“सणांची सम्रांज्ञी – दिवाळी” #राज्ञी
“सणांची सम्रांज्ञी – दिवाळी”
#राज्ञी
निधीन फोन ठेवला आणि मुलगा सुरज ला जोरात हाक मारली.”काय रे तुला साधे सण कसे साजरे करतात हे सुद्धा माहित नाही का?”
“का काय झाले आई…?”
“आत्ताच तुझ्या टीचरचा फोन होता. परीक्षेच्या पेपरमध्ये, दिवाळी सणांची माहिती लिहा प्रश्न होता, त्यात तुला काही लिहिता आले नाही. त्या म्हणाल्या की तू दिवाळी फिरायला जाण्यासाठी, फटाके ,फराळ मज्जा करण्यासाठी असते. फक्त एवढेच लिहिलेस. ”
असे म्हणून तिने त्याच्या गालात मारणार तितक्यात तिचा नवरा विजयने येवून सुरजला बाजुला घेतले.
“काय हे निधी, का मारतेस. त्याला सणांची काय अन कशी माहिती असणार सांग ?जरा डोकं शांत ठेवून विचार कर. कोण आणि कुठे चुकते आहे.”
निधीचा चेहरा प्रश्नार्थक झालेला पाहून विजय तिला सांगू लागला.
“सुरजला जसे समजायला लागले तसे आपण दिवाळी बाहेर गावालाच पर्यटनातच साजरी करतो मग कसा कळणार त्याला दिवाळ सण कसा साजरा करतात.”
हे ऐकताच निधी ओशाळली, सुरजला जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवून गोंजारू लागली.
“विजय माझंच चुकलं, मी टीचरच्या फोनमुळे खूप नर्व्हस झाले होते त्यामुळे माझा स्वतःवरचं ताबा राहिला नाही.साॅरी!!”
“साॅरी नको म्हणू, पण माझं एक ऐकशील?”
“काय सांग ना…?”
“या वर्षी आपण बाहेरगावी फिरायला न जाता ,घरीच राहून दिवाळी साजरी करूयात. तुझे काय मत आहे सांग?”
थोडा विचार करत, निधीने विजयला होकार तर दिलाच पण सासू सासरे, दीर जावा, नणंद सगळ्यांना घरीच सण साजरा करायला बोलावले. दिवाळीच्या पाच दिवसाची सगळी माहिती जाणून घेतली. व सुरजलाही ती माहिती सांगितली. ती कशी तर वाचा…हं…तुम्हालाही यातून खूप माहिती मिळेल. सर्वांत आधी घरातल्यांकडून तुम्ही मराठी महिने कोणते आहेत ते जाणून घ्या.
सर्वांना आवडणारी दिवाळी ही पाच दिवस साजरी करतात. घरातील कानाकोपऱ्याची स्वच्छता करून घर अंगण लख्ख केले जाते. दिवाळीत पणत्या, बोळके, आकाशकंदील, फटाके, फराळ, सारीच मज्जा असते. हा वर्षातला सर्वांत मोठा सण साजरा करतो. या पाच दिवसाच्या पहिल्या दिवसाला वसुबारस म्हणतात.
पहिला दिवस-गुरूद्वादशी/ वसुबारस –
आश्विन वद्य द्वादशीला गुरूद्वादशी म्हणजेच बसुबारस म्हणतात. वसू म्हणजे पृथ्वी आणि गाय तिचे प्रतीक व बारस म्हणजे द्वादशी म्हणून सर्व मिळून वसुबारस हा शब्द रूढ झाला.
मानवाला ऐहिक, पारलौकिक,आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्ग दाखवणाऱ्या गुरूविषयी आदरभाव ठेवण्यासाठी गुरूपूजन करतात. तसेच गाय आपल्याला दुधदुभते देते, शेतीसाठी बैल देते, बालकांपासून सर्वांचे भरणपोषण करते. म्हणजेच काय तर सर्वतोपरी मानवावर उपकारच करते मग तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घरातील सुवासिनी सवत्स( म्हणजे वासरासोबतची गाय) गायीची पूजा (गोपूजा )करतात. तिच्या पावलांवर पाणी घालून हळदीकुंकू लावून अंगणात तिचे ताटात निरांजन ओवाळून औक्षण करतात तिला आवडणारे गूळ,बाजरी, राळे, खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रंगीत रांगोळी काढून आकाशकंदील लावतात. अशा पद्धतीने दिवाळी किंवा दीपावली पहिला दिवस साजरा करतात.
