रुग्णवाहिका…
सुरेश आपल्या काही सहकाऱ्यासोबत हॉस्पिटलच्या बाहेर लॉन मध्ये गप्पा मारत बसला होता…गेल्या दहा वर्षांपासून तो या हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेवर चालक म्हणून कामाला होता…
नुकताच एका एक्सिडेंट झालेल्या रुग्णाला घेऊन तो आला होता…खरंतर तो रुग्ण अपघातात जागेवरच गेला होता पण सोपस्कर म्हणून हॉस्पिटलमध्ये आणले होते…सवयीने सुरेशला या गोष्टी नित्याच्याच होत्या…गाडी लावून तो त्याच्या सारख्याच इतर सहकार्यांच्या सोबत गप्पा मारत बसला…
बोलता बोलता त्यांचा विषय ‘सुट्टी टाकून कुठेतरी फिरायला जायचं’ यावर आला आणि त्यांच्या गप्पांना रंग चढला…खरंतर रोज अशी दुःखी कष्टी माणसे, वेदनेने त्रासलेले रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांचे निराश हताश चेहरे आणि अधुन मधून एखाद्याचा रुग्णाच्या मृत्यु आणि मग मयताच्या नातेवाईकांचा रडण्याचा आक्रोश याने ते सर्व विमनस्क झालेले होते.. कुठे तरी त्यांना विरंगुळा हवा होता…
शेवटी बऱ्याच काथ्याकुट केल्यावर त्यांनी सगळ्यांनी सहमतीने गोवा फिरायला जायचे नक्की केले…सगळ्यांनी आपापल्या सुट्यांचे प्लॅन करुन चार दिवस रजा टाकून जायचे ठरवून टाकले…
प्रश्न आता गाडीचा होता… तर मग सुरेश ने शक्कल लढवली…रुग्णवाहिकेत काहीतरी बिघाड आहे आणि ती दुरुस्तीला टाकायच्या नावाखाली गोव्याला तीच घेऊन जायचे हे त्यांनी आपापसात बोलून नक्की केले…
सर्व तयारी झाली…आता चारदिवस नुसती मज्जा त्यामुळे गाडी चालवायचे पण टेंशन नको म्हणून त्यांच्यातल्या एकाने बाहेरचा ड्रायव्हर ठरवून टाकला…
गाडीच्या मागच्या बाजूची जरा जुगाड़ बाजी करून त्यांनी आरामात हातपाय पसरून प्रवास व्हावा म्हणून खाली गाद्या वगैरे टाकल्या…
हिवाळयाचे दिवस त्यांनी पहाटे लवकर निघायचे ठरले म्हणजे लवकर गोव्यात पोहोचु आणि मजा करायला जास्त वेळ मिळेल हा त्यांचा मानस…सगळ्या प्रकारच्या ओल्या सुक्याची व्यवस्था गाडीत झाली होती…
ठरल्या दिवशी ते पहाटे तयार झाले…गाडीत सर्व सामान टाकले गेले पण ड्रायव्हरचा पत्ता नव्हता…सगळे अस्वस्थ व्हायला लागले…त्याला फोन लावणार तेवढ्यात लांबुन तो गाडीवरून कुडकुडत येताना दिसला…इतका उशीर का केला म्हणून त्याला सर्वानी शिव्या घातल्या पण सरतेशेवटी सर्व निघाले…
मागच्या बाजूला सगळे मस्त हातपाय पसरून ऐसपैस बसले आणि त्यांचा प्रवास सुरु झाला… चेष्टा मस्करी, हास्य विनोद नुसता कल्ला सुरू होता…
एखादा तास झाला असेल तेवढ्यात त्यांच्यातल्या एकाचा ज्याने ड्रायव्हर ठरवला होता त्याचा मोबाईल वाजला…पुढे जो गाडी चालवत होता त्या ड्रायव्हरचा फोन होता…
‘मायला हे गाडी चालवता चालवता आपल्याला का फोन करतय?’ असं चिडून म्हणत त्याने फोन उचलला…
” काय रे कशाला मागे फोन करतोय?…”
” दादा मला माफ करा मला गोग्याला यायला नाही जमणार माझा मुलगा आजारी आहे …” पलीकडून आवाज आला…
” काय?…येडावला की काय?…काय बावळ्यासारखा बोलतोय, पुढे बसून नीट गाडी चालव गपचूप?…”
” नाही दादा…मी कुठं गाडी चालवतोय?… मी तर माझ्या घरी आहे… ”
“अरे मग गाडी कोण चालवतयं ?” असं म्हणत त्याने मधला पडदा बाजूला केला आणि गाडी चालवणाऱ्या कडे पाहिले आणि सर्व भीतीने उडालेच…
पुढे बसून गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने आपली मान 180 डिग्री मध्ये मागे वळवून त्यांना म्हंटले…
” बसा की गपचुप…मी नेतो की तुम्हाला गोव्याला ”
तसा सुरेश किंचाळला
“अरे हा तर काल मी एक्सिडेंटवरुन घेऊन आलेला जागेवरच गेलेला मुडदा…” सुरेश असे म्हणताच सगळ्यांचे चेहरे पांढरेफटक झाले होते…
चार बेशुध्द पडलेले माणसे घेऊन गाडी गोव्याच्या दिशेने चालली होती…
कुलकर्ण्यांचा ” काहीच्या काही लिहिणारा ” प्रशांत