गुंतवणूकमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

लेख तर सुंदर आहेच ! अगदी हृदयस्पर्शी ! हा लेख टाटा मोटर्स पिंपरी पुणे येथील निवृत्त अधिकारी दिवाकर बुरसे यांचा

खोपा शिडीला टांगला…

‘टाटा मोटर्स’चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कँशिया, स्पँथोडिया, ग्लिरिसिडिया, जँकरेंडा, पेल्टाफोरम, बाँटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डाँ. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी.

चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची ‘इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी.’ ‘टेल्को’ कंपनीने ती ताब्यात घेऊन तिथे आपली ‘ मशीन टूल डिव्हिजन’ सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला ‘स्टँडर्स बिल्डिंग’ नावाची, इंग्रजी ‘सी’ च्या आकाराची एक बैठी एकमजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतींपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागे उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळे तिथे अनेक पक्षांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत ‘आर अँड डी १’, ‘मेकँनिकल अँंड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग’ आणि मेट्रोलॉजि’ हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती.

ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी तीन-चारची वेळ होती. आकाश झाकळून आले होते. सर्वत्र अंधार पडला होता म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हा लक्षात आले की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथल्या ट्यूबलाईट्स लागत नाहीयेत. मी लगेच सी पी ई डीला (सेंट्रल प्लांट इंजिनियरिंग डिव्हिजन) फोन करून कळविले आणि सर्व नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. पाच वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळे मी घरी निघून गेलो.

दुसऱ्या पाळीतील सी पी ई डी च्या कर्मचाऱ्याने तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधील सर्व दिवे बसवले. त्याचे हे काम होईतो जेवणाची सुट्टी झाली. त्याने बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथेच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढे सात-आठ दिवस ती तशीच पडून राहिली.

एक दिवस माझ्या दृष्टीस ती शिडी पडली. मी सी पी ई डी ला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितले. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळाने शिडी न्यायला एक जण आला पण त्याने शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत, आला तसा परत गेला. शिडी तिथे कोपऱ्यात होती तशीच उभी!

दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, “काय चाललंय हे? ती शिडी का नेत नाही तुम्ही? आता आठ दिवस होऊन गेले इथले काम करून. काम झाल्यावर पुढचे निस्तरायला नको वेळच्यावेळी?” पलीकडून मलाच प्रश्न झाला, “काय? अजून नाही नेली? कमाल आहे. मी कालच सांगितलं होतं आणायला. इथे आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलंय त्यामुळे. मी आत्ता लगेच पाठवतो कोणालातरी आणि उचलून आणतो.” मी तरीही जरा जोरातच बोललो, “आत्ताच्या आत्ता हलवा इथून. आहो, म्हणजे आम्ही फाईव्ह एस ची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही ही अशी गलथान कामं करायची? ते काही नाही. त्वरित उचला इथून.”

तो कर्मचारी परत आला पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमधे शिरला आणि आजिजीने म्हणाला, “एक्स्ट्रिमलि सॉरी सर. काईंडली एक्स्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्या जवळ गेलो तो माझ्या लक्षात आले की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्षांची जोडी आपले घरटे करत्येय. ते अर्धेअधिक झालंय करून. पुढच्या चार-पाच दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी काडी गोळा करून घर बांधायला घेतलंय. दिवसभर आळीपाळीने हेलपाटे मारतायत दोघही. समजा, मी ही शिडी नेली तर त्याचे घरटे तुटेल. दोघांनी केलेले काम वाया जाईल. त्यांचे घरट्याचे स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या साऱ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचा सगळा शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्षांचा अंडी घालण्याचा हा सिझन आहे. म्हणून तर त्यांची लगबग चाललीय येवढी. अशात एखाद्याचे घर असे विनाकारण उध्वस्त करणे बरे दिसते का आपल्याला, तुम्हीच सांगा. असे पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाहीए. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो. पण मनाला पटत नाही हे. सांगा काय करू? नेऊ का राहू देऊ तिथेच? महिन्याभाराचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रssकन् उडून. प्लीज कोआँपरेट करा सर.”

त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात येवढे आर्जव होते की मला काय करावे हेच सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे दोन-तीन आँपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे पटले असावे. खरे म्हणजे मलाही त्याचे म्हणणे पटले होते. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचे कौतुक करावसे वाटत होते.

तरीही मी म्हणालो, ” अरे असे कसे करता येईल. पुढचे दीड-दोन महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी, त्यावर धूळ, कोळिष्टकं जमायला! त्या भागाची झाडलोट, स्वच्छता होणार नाही. इट विल लुक अग्लि, अन्-टायडी, इनडीसेंट अँड विच इज नाँट अँक्सेप्टेबल”.

यावर माझ्याच शॉपमधला एक पुढे आला आणि म्हणला, ” सर, त्याची काळजी आम्ही घेऊ, इथे काम करणारे सगळे.” “काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार ? जे दिसायला कुरूप आहे त्याला कसे रूप देणार तुम्ही? उगीच काहीतरी आपलं.” मी तरीही विरोध दर्शविला.

