दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कालौघात झालेले बदल..३ पूर्वीचे दंतमंजन मोहन वराडपांडे

©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————

कालौघात झालेले बदल..३

पूर्वीचे दंतमंजन

आज आपण महागड्या टूथपेस्टस्, टुथ ब्रशेस् विकत घेतो.. त्यातही शेकडो प्रकार ..साॅफ्ट.. हार्ड.. दातों के कोने कोने तक जाने वाला .. वगैरे .. वगैरे ..

तसेच भांडे घासायला महागड्या पावडरी, लिक्विड सोप्स्.. स्क्राॅच ब्राईटस्.. विकत घेतो.

पण या पूर्वी ही व्यवस्था कशी होती? त्या काळात या फालतु वस्तूंवर खर्च करणे म्हणजे लक्झुरी होती.. परवडणारे नव्हते.. प्रत्येक घरात सरासरी पांच सहा भावंड, वडील एकटेच कमावणारे..

मला आठवतं .. दंतमंजन पूर्वी माझी आजी, आणि नंतर माझे बाबा, घरीच तयार करायचे.. लाकडी कोळसा कुटुन त्याची वस्त्रगाळ पावडर तयार करायचे, त्यात लवंग पावडर, कापूर पावडर असे घटक मिसळले, की झालं दंतमंजन तयार.. ते डाव्या तळहातावर घेऊन उजव्या हाताच्या तर्जनीने दांत हिरड्या रगडून तोंड धुतले, की जो फ्रेशनेस मिळायचा, त्याची सर आताच्या कोणत्याही टूथपेस्ट मध्ये नाही.. त्यामुळे दांतही मजबूत राहात.. माझ्या वडिलांचे दांत शेवटपर्यंत शाबूत होते.. त्यांनी कधीच टूथपेस्ट आणि ब्रश वापरला नाही…(माझे मात्र चार दातांचे रुट कॅनलिंग झाले.)

त्याच दर्जाचे बिटकोचे “माकड छाप दंतमंजन” काचेच्या चौकोनी बाटलीत बाजारात उपलब्ध होते.. कालांतराने “कोलगेट” या विदेशी कंपनीने आपला जम बसविण्यासाठी बिटकोची जाहिरातींद्वारे भरपूर बदनामी करुन, (कोळश्याने दातांचे कसे नुकसान होते, वगैरे) आपला बुध्दीभ्रम केला.. आपणही त्या जाळ्यात हळूहळू अडकत गेलो.. आणि एक दिवस वृत्तपत्रात बिटकोने आपण व्यवसाय बंद करित असल्याचा दुखद समाचार प्रसिद्ध केला.. अजूनही ती जाहिरात मला आठवते… आपणच आपलं दर्जेदार उत्पादन बंद करण्यास मदत केली आणि विदेशी कंपनीच्या जाळ्यात अलगद अडकलो.. स्वदेशी उत्पादनास मुकण्याची ती सुरवात होती.. असो.. कालाय तस्मै नम:..

आता कालांतराने लाकडी कोळसा हा दुर्गंधी नाशक आहे, असे आजचे सायन्स सांगते.. तर लवंग तेल दात दुखी वर लावायला डाॅक्टरच सांगतात.

हीच बाब भांडे स्वच्छ करण्याबाबत.. पूर्वी स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध नव्हता.. घरोघरी लाकडाच्या चुली, भुश्याच्या शेगड्या, कोळशाच्या शेगड्या, अंघोळीसाठी गरम पाण्याकरिता, झिलप्यांवर (लाकडांचे वरचे साल) चालणारे बंब होते.. त्यामुळे घरोघरी राख मुबलक प्रमाणात उपलब्ध होती.. नारळ्याच्या वरील केस, म्हणजे त्या काळातील स्क्राॅच ब्राईटस् .. आणि राख म्हणजे आजचे व्हिम.. सर्व भांडी एकदम चकाचक…

काळाचे ओघात घरोघरी गॅस् आला..चुली, कोळसा, भुस्साच्या शेगड्या,गरम पाण्याचे बंब या वस्तू इतिहास जमा झाल्या..
त्यामुळे आपल्याही पर्याय राहिला नाही.. अशा बाबींवर खर्च करणे आता अत्यावश्यक झालयं..

होय ना?

मोहन वराडपांडे
9422865897

Shared by Shishir Lokhande  90281 11422

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}