Classified

स्वयंप्रकाशी रवी…वाचतांना…. डोळ्यात पाणी तरळल्या शिवाय राहणार नाही…

स्वयंप्रकाशी रवी…

काल संध्याकाळची शिफ्ट संपवून घरी जात असताना ऑफिस बसमधून उतरलो आणि अचानक पावसाची सर आली. … सर ओसरायची वाट बघत मी इथेच पूलाखाली थांबलो. रात्री पाऊण एकची वेळ. इतक्यात कानांवर आवाज पडला…

“सर, ओळखलं का…?”

“…. नाही”

“आता…??” त्याने चेहऱ्यावरचा मास्क खाली घेतला. फार तर वीस बावीस वय असेल.

“सॉरी, पण नाही आठवत आहे.”

“कुर्ला स्टेशन…?? कसाऱ्याचं लोकल तिकीट ??…”

“ओह ओके ओके.. आत्ता आठवलं…” कोरोनाच्या दरम्यानचे …

कोरोनाचा पहिला कडक लॉकडाऊन लागला होता, तेव्हा लोकलप्रवास फक्त अत्यावश्यक सेवांपुरता मर्यादित होता. कुर्ला स्टेशनवर मी तिकिटासाठी रांगेत उभा असताना हा मुलगा माझ्याजवळ येऊन म्हणाला… “सर, प्लिज एक तिकीट काढून द्याल का?? कसारा पर्यन्त… प्लिज सर प्लिज, अर्जंट आहे, आई आजारी आहे…” असं कळवळून म्हणाला होता. मुलगा खरं बोलतोय अस वाटत होतं, आणि शिवाय पैसेही मागत नाहीये… तिकीटच मागतोय, म्हटल्यावर मीही त्याला माझ्या ओळखपत्रावर लोकलचं तिकीट काढून दिलं होतं. आज तो दोन अडीच वर्षांनी असा अचानक भेटलेला.

“तू इथे कसा…?”

“आलो होतो सर एका कामासाठी, आता घरी जात होतो. पाऊस आला म्हणून थांबलो…”

“हम्म.. पाऊस कधीही पडतोय या वर्षी…”

“हो ना…”

पुढची काही सेकंद शांततेत गेली…

“कसाऱ्याला राहतो का तू? आता घरी कसं जाणार?”

“माझं गाव आहे सर तिकडे. स्टेशन पासून तीस किलोमीटरवर”

“अच्छा.. आई बरी आहे का आता?” पावसाची सर ओसरेपर्यंत मी संभाषण वाढवायचा प्रयत्न केला.

“ती गेली साहेब ”

“ओह…” मला ओशाळल्यासारखं झालं.

“म्हणजे मागच्या वेळेला आपण भेटलो त्यानंतर बरी होती. आता सहा महिन्यापूर्वी वारली…”

“ओह…. आणि हे बाळ तुझं आहे का….?” त्याच्या हातात तीन-चार महिन्यांच मूल होतं.

“हे?? माझंच म्हणा आता…” तो बाळाकडे बघत बोलला.

“म्हणजे??”

“ म्हणजे, आहे तसं बहिणीचं. चौदाव्या वर्षी लग्न लागलेलं तीचं. चार महिन्यातच पोटुशी राहिली. सातव्या महिन्यात डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या वेळी गेली बहीण. ही पोर तेवढी वाचली. मुलाच्या दुसऱ्या लग्नात अडचण नको म्हणून मुला कडच्यानी जबाबदारी नाकारली. आमची आई जीवंत असती तर तीने बघितलं असतं हिच्याकडे. आता ती पण नाही. आणि दुसरं कोणीच नाही जवळचं …”

क्रिकेट मॅचचे हायलाईट्स सांगावे तशी तो त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगत होता.

“मग आता हिला घेऊन इथे कुठे राहतो…?”

“इथेच पुढे, धारावीजवळ. भाड्याने घेतलीय खोली…”

“काय करतो आणि?”

“जिथे राहतोय तिथेच दोन खोल्या सोडून एक इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना आहे. त्याच्याकडे काम करतो.”

“अच्छा… शिकलाय किती तू?”

“एम ए पार्ट वन ला आहे सर, हिस्ट्री… डिस्टन्स मधून…”

“अरे मग चांगली नोकरी का नाही बघत…? ही असली मजुरीची कामं का करतोय…?” मला कौतुक वाटलं….

“इथं पगार कमी आहे पण हिच्याकडे बघता येतं साहेब. मी सगळं मटेरियल खोलीवर आणून काम करत बसतो. अन् या पोरिकडे पण लक्ष राहतं मग.”

“तुझं अख्ख आयुष्य बाकी आहे अजून…” मला थेट बोलायची हिम्मत होत नव्हती.

“हो साहेब, मागे एकदा ही पोर रात्रभर रडली होती. खूप राग आलेला मला. कंटाळून सकाळी एका अनाथ आश्रमात घेऊन गेलो होतो. पण गेटवरूनच मागे फिरलो सर. नाही हिम्मत झाली…” तो निग्रहाने सांगत होता सगळं.

