कालौघात झालेले बदल..५ टेलिफोन मोहन वराडपांडे
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल..५
टेलिफोन
आज आपण मोबाईल, स्मार्ट फोन, समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांजवळ पाहतो.. त्याचं काहीच अप्रूप आपल्याला वाटत नाही.. आता तर अगदी लहानगे, के.जी. वन आणि के.जी. टु ची बाळं आॅनलाईन शाळेत असतात..
पण थोडा आधीचा काळ आठवा.. साधा लॅन्ड लाईन पूर्ण वस्तीत मोजक्याच घरी असे.. लॅन्डलाईन मिळण्यासाठी भली मोठी वेटिंग लिस्ट असायची..फोन घरी असणं असामान्य होतं.. तो फोन घरी असणारा, म्हणजे समाजातील सर्वात प्रतिष्ठित व्यक्ती..
त्या फोन ला एक गोल चक्री.. त्यात शून्य ते नऊ आकडे.. एक एक क्रमांक गोल फिरवायचा.. जिथे अडेल, तिथे सोडून द्यायचा… अशी व्यवस्था ..
त्याचा फोन जवळ एक पैशाची पेटी ठेवलेली असे. बाजूलाच एक बोर्ड.. “काॅलचे पैसे या पेटीत टाकावे” अशी आॅर्डर वजा सूचना त्यावर लिहिलेली असे..
त्यांचे परवानगीने आपण फोन काॅल करायचा.. तो ही हळू आवाजात.. त्यांना डिस्टर्ब होणार नाही अशा आवाजत .. मोजके पैसे सोबत न्यायचे व त्या पेटीत टाकायचे..
त्याकाळी फोन करणार्याकडे आणि फोन घेणाऱ्याकडे .. दोघांकडेही फोन नसायचे.. दोघेही बिनधास्त पणे, ज्या शेजारच्या घरी फोन असेल, त्यांचा नंबर एकमेकांना द्यायचे …
आपला फोन शेजारी आला की, त्यांच्या घरचं लहान पोरगं निरोप द्यायला आपल्या घरी येई.. मग आपण त्याच्या घरी जाऊन काॅल घ्यायचा.. असा मजेदार प्रकार होता.. या व्यवहारात एक मोकळेपणा होता.. आपल्या कडे फोन नसतांना शेजारच्या घरातील फोन नंबर दुसर्याला देण्याची दोघांनाही अजिबात लाज वाटत नव्हती किंवा कमीपणा वाटत नव्हता..
ट्रंककाॅल हे एक आणखी वेगळेच प्रकरण त्यावेळी होते.. बाहेर गावातील आपल्या नात्यातील व्यक्तीच्या शेजाराचा नंबर आपल्याकडे राही.. मग पोस्ट आॅफीसच्या ट्रंककॉल लाऊन देणाऱ्या व्यक्तीला आपण तो नंबर द्यायचा.. तो त्या नंबर वर फोन करुन आपल्या हाती रिसिव्हर द्यायचा.. फोनवर बोलत असतांना तिन मिनिटे पूर्ण झाली, की आॅपरेटर बाईचा लाईव्ह आवाज येणार.. “काॅल पुरा हो गया है.. बढाना है क्या?” आपण “हां हां बढा दो” असे म्हटल्यावर ती बाई शांत बसणार पुढील तीन मिनिटांसाठी.. बोलणे पूर्ण होईपर्यंत ती आॅपरेटर बाई असे दर तीन तीन मिनिटांनी आपल्याला मध्येच टोकत राही.. आणि तो पर्यंत आपल्या मागचा ट्रंककॉल बुक करणारा आपल्याकडे रागाने “खाऊ की गिळु” या आविर्भावात बघत राही.. आपण फोन ठेवल्यावर त्याला हायसे वाटे..
त्याचा काॅल कनेक्ट करुन दिला की तो पोस्टातला इसम आपल्या काॅलचा हिशेब करुन आपल्याला पैसे मागे…
कधी कधी आपल्या आधी दोन चार जणं रांगेत असले तर, आपल्याला तासभर प्रतिक्षा करावी लागे..
त्यावेळी बाहेर गावी ट्रंककॉल बुक करुन बोलणं एक दिव्य होतं.
मग कालांतराने प्रत्येक गावाला स्वतंत्र एस्. टी.डी. कोड देण्यात आले.. त्यामुळे पोस्टात जाऊन ट्रंक-कॉल बुकिंग ची झंझट संपली.. पण सर्वांकडे फोन नाही ना? त्याचे काय?
