दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

मंजिरी …. ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशनच्या , सारेगम ग्रुप ची मेंबर मधुर कुलकर्णी ह्यांची अत्यंत छान कथा

★★मंजिरी★★

सरिताच्या फोटोकडे अनघा टक लावून बघत होती. कुणाचा तरी खांद्यावर हात पडला म्हणून तिने वळून बघितलं. सुमामावशी होत्या!
“अनघा, आम्ही आता निघतो. थोडं लवकर निघालो की मग स्टेशनवर वेळेत पोहोचू. हल्ली पुण्यात ट्रॅफिक किती असतो ग.”
“मावशी,तुम्ही पंधरा दिवस राहिला,मला खूप बरं वाटलं. आता आई नसल्या तरी अधूनमधून येत जा.” अनघाला दाटून आलं.
“मी येणारच ग बाळा! पण तू तुझी काळजी घे. तू अशी सारखी रडलीस तर सरिताच्या आत्म्याला त्रास होईल.”

मावशी नागपूला परतल्या आणि अनघाला घर खायला उठलं. तिची चार दिवस असलेली रजा तिने अजून वाढवून घेतली. दोन दिवस जळगावच्या घरात जाऊन प्रत्येक वस्तूला सरिताचा झालेला स्पर्श तिला मनात साठवून घ्यायचा होता.
“मनीष,बाबांना सोडायला आपण जळगावला जातोच आहे तर मी दोन दिवस तिथे राहायचा विचार करते आहे.”
“बाबांना इथेच रहा म्हणून मी आग्रह करतोय पण त्यांना जळगावला परत जायचं आहे.” मनिषच्या मनातली खंत बाहेर पडली.
“त्यांना थोडा वेळ देऊ. इतकी वर्ष आईंबरोबर त्यांनी त्या घरात व्यतीत केले आहेत. आठवणी इतक्या सहजासहजी पुसल्या जातात का? काही दिवसांनी त्यांना पुण्यात घेऊन येऊ. कमलताईंना मी आता दिवसभर बाबांची काळजी घेण्यासाठी ठेऊन घेणार आहे. आणि बाबांची तब्येत तशी चांगली आहे.”

वीस वर्षांपूर्वी अनघाने ह्या घरात सून म्हणून प्रवेश केला होता. डोळ्यात पाणी आलं. एका अश्रूची एक आठवण येताना,अनेक आठवणींचा महापूर आला पण आता सरिता तिच्या पाठीवरून हात फिरवायला नव्हती.
………

अंगावर जड शालू,दागिन्यांचे वजन,माहेरची आठवण हे सगळं घेऊन अनघा मागच्या अंगणात तुळशीला नमस्कार करायला आली. तिने हात जोडले आणि बंद डोळ्यातून धारा वाहायला लागल्या.
“अनघा”…
अनघाने वळून बघितलं. सरिता तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. ती डोळे पुसायला लागली.
“अग मनसोक्त रडून घे. वाहू दे ते पाणी! त्यातूनच तर तुझ्या माहेरच्या आठवणी कमी होतील. रडावंस वाटलं तर खुशाल रडावं माणसाने. मोकळं होतो आपण! आता तू मला आईसारखं समज,असं काही मी बोलणार नाही,कारण आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण आपण दोघी मैत्रिणी तर नक्कीच होऊ शकतो. एकमेकींच्या सुखदुःखाच्या वाटेकरी!”
“आई!”…अनघाने सरिताचा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला.

