवा अचानक ती माझ्या गळ्यात पडली अन् म्हणाली, मम्मी ती अकल्पिता मला कितीतरी दिवसांपासून घोस्ट करतीये ग!
एक क्षण माझ्या अंगातून सरर्कन् भीतीची लहर गेली. मी तिला माझ्यापासून बाजूला ढकललं आणि म्हणाले, तू भूत बनत चालली आहेस? ती मंत्र तंत्र करतेय तुझ्यावर?
तरीच काल झोपेत माझ्याकडे बघून असंबद्ध बडबडत होतीस! म्हणजे भूत शिरलेलं तुझ्यात?
मुलीने पुढच्याच क्षणी केस मोकळे सोडले. मान, डोकं, डोळे गरागरा फिरवले अन् दात दाखवून हाsहा हीsही हुsहू हेsहेs हैssहैsssssssssss करत माझ्या अंगावर आली.
मी घाबरून बिल्डिंग हादरवणारी कर्णकटू कर्कश्य किंकाळी फोडली.
तशी ती मला मिठी मारून हसायला लागली अन् म्हणाली, मम्मुली! आमच्यात ‘घोस्ट करणे’ म्हणजे न सांगता अचानक बोलणं बंद करणं असतं ग बाssssई!
माझा जाता जाता राहिलेला प्राण पीछे मुडेंगे पीछेsss मुड करत परत पुन्हा हृदयात विराजमान होऊन बसला.
काल संध्याकाळी माझ्याबरोबर चहा पीत होती तर मधेच म्हणाली, कमॉन ब्रो, लेट्स स्पील द टि!
मी म्हटलं, चहा कशाला सांडायचा आता? पी मुकाट्यानं!
हेs मॉमी! आमच्यात ‘स्पील द टी’ म्हणजे कुचाळक्या करणं, गॉसिप करणं गॉसिप!, पोरीने डोळा मारून स्पष्टीकरण दिलं.
मग आम्ही दोघींनी अगदी मनमुराद मनातला टी स्पीलव स्पीलव स्पीलवला.
रोज उठून असे बरेच शब्द माझ्या माथ्यावर मारून मला एकदम युथफुल ठेवू पाहते ती! दॅट्स काही एवढं बॕड नाही!
मात्र त्यांचं ते सर्वसमावेशक ‘ब्रो ‘ प्रकरण माझ्या फार म्हणजे अगदी फारच फार डोक्यात जातं बुवा!
भाऊ तर विनाहरकत ब्रो आहेच, पण त्याबरोबर आई ब्रो, बाबा ब्रो, आजी ब्रो, आजोबा ब्रो, मामा, मामी, आत्या काका, काकी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड सगळेच ह्यांचे का म्हणून ब्रो?
आम्ही शाळेच्या प्रतिज्ञेत सुध्दा साऱ्या भारतीयांना बंधू आणि भगिनी मानताना ‘एकाला सोडून’ असं मनातल्या मनात आवर्जून म्हणायचो; आणि ही हल्लीची पोरं पोरी दिसेल त्याचा हात पकडून ‘ब्रो ब्रो’ करत नाचतात.
आता टेल मी, हे वागणं बरं नव्हं किनई? की हो? किनई? की हो? की नै नै हो वाचकहो🙃
©️स्नेहल अखिला अन्वित