आधार!
आधार!
मी आज खरंतर बाबांवर जाम वैतागलेय… आधीच मला कॉलेजला जायला उशीर झाला होता. आज राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ची मीटिंग होती आणि ऐन वेळी बाबांनी बँकेत जायला लावलं होतं. KYC update करायचा आजचा शेवटचा दिवस होता म्हणे! बँकेला आधार कार्डची प्रत द्यायची होती, आजच्या आज!
बँकेत आले, तर तो कारकून जागेवर नव्हता. त्याची वाट पहात उभी राहिले, तर एक typical गावठी बाई येऊन, “माय, जरा हा फार्म भरून द्येते का? खात्यातून पैकं काडायचं हायेत”, म्हणत डोकं खात होती.
एकदाचा तो कारकून आला, त्याला KYC ची कागदपत्रं दिली आणि त्या बाईपासून पिच्छा सोडवून घेत एकदाची बँकेबाहेर आले.
स्कूटी सुरू करणार तेवढ्यात तिथे एक चाळीशीचा इसम रडवेल्या चेहऱ्यानं एका छोट्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेला दिसला. ती मुलगी खूप जोरजोरात श्वास घेत होती. शब्दांत सांगता नाही येत पण काळजात गलबललं, पोटात तुटलं काहीतरी.
“काय झालं, दादा?”
“ल्येक बीमार हाय. बायको पैकं काडाया कवाधरनं आत गेलीया. पैकं आनले की लेकीला हास्पिटलात घीऊन जाऊ… सास घेयाला तकलीप होतीया तिला. डागदरने कागुद दिलाय मोठ्या डागदरसाठी.”
मी तो कागद वाचला… तिला acute pneumonia होता. किमान तीन महिन्यांची strong antibiotics ची treatment होती.
त्या NSS च्या मीटिंगला चुलीत घातलं आणि बँकेत घुसले. ती मगाचची बाई अजून आल्यागेल्याची मनधरणी करत होती. तिच्याकडून तिचं पासबुक घेतलं, बॅलन्स पाहिला तर जेमतेम पाच-सहा हजार रुपये होते त्यात…
एवढ्या पैशात ती काय त्या मुलीचा इलाज करणार होती कोण जाणे! तिला withdrawal slip भरून दिली, पण डोक्यात त्या मुलीचेच विचार चालले होते.
मला एकदम ती दिवाळीतील HP प्रिंटरची जाहिरात आठवली…
‘एक शाळकरी मुलगा एका पणत्या विकणाऱ्या आजीचा फोटो काढतो आणि “हिच्याकडून पणत्या विकत घ्या” असं आवाहन करणारी पोस्टर्स सगळीकडे डकवतो, तिच्या सगळ्या पणत्या विकल्या जातात’, अशी काहीतरी ती जाहिरात होती.
फॉर्म भरण्यासाठी तिचं पासबुक घेतलं होतंच, मी त्या पासबुकच्या अकाऊंट डिटेल्स असलेल्या पानाचा आणि सध्याचा balance दाखवणाऱ्या पानाचा फोटो काढून घेतला, तिला फॉर्म भरून दिला आणि बाहेर आले.
त्या बाबाकडून तो डॉक्टरचा कागद पुन्हा एकदा घेतला, त्या prescription / medical advice चाही फोटो काढला आणि त्या बाबाचं लक्ष नसताना त्याचा व त्या मुलीचा फोटो काढला.
हल्लीच्या सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत याच्या पुढचे टप्पे तसे सोपे होते… फेसबुक, ट्विटर, आणि व्हॉट्सॲपवरच्या माझ्या असंख्य मित्रमैत्रिणींना आणि ग्रुपना मी हे मेसेज मुक्त हस्तानं पाठवले. थोडक्यात या तिघांची माहिती, अपेक्षित उपचार खर्च, त्या डॉक्टरांचे संपर्क क्रमांक, आणि मुख्य म्हणजे बँक अकाऊंट डिटेल्स आदि सर्व माहिती पाठवली.
मी स्वतः माझ्या पॉकेटमनीतून थोडे पैसे त्या अकाऊंटला पाठवले. आणि इतरांनाही अशी बुद्धी व्हावी अशी प्रार्थना करू लागले.
दोन दिवसांनी बाबा पुन्हा माझ्या खनपटीला बसले… त्या आधारकार्डाच्या मागच्या पानाची प्रतही बँकेत द्यायची होती. त्याशिवाय KYC चे काम अडकलं होतं.
मी बँकेत गेले, बाबांचं काम केलं. तिथंच ती परवाची बाई पुन्हा काऊंटरजवळ दिसली… हैराण होऊन ती त्या कारकूनाला काहीतरी विचारत होती.
मी माझ्या KYC कारकूनाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, तो म्हणाला,
“तिची लहान मुलगी आजारी आहे. आणि कोणास ठाऊक कसं काय, पण तिच्या बँकखात्यात अनेक जण लहानमोठ्या रकमा जमा करताहेत. लाखभराच्या वरती रक्कम जमा झालीय. तिला खूप मोठा आधार मिळाला आहे. तिची मुलगी आता नक्की वाचेल. हे कोण पैसे पाठवतंय, असं ती त्याला विचारतेय!”
मी काहीच न बोलता तिथून निघाले… बाबांच्या ‘आधार’कार्डाची कहाणी त्या मुलीला ‘आधार’ देऊन साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली होती.