दुसरा दिवस धनत्रयोदशी ( आश्विन वद्य त्रयोदशी) – किंवा धनतेरस म्हणतात. या दिवशी स्त्रियां अभ्यंगस्नान करतात. व्यापारी व वैद्यकीय ( डॉक्टर) व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी या देवणतांचे पूजन केले जाते. डॉक्टर मंडळी आयुर्वेदाचे प्रवर्तक, भगवान धन्वंतरी यांची पूजा करतात. तसेच
व्यापारी मंडळी लक्ष्मी, हिशोबाच्या वह्या , धंद्याची हत्यारे, सोने- नाणे यांची झेंडूची फुले वाहून, गूळ आणि धन्याचा नैवेद्य दाखवून, दिवे लावून, पूजा करतात. यमराजाची अवकृपा होऊ नये म्हणून त्याला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करायचे असते. संध्याकाळी थोडी कणीक घेऊन त्यात थोडे तेल व हळद घालून एक दिवा तयार करून त्यात एक कापसाची वात लावून तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. हळदीकुंकू वाहून पूजा करण्यालाच यमदीपदान म्हणतात.
तिसरा दिवस – नरकचतुर्दशी ( आश्विन वद्य चतुर्दशी) सर्वांना त्रास देणाऱ्या नरकासूर (सूर म्हणजे राक्षस) याचा वध याच दिवशी श्रीकृष्णाने वध केला. मरतांना नरकासुराने भगवंताकडे ‘माझा मृत्यू दिवस सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच या दिवशी जो अभ्यंगस्नान ( मंगलस्नान) करील त्याला नरकाची पीडा होऊ नये’ असा वर मागितला आणि श्रीकृष्णानेही तथास्तु म्हणून तो मान्य केला. तेव्हापासून सर्वांनी नरकचतुर्दशीच्या दिवशी, दिवे लावून ,दिवस उजाडायच्या आधी घरातील स्त्रियांनी पहाटेच उठून स्नान करून, पाटाभोवती रांगोळीचे स्वस्तिक काढून, सगळ्यांना तेल ,सुगंधी उटणे लावून औक्षण करायचे असते.सर्वांनी मंगलस्नान करायचे असते. या दिवशी नरकासुराच्या निःपाताचे प्रतीक म्हणून करिटाचे फळ चिरडतात आणि रस जिभेला लावतात. घरातील देवांनाही पंचामृताने अभिषेक करून अत्तर लावून( उष्णोदक) गरम पाण्याने स्नान घालतात ही पूजा सुद्धा सूर्योदयापूर्वी करतात.पणत्या लावून, गोड नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी या दिवशी नव्या केरसुनीला हळदीकुंकू लावून ती वापरण्यास सुरुवात करतात. या पहाटे आकाशवाणीवर ( रेडिओ )कीर्तनही ऐकण्यासारखे असते.
चौथा दिवस – लक्ष्मीपूजन(आश्विन वद्य अमावस्या) – पहाटेच उठून अभ्यंगस्नान करायचे. बळीराजाने आपल्या पराक्रमाने विष्णूपत्नी लक्ष्मीसह सर्व देवतांना कोंडून ठेवले होते. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांच्याकडे तीन पावले जमिनीचे दान मागून त्याला पाताळात दडवले आणि लक्ष्मीसह सर्व देवतांची मुक्तता केली. हाच दिवस आश्विन वद्य अमावस्येचा होता. या विजयाची आठवण म्हणून महानैवेद्य दाखवून, संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी, नवीन वस्त्र (कपडे ) घालतात, सगळ्या घराला विजेच्या रोषणाईने उजळून, पणत्या, दिवे, आकाशकंदील, सुगंधी उदबत्ती ,दाराला तोरण, माळा या सर्व आनंदासोबत घरोघरी चौरंग, पाटावर लक्ष्मीची मूर्ती, किंवा फोटो ठेऊन, पाच बोळक्यात धने, लाह्या, बत्ताशे भरून, फुले वाहून घरातील लक्ष्मीची पूजा करून लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवला जातो.आरती करतांना फटाके, फुलझाडे ( आता वायू व आवाजाच्या प्रदुषणामुळे फटाके सहसा कोणी वाजवत नाही) नंतर घरोघरी शुभेच्छा देण्यासाठी लहान मोठे सर्व एकमेकांकडे जातात. नमस्कार करतात. घरी केलेल्या फराळाला बोलावतात. हा दिवस दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा बच्चेकंपनी सोबतच थोरामोठ्यांच्या आवडीचा उत्साहाचा असतो.
आता या पुढचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवसापासून मराठी महिन्यातील कार्तिक महिना सुरू होतो.
बलिप्रतिपदा -( कार्तिक शुद्ध प्रतिपदा) – वामन अवतारात बळीला पाताळाचे राज्य दिल्यानंतर त्याने केलेल्या प्रार्थनेमुळे वामन त्याचे द्वारपाल झाले तो दिवस होता कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा म्हणून तेव्हा पासून बलीच्या स्मरणार्थ ‘ बलिप्रतिपदा’ साजरी केली जाते. हा विक्रम संवत्सराचा वर्षारंभ दिन असून या दिवसापासून व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष सुरू होते. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवसापासून व्यापारी कीर्द खतावणीच्या नवीन वह्यावर लिहायला सुरू करतात. हळदीकुंकू लावून गंध, फूल व अक्षता वाहून पूजा करतात. तसेच मुलांच्या वह्यापुस्तके, लेखणीपूजन करतात. व्यवसायातील उपकरणे, यंत्रे, ई. पूजन केले जाते. बलिप्रतिपदेला सायंकाळी पत्नीने पतीला रांगोळ्यांनी सजवलेल्या पाटावर बसवून औक्षण करायचे व पतीने तिला भेटवस्तू द्यायची असते. पत्नीने पतीला नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचे. उभयतातील मतभिन्नता, आचारविचार विषयक तेढ दूर होऊन वैवाहिक जीवनात सुख मिळण्यास मदत होते. या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलींचा पहिला दिवाळ सण माहेरी असतो. जावयाचे कोडकौतुक केले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. शुभमुहूर्तावर अनेक नवीन कार्याचे उद्घाटन केले जाते.