मग जागोजागी पि.सी. ओ. (पब्लिक काॅल सेंटर्स्) उघडले.. बेरोजगारांना तो एक चांगला व्यवसाय मिळाला… त्याच्या कडे फोनवर बोलण्यासाठी केबिन्स् होत्या.. एक केबिन, एस्. टी. डी. साठी..म्हणजे देशांतर्गत .. आणि दुसरी आय. एस्. डी. म्हणजे विदेशात बोलण्यासाठी …
तिथेही मग रांगा लागायच्या.. डिजिटल मीटर होतं.. आपण किती रुपयांचं बोलतोयं .. हे कळायचं आपल्याला…
टेलिफोन डिपार्टमेंट कडून एक डिरेक्टरी मिळायची.. त्यात अल्फाबेटीकल आॅर्डर ने फोन धारकांची नावे व नंबर .. अतिशय बारीक अक्षरांत… खूप वयस्क माणसं तासन् तास ती डिरेक्टरीच पहात बसायचे.. आणि यांत जोशी जास्त आहेत की कुलकर्णी? पाटील जास्त आहेत देशपांडे? याचा शोध घ्यायचे म्हणे ते..
शिवाय प्रत्येकाचे घरी त्याची स्वतंत्र फोन ची डायरी.. घरोघरी फोन आल्यावर तर ती तर फारच महत्वाची.. ती वेळेवर सापडली नाही, तर आपण दिव्यांगच..
फोन वाल्यांची नावे नंबर जपून ठेवणारी..
जसं गॅस शेगडीजवळच लायटर.. देवघरातच पोथी.. अगदी तस्संच फोन जवळ डायरी…
पण त्या डायरीचे काम माणसांना जास्त आणि बायकांना कमी पडे .. कारण बायकांची स्मरणशक्ती दांडगी… अगदी तीस चाळीस वर्षांपूर्वीचा प्रसंग त्यांना तपशिलासह आठवतो.. कोणत्या वाढदिवसाला नवरोबाने आपल्याला साडी घेतली नव्हती, हे त्यांना बरोब्बर आठवते .. आपल्या अंगातला शर्ट आपण केव्हा घेतला.. घेतला की कोणी गिफ्ट दिला हे तिलाच आठवते.. कपाटातील दोनशे साड्यांचा इतिहास तोंड पाठ असतो.. केव्हा घेतली, प्रसंग कोणता, कोणी दिली, कोणत्या प्रसंगी..तुम्ही चॅलेंज करूच शकत नाही .. ती त्यांना गाॅड गिफ्टच आहे, म्हणा ना..
तर मुद्दा हा की, आवश्यक फोन नंबर तिला पाठच राहायचे .. सहसा डायरी पहावी लागत नव्हती तिला… तिला नाव आठवलं,की फोन नंबर क्रमांक पटकन् यायचे तिच्या ओठावर… नवरा एखादा नंबर डायरीतून शोधेपर्यंत तिचे दोन काॅल होऊन जात असत… आणि नवरोबाला कष्टाने नंबर सापडला, तर नेमक्या शेवटच्या दोन क्रमांक, केव्हा तरी पाण्याचा थेंब पडल्याने वाचता येत नसतात .. तेव्हा त्याचा वैताग पाहून “अहो हां कां नंबर? मला पाठ आहे घ्या”… त्यावेळी साक्षात भंगवंताचे दर्शन झाल्याचे भाव जसे भक्ताचे चेहर्यावरुन ओसंडून वहात असतात.. तसेच भाव नवरोबाच्या चेहर्यावर असायचे..
आता आहे का कोणाकडे ती डायरी? सांगा बरं?
आता काय? किती सोप्पं झालयं ना सगळं? कोणाचे नंबर लिहून ठेवायची झंझट नाही.. ना डिरेक्टरी बाळगायची…
आता मोबाईल वाजला की करणाऱ्याचं नाव लिहून येतं… ज्याला करायचा, त्याचं नाव टाईप केलं की लागला फोन..
खरचं सोप्पी झालयं ना सगळं?
काही महाभाग तर आता मी असे पाहिले, की त्यांना स्वतः चाच मोबाईल नंबर पाठ नसतो.. आपण मागितला, तर म्हणतात, तुमचा सांगा, मी रिंग देतो, घ्या सेव्ह करुन.
आता जास्त डोक लावावचं लागत नाही.
होय ना?
मोहन वराडपांडे
9422865897
Shared by Shishir Lokhande 90281 11422