दिवाळी अंकांची कुळकथा –व्हाट्स अँप वरून साभार शेअर
दिवाळी अंकांची कुळकथा
मराठी माणसाला दिवाळी अंक हाती पडल्याशिवाय दिवाळीचा सण साजरा झाला असे वाटतच नाही. अंगणात रंगीत रांगोळी आणि घरात स्वहस्ते विणलेल्या टेबलक्लॉथवर वसंत, मनोहर, हंस, किस्त्रीम यासारख्या सुंदर मुखपृष्ठांचे दिवाळी अंक, हा काही वर्षांपूर्वीचा मराठी घरातला माहोल आजही कायम आहे. फक्त स्वहस्ते भरतकाम केलेला टेबलक्लॉथने आता टेबलाची साथ सोडली आहे. पण आजही दिवाळी अंक म्हणजे जणू दर दिवाळीला घरी येणारा जिवलग नातेवाईकच. सध्या त्याचे रूप, स्वरूप आणि माध्यम बदलले असले तरी मराठी मनात त्याचे स्थान अजूनही अबाधित असे आहे. ग्रंथालयात येणारा वाचक वर्षभर निरनिराळी पुस्तके वाचीत असतोच पण दिवाळीत दिवाळी अंक घरी नेल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.
या दिवाळी अंकाचा इतिहास मोठा रंजक आहे. कोणा काशिनाथ रघुनाथ मित्र या इसमाने १८९५ साली मुंबईत ‘मनोरंजन’ नावाचे मासिक सुरु केले. मराठी साहित्याची ओढ असलेल्या या मित्र यांचे खरे आडनाव आजगावकर. सावंतवाडीत शिक्षकी करणाऱ्या आजगावकरांनी आपली साहित्याची आवड जोपासण्यासाठी एकेका साहित्य नगरीचा मागोवा घेत शेवटी मुंबई गाठली. तेही सतत आठ दिवस पायी चालत. पण तेथे पोचल्यावर लगेच पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. म्हणून मग त्यांनी काही दिवस पोस्टात लोकांना पत्रे, मनीऑर्डरी लिहून देणे, असे लिखाण काम केले. त्तेथे या आजगावकारांना ‘मित्र’ आडनावाचा एक बंगाली माणूस त्यांना भेटला. त्याने आजगावकरांना बंगाली शिकवले व अवघ्या दोन वर्षात आजगावकरांनी बंगाली साहित्याचे मराठी अनुवाद करून साहित्य सेवा सुरु केली. याच दरम्यान मित्र यांना लंडनहून पार्सलने आलेला ‘जॉय ऑफ लंडन’ नावाचा क्रिसमस विशेषांक आजगावकरांना पाहायला मिळाला. आणि यावरूनच त्यांना मराठी दिवाळी अंक काढायची कल्पना सुचली. मग १९०९ साली मराठी साहित्यातला ‘मनोरंजन’ नावाचा पहिला दिवाळी अंक जन्मास आला. याबद्दलची गुरुदक्षिणा म्हणून आजगावकरांनी मित्र हे आडनाव धारण केले. तेव्हापासून ते काशिनाथ रघुनाथ मित्र या नावाने ओळखले जाऊ लागले. अशा या मनोरंजनच्या पहिल्या दिवाळी अंकाची किंमत एक रुपया होती.
१९२ पानांच्या या पहिल्या अंकात त्या काळच्या पुरोगामी स्त्री लेखिकांना मोठे स्थान मिळाले हे विशेष. सौ काशीबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक, चिमणाबाईसाहेब गायकवाड या समाज सुधारक स्त्रियांनी या दिवाळी अंकातून स्त्री शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले होते. पुढे ललित वाड.मयाच्या बरोबरीने या दिवाळी अंकाने शास्त्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आशयाचे लिखाण समाविष्ट केल्याने ते लोकप्रिय होत गेले. “ओवाळणि घाली भाई” ही बालकवींची पहिली कविता याच अंकात प्रथम प्रकाशित झाली होती.
