माणुसकीचं दान -दीपक तांबोळी ………कथा माझ्या ” कथा माणुसकीच्या ” या पुस्तकातील आहे
माणुसकीचं दान
-दीपक तांबोळी
“तुषार तू म्हणत होतास ना की तुला काहीतरी समाजसेवा करायचीये म्हणून.ती संधी चालून आलीये बघ.येत्या वीस तारखेला आपण एका आदिवासी पाड्यावरच्या आदिवासींना दिवाळीनिमित्त कपडे देणार आहोत.तुझ्याकडचे जुने पण चांगल्या स्थितीत असलेले कपडे काढून ठेव.आणि हो!यावेळी जी माणसं वस्त्रदान करतील त्यांचे फोटो आपण वर्तमानपत्रात देणार आहोत ”
तुषारचा सामाजिक कार्यकर्ता असलेला मित्र,प्रताप फोनवर बोलत होता.
“ओके प्रताप.मी तयार आहे.माझ्याकडे बरेच जुने कपडे आहेत.ते काढून ठेवतो” तुषार आनंदाने म्हणाला.
काहीतरी समाजसेवा करावी असं बऱ्याच दिवसांपासून तुषारच्या मनात होत़ं.या कार्यक्रमाने त्या समाजसेवेला सुरुवात होणार होती.शिवाय प्रताप म्हणाला तसे वर्तमानपत्रात फोटो छापून आले तर दुधात साखरच पडणार होती.
” अहो ऐकताय का?”
शितलच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली.
” बोल काय म्हणतेय?”
“आपली कामवाली म्हणत होती साहेबांचे आणि आकाशचे काही जुने कपडे असतील तर दिवाळीसाठी द्या म्हणून ”
” अगं आताच मी प्रतापला कबूल केलंय आदिवासींना कपडे द्यायचं.यावर्षी राहू देत कामवालीला.पुढच्या वर्षी बघू ” तुषार जरा चिडूनच बोलला.
” अहो.तुम्हांला माहितेय ना,तिचा नवरा टी.बी.च्या आजारामुळे घरीच असतो.मुलं लहान आहेत.कमावणारी ही एकटीच.तेही महिन्याला फक्त दिडदोन हजार कमावणार.काय होत असेल त्यात?आपल्या आकाशचा एक ड्रेस येतो ३-४ हजारात.ती अख्खं कुटुंब चालवते त्या दिडदोन हजारात ”
शितल त्याला समजावू लागली.
“असू दे.असंही तू तिला नेहमीच काही ना काही देत असते.यावेळी नाही दिलं तर काय बिघडलं?आणि आता मी प्रतापला कबूल करुन बसलोय.समाजसेवा करायची चांगली संधी आलीये तर त्यात तू विघ्न आणू नकोस ”
तुषार चढ्या आवाजात म्हणाला तशी शितल चुप बसली.
शेवटी तो दिवस उजाडला.तुषार त्याचे स्वतःचे आणि आकाशचे जुने इस्त्री केलेले कपडे घेऊन आदिवासी पाड्यावर जाण्यासाठी निघाला.मुख्य रस्त्यापासून ७ किलोमीटर आत जंगलात असलेल्या त्या पाड्यावर पोहचायला त्याला तब्बल एक तास लागला इतका तो रस्ता खराब होता.पाड्यावर पोहचल्यावर मात्र तिथलं द्रुश्य पाहून त्याला धक्काच बसला.इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होत असेल याची त्याला कल्पना नव्हती.तिथं एक मोठा शामियाना उभारलेला होता.त्यात पन्नास एक खुर्च्या ठेवलेल्या होत्या.त्याने चौकशी केली तेव्हा मंत्री,खासदार,आमदार आणि कलेक्टरपासून सरपंचापर्यंत सारेच झाडून हजर रहाणार असल्याचं त्याला कळलं.गरीब आदिवासींना जुने कपडे देण्याच्या कार्यक्रमात या राजकारणी लोकांची उपस्थिती कशासाठी?असा त्याला प्रश्न पडला पण व्हि.आय.पी.व्यक्तींसोबत आपले फोटो निघणार या विचाराने तुषार खुश झाला.