यमद्वितीया/ भाऊबीज ( कार्तिक शुद्ध द्वितीया) – या दिवशी मान असतो तो भाऊ/ बहिणीचा. या दिवशी यमुनेने आपल्या भावाला म्हणजेच यमधर्माला आपल्या घरी बोलावून स्नान घालून प्रेमाने ओवाळून मिष्टान्न भोजन केले होते. या कृतीचे अनुकरण केल्यास बहिण भावाच्या नात्यात प्रेमवृद्धी होते
आणि यमाच्या आशीर्वादाने त्यांचे अपमृत्यू ,गंडातर टळते असा पुराणात. उल्लेख आहे. म्हणून बहिणीने भावाच्या अंगास तेल लावावे. भावाने सुगंधी उटण्याने अभ्यंगस्नान करावे. मिष्टान्न भोजन करावे व संध्याकाळी बहिणीने पाट रांगोळी काढून भावाला औक्षण करावे. वडील भावाला बहिणीने नमस्कार करावा. भावानेही बहिणीला यथोचित भेटवस्तू द्यावी. एकमेकांचे मंगल होण्याची मनोकामना व्यक्त करावी. या दिवशी सख्खे, चुलत, मावस, मामे भाऊ, मानलेले भावांना औक्षण करावे. चंद्रालाही औक्षण करावे. सर्वांनी हे दिवाळीचे पाचही दिवस आनंद ,उत्साहाने साजरे करावे. एकमेकांचे आशीर्वाद घ्यावे, द्यावे. असा हा भारतीय संस्कृतीच्या सण उत्सवाचा वारसा पुढच्या पिढीने पुढच्या पिढीला देत जावा, माहितीतून सांगत जावा.
सणांची सम्राज्ञी – दिवाळी आहे. आपण तिच्या कडून आनंद मिळवणारे उत्साहाचे धनी आहोत. या सणाची मजाच काही और आहे. वर्षभर सगळे या सणाची वाट बघत असतात. एकमेकांविषयी आदर, नाते एकत्र येवून दृढ करतात.
दिवाळी जसजशी जवळ येत होती तसतसा सुरजला खूप आनंद होत होता. कारण यावर्षी त्याने स्वतः आई-बाबा घरातील साफसफाईत मदत केली होती. जी त्याच्याकडे येणारे पाहुणेरावळे बघणार होते. सगळ्या भाऊ बहिणी एकत्र येऊन किल्ला करणार होते. पाच दिवस एकत्र राहून धम्माल मज्जा करणार होते. हे सगळेच सुरजसोबत पहिल्यांदा घडणार होते. आईकडून ऐकलेल्या सणाची माहितीतून त्याला सण कसा साजरा करावा लागतो याचे संपूर्ण ज्ञान मिळाले होते. जे तो नेहमी आठवणीत ठेवणार होता. आणि तो दिवस आला ज्या दिवशी त्याचे घर आजी आजोबा, पै पाहुण्यांनी भरून गेले. सुरजच्या चेहऱ्यावर आजवर दिवाळीच्या प्रवासातल्या आनंदापेक्षाही कैकपटीने जास्त आनंद त्याच्या आईबाबांना दिसत होता.जो पाहून निधी, विजय दोघेही समाधानी होते.
निधीला या वर्षीची सुंदर भेट हा सुरजच्या चेहऱ्यावरचा आनंद होता असे तिने विजयजवळ बोलुनही दाखवले. सारे घर दिवाळी सणाचा आनंद मनमुराद लुटण्यात हरखून गेले होते. सणांमुळे आपल्या जीवनात नवीन उत्साह, स्फूर्ती जागृत होत असते. साऱ्यांनी सणावाराला घरी राहूनच ते साजरे करायला पाहिजे.
काय मुलांनो समजले ना सणाचे महत्त्व. सुरजला जसा आनंद झाला तसा तुम्हीही दिवाळीचा आनंद लुटा. मजेत रहा, घरीच रहा. सुरक्षित रहा. आणि आपल्या भारतीय सर्व सणांची माहिती मोठ्यांकडून मिळवत रहा.
सर्वांना दिपावलीच्या सहर्ष शुभेच्छा!!
(दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
सौ.प्रज्ञा कुलकर्णी (राज्ञी)