गुणवत्ता पूर्ण जीवनशैली:
आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढीसाठी वापरात असलेली व्यवस्थापन प्रणाली, अद्ययावत व उत्तमोत्तम करण्याचा संकल्प दृढ करण्यासाठी नोव्हेंबर महिना “जागतिक गुणवत्ता” महिना म्हणून पाळला जातो. आजच्या स्पर्धात्मक युगात, बाजारपेठेत टिकून राहायचे असेल तर आपल्या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे, ही बाब सर्वांना कळून चुकली आहे. जी गोष्ट उत्पादने किंवा उत्पादकांची आहे तीच सेवा पुरवणाऱ्या आस्थापना व देण्यात येणाऱ्या सेवांची आहे. गुणवत्ता किंवा क्वालिटी याची एक खूप समर्पक व्याख्या केली जाते. “Quality means conformance of requirements”, याचा अर्थ होतो की, तुमची वस्तू/सेवा (ग्राहकाच्या) आवश्यकतांची परिपूर्ती करणारी असली तर त्याची गुणवत्ता उत्तम. म्हणजेच, बाजारपेठेचा विचार करत असताना नुसती वस्तू/सेवा यांची “उत्तम गुणवत्ता” याच्या पुढे जाऊन “ग्राहकाच्या समाधानाचे” महत्व लक्षात घेणे महत्त्वाचे/हिताचे आहे. उदाहरणार्थ, जर बाजारात दोन प्रकारच्या सुगंधाचे साबण उपलब्ध असतील तर दोन्ही साबणांची गुणवत्ता उत्तम असणे गरजेचे आहे, पण ज्या ग्राहकाला जो सुगंध समाधान देतो तोच त्याला देणे देखील महत्त्वाचे आहे. हीच गुणवत्ता व्यवस्थापनाची संकल्पना आहे.
मला वाटतं, गुणवत्ता व्यवस्थापनाची ही संकल्पना आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणण्याचा अवश्य विचार व्हावा. आपल्या अंगी असणारी बौद्धिक क्षमता, कलाकौशल्य हे आपले उत्पादन आपण व्यावहारिक जगात आपल्या चरितार्थासाठी, फायद्यासाठी कोणालातरी विकत असतो. तेव्हा याची गुणवत्ता उत्तमोत्तम कशी होईल, आपल्या ग्राहकांना कसे जास्तीत जास्त समाधान देईल याची काळजी घेतच असतो.
त्यासाठी काही तरी व्यवस्थापन करावे लागते. शिवाय आपली कला-कौशल्यातील गुणवत्ता वाढली आहे का नाही, ती लोकांना आवडते आहे ना, समाधान देते आहे ना, याचा आढावा देखील घ्यावा लागतो. बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर सामान्यज्ञान मिळवण्यासाठी, अद्ययावत ठेवण्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे. आपली बौद्धिक पातळी विकसित होते आहे ना, याची तपासणी विद्यार्थीदशेत द्याव्या लागणाऱ्या परिक्षांतून होत असते व त्या आधारे सुधारणा करणे शक्य होते. परंतु त्यानंतर आपली बौद्धिक क्षमता इतरांशी केलेल्या चर्चा, संवाद यामधून प्रगट होते. नोकरी करणाऱ्यांची बढती, पदोन्नती हे देखील बौद्धिक क्षमता वाढीचे निर्देशक असू शकते. “अति विचार करणाऱ्यांनी लिहीते व्हावे आणि कमी विचार करणाऱ्यांनी वाचन करावे” असे म्हंटले जाते. बौद्धिक संपदा निर्माण करण्यासाठी, वृध्दिंगत करण्यासाठी ह्याचा अवलंब केला पाहिजे.
प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण ही आजची काळाची गरज ओळखून गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मध्ये या पैलूचा अंतर्भाव होणे अधोरेखित केले गेले. त्या दृष्टीने, विशेषतः उत्पादन क्षेत्रात, उत्पादनांच्या गुणवत्ते बरोबरच उत्पादन प्रक्रियेत प्रदूषण नियंत्रण केले गेले आहे ना, हे देखील पाहिले जाते. त्यानुसार उत्पादनाला मानांकित केले जाते. ही संकल्पना देखील वैयक्तिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मध्ये अंगिकारली जाणे अपेक्षित आहे. आपल्या दैनंदिन आचरणात कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, त्याच प्रमाणे आपला घनकचरा कमी करून
असेल त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे या सारख्या बाबींवर अंमल करणे, यावर आपली वैयक्तिक गुणवत्ता उत्तम राखणे आवश्यक आहे. या साठी काही शास्त्रीय, तांत्रिक बाबींची जुजबी तरी माहिती करून घेणे अगत्याचे ठरेल.
व्यावसायिक क्षेत्रातील गुणवत्तेचे महत्त्व मुख्यत्वे करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी निगडित आहे. दैनंदिन जीवनात आपला अनेक व्यक्तींशी व्यवहार होत असतो आणि तो व्यावसायिक असतो असं नाही. उलट आपले बरेच संबंध कौटुंबिक, सामाजिक संदर्भात असतात आणि तेथे आर्थिक नफा-तोटा पाहिला जात नाही. अशा वेळी देखील आपले त्यांच्याशी असलेले वर्तन गुणवत्ता पूर्ण असावे लागते. सुरवातीला दिलेल्या व्याख्येनुसार आपले वर्तन, आचार-विचार संबंधित व्यक्तींच्या “आवश्यकतांची परिपूर्ती” करणारे असणे अपेक्षित आहे. जरी आपल्याला इतर कोणाचे विचार पटत नसतील तरी आपले भिन्न विचार त्यांना योग्य पद्धतीने पटवून दिले जाऊ शकतात. किंवा योग्य संवादातून समन्वय साधला जाऊ शकतो.
माणसाचे वर्तन हे दोन गोष्टींशी निगडित असते, “बुध्दी आणि भावना”. जेथे नफा-तोटा पाहीला जातो तेथे बुध्दीचा वापर जास्त होतो तर इतर संबंधात भावनेचा. परंतु दोन्ही वेळी वर्तन, आचार-विचार यातून उत्तम गुणवत्ता अंगिकारली जावी.
— वासुदेव पटवर्धन, पुणे