रेवा तीरे तपं कुर्यात् (नर्मदा तीरावरील सिद्ध संत) महेश आत्माराम सावंत. तोंडली, चिपळूण
(चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने…..
दिनांक २६/०८/२०२४)
रेवा तीरे तपं कुर्यात्
(नर्मदा तीरावरील सिद्ध संत)
साधारण शंभर वर्षांपूर्वीची सत्यकथा. धावडी कुंडा जवळ रतनपूर नावाचे गाव आहे. त्या गावात रामभाऊ दुबे नावाचे एक गृहस्थ राहत होते. जे जन्मतः मुके होते. त्यांचा एक नियम होता. ते भल्या पहाटे उठून सीतावनाच्या घनदाट जंगलातून नर्मदा स्नानासाठी जायचे. एके दिवशी स्नान करून परत येताना त्यांना एका वृद्ध संन्याशाचे दर्शन होते. तो संन्याशी म्हणतो…… एवढ्या भल्या पहाटे कोण या मार्गाने येत आहे? दूर हो!
रामभाऊ दुबे त्या संन्याशाच्या मार्गातून दूर होतात. त्या संन्याशाला प्रणाम करतात आणि म्हणतात….. मी एक गरीब ब्राह्मण आहे!
रामभाऊ घरी येतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपण बोलू लागलो आहोत! घरातील सर्वांना आनंद होतो. सर्व मिळून त्या संन्याशाचा शोध घेतात. पण पुन्हा कधीच त्या संन्याशाचे दर्शन घडले नाही!
नर्मदा किनारी असे अगणित चमत्कार घडले आहेत. कारण हि तपोभूमी आहे! असंख्य संतांच्या साधनेने पवित्र झालेली आहे! देव – दानव – ऋषी – महर्षी यांनी केलेल्या यज्ञाची पुण्याई आजही इथे नांदत आहे! नर्मदाजीच्या जंगलात…. डोंगरातील गुहेत किंवा एखाद्या रमणीय स्थळांवर अनेक महात्म्यांनी ईश्वर साधनेत आयुष्य घालवले आहे!
शंकराचार्यांना गुरु प्राप्ती इथेच झाली होती …… संत कबीरांनी नर्मदा मैयाच्या सहवासाचा आनंद लुटला होता……. गुरु नानक देव इथे काही काळ रमले होते……. अमरकंटकच्या जंगलात त्रैलंग स्वामींनी साधना केली होती……. योगी अरविंदाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल याच नर्मदा काठावर झाला होता…… स्वामी विवेकानंद इथे आले होते …… किती नावे घ्यावीत? कुणा कुणाचे स्मरण करावे!
कमलभारती महाराज…… गौरीशंकर महाराज…… धुनीवाले बाबा…… आपले थोरले महाराज (परमपूज्य परमहंस श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज), त्यांचे बंधू सिताराम महाराज, श्रीरंगावधूत महाराज, मायानंद चैतन्य महाराज, सिंगाजी महाराज, स्वामी ओंकारानंदगिरी, श्री राम महाराज …… नर्मदा खंडाच्या गळ्यातील ताईत असलेले श्री सियाराम बाबा, झालंच तर ओंकारेश्वर येथील शुकमुनी, आता आता ब्रम्हलीन झालेले पायलट बाबाजी ….. अशा अगणित संतांच्या साधनेच्या पुण्याईचे डोंगर या नर्मदा किनारी उभे आहेत! यांच्या तपश्चर्ये मुळेच हा नर्मदा किनारा सिद्ध किनारा झाला आहे! इथे पावलोपावली तीर्थ स्थाने निर्माण झाली आहेत! आणि म्हणूनच आपण जेव्हा परिक्रमेत असतो तेव्हा या सिद्धांनी सिद्ध केलेल्या स्थानांमुळे आपले जीवनही अनायासे कृतार्थ होते!
सुमारे तीनशे वर्षांपूर्वी नर्मदापुरम् इथे श्री रामजी बाबा यांनी जीवंत समाधी घेतली होती! आजही या समाधी स्थळाचे लाखो भाविक दर्शन घेतात.
