कालौघात झालेले बदल..४ कल्हई मोहन वराडपांडे नागपूर
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल..४
कल्हई
आपल्या पिढीने अनुभवलेली, आणि नवीन पिढीला अजिबात माहीत नसलेली एक बाब म्हणजे “कल्हई”..
पूर्वी स्टेनलेस स्टील हा प्रकार नव्हता.. घरोघरी लोखंडी कढया, तांब्या/ पितळेची भांडी होती..स्वयंपाक घरातही प्लॅस्टिक च्या बरण्या नव्हत्या.. सर्व किराणा सामान पितळी डब्यांत साठवलेले असे. . असो.
तर लोखंडी आणि पितळेच्या भांड्यात खाद्य पदार्थ शिजवला आणि जास्त वेळ ठेवला (खास करुन त्यात चिंच, आमसूल, आमचूर, किंवा टमाटो सारखे आंबट घटक असतील ) तर त्या पदार्थाची चव बदलत असे.. त्याला एक खास शब्द होता.. “कळकणे”..
ते टाळण्यासाठी पितळी भांड्यांना कथिल कोटिंग.. अर्थात कल्हई केल्या जात असे.. त्यासाठी खास कल्हई वाले घरावरून जात असे.. ज्या माऊलीला गरज असेल, ती त्याला आवाज देई.. भाव ठरविल्या जाई.. एकदा भाव ठरला की तो आपली पोतडी उघडे.
अंगण सहसा मातीचे पण स्वच्छ झाडलेले, गायीच्या शेणाचा सडा घातलेले असे.. त्यावर त्या माऊलीने सक्काळी सुबक, सुंदर रांगोळी घातलेली असे..त्यावर आठवणीने तिने हळद कुंकू भरलेले असे..अंगणाचे मधोमध किंवा सर्वांचे नजरेस पडेल अशा जागी तुळशी वृंदावन राहत असे.. त्या तुळशीसमोर सायंकाळी तेलाचा दिवा, उदबत्ती लावल्याशिवाय ती माऊली सायंकाळचा स्वयंपाक सुरु करीत नसे. (आजच्या सारखे कोणाच्याही अंगणात फरशी, क्राॅन्क्रिट, टाईल्स अंगणात राहत नसे..) असो..
तर तो कल्हई वाला योग्य कोपरा बघून छोटासा खड्डा करीत असे.. त्यात लाकडी किंवा दगडी कोळसा भरित असे.. त्याच्या खालून एक पाईप त्याच्या दुसर्या अवजारास जोडला असे..
त्या कल्हई वाल्याचे दोन प्रकार होते.. जुन्या प्रकारच्या कल्हई वाल्याकडे चांबडी पखाल राही.. त्याला तो पाईप जोडलेला राही.. अत्यंत शिताफीने सफाईदार पणे तो त्या पखालीचे तोंड उघडून हात वर करे.. आणि पटकन बंद करुन हात खाली दाबे.. त्यामुळे त्यात भरलेली हवा त्या पाइपमधून कोळश्याच्या खाली पोहचे .. त्यामुळे तो निखारा म्हणा..शेगडी म्हणा.. लवकर पेटत असे..
दुसरा सुधारित प्रकारात त्याचे पाशी लोखंडी बंद पंखा आणि त्याला एक हॅन्डल असे.. हॅन्डल फिरविले की आतील चक्री गतीने फिरुन हवा कोळश्याखाली पोहचे..
ही पूर्व तयारी झाली, शेगडी चांगली लाल लाल रसरसली की तो त्यावर पितळी भांड पालथं ठेवायचा.. चांगलं लाल गरम झालं की दुसर्या बाजूने ते भांड गरम करायचा..
मग गरम भांडे सांडशीने खाली जमिनीवर घेऊन पुढील क्रिया अत्यंत जलद गतीने करायचा.. त्या भांड्यात नवसागर पावडर शिंपडून पटकन कापसाने पसरविणे, मग लगेच कथलाचा तुकडा त्या भांड्यात घासणे, .. ते कथील क्षणात विरघळायचे.. मग पटकन कापसाने ते कथील भांडभर पसरवायचा.. त्यामुळे त्या भांड्याला कथिल कोटिंग झाल्याने ते भांड चांदीसारखं चमकायचं.. मग पटकन तो ते भांड थंड पाण्याच्या बाधलीत बुडवायचा.. त्याचा चर्र आवाज यायचा.. झाली कल्हई त्या भांड्याला..
असं एकेक करुन तो काम संपवे पर्यंत शेजारची माऊली आपल्याही भांड्यांचा भाव टाव ठरवून आपली भांडी पण आणायची .. अनायसे शेगडी पेटली असल्याने त्यालाही हा व्यवहार परवडायचा .. आणि आपले अंगण खराब न करता आपली भांडी होताहेत, म्हणून शेजारची माऊली मनोमन आनंदायची…
मग सर्व काम झाले की तो कल्हई वाला आपले चंबू गबाळे आवरून पुढील घरांकडे निघून जाई… मग आमचे काम सुरू होई..
तो गेला की त्या जागी सांडलेले, उडालेले, कथिलाचे थंड झालेले थेंबं, छर्याच्या स्वरूपात पडलेले आम्ही गोळा करीत असू.. ज्याच्या जवळ जास्त छर्रे तो मोठा.. खरं तर आम्ही हे कां करत असू.. त्याचा काय उपयोग होतां हे आम्हालाही कधी कळलं नव्हतं..
होयं ना?
मोहन वराडपांडे
नागपूर
9422865897
hared by Shishir Lokhande 90281 11422