पाहुण्यांना यायला उशीर होता म्हणून तिथे उपस्थित असलेल्या आदिवासी तरुणाशी तुषार बोलू लागला.त्या तरुणाच्या बोलण्यावरुन तुषारला कळलं की पाचशे लोकवस्तीच्या त्या पाड्यावर कसल्याही सुविधा नव्हत्या.दोन किलोमीटरवरुन पाणी आणावं लागत होतं.म्हणायला वीजेचे खांब होते पण दिवसातून दोनतीन तासच वीज उपलब्ध असायची.काही बिघाड झाला तर आठवडा आठवडा कुणी तो दुरुस्त करायला येत नव्हतं.पाड्यावर दवाखाना नव्हता.तिथून अठरा किमी.वरच्या गावात सरकारी दवाखाना होता पण तिथे डाँक्टर क्वचितच उपलब्ध असायचे.खराब रस्त्यामुळे शहरात जाणयेणंही खुप त्रासदायक होतं.पावसाळ्यात तर त्या रस्त्यात इतका चिखल व्हायचा की मुख्य रस्त्यावर जाणंही अशक्य होऊन बसायचं.बऱ्याचदा गंभीर रुग्ण रस्त्यातच दगावायचे.अडल्यानडलेल्या गर्भारणी दवाखान्यात पोहचण्या अगोदरच प्रसुत व्हायच्या.
कुणीही या पाड्याकडे लक्ष देत नव्हतं.आदिवासींच्या जीवनमरणाशी जणू कुणालाच काही देणंघेणं नव्हतं.मात्र निवडणुका आल्या की महिनाभर राजकीय पुढाऱ्यांची तिथं वर्दळ असायची.अनेक आश्वासनांची खिरापत वाटली जायची.सुधारणांची प्रलोभनं दाखवली जायची.मात्र निवडणुका संपल्या की कुणीही इकडे ढुंकूनही पहात नव्हतं.ते ऐकून तुषार अस्वस्थ झाला.आपण शहरात किती सुखासीन आयुष्य जगतोय याची त्याला जाणीव झाली.
कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु होती.हळूहळू एकेक पाहुणा यायला सुरुवात झाली.मंत्री महोदय तब्बल दोन तास उशीराने उगवले.त्यांच्यासोबत आलेल्या आलिशान गाड्यांचा ताफा पाहून तुषारच्या मनात विचार आला की २५-३० लाखाच्या गाडीत फिरणाऱ्या या राजकीय पुढाऱ्यांना अख्ख्या आदिवासी पाड्याला नवीन कपडे घेऊन देणं सहज शक्य होतं .पण ते खिशातली दमडीही खर्च करण्याची दानत दाखवत नाहीत. सामान्य माणसाला मात्र दानाचं आवाहन करत असतात.निवडणुका आल्या की मग मात्र दानशुरपणाचा आव आणतात.
भाषणांची सुरुवात झाली.प्रत्येक वक्ता आपल्या भाषणात त्याला गरीबांचा किती कळवळा आहे हे मोठ्या हिरीरीने मांडत होता.त्याचबरोबर प्रतापची स्तुती करत होता.त्या स्तुतीने प्रतापचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.ते पाहून तुषारला मात्र प्रतापसारख्या समाजसेवकाकडे कसलाही उद्योगधंदा न करता सोळा लाखाची गाडी आलीच कशी हा प्रश्न पडला होता.
भाषणं संपता संपत नव्हती. दुपारचे दोन वाजून गेले.तोपर्यंत समोर उन्हात बसलेले आदिवासी कंटाळून गेल्याचं तुषारला स्पष्ट जाणवत होतं.तो स्वतःही कंटाळून गेला होता.कार्यक्रम वस्त्रदानाचा आहे की राजकीय पक्षांच्या प्रसिध्दीचा हेच त्याला कळेनासं झालं.
शेवटी एकदाची भाषणं संपली.मग मंत्री,खासदार ,आमदार आणि प्रतिष्ठितांच्या हस्ते वस्त्रदान झालं.आदिवासींना कपडे देतांना प्रत्येक पुढारी हौसेने फोटो काढून घेत होता.
कपडे वाटून झाले आणि ज्याची तुषार आतुरतेने वाट पहात होता तो क्षण आला.सगळ्या वस्त्रदात्यांना बोलावून प्रतिष्ठितांसोबत फोटोसेशन झालं.मंत्री,आमदार, खासदारांसोबत फोटो काढून घ्यायची प्रत्येकाला घाई झाली होती.त्यासाठी प्रचंड रेटारेटी सुरु होती.ही समाजसेवा आहे की पब्लिसिटी स्टंट हेच तुषारला समजेनासं झालं.कपडे मिळालेले आदिवासी केविलवाण्या नजरेने हा तमाशा पहात होते.
वैतागलेल्या अवस्थेत तुषार घरी आला.कार्यक्रम कसा झाला हे शितलला सांगण्याचीही त्याला इच्छा उरली नाही.