त्यावर दुसरा म्हणाला, “सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या. उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा. नाही तर हा त्याची लँडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण फाईव्ह एस च्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. फाईव्ह एस चे आँडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथेच, या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेऊ. साऱ्या जगाला दाखवू आपले कर्तृत्व.”

हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परस्पर संबंधांत ताण निर्माण करू पहात होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सह्रदयता, भूतदया, पर्यावरणाचे भान, जबाबदारीची जाणीव इ. अनेक जीवनमूल्ये व व्यवसायमूल्ये डोकावीत होती. त्यांचा आदर करणे आवश्यक वाटले मला.

क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथे. बघू नंतर.” माझा निर्णय सगळ्यांना आवडला. “थँक्यू सर. आम्ही काळजी घेऊ.” असे म्हणत सगळे पांगले, आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मी ही मिटिंगला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफेसमधे आलो. दिवसाचे कामाचे शेड्यूल सहकाऱ्यांना समजून सांगितले. कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेले टपाल पहायला सुरवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, “सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का? बघा कसं झालंय ते.” त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो,”नंतर कशाला? हा आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो.”

बाहेर येवून बघतो तो काय! शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचे घरटे आकार घेतच होते. पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचे कुंपण उभारले होते. शेजारी एक स्टँंड उभा करून त्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते, “please don’t disturb. Work in progress”.

जवळच्या एका झाडाच्या फांदीवर दोन पत्र्याची लहान डबडी लटकवली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो!

विशेष म्हणजे ज्या ‘फाईव्ह एस’ या जपानी व्यवस्थापनतंत्राचा अवलंब करण्याचे धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचे प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले होते त्या तंत्रातील सूत्रांचे तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले होते!

त्यांना हे तंत्र इथे अवलंबायला कोणी सांगितले? कोणी शिकवले? निसर्गातील सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमि, जल, वायू, पर्यायाने आपले पर्यावरण या विषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक, दक्ष आहेत? ‘हो, आहेत’, हेच या प्रश्नाचे उत्तर. समोर दिसतंय हे त्याचे एक उत्तम उदाहरण!

निसर्गातील सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरुक आहेत, गंभीर आहेत हे पाहून धन्य वाटले. कारखान्यातील तंत्रज्ञान, कौशल्ये इ. विषयात त्यांना प्रशिक्षित केले जाते. ती व्यवसायिक गरज असते. तसे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्ये, सुरक्षितता, समाज विकास इ. विषयी सुद्धा त्यांना प्रशिक्षित केले जाते हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचे वैशिष्ठ्य. हे त्यांना शिकवलेले ज्ञान खालपर्यंत झिरपत आहे हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला, पावलोपावली जे ज्ञान आणि भान दिले जाते, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता.

मी त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचे आभारही मानले कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून!

पुढील दोन महिने माझे सर्व उत्साही सहकारी एखाद्या पहिलटकरीण लेकीची काळजी तिचे आई-वडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहगयुगुलाची! त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर ” Entry prohibited”. ते स्वतःही सारे लांब उभे राहूनच काळजी घ्यायचे.

यथावकाश पक्षिणीने त्या घरट्यात चार अंडी घातली. दोघांनी आळीपाळीने ती उबवली. त्यातील तीन अंड्यातून पिले बाहेर आली. एक अंडे वाऱ्यामुळे खाली पडून फुटले. पुढील पंधरा-वीस दिवस हे पिलांचे भरण-पोषण-शिक्षणात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करीत ती पिले घरट्यातून आकाशात आत्मविश्वासाने झेपावली!

ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटे बांधले, त्यात आपला संसार थाटला, तीन पिलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन करून जगायला सक्षम बनवले ते पक्षाचे जोडपे मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासे झाले. आम्ही कर्मचारी मित्रांनी दोन-तीन दिवस त्यांची वाट पाहिली. पण कोणीच फिरकले नाही!

साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि आँफीसमधे प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या ‘त्या’ कोपऱ्याकडे लक्ष गेले. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्यावर उभारलेले घरटे अदृष्य झाले होते. फुलांच्या कुंड्या, साखळीचे कुंपण, जवळचा स्टँड, हे सारे उचलले गेले होते. खालची जमीन धुऊन पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवले होते. त्यावर लिहिले होते….

“Project completed successfully! Thanks to all team members for their active support and participation.”
– Birdees.
लेख तर सुंदर आहेच ! अगदी हृदयस्पर्शी ! हा लेख टाटा मोटर्स पिंपरी पुणे येथील निवृत्त अधिकारी दिवाकर बुरसे यांचा आहे.

Related Articles

One Comment

  1. लेखाचा टाइप थोडा मोठा असेल तर वाचायला जास्त छान वाटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}