*आनंदची तपस्या*
शहराच्या चौकात एक नावाजलेले ‘तपस्या’ नावाचं हाॅटेल, कायम गजबजलेलं अन तोबा गर्दी असायची तिथं ,शहरात ३०-४० वर्षात नावारुपाला आलेलं प्रशस्त असं हे तपस्या हाॅटेल. त्यांच चौकात एक छोटेखाणी नविनच चालु केलेलं ‘आनंद’ नावाचं हाॅटेल, अगदी तपस्याच्या समोरच थाटलेलं, नलिनी नावाची वृद्ध महिला ते चालवत होती फारशी गर्दी नसायची पण घाईची अन् तपस्याला मधे टेबल न मिळालेली गिर्हाइकं यायची या छोट्या हाॅटेलात, चहा नाष्टा करून निघुन जायची,जेमतेम चालायचं म्हातारीचं हे हाॅटेल, तसा रिटर्न जाणार्या गिर्हाइका मुळे तपस्याला तसुभरही फरक पडत नव्हता.
पण एक गोष्ट खास होती आनंद हाॅटेलची एकदा तिथं गेलेला कस्टमर पुन्हा तिथेच जायचा, चवच तशी होती आनंद हाॅटेलची, आणि खुप प्रेमाने वागवत असे हाॅटेलची मालकीण. जेमतेम सहा सात टेबलचं आनंद हाॅटेल स्वच्छता अन् टापटीप मुळे खूपच प्रसन्न असायचे,पण सर्वांना आपल्या हाताची चव कळावी असं नलिनी काकूला खूप वाटायचं पण तपस्या हाॅटेल कडे पाहुन डोळ्यात पाणि आणुन पाहत रहायची. आनंद मध्ये आलेल्या कस्टमर मध्ये ‘तपस्या’ हाॅटेल बद्दल चांगले बोलणं चालु असलं की कान देवुन ऐकत असे आणि आनंदी होतं असे, फावल्या वळेत तपस्या हाॅटेल कडे डोळे भरून पहायची प्रगती पाहुन डोळे भरून यायचे नलिनी काकूचे. तसं खूप कमी वेळात आनंद हाॅटेल ही जेमतेम चालत होते.
तो दिवस काहीसा वेगळा होता आनंद हाॅटेल साठी, एक ६०-६५ वयाचा वृद्ध एक कप काॅफी ॲार्डर करून कोपर्यात बसला ,नलिनी काकूने गरमगरम कप त्या वृद्धा समोर ठेवला, एक तरूण जोडी (कपल)बाजूच्याच टेबलावर बसुन गप्पा मारत बसलेलं होतं, तो वृद्ध त्यांच्या कडे पाहत काॅफी पित होता हे खुप वेळ चालु होतं. नलिनी काकूनं एक कटाक्ष वृद्धाकडे टाकला अन् नकारार्थी मान हलवत गालातल्या गालात हसुन पुन्हा कामावर लक्ष केंद्रीत केलं, पण त्या जोडीचं कुठेच लक्ष नव्हतं गप्पा मारण्यात तल्लीन झालेल ते कपल खुप वेळ बसलेलं असावं असं टेबला वरच्या प्लेट्सच्या गर्दीवरून लक्षात येत होतं.काॅफी पिवुन झाल्यानंतर वृद्धाने स्वःताचं अन् त्या कपलचं पण बिल देत त्यांच्याकडे पाहुन हसत निघुन गेला.हि गोष्ट कपलच्या लक्षात येताच पैसे देण्यासाठी वृद्धांचा पाठलाग केला पण तो पर्यंत तो निघुन गेला होता.ते पुन्हा नलिनी काकू कडे येवून विचारपुस करू लागले त्यांवर काकूंनी सांगितले की दोन- तिन दिवसांनी तो वृद्ध येत असतो इथे, तुम्ही पुढच्यावेळी आले की विचारा त्यांना, ते ऐकुन ते कपल तिथून निघून गेले. आता असा प्रकार नित्य नेमाने होवू लागला,रोज कोणत्याना कोणत्या कपलचं बिल तो वृद्ध देवू लागला. नलिनीच्या हा प्रकार लक्षात येत नव्हता,न रहावुन एक दिवस तिने वृद्धाला विचारलं कि तुम्ही असं का करत आहात त्यांवर तो वृद्ध पुढच्या ‘तपस्या’ हाॅटेल कडे पाहुन हसला अन् निरूत्तर झाला, नलिनी काकूला कळायला काहीच मार्ग नव्हता.