“हम्म… इथे काय काम मग?”
आता तो थोडं वरमल्या सारखा वाटला. इकडे तिकडे बघत मग बोलला…

“ती हिरव्या रंगाच्या साडीत बाई बसलीय बघा…” पूलाखाली उघड्यावर संसार थाटलेल्या एका बाईकडे नजर करत तो बोलला, “तिच्याकडे दूध पाजायला आणतो हिला”

मी आधीच जेमतेम वीशीच्या मुलाला अकाली आलेलं, उसनं पालकत्व बघून भारावून जात होतो, तेवढ्यात त्याने हा नवीन बॉम्ब टाकला…

“दूध पाजायला म्हणजे… ??”

कसाऱ्याच्या कुठल्याशा आदिवासी पाड्यातला मुलगा, धारावीत भाड्याने राहतो आणि चार महिन्याच्या बाळाला दूध पाजायला पार्ला-अंधेरीत येतो… रात्री एक वाजता …?? मला कळत नव्हतं काय बोलू…

“जेमतेम चार महिन्यांची आहे ही.. दूध लागतच ना लहान जीवाला”…

“तू मिल्क बँक बद्दल ऐकलय का कधी…?? आई नसलेल्या बाळांना…..”
त्याने माझं वाक्य मधेच तोडलं व म्हणाला…,

“दूध मिळतं साहेब तिकडे. आईची छाती नाही मिळत.”

“एरवी ही पोर पिशवीतल्या दुधावर दिवसभर राहते. पण कधीकधी रात्री भरल्या पोटाचीसुद्धा इतकी रडते की काय करू कळत नाही. नुसत्या दुधाने पोट नाही भरत सर”

“हम्म… खरंय… पण त्या बाईला कसं काय ओळखतो तू?? ” खरं तर मला पुढे काय बोलू हेच कळत नव्हतं. पण उत्सुकता सुद्धा तितकीच वाढलेली.

“देव आहे साहेब… भेटतो, कुठे ना कुठे, कोणत्या तरी रुपात. बहीणीचं कार्य उरकून हिला घेऊन मुंबईत येत होतो. अशीच वेळ होती रात्रीची. ट्रेन मधे विशेष कोणी नव्हतं. कसाऱ्यावरून ट्रेन सुटली, जेमतेम खर्डीला पोचली आणि 😊 पोरीने गळा काढला, ती पुढचा एक दीड तास रडत होती. बाटलीने दूध पाजत होतो, तर तेही घेत नव्हती.

ही बाई सुद्धा त्याच डब्यात होती. ती तास दीड तास नजर रोखून बघत होती माझ्याकडे. डोंबिवली येता येता एक क्षणाला पोरगी अचानक रडायची थांबली. श्वास घट्ट धरून ठेवलेला. छाती भरल्यासारखी वाटली. चेहरा निळा पडायला लागला. माझं अवसान गळून पडलं. मला वाटलं खेळ खलास. तेव्हा ही बाई अचानक जागेवरून उठली. तिच्या कडेवरचं मूल बाजूच्या माणसाकडे देत, माझ्या अंगावर जवळपास किंचाळली. तीच्या डोळ्यांत आग आणि पाणी एकत्र दिसत होतं. पुढंचं एक दीड मिनिट तिच्या भाषेत संतापून काहीतरी बोलली ज्यातला मला एकही शब्द कळला नाही. शेवटी तीने तिचे दोन्ही हात पुढे केले. मी काहीही कळण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी चुपचाप पोरीला तिच्या हातात दिलं. ती तिथेच थोडं वळून पोरीला छातीशी घेऊन बसली. दहा मिनिटानी तिने पोरीला परत माझ्याकडे दिलं. पोरगी समाधानाने झोपली होती. इतकी शांत झोपलेली मी तीला कधीच पाहिलं नव्हतं…”

भेटल्यापासून पहिल्यांदा त्याचा आवाज भरल्यासारखा वाटला. डोळे सुद्धा भिजल्यासारखे वाटले. त्याने नजर फिरवली…

“मग, पुढे…??”

“मग काही नाही साहेब… तीच्या सोबत असलेल्या त्या माणसासोबत तोडक्या मोडक्या हिंदीत बोलता बोलता कळलं की ते लोक इथे राहतात म्हणून.”

“रोज येतो का मग इथे?”

“रोज नाही गरज पडत सर. पण कधी कधी रात्र झाली की ही पोरगी रडायची थांबतच नाही. तेव्हा मग तिला घेऊन मी इथे येतो. ही अम्मासुद्धा मी येताना दिसलो की तिचं स्वतःचं मूल छातीपासून खेचून लांब करते आणि हिला आधी जवळ घेते…”

माझ्या डोक्याला मुंग्या येत होत्या. मेंदू सुन्न पडत चाललेला…

“मी सोडू का तुला घरापर्यंत…? मी इथेच समोर राहतो. पटकन गाडी घेऊन येतो.”

