जाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

थिंक पॉझिटिव्ह अंक जिद्दबीज ! प्रवीण दवणे

थिंक पॉझिटिव्ह अंक

जिद्दबीज !

प्रवीण दवणे

कथेत घडावे तसे घडत गेले.
दारात एक अनोळखी स्त्री! पस्तिशीची असावी.
“आत येऊ?
“हो,पण कोण आपण?”
“नाही ओळखलंस?”
“नाही!”
“मी मेधा!”
“मेधा?”
“हो, आठव..”
“कोडी घालू नका, कोण आपण?”
तेवढ्यात पत्नी आली, “अहो, आधीआत तर येऊ द्या त्यांना..”
“अं?हो, या आत या!”
“खूप बदललास? मोठा झालास न?नाव झालं!पण आज आले वेगळ्या कारणाने, जुन्या मैत्रीच्या हक्काने”
पत्नी माझ्याकडे खास पत्नीच्या
चौकस नजरेने बघू लागली”.अग,मी खरंच ह्यांना..”
त्या बाई सौम्य हसल्या.
“मी मेधा! ठाण्याचे बेडेकर कॉलेज!मराठी बी ए!..पटवर्धनबाईंच्या वर्गात एकत्र होतो.
मी पंचवीस वर्षे झर्रकन मागे गेलो.
“हां.. हां..मेधा ! केवढा बदल?आठवलीस, बहुतेक वेळ लायब्ररीत बसणारी, स्कॉलर!”
भाषेच्या प्रेमात असलेली, स्पर्धेत भाग घेण्यात अग्रेसर असलेली, सावळी स्मार्ट मेधा!
आता अहोच्या औपचारिकतेतून अगं च्या अनौपचारिकतेत जाणं सहज झाले होते.
“बोल मेधा, अशीअचानक? तेही काही न कळवता?”
ती थोडं थबकली, शब्द शोधत असल्यासारखी,
“प्रवीण, एकतर अशी पंचवीस वर्षानंतर प्रकटले, तेही अगदी निकडीचे काम घेऊन, मला माहितेय,हे फारच चुकीचे वागतेयफोन नंबर जिकिरीने मिळवला होता, पण फोनवर एखाद्याला टाळणे सोपे जाते,म्हणून निश्चयाने घरीच आले, आता नमनाला घडाभर पाणी न घालता अगदी थेटच विचारते, एखाद्या बँकेत ओळख आहे का? तुझी?”
“आहेत ओळखी, पण कशा संदर्भात?”
“लोन.. लोन हवं होतं ”
“लोन?”
” ते ही अतिशय अर्जंट?दिवाळी नंतर मी व्याजासह एक रककमी कर्ज परत देईन,अगदी व्याजासह-”
“पण किती रक्कम?”
“पाच हजार!”
मला वाटलेलं नवल मी मनातच ठेवले, इतक्या कमी रक्कमेसाठी मेधा बँकेत कर्ज का मागत असेल!की इतक्या अनेक वर्षानंतर एकदम माझ्याकडे उसने पैसे मागण्याचा संकोच वाटल्यामुळे ती बँकेतून कर्ज हे चतुर निमित्त शोधत असेल? काही का असेना, मेधा पैशाच्या अडचणीत होती हे मात्र खरे.
मी विचारले, ” मेधा, कशासाठी हवीय ही रक्कम?”
“मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचाय, थोड्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत”
मी अभावितपणे विचारले, “तुझे मिस्टर ,त्यांच्या नोकरीचा काही प्रॉब्लेम?”
ती गप्प झाली. ती शांतता वेगळी होती, आम्ही पती पत्नीने एकमेकांकडे पाहिले, हा प्रश्न विचारून तिला दुखावले होते का?
मलाच कळले नाही.
“सॉरी मेधा, काही
खासगी कारण असेल, तर नको सांगूस!आवंढा गिळून ती म्हणाली”, ते दोन वर्षांपूर्वी न्यूमोनियाने गेले”
ओह सॉरी!
“त्या आधी दोन्ही मुलं, ती व्हाइट फिव्हर ने गेली, आता एकटी असते”
“ओह!”
“भावाकडे आश्रित किती राहणार?त्याचा स्वतःचा संसार आहे, त्याने नि वहिनीने खूप केले, पण आता आमच्या छोट्या गावात
मी स्वतः पोळी भाजी केंद्र सुरू केले,तिथून बसने रोज कसारा स्टेशन गाठून लोकल मध्ये चकली लाडू पाकिटे विकली!
“अगं, पणमग एखादी नोकरी?”
“आता पन्नासाव्या वर्षी कोण देणार रे?तीही शोधली, पण अनुभव अचंबित करणारे, या वयात ..हादरून टाकणारे आले,”
मी निःशब्द ,नि पत्नी डोळ्यांच्या कडा टिपत.
“अरे,स्टोव्ह, पातेली, कढई यांचे भाडे इतके आहे की सारा नफा त्यात जातो. आता एकटीच राहते, त्या खोलीचं भाडं, कसं परवडणार न? मी विचार केला, आता कर्ज मिळालं पाच हजार तर महत्त्वाची भांडी विकत घेईन, म्हणजे कायमचे भाडे खर्च वाचेल, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, माझ्या ऑर्डर्स वाढताहेत,एक मदतनीस बाई ठेवावी लागेल, तर तिचा पगार..! हाती काय उरणार न?”थोडा अंदाज घेत
अचानक तिने विचारले, “मग मिळेल का लोन?पाच हजार!मी व्याज देईन,काय जे असेल ते!”
