कालौघात झालेले बदल..२ सायकलचे बिल्ले,दिवे आणि रेडिओ लायसन्स् मोहन वराडपांडे नागपूर
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल..२
सायकलचे बिल्ले,दिवे आणि रेडिओ लायसन्स्
आज ज्या प्रमाणे टु व्हीलर, फोर व्हीलर ला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे, तसचं पूर्वी साध्या आपल्या सायकललाही होतं.. प्रकार थोडा वेगळा होता.. ज्यांचा जन्म १९५५.. ५७ च्या आधी झालायं, त्यांनाच आठवेल..
सायकलला दर वर्षी एक बिल्ला कार्पोरेशनकडून विकत घ्यावा लागे.. सायकल च्या हॅन्डल ला मधोमध जो नट असतो, तो उघडून त्या खाली तो बिल्ला लावावा लागत असे.. त्या बिल्ल्याला तेव्हढे माफक आकाराचे होल असायचे..त्या बिल्ल्याची किंमत मला विस पैसे स्मरते..
दर वर्षी चा बिल्ला ओळखु यावा, म्हणून त्याचा आकार दर वर्षी बदलेला असायचा.. कधी गोल, कधी त्रिकोणी, कधी चौकोनी, कधी पत्त्यातील बदामचा आकार, कधी चौकट, कधी किलवर तर कधी इस्पिक ..
फार पूर्वी हे बिल्ले पितळेचे असायचे. मग पितळ शासनाला परवडे ना, म्हणून अँल्युमिनिअम चे बिल्ले सुरु झाले.. मार्च महिन्याचे शेवटी शेवटी कार्पोरेशनच्या कार्यालयात या बिल्ल्यांसाठी झुंबड उडायची..
एप्रिल नंतर पोलिस पकडतील ही भिती..
एखाद्या रस्तावर पोलिस अचानक आडवी दोरी बांधून सायकल वाल्यांना पकडून बिल्ले तपासायचे.. ज्याच्या सायकल ला नवीन बिल्ला नाही, त्याच्या सायकलच्या दोन्ही चाकातील हवा सोडायचे.. फक्त हवा सोडण्यावर त्यांचे समाधान होत नसे.. तर ते दोन्ही चाकाचे व्हाॅल नट आणि व्हाॅल ट्यूब काढून घ्यायचे…
झालं.. तो सायकलवाला बिचारा परेशान.. जवळचे दुकान शोधून सायकलला नवीन व्हाॅल ट्यूब, व्हाॅल नट विकत घेऊन हवा भरे.. त्याची किंमत बिल्ल्यापेक्षा जास्त असे.. त्यामुळे झक मारत तो बिचारा सर्व कामे बाजूला ठेऊन दुसरे दिवशी नवीन बिल्ला विकत घेत असे..
त्याच प्रमाणे, त्या काळात सायकलला दिवा ही आवश्यक असायचा.. विना दिव्याचे सायकलला पोलिस रात्री चलान करीत..
तो दिवाही राॅकेल/घासलेट वर चालणारा असायचा.. मोठा गोड आकार असायचा त्याचा.. समोरची कांच गोल थोडी बाहेर आलेली (बहिर्वक्र).. मागून उघडायचा, त्यांत राॅकेल भरायचे, आणि वात पेटवायची.. रात्रीचे अंधारात तो शांत आणि थोडासा प्रकाश पुरेसा असायचा..
त्यातही मग “डायनामो” आले.. सधन सायकलवाले गर्वाने डायनामो लावू लागले.. त्यात राॅकेल, वात असे प्रकरण नव्हते .. समोर च्या हॅन्डलला टाॅर्च, त्यातून एक वायर थेट मागील चाकाला लावलेल्या डायनामोला जोडलेली.. त्या डायनामोची क्लिप दाबली, की त्याची चक्री मागील टायरला स्पर्श करायची.. आपण सायकल चालवायला लागलो, की ती चक्री फिरायची, त्यामुळे डायनामो मधील चुंबक गोल फिरायचे, त्यामुळे काॅईल
मध्ये विज निर्माण होऊन त्यावर समोरचा टाॅर्च जळायचा .. जेव्हढे जोरात पायडल माराल, तेव्हढा प्रखर उजेड यायचा.. सायकल थांबली .. टाॅर्च बंद.. लहानपणी फार आकर्षण वाटायचे त्या डायनामोचे… सायकल स्टँडवर लाऊन जोरात पायडल मारून तो टाॅर्च पहाणे, हा आवडीचा कार्यक्रम..
असेच आणखी एक प्रकरण होते.. रेडिओ लायसन्स् .. ज्याच्या घरी रेडिओ असे, त्याला ते कंपल्सरी.. पोस्ट आॅफीस मध्ये रांगेत उभे राहायचे.. पंधरा रुपये भरायचे.. मग तो पोस्टातील माणूस आपल्या त्या लायसन्स् रुपी पुस्तकात एक पंधरा रूपयांचा स्टॅम्प् चिटकावयाचा .. आणि त्यावर दणकन् लोखंडी शिक्का आपटायचा.. त्या स्टॅम्पचा रंग फिक्कट ब्राऊन असायचा व त्यावर तंबोरा, तबला असे काहीसे चित्र आणि वर “आकाशवाणी” असं छापलेलं असायचं.. नंतर टीव्ही आला.. त्याला ही सुरवातीला हेच लायसन्स् .. घरी कधी अचानक तपासनीस यायचा.. त्याला ते लायसन्स् दाखवावं लागे..
त्यानंतर कालौघात इतक्या सायकली आणि रेडिओ आले की त्यावर शासनाला नियंत्रण ठेवणं अवघड होऊन बसलं.. आणि एक दिवस “यापुढे हे लायसन्स् लागणार नाही” असे शासनाने घोषित केलं.
कालौघात हे प्रकार इतिहास जमा झाले.. नवीन पिढीला तर यावर विश्वास ही बसणार नाही.
होय ना?
मोहन वराडपांडे
नागपूर
9422865897
Shared by Shishir Lokhande 90281 11422