दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कौतुकातून गवसणारे आनंद निधान: वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड, पुणे

कौतुकातून गवसणारे आनंद निधान:

जगात प्रत्येक मनुष्य स्वत:ला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे? याला कारण असे की, हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुस-या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत.

पण तरी देखील माणसाची आनंद शोधण्याची, मिळवण्याची उर्मी कधी कमी होत नाही.
जगामध्ये विविध लोक आपल्याला भेटत असतात. काही लोक असतात जे कायम आनंदी असतात आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवतात. तर काही लोकांना कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नसतो. काही जण आनंदी असण्याचा दिखावा करत असतात. आनंदी राहणं ही एक कला आहे, जी प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीत समाधान मानून आनंदी राहणाऱ्या माणसांना जगायला जास्त चांगलं बळ मिळतं. आजकाल आपल्या धावपळीच्या आयुष्यात आनंद मिळणंही कठीण झालं आहे. पण अशावेळी काही घटना, कौतुकाची वाक्य असतात जी आपल्याला आनंद देतात आणि जगायला बळंही देतात. कधी प्रचंड उकाड्यात आलेली पावसाची छोटीशी सरही आनंद देते तर कधी सकाळीच तुमच्या आवडीच्या माणसांकडून मिळणारी कॉम्प्लिमेंट आपला दिवस अप्रतिम करते. अचानक कधी बॉसने केलेली प्रशंसाही मनाला समाधान देऊन जाते किंवा अचानक तुमची सुट्टी बॉसने पास केली की, आनंद गगनात मावत नाही. कारण काहीही असो, आवश्यक आहे ते आनंदी राहाणं.

इंद्रियांच्या संवेदनांतून खूपसे आनंदाचे क्षण आपण अनुभवत असतो. जसे डोळ्यानी पाहिलेला रम्य निसर्ग, कलाकाराने साकारलेले एखादे सुंदर चित्र, शिल्प. यात आपल्याला मानसिक आनंद मिळतोच. तीच गोष्ट कानांनी ऐकलेले सुखद संगीत देखील आपल्याला हवाहवासा आनंद देते. मऊ मऊ सशाच्या अंगाचा स्पर्शाचा, थंडीतलं शेकोटी जवळचं उबदार शेकत बसणं यातील आनंद अनुभव वेगळाच आनंद देतं. अवीट चवीचा पदार्थ जिभेवर रेंगाळत ठेवून त्याचा आस्वाद घेत खाणं, केवळ लाजबाब आनंददायी. ताज्या फुलांचा सुगंध टवटवीत आनंद देतो. जरी हे सगळे आनंद क्षणिक असले तरी ते जगण्याला आवश्यक उर्जा देत असतात.

इंद्रियांकरवी मिळणारे आनंद सर्व काळी, सर्वांना मिळणे तसे कठीणच असते. त्याला परिस्थितीच्या, शारीरिक क्षमतेच्या मर्यादा असू शकतात. तेव्हा या व्यतिरिक्त माणसाला मानसिक आनंदाची जास्त आवश्यकता भासते. असा आनंद मिळण्याचा हमखास स्त्रोत म्हणजे कौतुक! कौतुकाला अगदी लहान बाळा पासून कितीही वय होईपर्यंत प्रत्येकजण हपापलेला असतो.