काही दिवसांनी एक योग जुळून आला जेवढ्या कपल्सचं बिल भरलं गेले होते त्यातले काही कपल्स एकाच वेळी आनंदला आले आणि तो वृद्ध ही त्याच वेळी तिथे आला, तो तिथं येताच सगळ्यांच्याच नजरा या वृद्धाकडे वळाल्या सर्वजण उठुन उभे राहिले अन् प्रश्नांचा भडिमार चालु केला ते पाहुन नलिनी काकू बाहेर आल्या,त्या वृद्धांनी सर्वांना शांत करत बसायला सांगितलं अन् बोलता झाला, ” मला जे कपल परफेक्ट आणि छान वाटतं त्यांचच बिल मी भरतो,मला माझे तरूणपण जगल्याचा आनंद मिळतो म्हणून मी तुमच्या सर्वांची बिलं भरली आहेत अन् पैसे परत करून माझा आनंद हिरावून घेवु नका प्लीज ” त्यांवर सगळेजण निरूत्तर झाले , नलिनी काकू मात्र स्तब्ध झाल्या, बोलुन झाल्यावर तो वृद्ध निघुन गेला. तो दिवस आनंद हॉटेल साठी काही वेगळच गणित मांडून गेला. झालेली घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली,आनंद मध्ये कस्टमरचा ओघ वाढू लागला.आनंद हाॅटेल मध्ये बेस्ट कपलला बिल माफ होतं असा समज सगळीकडे झाला, आणि अर्थातच चविच्या बाबतीतच आनंद तपस्यापेक्षा सरस आहे हे लोकांना कळलं,आता नलीनी काकूचा कामाचा व्याप वाढला होता त्यामुळं काकूने स्टाफ वाढवायला सुरूवात केली,काही दिवसातच आनंद प्रशस्त झाले, आता मात्र तपस्या हाॅटेलला फरक पडू लागला जेमतेम कस्टमर दिसायचे तिथं, हि बातमी तपस्याच्या मालकाच्या कानावर पडली ,कस्टमर कमी झाल्याने तपस्याचा मालक आकाश आता अस्वस्थ झाला होता त्याला आनंद हाॅटेल बद्दल राग यायला लागला होता, पण काहीच करू शकत नसल्याने तो हतबल झाला होता. हाॅटेल मध्ये स्वःताच जातीनं लक्ष देवु लागला होता, पण आनंदमुळे तपस्याचं सगळं गणितच बिघडलं होतं,काही दिवसातच तपस्या डबघाईला आले, यावर पर्याय म्हणून आकाशच नलिनी काकूला भेटायला त्यांच्या घरी जायचे ठरवलं.
नलिनी काकू रात्री उशीरा हाॅटेल बंद करून घरी जात असताना आकाश त्यांना पाहतो, जवळच्याच सोसायटीत नलिनी काकू राहत असल्याने चालतच घरी जात असत,आकाश त्यांचा पाठलाग करून दारा जवळ जावुन उभा राहतो दारावरची पाटी वाचतो ‘सौ नलिनी आनंद ‘ घराची बेल वाजवायला त्याचे धाडस होत नाही,पण थोडा थांबून तो डेयरिंग करून बेल वाजवतो, आतुन काही वेळाने नलिनीकाकूचा पति आनंद दरवाजा उघडतो, आकाशला आत यायला सांगुन दरवाजा बंद करतात, नलिनी काकू कोण आलं पाहायला बाहेर येतात काकूला पाहुन आकाश दोघांचे पाय पकडून ” आई बाबा माझी चूक झाली मला माफ करा म्हणत रडू लागतो, त्यावर नलिनीकाकू त्याला हाताला पकडून उभं करतात, बाबा रागाने बाहेरच्या बाल्कणीत जावुन उभे राहतात. “आई सांग ना बाबांना मला माफ करायला माझी चूक झाली,तुम्ही पुन्हा घरी या सगळं पहिल्यासारखं होईल ” नलिनी काकू त्यांच्याकडे पाहते ” आकाश, तुला माफ करणारे आम्ही कोण आम्हाला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय तर सर्वस्वी तुझा होता, तुझ्या बापाने जिवापाड जपलेलं तपस्या तू त्यांच्या पासून हिरावून घेतलंस, पण तु तुझ्या बाबाला ओळखलं नाहीस जो माणुस तपस्या हाॅटेलला नावारुपाला आणु शकतो तो आनंद ला मोठं करायला काही करु शकतो हे तुझ्या लक्षात यायला हवं होतं, मग आता माफी मागून काय साध्य करायचंय तुला ” त्यावर आकाश खुप गयावया करतो पण त्याचा काहीच उपयोग होत नाही, त्यावर बाबा म्हणतात “नलिनी …….जावुदे ते सगळं अन् जायला सांग त्याला, ते ऐकुन आकाश त्यांना हात जोडतो अन घराबाहेर पडतो.
नलिनी बाल्कनीत येवुन पति आनंद शेजारी उभी राहते आणि गेट मधुन बाहेर जाणाऱ्या आकाश कडे पाहत म्हणते “आनंद हाॅटेल खुप मोठं झालं आज……पण मनांत एक प्रश्न तसाच आहे …..” त्यावर आनंद काय म्हणुन विचारतो, त्यावर नलिनी म्हणते “ते तुम्ही कपल्स ला तुम्ही काय म्हणाले …..मला माझे तरूणपण जगल्याचा आनंद मिळतो म्हणून मी तुमच्या सर्वांची बिलं भरली आहेत अन् पैसे परत करून माझा आनंद हिरावून घेवु नका प्लीज…”
…….म्हातारपणातही चांगली मार्केटींग स्ट्रॅटर्जी वापरलीत, त्यावर आनंद म्हणतो “बंदर कितना भी बुढ़ा हो जाए गुलाटी मारना नहीं भुलता” त्यावर दोघंही मोठ्याने हसतात……!