जाहिरातमंथन (विचार)मनोरंजनयुनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

तिरथराम करमचंद शर्मा हे मूळचे पाकिस्तानातील लाहोरचे– ‘शेगाव कचोरी’ आता सातासमुद्रापार!

तिरथराम करमचंद शर्मा हे मूळचे पाकिस्तानातील लाहोरचे. फाळणीच्या सुमारास म्हणजे १९४५ च्या आधीच कधीतरी तिरथरामजी लाहोर सोडून कुटुंबासह अमृतसरमध्ये दाखल झाले. उद्योग-व्यवसाय करून पोट भरणे हा एकच विषय त्यांच्यासमोर होता. त्यामुळे त्यांनी अमृतसरमध्ये कचोरीचे दुकान थाटले. त्याकाळातही त्यांची कचोरी प्रसिध्द होती. विशेष म्हणजे त्यासाठी लागणारा मसाला ते स्वतः घरातच तयार करत. त्यांच्या घरगुती मसाल्यांची चव पसंतीला उतरणारी होती.

काही कारणांमुळे तिरथराम यांना अमृतसर येथे राहता आले नाही. एक-दीड वर्षातच ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर काही दिवस मध्यप्रदेशात घालवल्यानंतर साऱ्या देशाचे पोट भरणाऱ्या मुंबईत ते १९४८-४९ मध्ये आले. त्यांना एकूण पाच मुले आणि तीन मुली होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांनी साधारणतः वर्षभर होजियरी वस्तू विकण्याचा धंदा केला.

त्याच सुमारास विविध शहरातील रेल्वेस्टेशनवरील कँटीन चालवण्यासाठी टेंडर निघालेले होते. यामध्ये तिरथराम शर्मा यांनी शेगावचे टेंडर भरले आणि ते मिळताच १९५० मध्ये ते शेगावला आले. तेव्हापासून या परिवाराचे शेगावशी जुळलेले ऋणानुबंध अजूनही कायम आहेत.
तिरथराम यांची दोन मुले जंगीबाबू आणि श्यामसुंदर त्यांना व्यवसायात जमेल तशी मदत करत. तेव्हा स्टेशनच्या कॅन्टीनचे दोन भाग होते. एक होता काउंटरचा. येणारे-जाणारे प्रवासी तेथे हवे ते खाद्यपदार्थ खरेदी करत. तर दुसरा भाग होता रेस्टॉरंटचा. तेथे ग्राहकांना बसून भोजन घेण्याची सोय होती. त्याकाळात कोळशाच्या भट्ट्या असत. भल्या पहाटे उठून जंगीबाबू भट्टी पेटवत. त्यावर विविध पदार्थ तयार होत असत.

सर्वसाधारणपणे रेल्वे स्थानकावर जे काही पदार्थ विक्रीसाठी असतात, तेच येथे शर्मा परिवाराने ठेवले होते. पण त्यांच्या जोडीला ‘कचोरी’ हा वेगळा पदार्थही काउंटरवर आला. शेगावमध्ये कचोरीचा प्रवेश अशाप्रकारे झाला आणि शेगाव रेल्वेस्टेशन वरील त्या ‘खास’ चवीची कचोरी ‘शेगाव कचोरी’ म्हणून प्रसिद्ध पावू लागली. तिरथराम शर्मा यांच्या खास मसाल्याची चव अमृतसरनंतर थेट शेगावमध्ये कचोरीत उतरली. तिने खवय्यांची मने जिंकण्यास प्रारंभ केला.

पुढे परिवारातील पुढच्या पिढीतील मंडळीही कचोरी व्यवसायात आली. यामध्ये हरीश, भुपेश, गगन आणि मनोज यांनीही कचोरी व्यवसायाचा विस्तार केला. आज शर्मा परिवारातील भावंडांची शेगाव आणि राज्यातील इतर शहरांमध्ये सुद्धा कचोरी सेंटर्स आहेत. मात्र सर्व ठिकाणची चव सारखीच असते. कारण सर्वांच्या मसाल्याचे मूळ तिरथराम शर्मा यांच्या खास रेसिपीमध्ये आहे.

कचोरीला ‘आयएसओ मानांकन’

नावाचा फायदा घेण्यासाठी शर्मा परिवाराच्या बाहेरचे अनेक जण ‘शेगाव कचोरी’च्या नावाची नक्कल करतात. त्यामुळे परिवारातील भुपेश शर्मा यांना ब्रॅंडचे नाव जपण्यासाठी ट्रेड मार्क नोंदणी करावी, असा सल्ला मिळाला. पण शहराच्या नावाने ब्रँड नोंदणी होत नसते. त्यामुळे त्यांनी ‘शेगाव कचोरी’च्या मागे परिवाराच्या नावाला गुंफले आणि ‘तिरथराम करमचंद शर्मा शेगाव कचोरी सेंटर’ असे नाव २००९ मध्ये नोंदवले.
सुमारे ७० वर्षांचा प्रदीर्घ पल्ला गाठणाऱ्या शेगाव कचोरीला २०१३ साली ISO मानांकन प्राप्त झाले. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आदी निकष तपासल्यानंतरच मानांकन देणाऱ्या संस्थेने शेगाव कचोरीला ‘आयएसओ मानांकन’ दिले आहे.

