युवा पिढीला वडीलधाऱ्यांनी सल्ला देणे..योग्य की अयोग्य? ©® श्रध्दा जहागिरदार
युवा पिढीला वडीलधाऱ्यांनी सल्ला देणे..योग्य की अयोग्य?
“आई तू थांब, तुला काही माहिती नाही यातलं”….
” बाबा ते तसे नसते हो”….
“आजी, तुझा काळ वेगळा होता गं, आता सगळं बदलले”…..
ही अशी वाक्य सध्या घरोघरी ऐकायला मिळतात. प्रत्येक पालकांना पडणारा हा प्रश्न आहे. या पिढीला आपल्या सल्ल्याची गरज आहे का?
काळ बदलला म्हणजे नेमके काय बदलले हो? मरेपर्यंत आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी त्याच आहेत की! त्यात फक्त सुधारणा होत गेली. तंत्रज्ञान प्रगत झाले. आधी नातेवाईकाला भेटायला जाणे म्हणजे घोडा, बैलगाडी, नंतर एखादी एस टी बस, रेल्वे वगैरे वगैरे. या साधनांमध्ये प्रगती होत गेली. नाते तुटले नाही पण त्यात दुरावा आला. What’s app मुळे मेसेज वर वाढदिवसाच्या शुभेच्छा जातात. “मावशीचा आज वाढदिवस आहे, तिला फोन कर गं ” या आपल्या वाक्याला आपल्याला सहज उत्तर मिळते, “फोनची काय गरज आहे? आजकाल कोणी फोन करत नाही गं आई, मेसेज करायचा.” म्हणजे आपण काही सांगायला गेलो तर आपल्याला त्यातील logic सांगायला जातात. एका पॉईंट नंतर आपल्याला पण वाटते अरे खरच की, आपण याचा विचार केलाच नव्हता.
म्हणजे तरुणाईच नाही तर लहान मुलं पण ऐकण्यापलीकडे गेली आहेत. याला जबाबदार पालक, सोशल मिडिया, की वेगाने प्रगत होणारे जग? पण मला वाटते येथे कोणाचाच दोष नाही. काळाप्रमाणे सर्वांनी धावले पाहिजे. पण धावता धावता तर या तरुण पिढीने आपली संस्कृती, परंपरा, नाती, घरातील मोठ्या व्यक्तींचा हात धरून चालायला पाहिजे. कारण त्या सल्ल्यामागे पण काहीतरी विज्ञान असते. जुन्या काळी मुलगी गरोदर असेल तर घरातील आजी, आई तिच्या समोर गोंडस श्रीकृष्णाचा फोटो ठेवायचा, तिला ‘हे’खाऊ नको बाई ‘ते’ खाऊ नको बाई असे सल्ले देत. शांत रहा, चिडचिड करू नको एवढेच काय ते.
आताच्या मुली पैसे देऊन गर्भ संस्काराचे क्लासेस लावतात. त्यामध्ये त्यांच्यासोबत त्या गर्भावर पण संस्कार केले जातात. म्हणजे ते मुल जगात येण्याअगोदर त्याला ज्ञानाचे भांडार मिळते. का तर ते मुल बुद्धिमान होणार नाही. म्हणजे त्या बाईची काळजी घेण्यात बदल झाला आहे. जुन्या काळी ती बाई स्वत:बद्दल पण एवढी सतर्क नव्हती, वडीलधारी जे सांगतील ते ऐकणे. आता त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. मुली खुप सतर्क झाल्या आहेत.
यामध्ये झुकतं माप कोणाला जाते ते कळत नाही. एकच मुल असते. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा हट्ट! त्या हट्टापायी आई-वडिल आपल्या मायेला आवर घालतात. त्यांच्या निधनानंतर मुलाला वेळ नाही तो वडलांचे दर्शन video call करून घेतो. येथे प्रगत तंत्र ज्ञानाचा वापर झाला पण माया, प्रेमाला कोठेच जागा नाही. परदेशी शिक्षणासाठी जा पण नंतर आपल्या मायदेशी परत या. घरातील वडील मंडळींचे ‘परत आपल्याच घरी ये रे’ हे वाक्य लाथाडू नका.
आपण उगाच म्हणतो का त्याने चार पावसाळे जास्त पाहिले आहेत. त्या चार पावसाळ्यात त्यांना ज्या चांगल्या, वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते. ते अनुभवाचे गाठोडे त्यांच्या जवळ असते. त्यातूनच ते आपल्याला सल्ला देतात.
वृद्धापकाळात पडणाऱ्या सुरकुत्या नका पाहू, त्यांच्या जवळ जे अनुभवाचे गाठोडे आहे ते पहा. ते पण तुमच्या प्रगत ज्ञानाचा वापर करतात पण त्यांच्या काळात ज्या सुख-दु:खांना त्यांना सामोरे जावे लागले. तो अनुभव आहे त्यांच्याजवळ! त्यातून जर तुम्हाला ते काही सल्ला देत असतील तर तो जरूर घ्या. त्यांना पण बोलायचा चांगले द्या.
विज्ञान एवढे प्रगत होत आहे. आकाशाला गवसणी घालत आहे. Mobile, what’s ap, Facebook, twitter या social media platforms मुळे आजच्या पिढीला एवढे ज्ञान मिळत आहे की त्यांना घरातील मोठ्यांचा सल्ला घेण्याची गरज नाहीये. पण घरात जर पाहुणे आले तर त्यांना नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावे हा प्रेमळ सल्ला आई-वडिल, आजी-आजोबाच देतात. त्यातुन तुमचे संस्कार दिसतात. संस्कृती जपली जाते. ते सोशल मिडिया तुम्हाला सांगत नाही. कोव्हिडमध्ये माणसाला माणसाची किंमत कळाली. प्रेमाच्या दोन शब्दासाठी तो आसुसलेला होता. म्हणजे माणसाला माणसाची गरज आहे. मग तरूण- तरुणींनो मोठ्यांचा सल्ला तुम्हाला का नको? दहा सल्ल्यामधील कदाचित एखादा सल्ला तुमचे आयुष्य बदलेल. तुमच्या सोशल मीडिया मध्ये त्यांच्या अनुभवाची शिदोरी पण संभाळून ठेवा रे.
©® श्रध्दा जहागिरदार🙏