#ओटी_लाखमोलाची (स्वानुभवावर आधारित) सौ शर्वरी कुलकर्णी-गुळवणी
#ओटी_लाखमोलाची
डोळे आजी आजोबा, महिन्याच्या एक दोन तारखेला हमखास तिच्या बँकेत पेन्शन काढायला येणारं एक खूप वयस्कर जोडपं साधारण नव्वदीच्या आसपासचं… मुलगा सून त्याच गावात पण त्यांच्या पासून लांब एका सर्वसोयीनियुक्त अशा फ्लॅट मधे राहत होते.
आजोबा तर अगदीच थकलेले , ऐकू कमी यायचं , दिसायचंही कमी, हात धरून चालवावं लागायचं. या अशा अवस्थेत आजी उसनं आवसान आणून त्यांचं सगळं करत. खाजगी रिक्षा परवडत नसल्यामुळे ते दोघे बसने बँकेत येत . असाच एक पेन्शन जमा झालेला दिवस, तिचं लक्ष सहज खिडकीतून बाहेर गेल्यावर तिला दिसलं की ते आजोबा आजींचा हात झटकायचा प्रयत्न करत होते, होती न्हवती ती ताकद एकवटून आजी त्यांना बँकेत ओढून आणत होत्या. शेवटी आजोबांनी त्यांच्यावर हात उचलला ..तिच्या पोटात कसंसच झालं ते बघून.. थोडी चौकशी केल्यावर कळलं की आजोबांना अल्झायमरचा आजार होता, यात माणसाचा मेंदू सुकतो आणि त्याची स्मरणशक्ती कमी होते. स्वतःचे तरुणपण बालपण स्पष्ट आठवते पण मधल्या वर्षांचा विसर पडतो. माणूस भ्रमिष्टासारखा वागू लागतो. त्या दोघांच्या बाबतीत जणू हा ‘दुष्काळात तेरावा ‘च होता. हजारभर रूपयांसाठी त्यांची दर महिन्यात होणारी ती धडपड तिला बघवली नाही. तिने त्या दोघांना चेक बुक घेण्याबद्दल सुचवलं, त्याचे फायदे सांगितले आणि आठ दिवसात मिळवून पण दिलं.
झालं… पुढच्या महिन्यापासून आजी एकट्याच बसने यायला लागल्या. दरवेळी आल्यावर आपला त्रास कमी केल्याबद्दल तिला धन्यवाद द्यायला मात्र त्या विसरायच्या नाहीत. दोन मिनिट तिच्याजवळ बसून मनातले दुःख बोलून दाखवायच्या. दोघीही माहेरच्या एकाच आडनावाच्या.. याचे आजींना विशेष कौतुक होते. म्हणायच्या, ” आपण बहिणीच आहोत हो.. म्हणूनच तर तुम्ही मदत करता माझी”.. एक क्षण का होईना दोघीही मनातूनच आपापल्या माहेरच्या आठवणीत फिरून यायच्या.
सगळं व्यवस्थित सुरू असतानाच महाभयंकर अशा कोरोनाने थैमान घातलं आणि घड्याळाच्या काट्यावर पळणारे शहर चिडीचूप झालं. बस बंद, रिक्षा बंद, दुकानं बंद.. रस्ते सगळे सामसूम झाले. आजींची पेन्शन काढायला यायची पंचाईत झाली. त्या हजार बाराशे रुपयाने थोडाफार का होईना त्या दोघांच्या संसाराला आधार होता. इकडे तिचा ही जीव वरखाली होत होता, आता कसे करणार ते दोघे.. वाण सामान , औषधं बाकी काही लागलं तर पैसे कुठून आणणार.. मनात काहीसा विचार करून तिने तिच्याकडे असलेला आजींचा मोबाईल नंबर डायल केला.
आजी :- …” हॅलो”
ती :- ” आजी , मी बोलतेय बँकेतून”..
आजी :- “हा मॅडम बोला ना, कशा आहात?”