भुपेश सांगतात की हे नाव निवडण्यामागेही त्यांचा एक विचार होता. वेगवेगळ्या कारणांमुळे मतभेद असले तरी सारी भावंडे एक आहेत. आज ना उद्या ती एका धाग्याने बांधली जावीत, हा मूळ उद्देश ठेवूनच त्यांनी आपल्या आजोबांचे नाव निवडले.

भुपेश सांगतात, “ही कचोरी, तिची चव हे माझ्या एकट्याचे नाही. माझ्या आजोबांपासून सारा परिवार त्याच्याशी जोडला गेला आहे. माझी सारी भावंडे सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत. त्या नावावर त्यांचाही हक्क आहे. म्हणून मी माझ्या आजोबांचे नाव निवडले. आमच्या शर्मा परिवारातील सारे सदस्य हे नाव वापरू शकतात. त्यांनी ते वापरावे, कारण त्या नावाला परंपरा आहे. ट्रेडमार्क करण्याची काळजी घेतली ती आमच्या परिवाराबाहेरील लोकांनी आमचे नाव वापरून ग्राहकांची दिशाभूल करू नये, यासाठीच..!”

मसाल्याचा विशिष्ट फॉर्म्युला

मसाल्यातील घटकांचे योग्य मिश्रण करून तिरथरामजींनी आपल्या कचोरीचा स्वाद विकसित केला होता. या स्वादिष्ट कचोरीची सारी खासियत त्यातील मसाल्यात होती.

सर्वसाधारणपणे मसाला तयार करताना आधी मिरची, अद्रक, लसूण एकजीव करून तो उच्च प्रतीच्या तेलातून काढला जातो. त्यानंतर त्यांचा खास मसाला मिसळला जातो व पाणी टाकून त्याला उकळी आणली जाते. ही उकळी आल्यावर त्यात उत्तम प्रतीचे बेसन, मैदा टाकून मिश्रण एकजीव केले जाते. या खास मसाल्यात धने, जिरे, विलायची, हिंग असे साधारण २० पदार्थ असतात. या सर्वांचे एक विशिष्ट प्रमाण आहे. यातील प्रत्येक घटक उच्च दर्जाचाच वापरला जातो. त्यांच्यासारखा मसाला इतरांना जमतही नाही. हेच शर्मा परिवाराचे ‘ट्रेड सिक्रेट’ आहे.
तिरथरामजी शर्मा यांच्या पाच मुलांकडून १६ नातवंडांकडे मसाल्याचा तो फार्म्युला आला आहे. कितीही प्रयत्न केला तरी मसाल्याची रेसीपी शर्मा भावंडं कुणालाही सांगत नाहीत. घरातल्या मंडळींशिवाय कुणालाही मसाला तयार करण्याच्या कामात सहभागी करून घेतले जात नाही.

आता महाराष्ट्रातील इतर काही शहरांमध्ये देखील शर्मा परिवाराची दुकाने आहेत. परंतु त्यांचा खास मसाला शेगावमध्येच त्यांच्या परिवारात तयार केला जातो आणि तेथून सर्व ठिकाणी पोहोचवला जातो.

‘शेगाव कचोरी’ आता सातासमुद्रापार!

अगोदर कचोरी घरी नेण्यासाठी विकत घेतली की घरी नेईपर्यंत खराब होण्याची शक्यता असायची. परंतु आता तीही चिंता मिटली आहे. कारण आता घरी तळता येईल, अशी ‘कच्ची कचोरी’ पॅकिंग करून मिळते. ही कचोरी जवळपास आठवडाभर तरी खराब होत नाही. विशेष म्हणजे आता ‘शेगांव कचोरी’ विदेशात सुध्दा निर्यात केली जाते.

पुणे येथील उद्योजक अविनाश देव यांच्या मदतीने ‘न्यूयॉर्क’ (अमेरिका) येथेही ‘शेगाव कचोरी’ पोहोचली आहे. विदेशात पाठवली जाणारी कचोरी आठवडाभर खराब होणार नाही, अशा पद्धतीने तयार केली जाते. दुबई स्थित एका हॉटेल समूहाने शेगाव कचोरीसाठी शर्मा यांच्याशी करार केला आहे. यापूर्वी पाकिस्तान आणि जपानचा प्रवासही या कचोरीने केला असून तेथील अनिवासी भारतीयांनी तिची लज्जत चाखलेली आहे.

Whats app POst Share  by Shishir Lokhande

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}