“नको साहेब…, आमच्या गावाकडचा एक मुलगा इथं कॉल सेंटरला बस चालवतो. शिफ्ट वाल्याना सोडून या वेळेला रिकामी बस घेऊन जातो तो या बाजूला. तो सोडतो मला बांद्रा कोर्टापर्यंत. मग तिथून जातो मी चालत.”

नशीबाने खेळलेल्या प्रत्येक चालीवर उत्तर शोधलं होतं त्याने. त्याच्या प्रत्येक वाक्यगणिक माझे शब्द आटत चाललेले… मला कळत नव्हतं काय बोलू…? शब्दच नव्हते उरलेले… ना याच्या जखमांवर फुंकर मारू शकणारे, ना त्याच्या झगड्याचं कौतुक करू शकणारे…

अर्ध मिनिट शांततेत गेलं. पाऊस थांबला होता. आम्ही रस्ता क्रॉस करून समोरच्या बाजूला आलो, जिथून त्याच्या त्या मित्राची बस जाणार होती.

“तुम्ही जा सर, मी जाईन इथून”

“पुढे काय करणारेस…? ठरवलं आहेस काही…?”

“प्रयत्न सुरूय सर. मागच्या वर्षीची पीएसआय ची मुख्य परीक्षा पास केलीय. मुलाखतीचा कॉल पण आलेला सर. पण हे कोविड मुळं अडकून पडलं सगळं सर. आणि एम ए सुरू आहेच. बघू सर, जमेलच कुठेतरी काहीतरी…” नशिबाचे सगळे फासे उलट पडत असताना सुद्धा त्याचा नशिबावरचा विश्वास जराही कमी होत नव्हता. कदाचित त्याला त्याच्या जिद्दीवर जास्त विश्वास असावा.

“तुझा मोबाईल नंबर देतो का?”

“तुमचा सांगा सर…” खिशातून मोबाईल काढून त्याने माझा नंबर टाईप केला.

“मिस्ड कॉल दे मला”

“नको सर, राहू देत”

“अरे दे की, काय झालं?”

“नको सर, राहू देत. मला शोधत मदत करायला याल. नकोय मला ते सर. आयुष्यात काही झालोच तर स्वतः पेढे घेऊन येईन तुम्हाला. इथेच राहता ना तुम्ही ?? ” त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं स्माईल होतं.

“……….” कुठून आणत असेल हा इतकी सकारात्मता.

“बस आली सर, ती बघा…”

तरीही जाता जाता याच्या हातात थोडे पैसे ठेवतोच असं मनात ठरवून मी समोरून येणाऱ्या बस कडे बघता बघता पाकिटाला हात घातला. शंभर-पाचशे देऊ की हजार-दोन हजार देऊ असा विचार करेपर्यंत त्याने स्वतःच्या खिशातून दहादहाच्या तीन नोटा काढून माझ्या बॅगच्या कप्प्यात टाकल्या.

“हे तुमचे तिकिटाचे पैसे सर… त्या दिवशी घाईघाईत राहून गेलेले…”

मी काहीही म्हणेपर्यंत तो बसमध्ये चढला होता आणि बस पुढे निघालीही होती.

“पुन्हा भेटू सर..”

मी बराच वेळ पुढे जाणाऱ्या बसकडे बघत बसलो.

मी अर्धएक मिनिट तिथेच उभा होतो. नक्की कोणी कोणाच्या पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणायला हवं होतं, याचा विचार करत.

मी चालत घराकडे निघालो. सिग्नलवर सायकलवरच्या कॉफीवाल्याकडे एक कॉफी घेतली. आणि सुन्न डोक्याने घरी आलो. असं म्हणतात, की असे प्रसंग तुम्हाला आयुष्यात नवीन ऊर्मी देऊन जातात… पण मला याच्या अगदी उलट वाटतय…. आत खूप मोठी आणि खोल पोकळी तयार झाल्यासारखी वाटतेय. रितेपणाची जाणीव. वन बीएचकेचा, टू बीएचके आणि हॅचबॅकची सेडान करण्या इतपतच खुरटी स्वप्नं बाळगणाऱ्यांना ही जगण्याच्या खरीखुऱ्या लढाईची गोष्ट अंगावर येते. तूपात घोळवलेली आणि साखरेत लोळवलेली दुःखं चघळायची सवय झालेल्या शहरी मध्यमवर्गाला ही दाहकता पेलवत तर नाहीच, पण ऐकवतही नाही. ‘बलुतं ’ किंवा ‘झोंबी ’ सारखी दुःखानी डबडबलेली आत्मचरित्रं वाचल्यावर आपल्यात जी शून्यत्वाची भावना निर्माण होते तीच भावना. पण सगळीच पुस्तकं लायब्ररीत मिळत नाहीत. काही पुस्तकं तुम्हाला अशीच रस्त्यावर, पूलाखाली चालता बोलता भेटतात. तुमच्यांशी गप्पा मारतात… जीवंत होऊन.

सलाम आहे रवी तुला… हो रवीच… स्वयंप्रकाशी रवी..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}