आपल्या कुठल्याही कृतीचे कौतुक झाले की आयुष्याला तात्पुरता का होईना सुखद आनंद देऊन जातो.
लहानपणी तर असे कौतुक आवश्यकच असते. मुलांना त्यातून आनंद तर मिळतोच, शिवाय त्यांच्या प्रगती साठी ऊर्जा मिळते. मला तर याच्या पुढे जाऊन असं वाटतं की जी मोठी माणसं कौतुक करतात त्यांना देखील आनंद मिळतो, कारण लहानांच्या प्रगती मध्ये आपलाही हातभार लागला. अर्थात लहान मुलांचे कौतुक करताना थोडे तारतम्य बाळगणे चांगले. जसं की हे कौतुक त्यांच्या डोक्यात जाणार नाही याची काळजी घेणे. कौतुक करताना कुणाशी तुलना केली तर मात्र एकाला आनंद देता देता दुसऱ्या कुणाचा आनंद हिरावून घेतला जाईल.
तसे पाहिले तर आयुष्यात सतत कौतुकाची जशी अपेक्षा असते तशी जरूरी पण असते. पण कौतुक कोण करतो आहे यावर आनंद मिळण्याचे प्रमाण अवलंबून असते. आपल्या जवळच्या माणसांनी केलेले कौतुक नक्की जास्त आनंद देऊन जाते. पण जसे वय वाढत जाते तसे आप्तेष्टांच्या जागी कौतुक करणारे जाणकार असावेत असे वाटायला लागते. म्हणून म्हणतात ना, गायक कलाकारांना पुण्यात मिळणारी “दाद” अतिशय महत्त्वाची वाटते. तसंच कौतुक, कृती करताना किंवा झाल्यावर लगेच मिळाले तर त्यातून मिळणारा आनंद फार अनमोल असतो. कलाकारांना नाटकात अभिनय करणे, टीव्ही-सिनेमात काम करण्यापेक्षा जास्त आवडते, कारण उत्स्फूर्त मिळणारा प्रतिसाद मनाला भावणारा, आनंददायी असतो. गायकांना संपूर्ण गाणं झाल्यावर मिळणाऱ्या टाळ्यांपेक्षा एखादी सुंदर “जागा” घेतल्यावर दर्दी श्रोत्याची दाद मन प्रसन्न करून जाते.
सच्च्या फलंदाजाला शतक ठोकल्यावर टाळ्या पडतात, पण नजाकत भरलेल्या कव्हर ड्राइव्ह वर मिळणारे “स्टॅंडिंग ओव्हेशन” आनंदाने भारावून टाकते. त्यामुळे कौतुक योग्य वेळी, योग्य जागी, योग्य प्रकारे आणि योग्यता असणाऱ्या व्यक्ती कडून, समूहाकडून झाले तर कौतुकांच्या आनंद लहरींचे रूपांतर आनंद निधानात होते. सगळ्यांना शाश्वत आनंद मिळवणे, मिळणे शक्य होत नाही. पण आयुष्यात येणाऱ्या असे अनेक आनंद तरंग शोधत गेले तर आयुष्य जगणे सुलभ होते, आनंदमय होते.

काही वेळा अनपेक्षित वेळी, अनपेक्षित जागी, अनपेक्षित व्यक्तीकडून होणारे कौतुक मनाला क्षणिक का होईना भरभरून आनंद नक्की देऊन जाते. यावरून, आत्मस्तूतीचा दोष पत्करून, एक छोटासा अनुभव सांगावासा वाटतो. एकदा मी पत्नीसह पुण्यात रिक्षाने कुठे तरी जात होतो. रिक्षा चालकाने मला बसताना काही वेगळ्या नजरेने पाहिले. पण मी स्वतः एक ज्येष्ठ नागरिक असल्याने फारसे लक्ष दिले नाही. थोडे पुढे गेल्यावर सिग्नलला थांबलो असताना रिक्षा चालक मला म्हणाला, काका तुमचे डोळे फारच सुंदर आहेत, उतरल्यावर तुमच्या बरोबर मला एक फोटो काढायचा आहे. मग माझ्या पत्नीला देखील त्याने विचारले, हो की नाही काकू? सांगायचा मुद्दा म्हणजे या वयात देखील हे कौतुक मोठा आनंद देऊन गेले, हे मात्र कबूल करायला पाहिजे.

पण कधी कधी कौतुक करता करता काही वेळा त्याचे रूपांतर फिरकी घेण्यासाठी किंवा खुशमस्करी करण्यासाठी केले जाते. जर ह्या गोष्टीचे भान ठेवता आले तर मग न रागावता त्यातील कौतुकाचा भाग तेव्हढा लक्षात घेऊन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणे हिताचे असते. ज्याचे कौतुक केले जाते त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कौतुक करणाऱ्याला देखील बराच आनंद मिळतो. कौतुक झालेली व्यक्ती आनंदी होवून दुसऱ्या व्यक्तीचे मनोमन आभार मानते आणि भले चिंतीत असते.
तेव्हा कुठेही, कधीही, कोणाचेही मनापासून छोट्या मोठ्या कृतीचे, कौशल्याचे योग्य वेळी, योग्य प्रकारे कौतुक केल्याने सर्वांना सहज गवसते, आनंद निधान!!

वासुदेव स. पटवर्धन, कोथरूड, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}