Classified

#अन्न सोहळा # – © सतीश बर्वे. २०.१०.२३.

🌼 #अन्न सोहळा # 👏🏻🌼🍛🍛

त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.
दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होते. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.
टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.

आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला,” काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं. हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.

साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.

काय झालं साहेब? तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला.

ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?

ते माझा बा तुम्हाला सांगेल असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.

एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला,” राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो.

ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं. त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला

माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटर असलेल्या गावात झाला.माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. माझ्या बा ला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला. इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची. बा ला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खुप गरीबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बा ने शिकवलंय मला. आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बा ने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचा.

आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.

बा म्हणायचा नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष्य असतं सगळ्यांकडे. आपण गरीबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.
बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता.

त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..

गाडी दुरूस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.

साहेब हे काय?

अरे माझ्या कडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तु मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार ह्याची चिंता सतावत असते.
हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवा जवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्या सोबत जमेल तेवढा हातभार लावायला. त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

© सतीश बर्वे.
२०.१०.२३.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}