Classified

सहवास ——– लेखक -प्रदीप केळुस्कर

————–सहवास ——–
लेखक -प्रदीप केळुस्कर
9307521152/9422381299
मी सुमनमावशीच्या प्लॅटमध्ये बसलो होतो. ऑर्थोपेडीक सर्जनकडे मावशीला न्यायचे होते. तिच्या गुढग्याचे ऑपरेशन करावे लागणार होते. मावशीच्या घरी मावशी एकटी. तिचे यजमान चार वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्याना मुलबाळ नव्हते. मावशीचे यजमान मोठया कंपनीत नोकरीला होते, मावशी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली होती. मुंबईतील ही अख्खी बिल्डिंग त्त्यांची होती. भरपूर भाडे येत होते. खुप संपत्ती होती पण पैसे खर्च करणे तिच्या जीवावर येई. प्रत्येक रुपया रुपया साठी ती वाद घालायची.आता ऑपरेशनसाठी लागणाऱ्या खर्चासंबधी बोलायला मी आलो होतो.
मावशी -तू विचारलंस का हॉस्पिटलमध्ये खर्चाच.. आधी पासून कोटेशन घे नाहीतर मुंबईतील हे डॉक्टर्स लुबाडतात पेशन्टना.
मी -होय, मी सगळी चौकशी करून आलोय. एकाच गुढग्याच ऑपरेशन करायचंय तर चार लाखपर्यत खर्च येईल.
मावशी -बापरे, चार लाख.. एवढे?
मी -त्या हॉस्पिटलमध्ये विशेष सेवा असते… ऑपरेशननंतर फिजिओची गरज लागते किमान चार महिने. त्या हॉस्पिटलचा फिजिओ घरी येऊन उपचार करतो, शिवाय नर्सिंगवगैरे टॉप असत त्या हॉस्पिटलमध्ये म्हणून…
मावशी -त्यापेक्षा साधे हॉस्पिटल बघ.. मालिश काय कोणी पण बाई करेल.
मी -मावशी, काय करणार आहेस त्या पैशांचं.. बँकेत ठेऊन काय उपयोग.. स्वतः साठी उपचार तर करून घे.
मावशीं -असे काही खुप पैसे नाही आहेत आमच्याकडे..सर्वाना वाटतं हिच्याकडे खुप पैसा पडलाय.. पण यांच्या आजारपणात किती खर्च झाले?
मी -मला सर्व माहित आहे, मी काकांचा मेडिक्लेम काढला होता, त्यामुळे त्यान्च्या आजारपणात किती खर्च झाला आणि किती कंपनीकडून मिळाला हे माझ्यापेक्षा जास्त कुणालाच माहित नसणार.
मावशी -बरं बरं.. काय ते हॉस्पिटलच ठरव आणि या ऑपरेशननंतर मी पाच सहा महिने घरात काही करू शकणार नसेन तर बाई बघायला हवी… आंघोळ बाथरूममध्ये न्यायला.. जेवण करायला.. बाजारहाट करायला.
मी -मुंबईमध्ये अशा बायकासाठी एजन्सी आहे, मी त्याची चौकशी करतो आणि ऑर्डर कळवतो.
मावशी -छे छे, तसल्या भैय्याबायका नको माझ्या घरात. त्या एजन्सी यूपीबिहार नाहीतर मद्रासी बायका पाठवतात, त्या नको.
मी -मग कसली बाई हवी.. आता कामवाली बाई मिळणे खुप कठीण झाले आहे.
मावशीं -तू आपल्या गावाकडची बाई बघ. त्याना माहित असते आपल्या चालीरीती.. जेवणाची पद्धत.

मी -अग आपल्या गावामध्ये शिक्षण पोहोचलाय, सर्वांनी शिक्षण घेतलं, सरकारी योजना पण गावात गेल्यात, आता बहुतेक लोकांची परिस्थिती सुधारली, आता आपल्याकढची बाई मिळणे कठीण..
मावशी -तू शोध.. एवढे मावशीसाठी कर.. जोपर्यत बाई मिळतं नाही तोपर्यत मी ऑपरेशन करून घेणार नाही.
आता आली पंचाईत, मावशीचे ऑपरेशन करून घेणे आवश्यकच होते,आताच तिला खाली बसता येत नव्हते, जिने चढता उतरता येत नव्हते आणि गुढगे दुखतं होते.
काहीतरी करायला हवे होते, काय करावे असा विचार करुंन मी माझ्या पुतण्याला फोन केला.
माझ्या पुतण्याला सांगितले सहा सात महिन्याकरिता कोणी गरजू आणि विश्वासू बाई बघ, आपल्या मावशीच्या घरात.. मावशी कशी आहे, हे तुला माहित आहे.. म्हणून..
पुतण्याने तिसऱ्या दिवशी उषा नावाच्या बाईची माहिती दिली. उषा ही आमच्या गावातील कुंभारवाडीतील, ती लग्न करून दुसऱ्या गावात गेली, तिला एक मुलगी झाली पण तिचा नवरा करोनामध्ये गेला आणि सासरी दीर जाऊ तिला थारा देईनात, म्हणून ती मुलीला घेऊन माहेरी आली. तिची मुलगी आता आठवीत शिकते आहे.
माझ्या पुतण्याने तिची शिफारस केली, चांगल्या वर्तनाची बाई आहे आणि मनमिळाऊ आहे, तिची मुलगी पण चुणचुणीत आहे, अर्थात तिची मुलगी मामाकडेच राहील कारण तिची शाळा आहे.
मी मावशीला कल्पना दिली आणि पुतण्याला उषाला मुंबईत आणायला सांगितले.
दोन दिवसांनी माझा पुतण्या उषाला घेऊन माझ्याकडे आला. माझ्याकडे ती दोन दिवस राहिली, यावेळी माझ्या पत्नीने तिला सुमनमावशीच्या स्वभावाची कल्पना दिली.
शनिवारी मी उषाला मावशीकडे घेऊन गेलो. मावशी कोचवर बसुन पाय दाबत होती, उषाला माझ्यासोबत पहिल्यानंतर ती मला सांगायला लागली
“अरुण, हिला सांग माझ्या खोलीत कुणी आलेलं मला आवडत नाही फक्त लादी पुसण्यासाठी यायचं, माझ्या कपाटाला किंवा रूममधील कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही.. माझ्या रूमला जोडून संडासबाथरूम आहे, तो वापरायचा नाही, इतरांना वेगळी सोय घरात आहे, रोज मला विचारून जेवण नाश्ता बनवायचा, उगाच वस्तू खुप आहेत म्हणून जास्ती बनवायच्या नाहीत, तेल थोडं वापरायचं. भांड्याची पावडर, कपड्याची पावडर कमी घालायची, कपडे भांडी स्वच्छ व्हायला हवीत. वाणसामान, भाजी आणल्यानंतर मला हिशेब द्यायचा ‘.
मी मावशीला म्हणालो “अग, तिला मी आणि समिधाने कल्पना दिलेली आहेच आणि तुझे ऑपरेशन झाले की समिधा दोन दिवस येथे राहील म्हणजे तिला सर्व समजेल, तू काळ्जी करू नकोस, आता हॉस्पिटलची तारीख ठरवू.’
शेवटी मी ऑपरेशन तारीख ठरवली आणि मावशीला ऍडमिट केले.
दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाले, ऑपरेशनबद्दल डॉक्टर समाधानी होते, मी आणि समिधा होतोच आमच्यासोबत उषा होतीच.
रात्री उषाने बनवलेले जेवण घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो. मावशी व्यवस्थित जेवली म्हणजे तिला जेवण आवडले असणार नाहीतर तिने जेवणाला नाव ठेवले असते.
दोन दिवसांनी मावशी घरी आली, आता तिला वेदना सुरु झाल्या. हॉस्पिटलचा फिजिओ येऊन ट्रीटमेंट देत होताच पण उषा गरम पाण्याने शेकत होती, जेवण, पाणी औषधे हातात आणुन देत होती.
मावशी उषाच्या तक्रारी करत नव्हती याचा अर्थ उषा तिला तक्रार करायला जागा ठेवत नव्हती. उषाने बनवलेले जेवण मी आणि समिधा जेवलो होतो, तिचे जेवण आमच्या पद्धतीप्रमाणे होते.
रविवारी संध्याकाळी मी आणि समिधा मावशीकडे गेलो, तेंव्हा उषा मावशीच्या हाताला धरून थोडं थोडं चालवत होती आणि मावशी हळूहळू पाय टाकत होती.
एप्रिल महिना लागला. मी मावशीकडे गेलो असताना उषा माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली
“भाऊंनू, माज्या चेडवाक आता सुटी पडतली, दोन महिने शाळा नाय.. माका वाटा होता चेडवाक हय आणूचा, दोन महिने रवात माज्याबरोबर, तुमी मावशेक विचारा ”
मी मावशीला “उषाच्या मुलीला दोन महिने रजा आहे, तेंव्हा ती तिच्याबरोबर रहाण्यासाठी इथे येते आहे, मग त्या दोघी जूनमध्ये एकदमच गावी जातील कारण तोपर्यत उषाला पण सहा महिने होतं आहेत, असे सांगितले. उषाची मुलगी इथे येते आहे हे ऐकून मावशीच्या डोक्याला आठ्या पडल्या. तिने उषाला बोलावले आणि सांगू लागली.
“अरुण म्हणतो आहे, तुझी मुलगी रजेत इथे येते आहे पण मला शांतता लागते, गडबड गोंधळ चालत नाही, मुलांनी सतत मोबाईल पहाणे, अचकट विचकट गाणी म्हणणे मला आवडत नाही हे लक्षात ठेव. माझ्या खोलीत कुणी आलेले मला आवडणार नाही, बाकी तुला माहित आहेच.. घरात जे बनेल तेच तिने खायचे.. तिच्यासाठी वेगळे काही बनणार नाही ‘.
उषा माझ्याकडे पहात होती, मी तिला मान हलवायला सांगितली, तशी तिने मान हलवत “होय.. होय म्हंटले आणि एका शेजारच्या माणसांसोबत उषाची मुलगी नंदा मावशीकडे आली.
नंदा आठवीत होती म्हणजे बारातेरा वर्षाची. मी तिला पाहिले तेंव्हा माझ्या लक्षात आले ती चुणचुणीत मुलगी आहे, काळीसावळी असली तरी बोलघेवडी आहे.. सतत हसत राहायची. आता हिचे घरात रहाणे मावशीला किती रुचते हे पाहायचे, कारण ती दोन महिने रहाण्याच्या दृष्टीने आली होती.
नंदा तिच्या आईसोबत आली त्या रविवारी आम्ही दोघ मावशीकडे गेलो. मावशी तिच्या खोलीत टीव्ही पहात होती आणि उषा आणि नंदा खाली बसल्या होत्या आणि टीव्ही पहात होत्या, मला थोडे आश्यर्य वाटले कारण आपल्या खोलीत कुणालाही न घेणारी मावशी या दोघींसमवेत टीव्ही पहात होती. आम्हाला पहाताच उषा उठली आणि पाणी आणायला गेली, तिच्यापाठोपाठ नंदा पण उठली. नंदाने दोन ग्लासातून पाणी आणुन दिले, पाणी पिऊन होतं न होतं तोपर्यत चहा आणि बिस्किटे घेऊन उषा आली.
समिधा सर्व पहात होती, मग मावशी तिच्या तब्येतीविषयी सांगू लागली. ऐकंदरीत नंदाचे घरात येणे मावशीला रुचलेले दिसलें.
तीन चार दिवस झाले असतील, अचानक मावशीचा फोन आला
“अरुण, उषा पाच हजार मागते आहे ऍडव्हान्स, तिला काही नंदासाठी खरेदी करायची आहे म्हणे, मी तिला नाही म्हंटल, तिचे मागील महिन्यांचे पैसे पोच आहेत, आता तिला पैसे कसे देणार? तिने बुडवले तर?
मी तिला म्हंटले “द्यायला लाग पैसे, ती नाही बुडवायची आणि तिने नाही दिले तर मी देईन तुझे पैसे ‘.
मावशीचे समाधान झाले असावे. तिने उषाला पाच हजार दिले बहुतेक कारण दुसऱ्या दिवशीच तिचा परत फोन आला “अरे अरुण,काल मी उषाला पाच हजार दिले मग दोघी बाहेर गेल्या, तिने नंदासाठी ड्रेस घेतले, चप्पल घेतले पण मला कमाल वाटली तिने माझ्यासाठी कॉटनचे मस्त गाऊन आणले,घरात चालायला मऊ स्लीपर आणले, फ्रीझला कव्हर आणले, मिक्सरला कव्हर आणले, बघ.. या गोष्टी हव्याच होत्या.. माझ्या लक्षातच आले नव्हते.. मऊ स्लीपर मुळे मला घरात फिरायला बरे जाते ‘.
एकांदरीत मावशी समाधानी होती हे बरे, नाहीतर माझी धावपळ होणार होती.
पुढील रविवारी मी गेलो तेंव्हा मावशी, उषा आणि नंदा पत्ते खेळत होती, त्त्यांचा पाच तीन दोन खेळ रंगात आला होता. मला पहाताच मावशी म्हणाली “अरुण, खुप दिवसांनी पत्ते खेळतेय मी, या नंदाने हे पत्ते शोधून काढले बघ, आता नंदा मला हरवते आहे एकसारखे.
मावशी कृतकोपाने नंदाकडे पहात म्हणाली.
मला मावशीचे हे रूप नवीन होते. मग मी थोडावेळ त्यान्च्या खेळात सामील झालो, माझ्या लक्षात आले मावशी आणि नंदा यांचे सूत कमालीचे जुळले होते.
मावशी आता हळूहळू चालू लागली, आता फिजिओ येणे बंद झाले पण उषा आणि नंदा तिच्या पायाला मालिश करू लागल्या आणि मावशीला ते आवडू लागले.
एकदा मावशीने मला फोन केला “अरे अरुण, येताना बुद्धिबळसेट घेऊन ये बाबा, ही नंदा मला बुद्धिबळ शिकवते म्हणते ‘….. मला कमाल वाटली.. मावशी या वयात बुद्धिबळ शिकणार आणि ते पण खेड्यातल्या मुलीकडून.. मी रविवारी बुद्धिबळसेट नेऊन दिला आणि नंदा मावशीला बुद्धिबळ शिकऊ लागली. मग मावशी सांगायची “काल उषा आणि नंदाने मला खाली बागेत नेलं.. कधी उषाने भाजी आणायला गेली असताना भेळ घेऊन आली, कधी उसाचा रस आणला.. मी समाधानी होतो. नाहीतर माझी धावपळ झाली असती.
आता मावशी उषाच्या जेवणाची तारिफ करायची, तिच्या हातचे माश्याचे कालवण तिला फार आवडायचे. एकदा मला म्हणाली “अरे या नंदाचा आवाज चांगला आहे, सतत गुणगुणत असते… काल ही काय गुणगुणते म्हणून हळूच दाराला कान लावला तर स्वातंत्रविरांचे गाणे “, ने मजसी ने मात्रभूमिला.. सागरा प्राण तळमळला ‘…
मला एवढा अभिमान वाटला या पोरीचा, नाहीतर मुंबईतील पोरी कसल्या कसल्या जिंगल्स ऐकत असतांत ‘.
आता मावशी, उषा आणि नंदा यांचे त्रिकुट जमले होते, आयुष्यात कधीही कुणालाही जवळ न करणारी मावशी या दोघी मायलेकीच्या अगदी जवळ गेली होती.
म्हणेपर्यत मे महिना संपत आला आणि उषाला गावी जायचे वेध लागले, तिची कोण वाट पहात होते म्हणून नव्हे तर नंदाची शाळा सुरु होणार होती आणि मावशीकडे सहा महिन्यासाठीच ती आली होती. मी उषाचे आणि नंदाचे रेल्वे तिकीट काढले आणि मावशीला फोन करून सांगितले, मावशी काही बोलली नाही.
उषा आणि नंदाने गावी जायची तयारी केली. आपली बॅग त्या आवरू लागल्या. नंदाला मुंबई फार आवडली म्हणे पण आता तिची शाळा सुरु होणार होती आणि मुंबईत तसे तिचे कुणीच नव्हते.
