रुष्ट……… सचिन मधुकर परांजपे (पालघर)
रुष्ट……….
….त्याला आज संन्यास घेऊन तब्बल ९० दिवस पूर्ण झाले होते. मनात अक्षरशः कोणतेही संकल्प विकल्प न ठेवता तो शांतपणे मजल दरमजल करत चालत होता. आता दिशा, कामं, गती अशी कोणतीही बंधने त्याच्यावर नव्हती. नात्यागोत्याचे बंध पूर्णविरामात विरले होते. त्याचा संन्यास हा #शुन्यसंन्यास होता..म्हणजे जवळ अक्षरशः काहीही न बाळगणे हे या संन्यासधर्माचे वैशिष्ट्य होते. अंगावर लज्जारक्षणापुरते कपडे वापरायचे, ते फाटेपर्यंत. फाटेपर्यंत कोणीही कपडा दिला नाही तर नग्नावस्थेत रहायचे, पण तोपर्यंत कोणीतरी धडके कपडे देई. ते दिले की जुनी वस्त्रे त्याग करुन ते नवे कपडे घालावेत….रोज आंघोळ करायची, अंगावरच्या कपड्यानीच अंग पुसून पुन्हा तेच कपडे घालावेत. कोणी दिलं की अन्नग्रहण करावं, तहान लागली की ओंजळीत पाणी घेऊन प्यावं…रात्री धर्मशाळेत किंवा देवळात थांबावे. सकाळ झाली की पदयात्रा सुरु…. रोज मनात आलं की ध्यानाला बसावं…. नामस्मरण करावं…
सप्तचक्रांचं ध्यान करता करता मुक्तीचा अभ्यास करावा. त्याला त्याच्या गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर तो निमूटपणे वाटचाल करत होता. तो सुरेख आवाजात भजनं गाई. त्या भजनात कधी निर्गुण निराकार देवाची आळवणी केलेली असे. तर कधी अद्वैतभक्तीचा भाव असे. असाच एकेदिवशी चालत चालत तो एका नगरात प्रवेशला. देहावर नुकताच कोणीतरी दिलेला एक नवा अंगरखा आणि नेसूला कंबरेवर गुंडाळलेला जाड पंचा होता. वेशीवरच्या नदीत नुकतंच सचैल स्नान झाले होते. नामस्मरण अखंड सुरु होते. आपल्याच धुंदीत तो शांतपणे चालत होता. रस्त्यावरुन येणारी जाणारी लोकं त्यास अभिवादन करत होते….
अशावेळी विरुद्ध बाजूने, त्या नगरातील एक अतीश्रीमंत सावकार येत होता. त्याच्या सोबत त्याचे काही बलदंड लठैत (रक्षक) होते. याच्यासारख्या भणंग भिकाऱ्याला लोक आनंदाने अभिवादन करत आहेत आणि आपल्याला भिऊन मुजरा करत आहेत ही बाब सावकाराला खटकली…. साला, कुठला हा फाटका भणंग भिकारी आणि लोक इतके विनम्र कसे?… आज याची मस्करी करु, याला उपाशी ठेवू… तो पुढे जाता सावकार त्याच्या अंगरक्षकांसह उलट फिरुन याच्या मागोमाग जाऊ लागला… कोण यास अन्न देते तेच बघतो मी. लठैतांना सुचना दिल्या…. जो कोणी याच्यासाठी दुपारचे अन्न घेऊन येईल त्यांना रोखायचे…. ब्बास!!!