ती :- ” मी ठीक आहे ..अहो पण आजी तुमचं काय, यावेळच्या पेन्शनचं काय करणार? कशी नेणार? ”
आजी :- “थोडे आहेत पैसे शिल्लक त्यावर भागते का बघते, लागले तर शेजारच्यांकडून घेईन.. फार पंचाईत झाली हो यावेळी… त्यात हे सध्या खूपच त्रास देतायत. मारतात, जेवणाचं ताट भिरकवतात, तू माझी बायको नाहीस… मला कामाला जायचंय डबा दे असं काही असंबद्ध बोलत राहतात. काही आणण्यासाठी सुद्धा मी दहा मिनिटे बाहेर जाऊ शकत नाही. आरडा ओरड करतात, शेजाऱ्यानाही मनस्ताप होतो आमच्यामुळे.. माझंही वय झालंय हो, सहन नाही होत मलाही…”( तिच्या स्वतःच्या आजोबांच्या शेवटच्या दिवसांची तिला आठवण झाली , त्यांनाही हाच आजार होता. त्यांच्या नकळत इतरांना आणि त्यांना स्वतःला होणारा त्रास तिने जवळून अनुभवला होता) क्षणात सगळं चित्र तिच्या डोळ्यासमोरून गेलं. मनात कुठेतरी खूप वाईट वाटून ती म्हणाली,
” एक काम करा, मला तुमचा पत्ता द्या, उद्यापर्यंत पैसे पोहोच करेन मी घरी”..
आजींच्या आवाजात उत्साह आला त्यांनी पत्ता दिला आणि म्हणाल्या , ” दुपारी जेवायलाच या..”. ” बरं , बघते …भेटू उद्या “,असे म्हणून तिने फोन ठेवला.
दुसऱ्या दिवशी बँकेतले काम संपवून जरा घाईतच ती बाहेर पडली. शोधत शोधत योग्य पत्त्यावर पोचली . निघताना तिने आजींना फोन केलाच होता. तिला घरी आलेलं पाहून आजींना खूप आनंद झाला. त्यांनी दारातच तिला विचारलं, “मला वाटलं तुम्ही दुपारी जेवायला याल, मी वाट पाहिली.” त्यांच्या या आपलेपणाचं तिला कौतुक वाटलं. दोघींच्या गप्पा झाल्या. हौसेने आजींनी त्यांच्या नातवाचा कपाटात जपून ठेवलेला एक जुना फोटो तिला दाखवला, त्याच्याबद्दल बोलताना त्यांचे शब्द थांबत न्हवते.. बाकी काहीही असलं तरी ‘दुधावरची साय ‘ होती ती…
तिच्या सरबतासाठी उन्हाळ्यामुळे महाग असून पण आणलेला तो लिंबू, शेजाऱ्यांच्या फ्रिज मधे तांब्याभर गार करायला ठेवलेलं पाणी या छोट्या गोष्टीसुद्धा तिच्यासाठी आज मौल्यवान होत्या. थोड्या वेळाने तिने स्वतः कडचे , त्यांच्या पेन्शन पेक्षा थोडे जास्तच असलेले पैसे आजींच्या हातात ठेवले आणि म्हणाली लॉकडाऊन संपेपर्यंत मी आणून देत जाईन दर महिन्याला पैसे. सगळं सुरळीत झालं की हिशेबाचं बघू… तिचा तो पैसे असलेला हात आजींनी पाणावलेल्या डोळयानी कपाळाला लावून म्हणाल्या, “खूप केलं हो तुम्ही आमच्यासाठी”..आजींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताच स्वतःचा हा निर्णय तिला खूप सुखावून गेला.
आता निघावं म्हणून ती उठली. आजींनी तिला आत बोलावलं आणि देवासमोर एक पाट मांडून म्हणाल्या, ” बसा, आज देवघरातल्या लक्ष्मी समोर मी माझ्या आयुष्यातल्या लक्ष्मीची ओटी भरते “.. असे म्हणून त्यांनीं तिला कुंकू लावले.. “बांगडया भरा” , असे म्हणत पन्नास रुपये हातावर ठेवले. ती प्रेमाची ओटी आणि ते हजार रुपये पेन्शनमधले तिच्यासाठी ठेवले गेलेले पन्नास रुपये त्यादिवशी तिच्यासाठी लाखमोलाचे ठरले… अशी ओटी नक्कीच कायम भरलेली राहील.. सुखाने , मायेने आणि आजींसारख्या लोकांच्या आशीर्वादाने…
(स्वानुभवावर आधारित)
सौ शर्वरी कुलकर्णी-गुळवणी