पत्नी चहा ठेवायला किचन मध्ये गेली, तिने दुरून खूण करून आत बोलावले. मी काय करावं या भोवऱ्यात होतो, पण स्त्रिया प्रत्येक भोवऱ्यातून अगदी अचूक मार्ग काढतात, पत्नी म्हणाली,”हे बघा, तिचं सर्व म्हणणं मी ऐकलय, अगदी प्रामाणिक वाटतंय, तिला मदत करायलाच हवी आपण”
“हो, पण कुठली बँक चार दिवसात कर्ज देईल?
“बँक नाही, आपण देऊया!”
“पाच हजार?”
“होय, आत्ताच्या आता द्यायला हवेत!”
“पण सगळा बनाव असेल तर..?”
“तर, आपले पाच हजार बुडतील, पण सारे खरे असेल तर, तिचे आयुष्य उभे राहील!द्या तिला पाच हजार..!”
मी पत्नीकडे पहातच राहिलो. ती ठामपणे बजावतच होती.
एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचे मन जणू कागदावर लिहिलेला मजकूर वाचावा तसे वाचता येत होते.मी कपाटातील रक्कम घेऊन मेधासमोर आलो नि म्हंटले, ज्या जिद्दीने तू स्वतःला पुन्हा उभी करते आहेस, त्या जिद्दीला मदत, माझा हा खारीचा वाटा”
तिचे डोळे भरता भरता थबकले,तिलाही सारे स्वप्नवत असावे.’प्रवीण, मी दिवाळी नंतर हे पैसे…”
मेधा घरातून बाहेर पडली, पण तिची कहाणी ऐकून मनात ती राहिलीच. मधेच तिचा फोन यायचा, त्यात वाढणाऱ्या ऑर्डर्स, विकतघेतलेले साहित्य याचा उल्लेख असायचा, मला ते तिचे सांगणे समाधान द्यायचे,पण वाटायचे, त्यात थोडा संकोच आहे.
दिवाळी झाल्यावर दहा बारा दिवसानंतर आधी फोन करून मेधा घरी आली. आज तिच्या व्यक्तीमत्त्वात एक आत्मविश्वास होता. उमटलेल्या हास्यात प्रसन्नता होती.
काय म्हणतोय व्यवसाय?एकदम यशस्वी?
तिने सविस्तरपणे कसे कसे घडत गेले ते सांगितले. आम्ही उभयता कौतुकाने ऐकत राहिलो. मग एकदम पर्स मधून एक बंद लिफाफा काढून तिने हातात दिला, प्रवीण पैसे परत करतेय, पण ह
ज्या अडचणीत तू हे दिलेस, ती वेळ, ती माझी परिस्थितीने केलेली कोंडी, ते ऋण मी..’
मेधा, अगं, सरस्वतीचे हे धन आहे, त्यातून तू लक्षमी उभी केलीस-ही जिद्द, परिस्थितीशी लढण्यापेक्षा ती बदलून ,तिला तुझी सोबती केलेस, खरंच, आता बघ पुढचे सर्व आयुष्य सुखाने नि समृद्धीने भरलेले असणार आहे, कारण, हात पसरण्यापेक्षा ते तू मूठ घट्ट वळून कामाला लावलेस”
ती हसली, पिशवीतून तिने काही गोड पदार्थ काढले, हे माझे नवे पदार्थ!
तिचे पाकीट समोरच होते. मला ते परत घेणे संकोचाचे वाटत होते, तोच पत्नी म्हणाली, मेधाताई,आता नवे काय मनात ,म्हणजे, अजून नवा संकल्प?”
आहे, पण पूर्ण केल्यावर सांगेन!
मग हे पैसे त्या साठी आम्हा दोघांकडून सप्रेम..”
मी चकितच झालो, प्रज्ञा अगदी माझ्या मनातलेच बोलली होती.
“छे, आता मी माझे आर्थिक नियोजन करू शकते”
“आमच्या दोघांकडून भाऊबीज समज..”
प्रज्ञाला ऐनवेळी हे कसं सुचतं कळत नाही.
भाऊबीज म्हणताच तिने ते पाकीट घेतले.
दोन तीन महिने असेच गेले, मेधाची आठवण येण्याचे तसे कारण नव्हते. एका संध्याकाळी फोन!मेधा म्हणाली, “आता नाही म्हणायचे नाही, तर पुढे सांगते”
तिच्या स्वरात आत्मीयतेचा उत्साह होत.
तू नि प्रज्ञावहिनी, परवाच्या चैत्र पाडव्याला माझ्या घरी यायचेच आहे”
“हो,पण ,विशेष काय?”
“विशेष हेच की तू भाऊबीज म्हणून मला दिलेल्या त्या धनात भर घालून छोटे वाचनालय सुरू करीत आहे, तू आलास तर खूप लोक येतील,जवळच्या गावातून, आवाहन केलेस तर सभासद होतील पुरेसे, पुढचे पुढे, पण छोट्या गावात एकही वाचनालय नाही, ते सुरू करतेय, उद्घाटन करायला येशील ना?”
मी स्तब्ध झालो, अरे बोल, थोडे मानधन देईन मी.. पण ये ,तू नि वहिनी!”
पत्नी म्हणाली, काय झाले?फोन कुणाचा?नि डोळे भरलेत का?”
मी सारे सारे सांगितले.
खूप दिवसांनी अश्रूंना कुणाच्यातरी जिद्दीचा सुगंध आला होता.भाऊबीज जिद्दबीज होताना शब्दांतून दीपज्योतीची पालवी धुमारत होती!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}