जमेल तेव्हा पर्यंत प्रकाश देत रहा आणि येणार्या अडगळीला आनंदाने सामोरे जा… रोटेरियन PDG सुबोध जोशी
काल भाऊबीज संपली आणि सर्वात पहिली लगबग दिवाळी नंतरच्या साफ सफाई कडे लागली. विद्युत रोषणाई च्या माळा व त्याच्या जोडीचे साहित्य पुढील वर्षीदेखील उपयोगाची असेल ह्या आशेने सांभाळून खोक्यात भरून ठेवले. फराळाचे रिकामे होत असलेले डबे आणि इतर काचेचे सामान घासून पुसून showcase मध्ये पोहोचले सुद्धा.
दारातील रांगोळी झाडून पुसून तिचे सौंदर्य आणि अस्तित्व दोन्ही सहजपणे मिटवले. आकाश कंदिलाची मिजास एका झटक्यात खाली उतरवून टाकली आणि शेवटचा मोर्चा दारातील उरलेल्या पणत्यांकडे वळवला.
तेलाच्या चिकटपणामुळे निस्तेज झालेल्या,
वातीच्या काजळीने काळवंडलेल्या,
कुठेतरी धक्का सहन न होऊन तडकलेल्या,
संपलेल्या तेलामुळे वात ही जळून गेलेल्या,
फरशीवर आपल्या सेवेच्या खुणा सोडलेल्या,
रात्रभर तेवल्यावर थोडीशी ऊब शिल्लक असलेल्या,
अशी असहायता मला त्या पणत्यांच्या जागी एकाएकी दिसू लागली. मातीच्याच पणत्या हव्या ह्या अट्टाहासापायी चार दिवस पायपीट करून दिवाळीच्या अगोदर मिळवलेल्या पणत्या, त्यांच्या पाच दिवसाच्या समर्पणानंतर एकाएकी अडगळ वाटू लागल्याची मला अचानकपणे खंत वाटू लागली.
आपले आयुष्यही असेच पणत्यां सारखेच असते का?
जो पर्यंत आपल्यातील नावीन्य आणि समोरच्याची गरज टिकून आहे तोपर्यंतच आपल्या अस्तित्वाची गरज आणि शोध आहे. हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक पणतीला हे कळेपर्यंत तिने दिवाळीतील पाच दिवस मिरवून घ्यायचे असते. तुमची काळजी, निगा, तेलपाणी आणि वात ह्याचे तुम्ही फक्त पाचच दिवस हक्कदार असता. समोरच्याचा सण आणि त्याची गरज संपताक्षणी कालची ” तेज:पुंज मंगलमय पवित्र ” पणती एका झटक्यात अडगळ झालेली असते.
आजची पणती ही उद्याची अडगळ असतेच हे प्रत्येक पणतीने समजून घेतल्यास तिच्यावर कधीच काळवंडून जाण्याची वेळ येणार नाही.
तेव्हा जमेल तेव्हा पर्यंत प्रकाश देत रहा आणि येणार्या अडगळीला आनंदाने सामोरे जा हीच सरत्या दिपावलीची शुभेच्छा.
रोटेरियन PDG सुबोध जोशी
Rtn. PDG Subodh Joshi