दुपार झाली… उन्हे वाढू लागली. दूरवरुन हा येताना बघून एक लहान व्यापारी एका हातात पुरीभाजी आणि एका हाती पाण्याचा खुजा घेऊन पुढे सरसावला. तो पुढे येताना बघून दोन्ही लठैत काठी उगारुन धावले. याद राख, याला अन्न दिले तर. सरकारांचा हुकूम आहे. व्यापाऱ्यानेच काय, अर्ध्यापाऊण गावाने सावकाराकडून कर्ज घेतले असल्याने त्याचा शब्द ओलांडण्याची कुणाची हिंमत नव्हती. अन्यथा मालमत्तेवर उगाच टाच आली असती. व्यापारी दुःखी अंतःकरणाने बाजूला झाला. एक कापडविक्रेता, एक शेतकरी, एक फळे विकणारी बाई यांनाही परस्पर हाकलण्यात आलं… सावकाराने बसलेल्या रथाच्या एका कोनाड्यातून सुकामेवा आणि थंड जलप्राशन करुन तो याची गंमत बघू लागला. हा तितक्याच स्थितप्रज्ञतेने चालत होता…. सूर्य तापलेला होता…
आणि इतक्यात पुढच्या वळणावर एक दहाबारा वर्षाची अतिशय सुंदर मुलगी जणूकाही याचीच वाट बघत असल्याप्रमाणे उभी होती. रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते. तिच्या हातातील पोटली बघताक्षणी लठैत पुढे सरसावले पण पुढच्या क्षणी फेफरं आल्यागत किंचाळत लांब फेकले गेले. या मुलीने किंवा तिच्या घरच्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले नव्हते. उरलेले दोन अंगरक्षक जे सावकारासोबत होते ते पुढे धावले पण तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच पक्षघाताचा झटका बसून ते मार्गातच आडवे झाले… सावकार बघतच राहिला.
तो येताक्षणी तिने त्याला हात धरुन शांतपणे शेजारील घनदाट वृक्षछायेतील पारावर नेलं. आणि मोठ्या प्रेमाने एका पत्रावळीवर भात, आमटी, मऊसूत पोळ्या, एक पालेभाजी आणि जिलबी, द्रोणात मठ्ठा असं वाढलं. शीतल जल एका चांदीच्या पेल्यातून दिलं. तो तितक्याच स्थितप्रज्ञतेने खाऊ लागला. आपल्या बलदंड लठैतांना हातही न लावता जमीनदोस्त करणारी ही चेटूक जाणणारी कुणी असावी या भितीने सावकार दबकत रथातून उतरला…तिने मान वेळावून त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला… हा चेहरा ओळखीचा आहे? कुठे बरं बघितला?
आता तिच्या चेहर्यावर छद्मी हास्य होतं, “मूर्ख सावकारा, अरे मी श्रीलक्ष्मी…माझा चेहरा विसरलास? राजस्थानी कारागिराकडून संगमरवरात माझी मूर्त कोरुन मला तिजोरीत ठेवलं होतंस ना. मी घुसमटत होते. ना दानधर्म, ना यज्ञकर्म, ना गोशाळेत मदत, ना अन्नदान…कुठेही माझा विनियोग नाही. सत्पात्री याचकांना विन्मुख धाडून तुझी पापं वाढत होती. गहाटवट ठेवलेली स्त्रीधने तुला शाप देत होती. बळजबरीने लुबाडलेल्या जमीनी शापित होत होत्या… अन्नदान तर नाहीच पण आज या संन्यासी साधकाला कुणी अन्नदान करु नये यासाठी तु नीचपणाची पातळीही सोडलीस…. आज मी मुक्त झाले खऱ्या अर्थाने…. आता मला बंधन नाही. तुझ्या चांगल्या कर्मांचा हिशोब आज पूर्ण झाला. इथे आपलं नातं संपलं….” ती म्हणाली
“पण देवी मॉं….” सावकार म्हणाला “मी अत्यंत दक्षतेने आपली काळजी घेतली. कुठेही जाऊ दिले नाही”
“अरे मूर्ख माणसा…माझी प्राप्ती हा पुरुषार्थ आहेच पण माझा सत्पात्री विनियोग, माझा सन्मार्गी खर्च, गरजूंना दानधर्म, धर्मकृत्ये, अन्नदान हा महापुरुषार्थ आहे. जिथे हे होत नाही तिथे मी टिकत नाही. कृपणांच्या वास्तूत मी धनरुपात असले तरी आनंदरुपात नसते. याक्षणापासून मी तुझी साथ सोडली आहे.” हे ऐकताक्षणी सावकार मृर्च्छा येऊन तिथेच कोसळला…याचं जेवण होताक्षणी हा तीचे आभार मानून शांतपणे पुढे चालू लागला. जगाची अधिष्ठात्री अन्नपूर्णा बनून तिने आपल्याला जेऊ घातले आहे याची त्यास गंधवार्ताही नव्हती… ती मग आनंदाने अंतर्धान पावली. टळटळीत उन्हात भर रस्त्यावर काही अंगरक्षक आणि एक अठरा विश्वे दारिद्र्य असणारा सावकार बेशुद्ध पडून होते….
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)