★★ इंग्लिश मिंग्लिश ★★ ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★ इंग्लिश मिंग्लिश ★★
मिंग्लिशच,बरोबर वाचलं तुम्ही. म्हणजे मराठीत mingle झालेलं इंग्लिश.
आमच्या वेळी पहिली ते चौथी फक्त मराठी मिडीयम असायची.
एक तर मराठी किंवा डायरेक्ट कॉनव्हेंट. आमच्या सुदैवाने पाचवीत लोअर इंग्लिश हा प्रकार सुरू झाला.आपल्याला पण फाडफाड इंग्लिश बोलता येईल ह्या उद्देशाने मी पण लोअर इंग्लिश घेतलं.पण घरात आणि बाहेर,’थँक्स’ आणि ‘सॉरी’ ह्यापलीकडे कुठले इंग्लिश शब्दच संभाषणात नव्हते. आता टेबल,पेपर,पेन्सिल,पेन,बेंच हे शब्द नका धरू हं! ते मराठीच शब्द आहेत.🤣
आमची शाळा म्हणजे नागपूरची सोमलवार हायस्कुल,रामदास पेठ ब्रँच. सध्याची topmost शाळा. म्हणजे आता entrance exam, वर भरमसाठ फी हे सगळंच आलंच. पण आमच्या वेळेला ती शाळा नुकतीच सुरू झाली होती. त्यांना विद्यार्थी हवे होते. शाळा घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर म्हणून वडिलांनी त्या शाळेत घातले.
तर इंग्लिश बद्दल बोलत होते. अचानक पहिल्या पायरीवरून दहाव्या पायरीवर उडी मारावी तसं झालं. सुरवातीला तर फारच जड गेलं. past, present, future tense.. past perfect, present perfect हे शिकायलाच किती दिवस लागले.लोअर इंग्लिश खूप कठीण नव्हतं पण इतिहास,भूगोल ह्या विषयात शब्द जरा कठीण असत.
मला आठवतंय एकदा सहावीत आम्हाला एका Unit test मध्ये Translate in English मधे एक वाक्य दिलं होतं. “हिवाळ्यात तुम्ही कधी आंबे बघितले आहे का?” कित्ती सोप्प विचारलं असा सगळ्यांचा अविर्भाव होता😀 “Have you seen mangoes in winter?” मार्क्स पूर्ण मिळणार ही खात्री होती. पण प्रत्यक्ष पेपर हातात आल्यावर,एक दोन सोडून( जे कॉनव्हेंट मधून आले होते) सगळ्या विद्यार्थ्यांचं चुकलेलं होतं.
सरांना आम्ही अगदी पेपर दाखवून सांगितलं, “सर,तुम्ही इथे मार्क्स दिले नाहीत.” सर म्हणाले, “चुकलेल्या उत्तराला मार्क्स कसे मिळतील? Have you ever seen mangoes in winter? असं उत्तर हवं.”
‘कधी’ चं ‘ever’ कुठे लिहिलं होतं?
आम्हाला इंग्लिश शिकवायला ५ ते ७ वी पर्यंत आपटे मॅडम होत्या. चक्क नऊवारी घालणाऱ्या! तेव्हा नऊवारी फक्त आजी घालायची. आपटे मॅडम तर माझ्या आईच्या वयाच्या होत्या. गोऱ्यापान, नाजूक फीचर्स. आणि इंग्लिश इतकं सुंदर शिकवायच्या. अस्खलित इंग्लिश बोलायच्या. त्यांच्याकडे बघून शिकलो,माणसांच्या पेहेरावावरून त्याचं कौशल्य,बुद्धिमत्ता ठरवायची नसते. त्यांच्या शिकवण्यामुळे नंतर active passive खूप आवडीचं झालं.त्यात आणखी गोडी निर्माण केली ती देसाई मॅडमने. ८ ते १०वी इंग्लिश शिकवायला होत्या. देसाई मॅडम धड्यातील प्रत्येक वाक्य,active-passive आणि direct-indirect करायला सांगायच्या. इतकं प्रचंड आवडायला लागलं की active-passive मध्ये पूर्ण मार्क्स मिळायचे. माझा मुलगा दहावीत असताना,ह्या मुलांना active-passive जड जायचं.😇
मला इंग्लिश ह्या भाषेचं खूप आकर्षण आहे.जे अस्खलित बोलतात,त्यांचं संभाषण ऐकायलाच खूप आवडतं. इंग्लिश ही भाषा अशी आहे की अफाट वाचन असेल तरच त्यावर प्रभुत्व मिळवता येतं.
त्या भाषेत संवाद कौशल्य साधता येतं. पण फक्त शब्द खूप माहिती असूनही उपयोग नाही. त्या भाषेत संवाद करणं हे देखील एक कौशल्यच आहे आणि त्यासाठी खूप जड,कठीण शब्दांची गरज नसते. अगदी सहज तोंडात येणारा शब्द हवा असतो.आणि हे सतत इंग्लिशमध्ये संवाद साधूनच येतं.नाहीतर मग आधी मनात वाक्य तयार करायचं आणि मग बोलायचं असं होतं.😀
हल्लीची मुलं किती सहज,छान इंग्लिश बोलतात.आणि ती काळाची गरजही आहे.ती भाषा ऐकताना गोड वाटायला हवी.पण काही ठिकाणी मुलं ज्युनिअर के जी मधे गेले की, “ती Green चटणी आणि Yellow भात खायचा हं!” असे डायलॉग घरी सुरू होतात.
आपल्या मुलाला पटापट इंग्लिश यायला हवं हा उद्देश असतो पण त्यामुळे मराठीची गोडी तर लागतच नाही, पण इंग्लिश पण नाही. हे असं मराठीतलं mingled इंग्लिश मातृभाषेची पार वाट लावतं. ह्या पिढीला कितीतरी मराठी शब्द,मराठी म्हणी माहिती सुद्धा नाहीत. ज्यांना मराठी वाचनाची आवड आहे ते अपवाद वगळता,रोजच्या वापरातले शब्द सुद्धा माहिती नसतात ही दुरावस्था. मी एकदा अगदी झोक्यात आमच्या चिरंजीवांना म्हटलं, “आनंदावर विरजण घालू नको रे.” तो काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी डोक्यात आलं,ह्याला विरजण हा शब्द तरी माहिती आहे का? त्याला विचारलं,तर तो नाही म्हणाला.
कपाळावर हात मारून घेतला.कर्म माझं! 😁
भाषा आत्मसात करणं ही एक तपस्याच आहे. मग ती कुठलीही असो. आपण मराठी माणसं आपल्या संवादात सतत जो इंग्लिशचा वापर करतो,तितकं दुसऱ्या प्रांतातले करत असतील? ‘I doubt’
हे बघा, झालीच न चूक,म्हणजे मला म्हणायचं होतं की मला शंकाच आहे😀
हेच ते ‘इंग्लिश मिंग्लिश’.
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे