विषय:- श्रेष्ठ कर्माची व्याख्या. ………….शिवाजी कणसे
🤴मनन चिंतन 💚
विषय:- श्रेष्ठ कर्माची व्याख्या.
Disclaimer (टीप):- इथं श्रेष्ठ कर्म म्हणजे, अकर्म व निष्काम कर्म असा अर्थ अपेक्षित नसून, श्रेष्ठ कर्म त्यातल्या त्यात उच्च प्रतीचं कर्म असा अर्थ घ्यावा.
लहानपणी किर्तन प्रवचन, भगवतगीता, ज्ञानेश्वरी ऐकून एक प्रश्न सारखा भेडसावत होता, श्रेष्ठ कर्माची एका वाक्यात व्याख्या काय असू शकते?
श्रेष्ठ कर्माची मार्गदर्शक तत्वे वाचायला, ऐकायला बऱ्याच ठिकाणी मिळतील पण स्पष्ट व्याख्या नसून अमुक कर्म पाप व अमुक कर्म पुण्य अशी उदाहरणे सांगितली जातात.
यावरून एक ध्यानात येईल की, कर्माची गती अति गहन व गुह्य आहे. कर्माचा सिद्धांत आपोआपच काम करतो, माणसाच्या विचार व तर्काच्याही पलीकडे हा सिद्धांत आहे कारण विचार, आचार यातील हेतू किंवा भाव या आधारे कर्माची गुणवत्ता ठरते. बस्स एवढचं म्हणता येईल कर्म न करणं हेही कर्मच असून कोणतंच कर्म दोषरहित असूच शकत नाही. म्हणूनच कर्म फळाची अपेक्षा न धरता कर्म करण्याचा आदेश गीतेत सांगितला आहे.
साधी सोपी पण सूक्ष्म मार्गदर्शन करणारी व यथार्थ सत्य जीवनकला आत्मसात करण्यासाठी काही महत्वाची सूत्रे हाती लागली किंवा स्वयं व्याख्येत ती समाविष्ट केली.
उदा.
१) चूक किंवा बरोबरची व्याख्या वैश्विक नसते, ती स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थिती सापेक्ष असते.
२) आजरोजी तरी या जगात कोणताच मनुष्य, देहात राहून परिपूर्ण (परफेक्ट) असूच शकत नाही.
वरील सूत्रांच्या आधारे सोपी पण सहजासहजी न समजणारी व्याख्या मला पटली, ती म्हणजे,
जो आरसा आपला आहे किंवा जी मोजपट्टी आपली आहे ते इतरांच्या साठी पण वापरायचे.
साक्षी भाव म्हणजेच मी त्या ठिकाणी असेल तर काय? यावर आत्मचिंतन करून समोरच्याशी कर्म करणं योग्य आहे.
उदा. तुम्ही तुमच्या सुनेकडून जी अपेक्षा ठेवता तशी अपेक्षा तुमच्या बहीण किंवा मुलीकडून तिच्या सासरच्यानी ठेवली तर तुम्हाला चालेल का?. म्हणजे सासरी नांदायला गेलेल्या माझ्या बहीण, मुलीसाठी एक मोजपट्टी/आरसा व सुनेसाठी दुसरा आरसा असे नको.
जर मलाही कधी कधी उशीर पर्यंत झोपावं वाटतं तर मग घरातील इतरांना पण तसंच वाटत असेल ना. हा आरसा किंवा मोजपट्टीचा साक्षी भाव समान दृष्टीकोन वापर होय. साक्षी भावाची सुक्ष्मता जशी जशी वाढत जते तसा तसा आपल्या कर्मातील सम न्याय दृष्टीकोन वाढत जातो.
थोडक्यात काय तर माझा तो स्वाभिमान व समोरच्याचा तो गर्व हा डबल स्टॅंडर्ड दृष्टीकोन नको.
वरील सूत्र वापरून प्रत्येक कर्म करीत गेलं की हळूहळू श्रेष्ठ कर्माच्या व्याख्येच्या जवळ आम्ही पोहचायला लागतो. त्याच्या पुढची पायरी आहे निमित्त कर्म. निमित्त कर्म भाव जसा जसा वाढत जातो तसा तसा त्या कर्मातील अहंकार कमी होत जातो.
श्रेष्ठ कर्म करताना व रिस्पॉन्स देताना, साक्षी भाव व निमित्त भाव ठेऊन मला माझ्या कर्मावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मला माझ्या कर्माच्या बँक बॅलन्स वर भर द्यायचा आहे.
🌼शिवाजी कणसे🌼16.04.2022🌞सुधार 15.03.2023🌼🚩8208870761🌞🕉️