नंदन ची सुनंदन लेलेंशी भेट –
२०१९ साली वर्ल्ड कप मध्ये भारत-पाकिस्तान ची मॅच पाहताना पहिल्यांदा नंदन माझ्यासोबत टीव्हीवर क्रिकेट पाहायला पाहायला बसला असावा. पुर्वी क्रिकेट त्यानं फारसं पहिलं नव्हतं. मैदानातला प्रत्येक चेंडूवर होणारा आवाज आणि लोकांचा उत्साह बघुन नंदनपण लक्ष देऊन ‘काय घडतंंय’ पाहत होता. ठरल्यासारखी भारताने मॅच जिंकली आणि मी नंदनला घेऊन FC रोडला घेऊन गेलो. पाकिस्तान विरुद्ध जिंकल्यावर रस्त्यावर भारतीयांचा जल्लोष नंदनने पहिल्यांदाच अनुभवला आणि खुुप एन्जॉय केला. बहुतेक तेव्हाच क्रिकेट हा खेळ त्याच्या डोक्यात बसला.
FC रोडवरचा जल्लोष नंदनच्या इतका डोक्यात बसला कि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या चौकश्या सुरु झाल्या. मी जमेल तशी माहिती त्याला द्यायला सुरुवात केली. योगायोगाने त्याच वेळी मी माझा जुना व्हिडिओकॉन बझूका TV बदलून स्मार्ट TV घेतला. त्यावर त्याला मॅचेस पहायला अजुन रस यायला लागला. मी जमतील तसे काही जुन्या चुरशीच्या मॅचेस त्याला दाखवायला सुरुवात केली. त्याचवेळी त्याला IPL चा पण शोध लागला आणि त्याही मॅचेस मन लावून पाहायला सुरुवात केली. त्याला इतका त्याचा छंद लागला कि आम्हाला TV पाहायला मिळेनासा झाला. शाळेतून आलं कि रिमोट सरांच्या कस्टडीत.
त्यानंतर आला कोरोना आणि नंदन ची शाळा ऑन-लाइन सुरु झाली. दोन-तीन क्लास झाले कि सर मोकळे. नंदन व्हील चेअर वर असल्याने कुणी बाहेर नेल्याशिवाय घरात बसून टीव्ही पाहणे याशिवाय काही काम नव्हते. त्याने IPL चे पूर्ण सीझन मन लावून पाहिले आणि नंदनची मेमरी खूप शार्प असल्याने त्याचे स्टॅटेस्टिकस वगैरे त्याला तोंडपाठ व्हायला लागले. प्लेयर्स ची नावे, त्यांचे देश, त्यांचा जर्सी नंबर, रन्स आणि विकेट असा डेटा मुखोद्गत व्हायला सुरुवात झाली. शाळा ऑन-लाइन असल्याने अभ्यास TV वर Youtube वर व्ह्यायचा आणि मग सोबत स्मार्ट TV त्याला क्रिकेट संबंधी सर्व उपलब्ध videos recommend करायला लागले. फावल्या वेळात त्याला एकाचं छंद लागला, क्रिकेट आणि त्याच्याशी संबंधित समीक्षा, समालोचन, pitch रिपोर्ट्स ह्याचे videos पाहणे.
हा छंद पाहता पाहता इतका शिगेला पोहोचला कि टुर्नामेंट्स चे वेळापत्रक, सामन्याची आकडेवारी, खेळाडूंची कामगिरी यासोबतच त्यांचे व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक माहिती हादेखील अभ्यास व्हायला सुरुवात झाली. पाहता पाहता नंदन एक पूर्ण समीक्षक झाल्यासारखं क्रिकेटवर अधिकारवाणीने बोलायला लागला. जो कोणी भेटेल त्याला एकच गप्पा, क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. एव्हाना त्याचा TV वर पाहायच्या कन्टेन्ट मध्ये पण वयानुसार बदल झाला. त्याने स्वतःच क्रिकेटवरचा दर्जेदार समीक्षा शोधून काढून पाहायला सुरुवात केली. या कामी नंदन ला मोलाची मदत केली तो अलेक्साने. रोहित शर्मा, विराट कोहली हे हिरो झाले. समालोचक आणि पत्रकार मंडळींमध्ये प्रामुख्याने एक नाव नेहमी त्याच्या तोंडात यायला लागलं, “सुनंदन लेले”. प्रत्येक मॅचच्या आधी “सुनंदन लेले काय म्हणतात?” याची प्रामुख्याने मीमांसा व्हायला सुरुवात झाली. आमच्या घरात सगळ्यांनाच सुनंदन लेले एक घरचेच व्यक्ती होऊन गेले.
नंदनबद्दल एक बाब मला नेहमीच सुखावत आली ती म्हणजे दिव्यांग असून, एक जागी व्हील-चेअर वर असूनही तो नेहमी खूप उत्साही असतो. स्वतःच्या मनोरंजनाबद्दल सतर्क आणि जागरूक असतो. मनोरंजनाचे मार्ग स्वतः शोधूनच काढत नाही तर त्याची खोलवर माहिती स्वतः मिळवतो आणि हे त्याचे प्रयत्न निरंतर सुरु असतात.