अशा रामजी बाबांच्या आश्रमात एके दिवशी हिमालय यात्रेला निघालेल्या ५०० साधुंचा जत्था अचानक येतो. अर्थात आश्रमात आलेल्या साधूंचे स्वागत करणे क्रमप्राप्त होते! आश्रमात काय होते ? चार पेढे आणि थोडेसे दही! शिष्यांनी रामजी बाबांना सांगितले की आश्रमात फक्त चार पेढे आणि थोडेसे दही आहे म्हणून. रामजी बाबा म्हणाले एक काम करा. चार मोठ्या टोपल्या आणि एक मोठे भांडे आणा. बाबाजींच्या सांगण्यावरून वस्तू आणल्या गेल्या . रामजी बाबांनी प्रत्येक टोपलीत एक एक पेढा ठेवला आणि मोठ्या भांड्यात दही ठेवले. त्या सर्वांवर एक सफेद कपडा टाकून म्हणाले…… साहब देवेगा!
……. आणि आश्चर्य घडले! त्या चारही टोपल्या मिठाईंनी भरल्या! मोठ्या भांड्यात अमृततुल्य चवीचे दही काठोकाठ भरले होते! ५०० साधू तृप्त झाले!
बुधनीच्या डोंगर माथ्यावर भृगनाथ नावाचे तपस्वी राहत होते. लोक सांगतात की, श्री भृगनाथ महाराजांना भेटायला रामजी बाबा नर्मदा मैयावरून चालत जात असत! श्री रामजी बाबांचे अनेक चमत्कार इथे प्रसिद्ध आहेत! असे हे श्री रामजी बाबा खरे सिद्ध संत होते!
नर्मदा किनारी एक संत होते….. त्यांचे नाव श्री दूबवाले बाबा! दूबवाले बाबा परिक्रमेत असताना एके ठिकाणी जेवणासाठी भिक्षा मागताना अधिकचे तूप मागतात. अधिकचे तूप मागितले म्हणून यजमान त्यांचा अपमान करतो. दूबवाले बाबांना आपली चूक उमगते. ते तसेच मैयाच्या किनारी जातात……. आणि हातातील सर्व भिक्षा मैयार्पण करतात! त्यानंतर त्यांनी कधीही अन्न ग्रहण केले नाही. परिक्रमा संपन्न झाल्यावर मैया किनारी एक कुटी बांधून राहू लागले! सुरुवातीचे काही दिवस त्यांनी नर्मदा मैयाचे जल प्राशन केले. आणि नंतर त्यांनी नर्मदा किनारी सापडणारे लुसलुशीत गवत…. ज्याला स्थानिक भाषेत दूब म्हणतात ,ते खाऊ लागले!म्हणून हे दूबवाले बाबा नावाने प्रसिद्ध झाले!
असेच एक बाबाजी होते. श्री मौनी महाराज नावाचे. चिरई डोंगरी इथे त्यांचे वास्तव्य असायचे . त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कावळ्याची भाषा अवगत होती!
एकदा सिलुवा गावी सत्यनारायण कथा सुरू असते . श्री मौनी महाराज त्यावेळी तिथे उपस्थित होते. उन्हाळ्याचे दिवस होते. आकाश निरभ्र होते. त्याचवेळी एक कावळा ओरडू लागतो. श्री मौनी महाराजांना त्या काक भाषेचा अर्थ उमगला. त्यांनी सर्वांना सूचना केली. लवकरच पाऊस पडणार आहे. तरी तातडीने सर्वांच्या भोजनाचा प्रबंध करा. ……. उपस्थितांचे भोजन आटोपले आणि पावसाला सुरुवात झाली!
