कालौघात झालेले बदल….९ फोटोग्राफी टेक्नॉलॉजी मोहन वराडपांडे
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897.
——————
कालौघात झालेले बदल….९
फोटोग्राफी टेक्नॉलॉजी
फोटोग्राफी टेक्नॉलॉजीचेही असंच आहे.. आज किती सोप्पी झालयं सगळं.. स्टुडिओ मध्ये गेलो, तर तो दहा मिनिटांत सोळा फोटो प्रती देतो, पासपोर्ट साईज.. ते ही अगदी नगण्य मोबदल्यात .. कशाला.. तुम्ही तुमच्या मोबाईल ने फोटो काढा, आणि घरच्याच कलर प्रिंटर वर घ्या प्रिंट आऊट … अगदी क्षणात .. याचं काहीच अप्रूप वाटत नाही आता आपल्याला..
पण हा चेंज.. ही प्रगती आता आताचीच तर आहे.. आमचं लग्न झालं १९८३ साली.. त्यावेळी ब्लॅक अँन्ड व्हाईटच फोटो होते.. त्यावेळी कॅमेराचा रोल मिळायचा.. आधी विसचा नंतर नंतर छत्तीस फोटोंचा..
आणि या रोलमधील सर्व फोटो काढल्याशिवाय तो रोल धुवायला स्टुडिओत टाकता येत नसे.. स्टुडिओ वाला तो रोल धुवून आपल्याला निगेटिव्ह ची पुंगळी द्यायचा.. त्या निगेटिव्ह ला उजेडात धरून आपण ठरवायचं की कोणकोणते फोटो डेव्हलप करायचे ते….कारण कधी कधी लेन्स् वरील कॅप न काढल्याने किंवा अती ब्राईटनेसने, काही फोटो पूर्ण काळेच यायचे..
मग आला कलरचा जमाना.. लगेच आला.. मला वाटतं १९८४- ८५ मध्येच.. त्याची आणखी वेगळीच गंमत.. तो कलर रोल धुण्याची व्यवस्था नागपूरला नव्हतीच.. रोल जायचे मुंबई ला धुवायला.. आठ पंधरा दिवसांनी यायचा धुऊन .. मग प्रिंट आऊट नागपूरला.. बसा त्याची वाट पहात … कालांतराने ती सोय मग नागपूर ला ही झाली..
लग्नानंतर आम्ही मुंबई गोवा ला गेलो होतो.. तिथे पिकनिक स्पाॅटस् वर “त्यावेळचे आधुनिक कॅमेरे” घेऊन फोटोग्राफर व्यवसाय करीत.. ईन्स्टंट फोटो.. त्याचा कॅमेरा भला मोठा… आपण पोज दिली, त्याने क्लिक केले, की कुर्रर्र आवाज करत, त्या कॅमेराच्या खालूनच फोटो बाहेर .. चांगला जाड फोटो.. समोरुन कलर फोटो, मागून काळाशार.. मागून त्याला निगेटिव्ह चिटकलेली.. माझ्या संग्रही आहेत अजून ते फोटो…
सतत वर्षानुवर्षे ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो पहाण्याची सवय असणाऱ्या आपल्या नजरेला ते कलर फोटो खूपच आनंददायी वाटत असे..
आताही कुठे बाहेर फिरायला गेलो, की दिसतात तिथे फोटोग्राफर.. विनवण्या करतात ग्राहकांच्या.. दहा मिनिटांत देतो फोटो म्हणून .. पण लोकं मात्र त्यांचेकडे सर्रास दुर्लक्ष करुन आपापल्या मोबाईल मध्ये फोटो काढण्यात दंग असतात.. बरं.. नुसते फोटो काढून थांबत नाहीत, तर क्षणात ते व्हाॅटस् अॅपवर पोहचतात आपापल्या जिवलगांकडे.. केव्हढी प्रगती.. केव्हढा हा बदल.. अगदी जादूच वाटावी अशी…
आपली पिढी आजही कधी कधी जुने अल्बम पाहते.. त्या स्मृती जागृत होतात .. आपली मुलं तर सर्व फोटो गुगल कां क्लाऊड नामक व्हर्च्युअल अल्बम मध्ये साठवते .. एव्हढेच नव्हे.. तर आजच्याच तारखेला पांच वर्षापूर्वी आपण कुठे होतो, त्या क्षणाचा फोटो क्षणात शेयर करते..
ज्यांनी जुन्या ब्लॅक अँन्ड व्हाईटच्या कॅमेरा ने, रोल वाले फोटो बाहेर गावी काढले, आणि नागपूर ला आल्यावर तो रोल धूऊन डेव्हलप करुन मग फोटो सावकाशपणे पाहिले, त्यांना आजच्या या गतीमान युगात, ही स्तंभित करणारी तंत्रज्ञानाची झेप बघून अचंबित व्हायला होतं..
होय ना?
मोहन वराडपांडे
9422865897.