मी चार जून रोजी या दोघीना रेल्वेत बसवायला म्हणून मावशीच्या घरी गेलो. मावशी एकटी हॉलमध्ये बसुन होती. माझ्याशी बोलली नाही. मी आतल्या खोलीत जाऊन उषाला मी आल्याचं सांगितलं. त्या दोघी तयारीत होत्या. त्या दोघी ब्यागा घेऊन बाहेर आल्या. दोघीनी मावशीला नमस्कार केला. मावशी गप्प होती. दोघींच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं.
उषा आणि नंदा शेवटचे हे घर पहात होत्या. उषा या घरात सहा महिने राहिली आणि नंदा दोन महिने. दोघीनी आपआपल्या ब्याग उचलल्या आणि मावशीला “येतो ‘, म्हणत डोळ्यातील अश्रू थोपवत बाहेर पडल्या. मी पण मावशीला “,, येतो ग यांना गाडीत बसवून ‘असे म्हणून बाहेर पडलो.
टॅक्सी स्टेशनकडे धावत होती. मी पुढे बसलो होतो, माझं लक्ष होतं दोघी रुमालाने डोळे पुसत होत्या.
मी दोघीना डब्यात बसवलं, अजून पाच मिनिटे होती गाडी सुटायला. एवढ्यात माझा फोन वाजू लागला. मावशीचा फोन होता
“अरुण, त्या दोघीना घेऊन ताबडतोब घरी ये, मी त्यान्च्याशिवाय राहू शकत नाही रे ‘…
“अग मावशी, असं काय करतेस? उषा सहा महिन्यासाठीच आली होती आणि नंदाची शाळा नाही का?
“ते सर्व माहित आहे मला, मी तुझी मावशी म्हणून सांगते आहे, तू त्याना गाडीतून उतरव आणि टॅक्सीने घरी आण, जास्त बोलू नकोस.. मी सांगते तसे कर.. नाहीतर गाडी सुटेल..
मी त्या दोघीना ब्यागा घेऊन उतरायला सांगितले. त्याना कळेना काय झाले?
मी स्टेशनबाहेर येत होतो, माझ्या मागून त्या दोघी.
मी परत टॅक्सी पकडली आणि मावशीच्या घरी आलो. उषा परत परत “काय झाला.. कित्याक परत आणलास ‘, असं विचारत होती. मी कसलेच उत्तर दिले नाही.
मावशीच्या घराच्या दारात मावशी दार उघडून वाट पहात होती. त्या दोघीना पहाताच ती पुढे झाली आणि दोघीना मिठीत घेऊन रडू लागली.
“, अरुण, मी नाही राहू शकत या दोघी शिवाय, एवढी वर्षे मी माणुसघाणी होते, कुणाचा सहवास मला नको असायचा पण माणसाची साथसोबत किती महत्वाची हे या दोघींच्या सहवासाने कळलं. खरंच गेले सहा महिने मी आंनदात घालवले कारण उषा होती घरात, मग ही नंदा आली.. मला बुद्धिबळ शिकवणारी.. कुणीतरी घरात लहान पण हवंच… आम्हला मुलं नाहीत त्यामुळे हे घर कस उजाड झालं होतं.. पैसे खुप असले म्हणून काय झाले.. माणसे सहवासाला नसतील तर.. काय करायचे त्या पैशाचे?
उषा, तू इथेच राहा.. माझी बहीण म्हणूंन.. नाही म्हणू नकोस उषा… तुला काही कमी पडणार नाही..
या नंदाला येथेच उत्तम शाळेत घालूया, गाण्याच्या क्लासला घालूया.. काय आवाज आहे तिचा.. तीच गाणं जपायला हवं.
उषा, नंदा तुम्ही माझ्याजवळ हव्यात.. नाही म्हणू नका.. आपण आंनदात राहू.. होय म्हण उषा..
होय म्हण ‘.
मावशीचे अश्रू पुसत उषा मान हलवून “होय.. होय ‘म्हणत होती.. नंदा केंव्हाच मावशीला बिलगली होती.
मी कोपऱ्यात उभा राहून डोळे पुसत पुसत ही साथसोबत पहात होतो.
प्रदीप केळुस्कर 9307521152/9422381299

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}