त्या दिवसानंतर अनघाचं आणि सरिताचं चांगलंच मेतकूट जमलं. एक अनोखं नातं निर्माण झालं. जळगावचं वडिलोपार्जित मोठं घर! घरात मनीष,सासू-सासरे आणि सरिताची अविवाहित मोठी नणंद असे राहत होते. लग्नानंतर दोनच दिवसात अनघाला आत्यांच्या स्वभावाची कल्पना आली.
“आई,मी ह्या घरात अगदीच नवखी आहे,पण आत्या तुम्हाला सतत घालून पाडून बोलतात,ते मला अजिबात आवडत नाही. तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत म्हणून काहीही बोलावं?”
“अनघा,मी नवीन लग्न होऊन आले तेव्हा तुझ्याचसारखी चिडले होते. माझ्या चिडण्याने हे वन्सना बोलले. घरात तंटा झाला. सासूबाईंनी माझ्याशी अबोला धरला. एक दिवस खोलीचे दार बंद करून खूप रडले. सगळं मन मोकळं करून टाकलं आणि ठरवलं की आयुष्यात आनंद घ्यायचा असेल तर डोक्यावर बर्फ ठेवूनच रहायचं. खूप त्रास झाला सुरवातीला! पण एकदा ठरवलं ते पार पाडायचं होतं. कधीतरी मन अस्वस्थ झालं की तुळशीवृंदावनाजवळ येऊन शांतपणे उभं राहायची. आता तुम्ही मुली पैशाने,विचाराने स्वतंत्र झाला आहात. आमच्याइतक्या मनाने हळव्या नसता पण शेवटी स्त्रीचं मन हळुवारच असतं ग! कुठेतरी टोचणी लागतेच. तो क्षण बाजूला सारायला कष्ट पडतात पण त्यातून बाहेर पडावंच लागतं कारण संसार नेटका करायचा असतो.”
“ते सगळं ठीक आहे आई! पण स्त्रीला तिची मतं, इच्छा,आवडीनिवडी नसतात का? सतत दुसऱ्यांचाच विचार करून जगायचं का? परदेशातल्या स्त्रिया स्वतःसाठी जगतात आई! त्यांना हवं तेच करतात.” अनघा त्वेषाने बोलली.
“अगदी मान्य ग! स्त्रीला इच्छा,आवडीनिवडी असतातच ना. त्या सुद्धा काही प्रमाणात जपायच्याच ग! आणि परदेशात किती लग्न टिकतात?”
अनघाने वाद वाढवला नाही कारण तिच्या मनात सासूबद्दल खूप आदर होता. आठ दिवसांनी अनघा-मनीष पुण्यात परतले. दोघांचेही घर,नोकरी रुटीन सुरू झाले.

अनघा-मनीषचं लग्न होऊन वर्ष होत आलं होतं. अधून मधून सरिता आणि अरुण पुण्यात मुक्काम करून येत असत. पण एका मुक्कामी दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं सरिताला जाणवलं. अनघाचं तिच्याशी बोलणं कमी झालं. घरात विचित्र अबोला पसरला होता. मनीष आणि अनघाचं वागणं यंत्रवत वाटत होतं. नवरा-बायकोत आपण पडणं योग्य नाही. कितीही वाद,भांडण झाली तरी रात्र त्यांचीच असते हा विचार करून सरिता काही बोलली नाही. पण अचानक एक दिवस ऑफिसमध्ये न जाता अनघाने बॅग भरली आणि ती सरिताला म्हणाली, “आई,मी जरा आईकडे जातेय. मला चेंज हवा आहे.”
“अगदी जरूर जा. आणि यायची घाई नको करू. तुझं मन भरेपर्यंत माहेरपण उपभोगून ये. मी आणि बाबा इथे आहोत तोपर्यंत मनीषच्या खाण्याची काळजी नाहीच पण तू जाणार हे मनीषला माहिती आहे न?”
“नाही,माझं आत्ता ठरलं आहे. तुम्ही त्याला सांगा.” अनघा रागात होती हे सरिताला कळलं.
“तू निर्धास्तपणे जा. त्याला मी सांगते.” सरिता तिच्या गालावर थोपटत म्हणाली.

