अलक (अति लघु कथा)–संध्या घोलप
🔳अलक (अति लघु कथा)
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
१) तिने नवीन मोठा फ्रीज घ्यायचं ठरवलं होतं. जुन्या छोट्या फ्रिजचे पाचशे रुपये येणार होते, ते ती सहज आपल्या मैत्रिणीला सांगत होती.
तिचं साडेचार वर्षाचं पिल्लू जवळ आलं आणि म्हणालं, “आई, पाचशे रुपये खूप जास्त असतात का गं?”
“का रे?” तिने त्याला विचारलं.
“आपण आपला फ्रीज पाळणाघराच्या काकूंना देऊया ना. त्यांना त्याचा किती उपयोग होईल!”
आडातलं पोहऱ्यात आलेलं बघून तिला भरून आलं आणि तिने त्याला जवळ घेतलं.
२) पिल्लू आता थोडं मोठं झालं होतं. शाळेत environment science (म्हणजे परिसर अभ्यास) शिकत होतं. त्याच्या आजीचं निधन झालं. घरातल्या लोकांनी आजीच्या अस्थी गंगेत वाहायचं ठरवलं.पिल्लू पटकन म्हणालं, “म्हणजे आपणच नदी खराब करायची? प्रदूषण आपणच करतो ना? मग दुसऱ्यांना नावं का ठेवायची?” आजोबांना आपल्या शाळेतल्या नातवाच्या विचारांचं कौतुक वाटलं. त्यांनी त्याला विचारलं, मग काय करायचं तू सांग.
पिल्लू म्हणालं, ” आपण अंगणात झाड लावू आणि मातीत अस्थी विसर्जन करू. झाड वाढेल आणि आजी सतत आपल्या समोर असेल.” तिने पिल्लूला जवळ घेतलं.
पोहरा आता भरभरून वाहत होता.
३) पिल्लू आता खूप शिकून मोठं झालं होतं. मोठ्या कंपनीत नोकरी करत होतं. एक दिवस, एक अनोळखी व्यक्ती तिला भेटायला आली.
“तुमच्या मुलाचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे ते तुम्हाला माहित नाही.” तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
” माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला होता. त्याला ट्रिटमेंट देण्याची आमची ऐपत नव्हती. तुमच्या मुलाने तो भार उचलला. आम्हाला यश आलं नाही. पण तुमचा मुलगा, आमच्या दोघांच्या पाठीशी माझ्या मुलाच्या शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला. अश्या मुलाला जन्म दिलेल्या आईला मी मुद्दाम भेटायला आलो आहे.” तिचे डोळे वाहायला लागले.
“देणारा हात” आता तिच्याकडून पुढे गेला होता. ती निश्चिंत झाली.
—–संध्या घोलप
Excellent. संस्कार काय असतात ते असे येतात पुढच्या पिढी मध्ये