#स्ट्रेट_ड्राइव्ह ११ बस दो कदम दूर…अनिल विद्याधर आठलेकर
#स्ट्रेट_ड्राइव्ह ११ 🏏
बस दो कदम दूर…
————-
भारताने आरंभलेल्या विश्वमेध यज्ञाचा सुसाट सुटलेला रथ अखेरचा सामना होत असलेल्या बेंगळुरू येथील चिन्नास्वामी मैदानापर्यंत येऊन पोहचला. डच लोक लव-कुश होऊन तो अडवण्याचा प्रयत्न करणारा का असा एक छोटासा किंबहुना त्यांच्याच चाहत्यांचा प्रश्न होता. चिन्नास्वामी दोन खेळाडूंसाठी आणि कोचसाठी हृदयात असणारं, आपलं असं मैदान. विराटची आयपीएल टीम आरसीबी इथलीच, त्यामुळे आणि केएलराहुल व कोच राहुल द्रविड कर्नाटकचेच त्यामुळे त्यांच्यासाठी हे मैदान अत्यंत प्रिय. धावामान अंदाजानुसार इथे खेळपट्टीत भरपूर धावा असल्याचं आधीच समजलं होतं, प्रश्न होता फक्त टॉसचा!
🏏 टॉस जिंकून पहिली बॅटिंग
टॉस रोहित शर्माने जिंकला आणि अपेक्षेप्रमाणे पहिली फलंदाजी घेतली. संघ पूर्ण जोशात आहे, गोलंदाज फॉर्ममध्ये आहेत, बॅटिंगही उत्तम होतेय असं सगळं चांगलं चांगलं होत असलं तरी सेमी फायनलमध्ये जाण्यापूर्वी एक आणखी आश्वासक कामगिरीची गरज होती. डच लोकांचा संघ लिंबूटिंबू असला तरी साखळी सामन्यात त्यांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेसारख्या दादा संघाला धूळ चारलेली होती, हे विसरून चालणार नव्हतं. भारताची कामगिरी बघता पुन्हा एकदा ओपनिंगच निर्णायक ठरणार हे उघड होतं.
🏏 द रोहित एक्स्प्रेसला गिलस्पीडची जोड
रोहित शर्मा नावाची सुपरफास्ट एक्स्प्रेस ओपनिंग स्लॉट क्रमांक १ वरून सुटली आणि नेहमीप्रमाणे तिने वेगाने धावा वाढवायला सुरुवात केली! १० षटकांत आपल्या जवळपास ९० धावा झाल्या होत्या. यावेळी शुभमन गिलही सुसाट सुटला. दोघांनीही आपापली अर्धशतकं झळकावली.
🏏 द किंग ऑन सॉन्ग अगेन
गिल बाद झाल्यावर कोलकात्यात ४९ वं शतक मारून आलेल्या विराट कोहलीचं जंगी स्वागत बेंगळुरूच्या क्राउडने केलं नसतं तरच नवल. प्रत्येक शॉट एंजॉय केला जात होता, सुरूवातीला थोडीशी संथ खेळी खेळणार्याक विराटने रोहित बाद झाल्यावर अचानक गियर बदलले आणि क्षणात साहेबांनी अर्धशतक गाठलं. बेंगळुरूच्या लोकांनी जल्लोष केला आणि आता ५० वं शतक आलंच बहुधा असा जवळजवळ विश्वास सर्वांना वाटू लागला. तोच वॅन डर मर्व्हने टाकलेल्या उत्तम चेंडूवर बॅकफूटवर जात खेळण्याचा कोहलीचा प्रयत्न फसला आणि बेल्स उडाल्या !
कोहली या वर्ल्डकपमध्ये सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने ५९४ धावा फटकावल्या आहेत आणि सर्वाधिक धावा झळकावणार्यांयच्या यादीत तो प्रथम क्रमांकावर आहे !
🏏 द ‘चिन्नास्वामी अय्यर’
कोहली बाद झाल्यावर अय्यरने सूत्रे हातात घेतली. सुरुवातीचा अपवाद वगळता अय्यर सध्या सातत्याने चांगला खेळतोय. हिटमॅन आणि किंग तर गेले पण मै हू ना.. असं म्हणत अय्यरने दणादण खेळायला सुरुवात केली. कन्नडमध्ये ‘चिन्ना’ चे साधारणपणे २ अर्थ होतात. चिन्ना म्हणजे शब्दश: बघितल्यास सोनं, तर लहान मुलांना ‘चिन्ना’ म्हणायची पद्धत आहे. आपल्याकडे ‘बाळा, सोन्या’ म्हणतात त्याप्रमाणे. अशाच अर्थी पाहील्यास चिन्नास्वामी ग्राऊंडवर अय्यर या दोघांनंतर ‘चिन्ना-स्वामी’ झाला आणि त्याने तब्बल ५ षटकार मारत बेंगळुरूच्या रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं, पहिलं शतक झळकावलं आणि तेही शेवटपर्यन्त नाबाद राहून!
