Classified
26 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २६ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग २६
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
इकडे तात्यारावांच्या घरात त्यांच्यासह तीन लहान मुले आणि प्लेगने आजारी वडील इतकेच लोक होते. त्यांचे मोठे बंधू बहिणीला आणण्यासाठी गेले होते. संध्याकाळी लहान भाऊ वडिलांजवळ जाण्यासाठी हट्ट करून रडू लागला. सुरवातीला ऐकेनाच पण मग तात्यारावांनी त्यास सांगितले की, “रडू नकोस, बाहेरच्या लोकांना वडील आजारी आहेत हे कळू द्यायचे नाही आहे.”
हट्ट करणारा छोटा बालक काही क्षणातच शांत झाला. आणि एखाद्या मोठ्या मुलासारखा वडिलांची सेवा करण्यासाठी तात्यारावांना मदत करू लागला. त्या रात्री तात्याराव वडिलांच्या सेवेत अखंड धावपळ करत होते. पण प्लेगचा काही उतार पडत नव्हता. पहाटेच्या वेळी ते जोरजोरात कण्हू लागले. वेदनांनी ते अक्षरशः बेजार झाले होते. त्यामुळे हळू हळू बाहेरच्या लोकांना कळू लागले. तात्यारावांचे काका, बापुकाकांना जेव्हा हे समजले तेव्हा ते फारच घाबरले.
त्यांनी घरी यायचे टाळले आणि पोलिसांना चूप राहण्यास सांगून येतो म्हणून सांगून गेले ते पुन्हा आलेच नाही. त्यांनी गावच्या कुलकर्णी आणि पाटील यांना बातमी सांगून ठेवली आणि बातमी कळली नाही असे दाखवावे आणि चौकशी करू नये म्हणून सांगितले. शक्यतो मुलांना घराबाहेर काढू नये म्हणून देखील सांगितले.
इकडे तात्याराव माहित असलेले आणि कळत असलेले सगळे उपाय करून बघत होते. त्यांनी कोणालातरी जळवा आणायला सांगितल्या. ते जळवा घेऊन आल्यावर त्या वडिलांच्या जांघेत गाठीवर लावण्यात आल्या. जळवांनी रक्त शोषून घेतले आणि ती गाठ गेली. पण नंतर जळवा काढून देखील रक्त थांबेना.
थोड्यावेळाने पुन्हा ती गाठ आधीपेक्षा जास्त फुगून वर आली. तात्यारावांच्या वडिलांना पुढे काय वाढून ठेवलं आहे, हे एव्हाना कळून चुकल होत. ते मुलांच्या चिंतेने अधिक घाबरून गेले. तात्यारावांचे मात्र अजूनही प्रयत्न चालूच होते. त्यांनी लहान भावाला पुढच्या दाराजवळ बसवून कोणी आले तर वडील घरी नाहीत म्हणून सांगण्यास सांगून ते स्वतः मागच्या अंगणात गेले. कोणी तरी बोंडाचे औषध सांगितल्यामुळे ते बोंडे तोडून गोळा करत होते. तिथे थोड्याच वेळात तात्यारावांचा लहान भाऊ म्हणजेच बाळ आला.
तात्याराव त्यास म्हणाले, “तू आपले काम सोडून इकडे का आलास? जा परत तिकडे.” तसा तो पुन्हा जाऊ लागला. त्याच्या डोळ्यातले पाणी पाहून तात्यारावांनी त्यास जवळ बोलावून घेतले. सुरुवातीला त्यांना वाटले की, हा वडिलांच्या चिंतेने रडतो आहे.
पण मग बाळ म्हणाला की, “तात्या, रागावणार नसशील तर एक सांगायचे आहे तुला.”
तात्याराव म्हणाले, “सांग की.”
त्यावर तो दहा अकरा वर्षांचा मुलगा म्हणाला की, “वडिलांसाठी तुला आधीच किती त्रास पडत आहेत. म्हणून मी सकाळपासून सांगितले नाही. पण आता मला उभेच राहता येत नाही. माझ्या जांघेत फार दुखते आहे.” असे म्हणून तो रडू लागला.
त्या इतक्या लहान मुलाने आपल्या मोठ्या भावाला अधिक त्रास पडू नये म्हणून आपले दुखणे इतक्या वेळ दाबून ठेवलेलं बघून तात्यारावांना गहिवरून आले. त्यांना प्रचंड धक्का बसला. वडिलांच्या पाठोपाठ आता लहान भावाला देखील प्लेगने गाठले होते.
पण काहीच विशेष नाही असे दाखवत तात्याराव त्यास म्हणाले, “हात्तेच्या, इतकेच ना! चल मी तुला ते शेंदराचे औषध लावतो. वडिलांना मात्र तू आजारी आहेस हे कळू द्यायचे नाही बर का?”
बाळ म्हणाला, “छे, अजिबात नाही कळू देणार. ते घाबरतील.”
तात्यारावांनी बाळला पुढच्या बंगल्यात निजवले. थोरल्या वहिनीस त्याची काळजी घेण्यास सांगून स्वतः वडिलांची शुश्रुषा करण्यास माडीवर गेले. जाताना कोणाला बातमी कळू न देण्याची काळजी घेण्यास सांगितले.
वहिनी पण लहानच तेरा चौदा वर्षांची. पण तीही या प्रसंगात धीराने सगळ करत होती.
प्लेगच्या रुग्णाच्या श्वासोच्छवासानेही प्लेग दुसऱ्यास होऊ शकत असे.
त्यामुळे तात्याराव अधून मधून स्वतःस काही दुखते खुपते का ते तपासून पाहत. वहिनीस डोके दुखते का वगैरे विचारात असत. वहिनीला सांगत दुखत असेल तर लपवून ठेऊ नको. दोन दिवसांपूर्वीच वडिलांनी आणलेले प्लेग प्रतिबंधक औषध स्वतः घेत आणि वहिनीस देखील देत. तात्यारावांचे डोळे आता मोठा भाऊ परत कधी येतो याकडेच लागलेले होते. घरात आता तोच आधार होता.
वडिलांना प्लेगची लागण होऊन दोन दिवस होत आले होते. त्याच संध्याकाळी वडील आणि बाळ दोघेही जोरजोरात कण्हू लागले. दोघांनाही वेदना सहन होईनात. प्लेगच्या रुग्णाला पाणी देऊ नये असे सांगितले असल्याने तात्यारावांनी दोघांनाही पाणी दिले नव्हते. पण या स्थितीत पाणी पाणी फार होई. बंगल्यात पुढे बाळ आणि मागे माडीवर वडील, त्यांची शुश्रुषा करण्यासाठी चौदा सोळा वर्षांची दोन लहान मुले.
त्या दोघांची धावपळ चालू होती. मदतीस कुणाला बोलवावे तर कोणीच येईनात. जे आजपर्यंत सावरकर घराण्यावर जगत होते, असे लोकही या संकटाच्या काळात मदतीस येईनात. तात्यारावांनी मामास तार करून बोलावणे पाठवले पण त्यास यायला वेळ लागणार होता.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता.