मनीष ऑफिसमधून आल्यावर अनघा माहेरी गेली आहे हे त्याला कळलं आणि तो चिडला. “मला न सांगता अनघा गेली? एक फोन करू शकली असती ना?”
“मनीष,शांत हो! तिचंही मन अस्वस्थ दिसलं.”
“डोक्यात काहीतरी खूळ घेऊन बसायचं आणि अस्वस्थ व्हायचं.” मनीषचा राग उफाळला.
“मनीष,विचारायचा अधिकार आहे म्हणून विचारते. तुमच्या दोघांमध्ये काय बिनसलं आहे?”
“तिला बंगलोरला एका जॉबची ऑफर आली आहे. पगार दुप्पट आहे. तिला तो जॉब हवा आहे.”
“अरे,मग ही तर आनंदाची बातमी आहे. अगदी अवश्य जाऊ दे.”
“आई, बंगलोरला मी जाऊ शकणार नाही. चार पैसे कमी मिळाले तरी इथे किती सुख आहे,स्वतःचं घर आहे,तुम्ही अधूनमधून येता. तिकडे राहणं सोपं नाही.”
सरिता काही वेळ गप्प बसली. मग मनीषला म्हणाली,”एक प्रश्न विचारू मनीष?”
“विचार!”
“हा जॉब तुला मिळाला असता तर? तू स्वीकारला असताच ना? मग तिने का नाही? लग्न करताना तुम्हाला मुलगी करिअर करणारी हवी असते. संसारात तिची आर्थिक साथ हवी असते,मग असे प्रसंग आल्यावर तिला साथ द्यायची सोडून हा कसला विचार तुझा?”
“ती एकटी राहणार का तिकडे? मी नाही जाऊ शकत.”
“राहिल की! तिने विचार करूनच निर्णय घेतला असेल ना!”
“आई,खर्चही दुप्पट वाढेल. ह्या घराचे हफ्ते अजून फिटायचे आहेत. तिकडे ती भाड्याच्या घरात राहणार, त्याचा खर्च! पगार जास्त मिळूनही काय उपयोग? आणि दोघांनाही एकटं राहावं लागेल ते वेगळंच!”
“तू फक्त खर्चाचा हिशोब मांडलास. पण ह्या संधीमुळे,तिथल्या अनुभवामुळे कदाचित नंतर पुण्यात तिला याहून चांगला जॉब मिळू शकेल. आणि आता बाबांनी व्हीआरएस घेतली आहे. काही दिवस आम्ही दोघे बंगलोरला राहू,काही दिवस पुण्यात! तिला नाही म्हणू नकोस. जशी बायकोने नवऱ्याला साथ द्यावी ही अपेक्षा असते,तशीच नवऱ्याने देखील तिला द्यायलाच हवी. तिला अडवू नकोस. फोन कर,तिला प्रोत्साहन दे. आणि दोन दिवसांनी तिला घरी घेऊन ये.”

आईचं म्हणणं पटलं नव्हतं तरी पण मनीष अनघाला घरी घेऊन आला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सरिता भरून पावली. हुशार,गुणी सून मिळाली होती. तिच्या पाठीशी कायम राहायचं हे सरिताने ठरवून टाकलं.

वर्षभरातच अनघाला पुण्यात एका उत्तम जॉबची ऑफर आली. आनंदाचे क्षण वाढत होते. अनघाला जुळी मुलं झाली तेव्हा सरिता पुण्यात दोन वर्षे येऊन राहिली. सांभाळणारी बाई असली तरी घरात सरिता आहे म्हणून अनघा निर्धास्तपणे कामावर जाऊ शकत होती. अडीअडचणीला एकमेकींना साथ देत, दोघींमधलं नातं दृढ होत गेलं. मनीषच्या आत्याचं निधन झालं आणि अनघाने सरिताला पुण्याला यायचा आग्रह केला.
“आई,आता तुम्ही आणि बाबा पुण्यात या. इतके दिवस आत्यांची जबाबदारी होती म्हणून मी काही बोलले नाही.”
“अनघा,पुण्याचं घर सुद्धा आमचंच आहे,पण इथे बरं वाटतं ग,माझं भजनी मंडळ, मैत्रिणी ह्यात वेळ छान जातो. आणि तू हाक दिलीस की मी आलेच म्हणून समज.” सरिता हसत म्हणाली.
“ते तर तुम्ही कायमच धावून आलात आई पण मला तुमची थोडी तरी सेवा करू द्या. आईची माया दिली, आपल्या दोघींमध्ये कधी धुसफूस झाल्याचं मला तरी आठवत नाही आणि झाली असेल तर ती माझ्याचकडून!”
“मला मुलगी नाही ना,म्हणून तुझ्या रूपाने ती घरात आली.”
“आई,दिवाळीत आम्ही येतोय,तेव्हा तुम्हाला इकडे घेऊन येणार. आता मी तुमचं काहीही ऐकणार नाही.”

