कालौघात झालेले बदल… १० टुरिंग टाॅकिज– मोहन वराडपांडे
©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————
कालौघात झालेले बदल… १०
टुरिंग टाॅकिज
आज आपण घरोघरी स्मार्ट टि.व्ही. वर, हवा तो सिनेमा पाहू शकतो.. एव्हढेच कशाला, नेटवर्क स्ट्राॅन्ग असेल, तर आपल्या मोबाईल वरही पाहू शकतो..
पण पूर्वी सिनेमा, टाॅकिज मध्येच जाऊन पहावा लागे.. आजही मल्टिप्लेक्स् मधील छोट्याश्या टुमदार टाॅकिज मध्ये सिनेमा पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही.
पण पूर्वी सिनेमाच्या मोजक्याच प्रती तयार करित असत.. त्यामुळे ज्या गावाचे प्रोड्यूसर, त्या गावी आधी सिनेमा प्रदर्शित होई.. म्हणून आपल्या विदर्भात तरी, नवीन सिनेमा आधी अमरावती ला सुरु होई .. अमरावतीकरांचे मन भरले, की मग तो सिनेमा नागपूर ला येई.. असे करत करत ग्रामीण भागापर्यंत तो सिनेमा पोहचायला वर्षे लागायची.
आता तसे नाही.. तंत्रज्ञानाचे अफाट प्रगतीने एका सिनेमाच्या शेकडो प्रती एकाच वेळी तयार होतात .. म्हणून संपूर्ण देशात एकाच वेळी तो सिनेमा प्रदर्शित होतो..
मी १९७८ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा या तालुक्याच्या लहानशा गावात नोकरीला लागलो.. तिथे टुरिंग टाॅकिज होते.. जे टाॅकिज कधी कधी वेगवेगळ्या जागी हलविता येते, ते टुरिंग टाॅकिज..
त्याची मजा काही औरच.. तिथे आज रात्री चा शो असेल, तर दिवसभर त्याची जाहिरात करणारा हातठेला, सिनेमाचे पोस्टर लाऊन गावात फिरायचा.. सोबत जाहिरात करणारे एक दोन बारके मुलं.. हातात एक भोंगा.. नुसताच रिकामा भोंगा.. त्याला तोंड लाऊन त्यांची जाहिरात सुरु…”हुर्रर्रर्र.. श्रीगोंदेकर सिने रसिकांनो.. ऐका हो ऐका.” अशी त्याची सुरवात.. मग सिनेमाचे नाव.. मग काम करणारे कलाकार, असे म्हणून तो सर्वच प्रसिद्ध सिने कलाकारांची नावे घ्यायचा.. प्रत्यक्षात त्यातला एकही कलाकार त्या सिनेमात नसायचा.. भलतेच असायचे..
पाऊस आत येऊ नये म्हणून वर ताडपत्री .. बाजूने कापडी कनात .. मधोमध पडदा.. पडद्याच्या मागे महिला विभाग आणि समोर पुरूष विभाग..
स्वाभाविक पणे महिलांना उलट्या बाजूने सिनेमा दिसे.. म्हणजे सर्व टायटल्स् आरश्यात पाहिल्यासारखे उलटे.. डाव्या हाताने केलेली फायटिंग.. हिरोईन्स् चे पदर उलट्या खांद्यावर.. असा प्रकार.. पण याला इलाज नसल्याने, याबाबत, त्या महिलांची काहीच तक्रार नसे.. त्यातही त्या आनंद शोधित ..
सर्व प्रेक्षक वर्ग जमिनीवर बसे.. पुरुषांचे मागे निवडक दोन बाकाडे .. खास प्रतिष्ठितांकरिता..(त्यात त्यावेळी आमचीही गणना होत असे.😄)
तेव्हा तो सिनेमा जितक्या रिळांचा .. तितके इंटरव्हल्स्.. बावीस रिळं असतील, तर एकवीस इंटरव्हल्स्… प्रत्येक वेळी लाईट लागणार.. मग तो आॅपरेटर ते रिळ पुन्हा रिवाईंड करुन, डब्ब्यात भरणार.. मग पुढील रिळ प्रोजेक्टरवर चढवून लाईट बंद करुन पुढील सिनेमा सुरु.. कारण एकच प्रोजेक्टर.. (शहरात मात्र दोन प्रोजेक्टर असल्याने प्रेक्षकांना कंटिन्यूटी जाणवायची.)
त्या रिळांच्या डब्ब्यांवर क्रमांक टाकलेले असत.. त्या प्रमाणे तो क्रमांकाने रिळ चढवत असे प्रोजेक्टर वर…
पण कधी कधी एखादे अठरा नंबरचे रिळ चुकीने पांच नंबर च्या डब्ब्यात भरलेले असे.. आॅपरेटर बदलल्याने त्याला माहित नसे.. तो डब्ब्यावरील क्रमांक पाहून रिळं चढवी ..
त्यामुळे पाचव्या इंटरव्हल् नंतर हिरोशी फायटिंग करुन व्हिलन मरुन जाई.. द एन्ड .. आणि पुढील भागात तो हिरोईन ला पळवून नेई… व हिरो त्याचा पाठलाग करे.. काही कळेच ना.. अरे? आत्ता तर व्हिलन मेला होता ना? मग पुन्हा कसा आला? पण त्या प्रेक्षक वर्गाची या बाबतही काहीच तक्रार नसे..
त्यांचा सारा ईंट्रेस्ट सिनेमातील गाण्यांमध्ये.. गाण्यांचे मोठे शौकीन .. सिनेमातील संवाद सुरु असतील तर इतका कलकलाट की आपल्याला काही नीट ऐकुच येणार नाही.. पण मात्र गाणं सुरु झालं की एकदम पिन् ड्राॅप सायलेन्स्.. एकदम तल्लीन…
अशी मजा असायची या टुरिंग टाॅकिज ची…
अशी मज्जा तुमच्या मल्टिप्लेक्स् थियेटरमध्ये तर कध्धीच येणार नाही.
होय ना?
मोहन वराडपांडे.
9522865897.