Classifiedजाहिरातमंथन (विचार)युनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

व्यावसायिकता, अर्थात सोप्या भाषेत “𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗𝚊𝚕𝚒𝚜𝚖” …. व्ही एस पटवर्धन

व्यावसायिकता, अर्थात सोप्या भाषेत “𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗𝚊𝚕𝚒𝚜𝚖”:

नुकतेच भारतात वन डे वर्ल्ड कप अंतर्गत बरेच सामने खेळवले गेले. प्रत्येक सामन्याआधी, सामन्यादरम्यान व नंतर, बहुतेक सर्व  दूरचित्रवाणी चॅनेल वर क्रिकेट मधील तज्ञ, माजी खेळाडू यांच्या चर्चा घडवून प्रेक्षकांना आपल्या चॅनेलशी जखडून ठेवण्यासाठी मोठी चढाओढ लागली होती. सामन्याआधी होणाऱ्या चर्चेदरम्यान साधारण सगळीकडे एक प्रश्न अगत्याने विचारला जायचा, विशेषतः भारताच्या सामन्याआधी, “आज कोण जिंकेल? ” बहुतेक सर्व भारतीय तज्ञ सांगायचे, “मेरा दिमाग कहता है ***, लेकिन मेरा दिल कहता है भारत”. ह्या उत्तरावरून मला एक गोष्ट लक्षात घ्यावीशी वाटते. माणूस विचार करून, निर्णय घेऊन कृती करतो, तेव्हा त्यामागे प्रामुख्याने, बुध्दी आणि भावना ह्यांचा आधार घेतो. बुध्दीच्या आधारे विचार करताना वास्तवाचे भान असावे लागते, जसे आपल्या टीमचे व विरोधी टीम मधील खेळाडूंचे कौशल्य, मैदानावरील व हवामानाची त्या दिवशीची परिस्थिती. याला व्यावसायिकता म्हणता येईल. नाही तर फक्त देश प्रेमाच्या भावनेतून, भारतच जिंकणार असेच म्हणणे क्रमप्राप्त होते.

व्यवसाय करताना आपल्याला दोन बाबतीत काळजी घ्यावी लागते, त्या म्हणजे व्यवस्थापन आणि व्यावसायिकता. हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की, या दोन्ही गोष्टी संबंधी विचार करताना बुध्दीचाच विचार करून घेतलेला निर्णय कृतीत उतरवला जातो, जाणे आवश्यक आहे. व्ययस्थापनेतील शिस्त अंगीकारली नाही तर व्यवसाय टिकवून ठेवणे कठीण असते आणि व्यावसायिकतेचे पालन करताना चालढकल झाली तर त्याचा सरळसरळ परिणाम नफ्यावर होतो. यावरून असं म्हंटलं तर वावगं ठरू नये की, व्यावसायिकता हा बुद्धीशी निगडित विचार, कृती करण्याचा विषय आहे.

व्यावसायिकतेचा जरा व्यापक विचार केला तर त्याचा संबंध नुसत्या नफा-तोट्याशी न जोडता, आपल्या रोजच्या कौटुंबिक, सामाजिक विचार, निर्णय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कृती याच्याशी जोडला गेला तर आपले जीवन सुलभ व आनंदी होऊ शकेल. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाचे चुकीचे वागणे आई भावनेच्या आधारे पाठीशी घालत असेल तर बुद्धीला ते पटणारे असणारे नाही किंवा आईचे असं वागणं व्यावसायिकतेला धरून नाही. अशामुळे सर्व कुटुंबाचे नुकसान होते. इथे भावना आणि बुद्धी यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. आई-मुलाचे संबंध जरी भावनिक असले तरी एक पालक किंवा मार्गदर्शक म्हणून आईने आपल्या वागणुकीत व्यावसायिकता दाखवणे अत्यंत महत्त्वाचे.

याउलट, जर एखादा खूप श्रीमंत माणूस गरजूंना भावनिक विचार न करता योग्य वेळी मदत नाकारत असेल तर ते देखील स्वीकारार्ह नाही, अगदी व्यावसायिकतेचा विचार करून सूद्धा.

व्यावसायिकतेचा एक मुख्य घटक, शिस्त शिकवतो. घरातील सामानसुमान ठेवताना ते आपल्याला सोईस्कर होईल असे ठेवणे ही झाली व्यावसायिकता, पण तेच जर सामानाची मांडणी नुसती सौंदर्य दृष्टीने केली तर ती भावनेच्या आधारे केलेली कृती ठरेल. योग्य वेळी, आवश्यक वस्तू हाती येईल यासाठीची शिस्त म्हणजे व्यावसायिकता.

कुठलेही कला-कौशल्य आत्मसात करताना बुद्धी बरोबर भावनेचा अंगीकार आवश्यक असतोच. पण ही कला किंवा कौशल्य इतरांपुढे सादर करताना व्यावसायिकता दाखवली तर ती लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोचवता येते. चित्रकार जेव्हा त्याने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन करतो तेव्हा तो त्या चित्रांची व्यवस्थित मांडणी करतो, ही झाली व्यावसायिकता.

जशी कला-कौशल्य सादरी करण्यात व्यावसायिकता दाखवणे रास्त आहे, तसेच आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील आपल्या आचार-विचारांचे आदानप्रदान करताना आपण व्यावसायिकता आणली, जोपासली तर समाजात आपली स्विकारहार्यता वाढायला मदत होईल. म्हणजे बघा, आपला पोषाख जर आपण हजेरी लावत असलेल्या प्रसंगानुरूप असेल तर चार लोकांत मिसळताना तुम्हाला नुसते बघून देखील लोक प्रभावित होतील. तेच तुमच्या संवादाबद्दल. एखादा विचार समजावून सांगताना वापरलेली भाषा, विषयाची केलेली मांडणी, बोलण्यातील स्वरांचा चढ उतार ह्या सर्वामुळे लोकांना तुमचे विचार पटवून देणे सुलभ होईल. आयुष्यात यशस्वी  होण्यासाठी अशी व्यावसायिकता आत्मसात करणे क्रमप्राप्त आहे.

Mr. V. S. Patwardhan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}