मनोरंजनची लोकप्रियता पाहून मराठी भाषेतील अनेक नियतकालिकांनी आणि मासिकांनी दिवाळी अंक काढण्यास सुरुवात केली. त्यामध्ये सुप्रसिद्ध लेखकांच्या कथा, कविता, वैचारिक लेख, व्यंगचित्रे या बरोबरच देश विदेशातील कला-क्रीडा, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट आणि नाटकांचे समीक्षण इत्यादी गोष्टी साहित्यमूल्य घेऊन अवतरल्या. कालांतराने मराठी वाड.मयाच्या क्षेत्रात ‘दिवाळी अंक’ हा एक स्वतंत्र साहित्यप्रकार म्हणून उदयास आला. यात पुढे वैचारिक निबंध, मुलाखती, प्रवास वर्णने, आत्मचरित्र लघुकादंबरी, एकांकिका इत्यादी साहित्याची भर पडली. दिवाळी अंकानी मराठी साहित्य क्षेत्राला मोलाचे योगदान दिले आहे. अनेक नामवंत लेखक, कवी, साहित्यिक प्रारंभी नवोदित म्हणून दिवाळी अंकातूनच पुढे आले. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले महाराष्ट्राचे थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचे ‘वीज म्हणाली धरतीला’ या सुप्रसिद्ध नाटकाचे बीजारोपण देखील दिवाळी अंकातून झालेले आहे.
अशाप्रकारे अनेक प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी वाचण्याचा आनंद दिवाळी अंक देतात. दिवाळीच्या पर्वात तर दिवाळी अंकांचे वाचन तर आहेच, पण ते नुसते चाळणेही खूप आनंददायी आहे. कुटुंबातल्या सगळ्यांचे वाचन होता होता ते लवकरच ते जुने होतात. पण हे जुने अंक वाचण्यातही एक नवा आनंद मिळतो.
मराठीत दरवर्षी सुमारे पाचशे दिवाळी अंक निघतात. दिवाळी अंकांच्या परंपरेत १९२१ ते १९६० आणि १९६१ ते १९८० हा सुवर्णकाळ म्हणावा लागेल. या काळात कर्मयोगी, किर्लोस्कर, मुलांचे मासिक, स्त्री, मनोहर, सत्यकथा, वाड.मय शोभा, रम्यकथा इत्यादी दिवाळी अंक घरोघरी दिसू लागले. नंतरच्या काळात मौज, विशाखा, रसिक, निहार, अमृत, प्रपंच, मेनका, माहेर, धनंजय, आवाज, विश्रांती, गृहशोभिका, इत्यादी अंकही लोकप्रिय झाले. आता तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स लोकमत, तरुण भारत, सकाळ या नामांकित वर्तमानपत्रांचे दिवाळी अंक नियमित निघतात.
सांप्रत नवशतकात अनेक गोष्टी बदलल्या. अर्थकारण, राजकारण, समाजकारण बदलले आहे. त्या अनुषंगाने आपली जीवनशैली, मुल्ये आणि भाषा यामध्येही उलथापालथ झालेली आहे; संगणकयुग आले आहे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम स्वाभाविकपणे दिवाळी अंकांच्या अंतरंगात आणि बाह्यरंगातही झाला आहे. छापील दिवाळी अंक आता डिजिटल झाले आहेत. नवीन पिढी ते मोबाईलवर वाचते तर जुनी पिढी अजूनही दिवाळी अंक हातात धरून वाचण्याचा आनंद घेत आहे. परदेशात वास्तव्य असलेले अनिवासी भारतीयही मोठ्या आवडीने दिवाळी अंक वाचतात. काही साहित्यप्रेमींनी विदेशातही मराठी दिवाळी अंक काढलेले आहेत. असे असले तरी, अलीकडच्या टीव्ही मालिका, संगणक व मोबाईलवरील समाजमाध्यमे आणि मनोरंजनमाध्यमे यांचा सहज उपलब्ध असलेला पर्याय दिवाळी अंकाच्या समृद्ध परंपरेला मारक ठरेल की काय, अशी काळजीही वाटते.
काही का असेना, जोवर मराठी माणूस आणि वाचन संस्कृती हे सांस्कृतिक भावबंध शाश्वत आहे तोवर दिवाळी अंकांचे स्वरूप कितीही बदलले, तरी ही समृद्ध परंपरा मराठी माणूस खंडित होऊ देणार नाही अशी मी आशा बाळगू या.
– डॉ. सौ कल्पना मुनघाटे
नेरूळ, नवी मुंबई