दिवाळीत अनघा-मनीष आले तर सरिता झोपूनच होती. सतत ताप येत होता. अनघाला ते बघून भरूनच आलं. दोघांनाही आता जळगावला ठेवायचं नाही हा निर्णय अनघा-मनीषने घेतला.

पुण्यात सरिताच्या टेस्ट झाल्या आणि अनघाची शंका खरी ठरली. शरीर पोखरणाऱ्या आजाराला सरिता बळी पडली होती. असाध्य, सगळ्या कुटुंबाला उध्वस्त करणारा आजार! एका हळव्या क्षणी अनघाचा बांध फुटला. ती सरिताजवळ बसून हमसून हमसून रडायला लागली.
सरिताने अनघाला जवळ घेतलं,”तुला माझी सेवा करायची होती ना! बघ आता, किती करावी लागते आहे.”
“आई,अशी सेवा मला नव्हती करायची. तुम्हाला आनंदात ठेवून तुमच्या उत्तर आयुष्यात तुम्हा दोघांना सुखात ठेवायचं होतं.” अनघाचे अश्रू थांबत नव्हते.
“मी सुखातच आहे. तुझ्यासारखी इतकी गुणी सून मला लाभली आहे,ह्यापेक्षा मोठं सुख ते कोणतं? आता तुला हळवं होऊन चालणार नाही. मोठी हो! तुलाच सगळ्यांना सांभाळून घायचं आहे. माझी एक इच्छा पूर्ण कर. जळगावच्या घरातली तुळस इतकी वर्षे कधीही कोमेजली नाही. मी लग्न होऊन त्या घरात आले तेव्हापासूनच ती माझ्या सुखदुःखाची साथीदार आहे. माझा आधार आहे. कृष्ण कसा हाक दिली की धावून येतो ना,तशीच ती माझ्यासाठी आहे. मला आत्मिक बळ, मानसिक समाधान देणारी! आणि तुळस म्हणजे कृष्णच ग! आत्ता सुद्धा मी कमलताईंना रोज पाणी घालायला सांगितलं आहे. ती तुळस इथे घेऊन ये. तुला कधीही माझी आठवण अनावर झाली की त्या तुळशीची मंजिरी डोळ्याला लाव. मी तुझ्याजवळ असेन.”
अनघा सरिताला घट्ट मिठी मारून मोकळी होत होती.

प्रयत्नांची पराकाष्ठा संपली आणि सरिताचं अस्तित्वही संपलं. अनघाने सगळ्यांना सावरलं कारण तिने सरिताला शब्द दिला होता.
………

अनघाने जळगावच्या घरात पाऊल ठेवलं. पाय धुवून ती तुळशीजवळ आली. आज तिला खूप रडायचं होतं. इतके दिवस मनीष,बाबा आणि मुलांना आधार देत,सावरत तिचं दुःख तिने बाजूला ठेवलं होतं. तिने हळूच मंजिरी तोडून डोळ्यांना लावली. एक पवित्र वलय तिच्याभोवती फिरतय हे तिला जाणवलं. पाठीवरून कोणीतरी हात फिरवत म्हणालं, “आहे मी! तुझ्याचजवळ, तुझ्या पाठीशी!”

अनघाने काही क्षण डोळे मिटून घेतले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तिचा आधार हरवला नव्हता. तिच्या पाठीशी होता……….

★समाप्त★

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}