एकदा खूप आग्रह केला म्हणून त्याला गहुंजे स्टेडियम मध्ये IPL मॅच पाहायला घेऊन गेलो. राजस्थान रॉयल्स आणि RCB यांची ती मॅच. नंदनची फेवरीट टीम मुंबई इंडियन्स असल्याने आणि बातम्यांमध्ये त्यावेळी रोहित आणि विराट यांच्यामधील शीतयुद्धाची gossips कानावर पडल्याने स्वारी विराटवर नाराज होती. आमचा फेवरीट रोहित शर्मा, इतका फेवरीट कि मध्ये त्याचा फॉर्म नव्हता तेव्हा त्याला अधिकारवाणीने डिफेन्ड करायला नंदन सगळ्यात पुढे. कोणी त्याच्याविरुद्ध काही बोललं कि झालं, कट्टर दुश्मनी. असे असल्याने ह्या मॅचमध्ये RCB ला सपोर्ट करायचा काहीच विषय नव्हता. आणि दुर्दैवाने स्टेडियम मध्ये आमच्या आजूबाजूला सगळे RCB. टॉस पासून वादा वादी सुरु. RCB ने टॉस जिकून पहिले बॅटिंग घेतली आणि सरानी मैदानात ओरडून जाहीर केलं, निर्णय चुकला, RCB हरणार. गम्मत सुरु होती, सगळ्या RCB वाल्यानी नंदनला पिडायला सुरुवात केलेली. सामनाभर गोंधळ घातला आणि गम्मत म्हणजे शेवटी RCB हारली. सगळी मंडळी नंदनला, “बॉस, बधाई हो, तुम जीत गये”. गाडी दोन दिवस खुशीत होती.
अश्या अनुभवाने क्रिकेटचं वेड वाढतच चाललंय. मधूनच भारतीय संघाला, त्यातल्या त्यात रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत यांना भेटायची मागणी होते. त्याला मी त्याच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल सांगितलं तर प्रसंगी कायदा हातात घ्यायची भाषा येते तोंडातून. क्रिकेट म्हणजे त्यांनी जीवन बनवून घेतलंय त्याने. त्यात इतका रमतो कि कधी कधी मला हि खूप बरं वाटतं. असेच आनंदी राहायचे मार्ग त्याला लाभू दे आयुष्यात कधी उदास व्हायची वेळ त्याच्यावर येऊ देऊ नाकी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हे सुरु असतानाच या नवरात्रीमध्ये माझी एक मैत्रीण घरी आली. कोणी घरी आलं कि त्याला नंदन सोबत क्रिकेट पुराण ऐकल्याशिवाय सुटका नसते. TV वर सुनंदन लेलेंचा विडिओ सुरु होता. त्यावर आपलं मत व्यक्त करणी सुरु होत. एव्हढ्यात मैत्रीण म्हणाली, “अरे, सुनंदन माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचा family friend आहे”. नंदनचे वेड पाहून ती म्हणाली, ” पाहू या, मी विचारते तिला नंदनला भेटता येईल का त्यांना.” टीव्ही साऊंड म्यूट झाला, कान टवकारले आणि लगेच मोर्चा तिकडे वळला. सुदैवाने दुसऱ्याच दिवशी तिचा फोन आला, “अरे, मी बोलली आहे मैत्रिणीशी. सुनंदन लेले येणार आहेत पुण्यात ७-८ तारखेला. आणि मुख्य म्हणजे त्यांनी कबुल केलंय नंदनला भेटायचं.”
झालं, त्या दिवसापासून आमच्या घरात एकच विषय, त्यांच्याशी काय बोलू, त्यांना काय विचारू, नक्की येतील ना ते ( त्याचं नंदनने दिलेलं कारण, बाबा, ते सध्या खूप बिझी असतील, अरे वर्ल्ड-कप चालू आहे). लिहिता येत नसल्यानं आईला आदेश आला, “मला जे जे आठवतंय ते ते तू माझ्यासाठी कागदावर लिहून ठेव. ऐनवेळी काही विसरायला नको. ड्रेस कुठला घालू?, यावर त्याला म्हंटल, अरे, टीम इंडिया ची जर्सी आहे ना तुझ्याकडे, तीच घाल. त्यावर आईला आदेश, “आई, माझी जर्सी स्वच्छ धुवून ठेव.” कुठल्या परीक्षेसाठी केली नसेल एव्हढी तयारी झाली.
सात नोव्हेंबरला संध्याकाळीच सुनंदन लेलेंचा फोन आला. आठ तारखेला सकाळी भेटू असं ठरलं.
आठ तारखेला सकाळी पाच वाजता न उठवता स्वारी उठली, सर्वानी आवराआवर केली आणि मोर्चा डेक्कन कडे वळवला. आम्ही स्थानापन्न होत होतोच कि लेले पण आले. त्यानंतर जेवढा वेळ आम्ही एकत्र होतो नंदन बोलत होता, सुनंदन लेले उत्तरं देत होते, कुठे हि न कंटाळता त्याच्याशी मनमोकळा संवाद साधत होते. नंदनच्या डोक्यातील चुकीच्या concepts मोडून काढत होते. हॉटेल मध्ये जशी जशी गर्दी वाढू लागली, येणारी मंडळी लेलेंना पाहिल्यावर विश करत होती, सेल्फीचा आग्रह धरत होती. पण सगळ्यांना, न चिडता रागावता, सुहास्यमुखाने लेले भेटत होते आणि त्याचवेळी नंदनशी संवाद करत होते. वेळ कसा गेला कळलेच नाही. हळू-हळू नंदन चे प्रश्न थंडावत गेले. एक अलौकिक समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटत होते आणि कुठेतरी मी आणि वीणा पण या क्षणाचे साक्षीदार होऊन नंदन चा आनंद सोहळा पाहत होतो. सुनंदन लेलेंमधील एक हळुवार मनाच्या मानवाचं दर्शन होत होतं. एक यशस्वी तज्ञ क्रीडा-क्रिकेट समीक्षकामध्ये एक समजूतदार आणि प्रगल्भ जाणिवा असलेली व्यक्ती पाहून त्यांच्याविषयी मनात आदर वाढला. अजून एक समृद्ध अनुभव पाठीशी आला, आयुष्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी.
संतोष देशपांडे
🙏🌷