अशा सिद्ध साधकांची नर्मदा किनारी कधीच कमतरता नव्हती! श्री योगानंद सरस्वती नावाचे थोरल्या महाराजांचे शिष्य होते. एकदा प्रवासात त्यांना तहान लागते. हातातील कमंडलू रिकामा असतो. ते ज्या ठिकाणी असतात तिथे एक कोरडी विहीर असते. जी पावसाळ्या व्यतिरिक्त रिकामीच असायची! श्री योगानंद सरस्वती महाराज आपला रिकामा कमंडलू त्या कोरड्या विहिरीत बुडवितात आणि विहिर पाण्याने तुडुंब भरते!
नर्मदा काठावरील संतांनी केवळ साधना केल्या….. चमत्कार केले असंही नाही. श्री रुद्रदत्त महाराज यांनी मैयाची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर अनेक गावांत संस्कृत पाठशाळा सुरू केल्या!
नर्मदा किनारी महिला संत देखील अनेक झाल्या. मोरटक्काच्या रमाबाई माताजी……सेठानी घाटावरील जानकीदास बाई …… कौसल्यादास बाई ….. शत्रुघ्नदास बाई….. अमरकंटक येथे आजही दर्शन देणाऱ्या मीरामाता (कुणी यांना पगली मैया म्हणतात.)….. अशा कितीतरी तपस्विनींनी इथे साधना केली आहे! योगिनी जानकीदास बाई तर १११व्या वर्षी समाधी घेतली!
नर्मदा माईच्या कुशीत साधकांची….. तपस्व्यांची निरंतर परंपरा आहे! या योग्यांच्या मालिकेतील दोन महाराष्ट्रीयन योग्यांचा उल्लेख करावासा वाटतो!
मूळ नाशिकचे असलेले एक योगाचार्य होते. ब्राह्मण घाटावर ते फलाहारी बाबा म्हणून प्रसिद्ध होते. एकदा ते ट्रेनने प्रवास करीत असतात. ट्रेन एका स्टेशनवर थांबते. फलाहारी बाबा प्लॅटफॉर्मवर उरतात आणि ध्यानाला बसतात. ट्रेनची सुटायची वेळ होते. पण इंजिन सुरूच होईना! इंजिनची चेकिंग होते, पण तीत काहीच दोष आढळेना. सुदैवाने स्टेशन मास्तर नर्मदा किनारी राहणाराच असतो. त्याचे लक्ष फलाहारी बाबांकडे जाते आणि इंजिन का सुरू होत नाही याचा त्याला उलगडा होतो. तो फलाहारी बाबांच्या पाया पडतो. त्यांना डब्यात बसण्याची विनंती करतो . फलाहारी बाबा डब्यात बसतात आणि ट्रेनचे इंजिन सुरू होते!
सुमारे दिडशे वर्षांपूर्वीची गोष्ट! रत्नागिरीत जन्मलेले एक महाराज होते. जे स्वामी समर्थांचे शिष्य होते. ज्यांना प्रत्यक्ष स्वामींचा सहा वर्षे सहवासाचा आनंद उपभोगता आला होता! स्वामींनी समाधी घेतल्यानंतर त्यांनी चोवीस वर्षांत चार परिक्रमा पूर्ण केल्या होत्या! जे शंभर वर्षे जगले होते! आणि जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत ते सिनोर येथेच नर्मदा मैयाच्या किनारी होते!
नर्मदा काठावरील किती संतांची वर्णने करावीत ! बगलवाड्यातील गोपालानंद बाबा….. बडकेश्वर येथील श्री गंगागिरीजी महाराज…… हरदा जवळील श्री रंकनाथ बाबा…… नर्मदापूरमचे श्री रामफलजी महाराज किंवा श्री प्रियालपुरीजी महाराज….. ओंकारेश्वर, कावेरी संगमावरील श्री रामदासजी महाराज…… मोरटक्काचे ओझा महाराज….. खेडी घाटावरील श्री चंद्रशेखरनंदजी……. किती नावे घ्यावीत ! या एकेका संतांच्या स्मरणानेच आपली एक एक परिक्रमा पूर्ण होईल!
नरबदे हर हर!
महेश आत्माराम सावंत.
तोंडली, चिपळूण