दुसऱ्या दिवशी तो उत्सुकतेने सात आठ वर्तमानपत्रं विकत घेऊन आला.बातमी होती पण सर्व वर्तमानपत्रात मंत्री,आमदार,खासदार आणि त्यांच्यासोबत प्रतापचे फोटो होते.एकाही वर्तमानपत्रात तुषारचा फोटो नव्हता.चमकोगिरी करणाऱ्या या लोकांचा त्याला संताप आला.त्या संतापातच त्याने प्रतापला फोन लावला.त्याने तो उचलला नाही. तीन चार वेळा प्रयत्न केल्यावरच त्याने तो उचलला.
” यार प्रताप ज्यांनी कपडे दान केले त्यांचा कुणाचाच फोटो पेपरमध्ये नाहीये.सगळे मंत्री आणि आमदार,खासदारांचेच फोटो आहेत.” तुषार जरा रागानेच बोलला.
” हो मी पाहिले फोटो.आपण तर सगळे फोटो दिले होते.पण जागेअभावी त्यांनी ते दिले नसावेत.आणि हे तर तुलाही माहितेय तुषार की न्युज व्हँल्यू असल्याशिवाय पेपरवाले कोणतेही फोटो आणि बातमी टाकत नाहीत आणि राजकारणी व्यक्तींशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला न्युज व्हँल्यू येत नाही म्हणून त्यांचेच फोटो पेपरमध्ये टाकावे लागतात.हाच कार्यक्रम आपण राजकारणी पुढाऱ्यांना न बोलावता केला असता तर वर्तमानपत्रांनी त्या कार्यक्रमाची दखलसुध्दा घेतली नसती किंवा घेतलीही असती तर ती बातमी अगदी छोटीशी एखाद्या कोपऱ्यात टाकली असती.अशा बातमीला काहिच किंमत नसते ”
तुषार काय समजायचं ते समजला.जे खरे दानी होते त्यांना कुणीही किंमत देत नव्हतं.भ्रष्ट मार्गाने निवडून आलेल्या,जनतेच्या पैशावर ऐश करणाऱ्या, गरीबांचा वाली असण्याचं सोंग घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे आणि स्वतःच्या प्रसिध्दीसाठी समाजसेवेचं नाटक करणाऱ्या प्रतापसारख्या समाजसेवकांचे फोटो मात्र वर्तमानपत्रात दिमाखात झळकत होते.तुषारने न बोलता फोन कट केला.या अशा दिखावू समाजसेवेत फक्त वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळते म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्याने स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहीली.
दुसऱ्या दिवशी तो शितलला म्हणाला “अगं,आपल्या कामवालीला तिच्या नवऱ्याचे आणि मुलांचे जुने कपडे मापासाठी आणायला सांग.मी माझ्या काही मित्रांशी बोललोय.ते त्यांचे जुने कपडे देणार आहेत ”
शितलला एकदम हायसं वाटलं
“चला बिचारीची दिवाळी आनंदात तरी जाईल ” ती समाधानाने म्हणाली.
धनतेरसच्या दिवशी तुषारने शितलला सांगून कामवाली आणि तिच्या कुटुंबाला घरी बोलावून घेतलं.त्यांना बसायला सांगून तुषार घरातून कपड्यांच्या पिशव्या घेऊन आला.त्याच्या हातातल्या रेडिमेड कपड्यांच्या पिशव्या पाहून शितलला आश्चर्याचा धक्काच बसला.
“अहो हे तर नवेकोरे कपडे दिसताहेत.तुम्ही तर जुने कपडे देणार होतात ना?”
” हो शितल.पण माझ्या लक्षात आलं की यांना जुने कपडे द्यायचे आणि आपण मात्र नवीन कपड्यांनी दिवाळी साजरी करायची?माझ्या मनाला ते पटेना म्हणून त्यांच्या मापाचे नवीन कपडेच विकत घेऊन आलो ”
कामवालीचे आणि तिच्या नवऱ्याचे डोळे अश्रूंनी भरुन आले.तिच्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले.तुषार त्यांना कपडे देत असतांनाच शितल आतून नवीकोरी साडी घेऊन आली आणि कामवालीला देऊन म्हणाली
“सगळ्यांना नवीन कपडे झाले मग तूच कशाला मागे रहातेस?तुही नवीनच साडी घे”
तेवढ्यात आकाश मोबाईल घेऊन पुढे आला
” थांबा आई बाबा .कपडे देतांना फोटो काढू या”
तुषार त्याला थांबवत म्हणाला
“नको बेटा फोटो नको काढू.ही काही राजकारण्यांची दिखावू आणि स्वार्थी समाजसेवा नाहीये.हे माणुसकीचं वस्त्रदान आहे ”
© दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या ” कथा माणुसकीच्या ” या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी क्रुपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा )