“भाऊबीज” ✍🏻 सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
“भाऊबीज” 💜💜
✍🏻 सौ. अतुला प्रणव मेहेंदळे
“ए सोनाली, थांब.. तू काय करतेस इथे? जा तुझ्या आजीला मदत कर.” आक्कांनी पार्थ म्हणजेच त्यांच्या नातवाजवळ जात सोनाली ला जवळजवळ खोलीबाहेर पिटाळलं. तेवढ्यात माधवी म्हणजेच आक्कांची सून तिकडे आली. “काय गं माधवी, त्या मोलकरणीच्या नातीला काय आपल्या पार्थसोबत खेळायला देतेस? ती कुठे आपण कुठे..
माधवीला आक्कांच्या ह्या बोलण्याचा राग आला खरंतर पण ती त्यावेळी तरी काहीच बोलली नाही. ती पार्थला कडेवर घेऊन दुसऱ्या खोलीत गेली.
माधवी देसाईला आता, सौ. माधवी अमित लालसरे होऊन पण १३ वर्षांचा काळ लोटला होता. माधवी खरंतर शिक्षिका! पण कधीही सुट्टीवर नसलेली माधवी मात्र पार्थला घरी आणल्यावर ४ महिन्यांची पगारी सुट्टीच घेऊन त्याच्या करण्यात पूर्णपणे व्यस्त झाली.
तिला आत्ताही जुने सगळे दिवस आठवत होते.
कारण ते विसरण्यासारखे अजिबातच नव्हते. आक्का खरंतर गावी असायच्या. आणि माधवी-अमित कामानिमित्त मुंबईला असायचे. पण लग्नानंतरचे गुलाबी दिवस आणि एखाद दुसरं वर्ष सोडलं तर आक्कांनी तिला नातू हवा म्हणून प्रचंड भंडावून सोडलं होतं.
तसं दोघांचं प्लॅनिंग वगैरे काही नव्हतं आणि दोघांना मूल हवं होतं पण ते नेहमीच आपल्या हातात नसतं हे दोघंही ओळखून होते.
शिवाय अमित आईच्या मर्जीनुसार वागणारा मुलगा त्यामुळे तो ही काहीच बोलायचा नाही. पण अमित माधवी ला छान समजावून सांगायचा. “तू अजिबात आईचा विचार करू नकोस. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहू. शेवटी देवाच्या मनात असेल तेच होणार.” पण दोघांमध्येही काहीच दोष नसताना लग्नाला १२ वर्ष होऊनही पाळणा हलला नाही म्हणून त्यांनी मूल, विशेषतः आक्कांची मर्जी नसताना बाळ आणतोय म्हणून एक मुलगा, दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो आक्कांच्या गळी हुशारीने उतरवला.
माधवी आता ‘८ महिन्याच्या पार्थची आई’ हे बिरूद मानाने मिरवत होती. आणि पार्थच्या घरी येण्यामुळे आक्का आता इथेच येऊन रहात होत्या. पण गप्प बसतील त्या आक्का कसल्या. रोज उठून काहीतरी नवीन होतंच. सध्या तर सारखं सोनालीवरती लक्ष असायचं त्यांचं.
सोनाली म्हणजे घरकाम करणाऱ्या मावशींची ६ वर्षांची नात. माधवीचं लग्न झाल्यापासून तीच्याकडे या मावशी होत्या सगळं घरकाम करायला. माधवी अगदी बिनधास्त त्यांच्यावर घर सोपवून कामाला नोकरीला जायची इतक्या त्या विश्वासातल्या होत्या. त्या ही माधवीचं घर आपलं समजून काम करायच्या. मावशींच्या मुलाचा आणि सुनेचा सोनालीच्या जन्मानंतर २ वर्षांनी ट्रेन दुर्घटनेत अपघात झाला आणि ते तत्क्षणीच निवर्तले. त्यामुळे मावशी नेहमीच सोनालीला घेऊन येत होत्या. आताशा माधवी आणि अमितला पण सोनालीचा लळा लागला होता. ती घरातलीच एक असल्यासारखी झाली होती. ती पोर होतीच अगदी लाघवी चुणचुणीत, प्रेमळ आणि समजूतदार.
पण आक्कांना तिने पार्थच्या जवळ गेलेलं अजिबात खपायचं नाही. त्याप्रमाणे आजही त्यांनी हटकलं. पण प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा सोनालीला मावशी घेऊन येत असत तेव्हा तेव्हा आक्का तिच्याशी अगदीच फटकून वागत होत्या. तिला पार्थच्या खोलीत अजिबात जाऊ द्यायच्या नाहीत. खरंतर तिचं असं तिकडे जाणं, त्याच्याविषयी ओढ वाटणं अगदीच बालसुलभ होतं. तिच्या वयाला अनुसरून होतं. सोनाली पण सारखी काही न काही कारण काढून पार्थजवळ येत-जात रहायची. ती पण तशी हट्टीच. माधवी हसून मनात म्हणायचीसुद्धा,” बरं आहे एका ठकास सोनाली नामक महाठक मिळाली आहे.”
इतक्यात आक्कांनी माधवीला बोलावून घेतलं आणि माधवीची विचारांची तंद्री भंग पावली.
“माधवी, अगं दिवाळी जवळ आली आहे. यावेळी तुला काही फराळ बनवायला जमेल असं वाटत नाही. आणि मला काही एवढ्या सगळ्यांचं बनवायला या वयात जमणार नाही तेव्हा बाहेरून आण फराळ.” त्या अगदी कुजकट शब्दात म्हणाल्या. त्यावर माधवी पण ठसक्यात म्हणाली, “अहो आई नको. मी आणि मावशी मिळून बनवू ना फराळ. आणि पार्थकडे बघायला आहातच की तुम्ही.” पुढच्या एक दोन दिवसातच फराळ तयार झाला. माधवी ने सगळी तयारी केली. मावशींनी आणि सोनालीने तिच्या चिमुकल्या हातांनी खूप मदत केली. पण दिवाळीच्या दोन दिवस आधी सोनाली बाईंचा पापड वाकडा झाला आणि ती आलीच नाही. पुढेही दोन दिवस आली नाही. मग मात्र माधवीला चुकचुकल्यासारखं झालं.
तिने अमितला पण हे सांगितलं. तो म्हणाला, “अगं तू विचार ना मावशींना. बरं नसेल तर आपण करू सगळी मदत. आपलीच आहे ती.” या बोलण्याने तिला धीर आला. तिने शेवटी मावशींना दुपारी आक्का वामकुक्षी घेत असताना विचारलं, “मावशी सोनाली नाही आली दोन दिवस. सगळं ठीक आहे ना?” मावशी मान खाली घालून बोलल्या, “काय सांगू तुम्हाला ताई. सारखी माझ्या मागं लागली आहे. यावेळी म्हणे मी पण ओवाळणार भावाला. आता तुम्हाला तर माहिती आहे माझं असं या जगात बाकी कुणीच नाही. चाळीत आजूबाजूला बघते ना ती भाऊबीजेला काय करतात ते. पण तुम्हीच सांगा कशी पुरी करू हीची ही इच्छा.
६ वर्षाची लहान पोर ती! तिला काय सांगू आता कळतंच नाही मला. नसता हट्ट या पोरीचा. परवापासून घरात नुसती बसून असते.” माधवीला खूप वाईट वाटलं. कधीही कसला हट्ट न करणाऱ्या सोनालीसाठी आपण काहीच करू शकत नाही याचं तिला वैषम्य वाटलं. याच विचारात माधवी रात्रीपर्यंत होती. ती ही जराशी गप्प गप्प आहे बघून अमित ने तिला रात्री विचारलं. आणि हिने घडला प्रकार सांगितला. त्यावर त्याने पण खूप विचार करून एक उपाय सांगितला आणि माधवीला तो मनापासून पटला.
तिने तर आनंदाने अमितला मिठीच मारली. दिवाळीचे दोन दिवस कसे छान गेले. पाडवा ही झाला. “यावेळी अमितने पाडव्याचं काहीच कसं दिलं नाही.” या विचारात आक्का होत्या. पण देईल मागून असं वाटून त्या गप्प बसल्या. माधावीने मात्र मावशींना उद्यासाठी सुट्टी दिली आणि ‘संध्याकाळी सोनालीला छान गिफ्ट द्यायचं आहे त्यामुळे काहीही झालं तरी घेऊन याच!’ अशी सक्त ताकीद दिली.
माधवीचा भाऊ बंगलोरला आणि अमितला सख्खी बहिण नसल्याने आज शांतता असणार अशा बेतात दुसऱ्या दिवशी आक्का होत्या. पण माधवीने दुपारी स्वतःच्या हाताने रव्याचा केक, कोथिंबिरीची पुडाची वडी, बटाटा भाजी, पुलाव आणि गरमगरम पुऱ्या असा जंगी बेत आखला. सगळी तयारी झाली. अमित हे सगळं आनंदाने बघत होताच. आज त्याने स्वतः पार्थला छान तयार केलं. आणि संध्याकाळी मावशी आणि तोंड पार सुकून गेलेली सोनाली आले.
आक्कांचा पारा चढला. त्यांनी हळूच विचारलं, “जळलं मेलं लक्षण ते! ह्यांना कशाला आज बोलावलं आहेस. आणि मगाचपासून विचारेन म्हणतेय एवढी तयारी कशाला केली आहेस? आपल्याकडे तर भाऊबीज नाहीये.” त्यावर माधवी हसतच तिकडून बाजूला झाली. तिने उत्तर देण्याचं टाळलं. नंतर एक पाट मांडून त्यावर बाजूने रांगोळी काढून ठेवली. आज तिने मावशींना काही करू दिलं नाही. थोड्या वेळाने अमित पार्थला मांडीवर घेऊन पाटावर बसला.
तेव्हा न रहावून आक्का मध्ये बोलल्याच, “हे रे काय अमित? अरे आज भाऊबीज आहे. पाडवा काल झाला. काल गिफ्ट द्यायचं होतं. तूझा आज काही द्यायचा विचार आहे की काय?” असं म्हणून त्या हसल्या. त्यावर अमित शांतपणे म्हणाला, ” आई तसं समज. फक्त आज इथे जे काही होईल त्यात कृपया मध्ये बोलू नकोस. आता आम्ही मोठे झालोय. आणि काही निर्णय हे कृपा करून आमचे आम्हाला घेऊ देत. इतके दिवस तुझं ऐकलं कधीही तुझ्या शब्दाबाहेर गेलो नाही.
पण यावेळी एक वेगळ्या प्रकारची दिवाळी आमच्या आयुष्यात येतेय त्याला हसत सामोरी जा आणि आशीर्वाद दे. नाहीतर चार दिवसांनी तुझं गावी जायचं तिकीट काढून देतो. माधवी ये तू अशी समोर. ” आता मात्र माधवी निर्धाराने, इतका वेळ तोंड पाडून बसलेल्या, सोनालीजवळ गेली आणि तिने हात हातात धरून सोनालीला सांगितलं, ” बाळ सोनाली, तुला कुणालातरी ओवळायचं होतं ना भाऊबीजेला. तू आपल्या पार्थला ओवाळशील? माझ्या पार्थची मोठी ताई म्हणून! ” सोनालीचा चेहरा खुलला. बाकी काही कळलं नसलं तरी पार्थला ओवाळायला मिळणार म्हणून ती लगेच टाळ्या वाजवत गोड हसायला लागली. आक्का मात्र रागाने लालबुंद झाल्या. हे पाहून मावशीच पुढे बोलल्या
“ताई हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही कुठे आम्ही कुठे? नका ताई वेड्या जीवाला आस लावू. पोर काहीही हट्ट करेल म्हणून काय आपण पूर्ण केला पाहिजे असं नसतं.” यावर माधवीने त्यांना बसवलं. ती समजावणीच्या स्वरात पुढे म्हणाली, “मावशी यात आस वगैरे काही नाही. अहो खरं सांगू का? आम्हाला खरंतर एक मुलगीच हवी होती दत्तक म्हणून.
पण आईंचा तगादा म्हणून आम्ही मुलाला निवडलं. आणि पार्थ तर आता आमच्या गळ्यातला ताईत झाला. पण शेवटी मनातली मुलीची इच्छा तशीच राहिली ना? म्हणून तुमच्या भाऊंनीच मला हा छान उपाय सुचवला. कागदोपत्री नसलो तरी आम्ही आजपासून सोनालीचे पालक आहोत. तिला आता इथेच राहूदे.
अशीही दोन-तीन महिन्यात मी कामाला जायला लागले की तुम्हीच तर या दोघांचं करायचं आहे आजी म्हणून… ती आता आमची मोठी लेक आहे. आणि पार्थची मोठी बहीण आहे. तिचं सगळं शिक्षण, कपडालत्ता आणि सगळ्यात महत्वाचं तिच्यावर प्रेम आम्हीच करणार. आता हे बहिण-भाऊ एकत्र वाढतील आमच्या मायेच्या सावलीत. आणि यात कुणालाही काहीही आक्षेप असायला नको. हा निर्णय आमचा दोघांचा आहे. आणि तो पक्का आहे.” हे ऐकून आक्का आत निघून गेल्या, पण आता त्याची कुणालाच पर्वा नव्हती.
सोनालीने माधवीच्या मदतीने पार्थला भाऊ म्हणून ओवाळलं. हे बघून मावशी मनात म्हणत होत्या, “आता मी आनंदाने डोळे मिटायला मोकळी.” आणि अमित ने माधवीच्या कानात हळूच विचारलं, “काय मग राणी सरकार, आता खुश आहात ना? लेकीची हौस पूर्ण झाली. आणि पाडवा पण तुम्हाला हवा तसा साजरा झाला.” माधवी ने आनंदाश्रू भरल्या डोळ्यांनीच अमितला होकार दिला. दिवाळीला आपलं चौकोनी कुटुंब पूर्ण झाल्याचं समाधान आज त्या दोघांच्या चेहऱ्यावर झळकत होतं.
ll शुभं भवतु ll
( कथा आवडल्यास नावासकट जरूर शेअर करा ही विनंती.😊🙏🏻 आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…🎉🎊)