श्रेयस अय्यर शॉर्टपीच चेंडूवर चकतो असा त्याच्याबद्दल असणारा समज तो हळूहळू खोडून काढत चाललाय आणि नं.४ या महत्त्वाच्या बॅटिंग पोझिशनसाठी आपण पूर्णपणे समर्थ आहोत हे तो बॅटनेच दाखवून देऊ लागलाय ही रोहितसाठी आणि भारतासाठी खूप आनंदाची बातमी आहे.
🏏 राहुल – नाम तो सुना होगा !
अय्यरच्या साथीला आलेल्या केएल राहुलने होमग्राऊंडवर जणू आधीच सेट होऊन आल्यासारखी बॅटिंग केली. चौफेर फटके मारले आणि चक्क ६२ चेंडूत शतक झळकावलं ! तेही खणखणीत ११ चौकार आणि ४ षटकार मारत! याआधी त्याचा अंदाज चुकल्यामुळे आणि टायमिंग बरोबर झाल्यामुळे त्याला 97 वर नाबाद रहावं लागलं होतं, पण ‘आज नहीं!’ त्याने शेवटी ‘करून दाखवलं !’ राहुल आशिया चषकापासून चांगला खेळतोय आणि त्याने एकापेक्षा एक सरस खेळी खेळून ट्रोलर्सच्या तसेच टीकाकारांच्या अक्षरश: श्रीमुखात लगावली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये!
बघता बघता एक विक्रमही भारताच्या नावे झाला. एकाच सामन्यात, एकाच संघाकडून एकाच डावात टॉप ५ पैकी सर्व फलंदाजांनी किमान अर्धशतक झळकावण्याची वर्ल्डकपमधील ही पहिलीच वेळ होती !
भारताने डच लोकांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत, धावांचा डोंगर उभा केला आणि त्यांना आव्हान दिलं ५० षटकांत ४११ धावा करण्याचं !
🏏 पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ..
बॅटिंग मध्ये डोंगर उभारल्यावर आता वेल होती बोलर्सची. पहिल्या १० षटकांत थोड्याफार धावा गेलेल्या असल्या तरी धावसंख्येकडे बघता नेदरलँडने ती पार करेल असं म्हणणं म्हणजे अजय देवगण हृतिक रोशनसारखा डान्स करेल म्हणण्याइतकंच आशावादी ठरलं असतं.
🏏आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
पहिल्या दोन विकेट ७० धावांमध्ये पडल्यावर रोहित शर्मा अचानक मूडमध्ये आला आणि त्याने चक्क कोहलीच्या हातात बॉल सोपवला, बरं इथवर ठीक होतं. वर तब्बल ९ वर्षांनंतर कोहलीने चक्क विकेटही मिळवली, तीसुद्धा त्यांचा कप्तान एडवर्डस याची!
आता शर्माने ठरवलं की हीच संधी आहे आपले कामचलाऊ बोलर्स जोखून बघण्याची. त्याने मग गिल आणि सूर्यकुमार यांनाही बोलिंग दिली. इंग्लंडचा जो रूट असो की आफ्रिकेचा मार्करम, हे बोलर जेव्हा एखादा मुख्य बोलर मार खात असतो तेव्हा कोटाही पूर्ण करतात आणि विकेटही मिळवून देतात. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत आपल्याला अशा एका पर्यायाची गरज आहे आणि कित्येकांना ही गंमत वाटलेली असली तरी रोहित शर्माने उचललेलं हे पाऊल खासच म्हणावं लागेल. सरतेशेवटी स्वत: मालकांनी चेंडू हातात घेतला आणि नेदरलँडचा शेवटचा गडी आपल्या खिशात टाकला! अशा प्रकारे भारताची ‘दो हंसों की जोडी’ असणार्यास कोहली आणि रोहित यांनी १-१ विकेट घेऊन हा सामना आणखी संस्मरणीय बनवला! सामना भारताने १६० धावांनी जिंकला, हे वेगळं सांगणे नं लगे ! असा दणदणीत विजय मिळाला आणि बेंगळुरूत रविवारी दिवाळी ‘साजरी’ झाली.
🏏आता लक्ष्य नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद !
तसं पाहता, उरलीसुरली सर्व कसर भारतीय टीमने या सामन्यात भरून काढल्यामुळे सर्व बॉक्सेस टिक झाले असं म्हणायला हरकत नाही. सर्व ९ साखळी सामन्यांनंतर आपली स्कोअरलाइन ९-० अशी असून आता उर्वरित दोन अडथळे पार करून ती ११-० अशी करावी आणि विश्वमेध यज्ञ सुफळ संपूर्ण करावा हीच अपेक्षा ! आता लक्ष फायनलकडे आणि लक्ष्य फक्त विश्वचषक!
जय हो !
– अनिल विद्याधर आठलेकर
मोबाइल : ९७६२१६२९४२